मंगळवार, १२ एप्रिल, २०१६

खाऱ्या पाण्यावर घेणार वेली टोमॅटोचे उत्पादन


खाऱ्या पाण्यावर घेणार वेली टोमॅटोचे उत्पादन

पाणी शुद्धीकरणासाठी घेतली जातेय सौर ऊर्जेची मदत

दक्षिण ऑस्ट्रेलियातील २० हेक्टर हरितगृहातील टोमॅटो लागवड ही समुद्राच्या क्षारयुक्त पाण्यापासून मिळवलेल्या चांगल्या पाण्यावर पिकविण्याचा निर्णय सनड्रॉप फार्म या कंपनीने घेतला आहे. सौरऊर्जेच्या साह्याने पाणी उकळून त्यापासून मिळालेल्या वाफेवर विद्यूत ऊर्जाही तयार करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे ही वाफ थंड केल्यानंतर त्यापासून उपलब्ध होणारे शुद्ध पाणी हे टोमॅटो वाढीसाठी वापरले जाणार आहे. हा फार्म २०१६ या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. 

समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून शुद्ध पाणी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा आवश्यक असते. ही ऊर्जा शाश्वतरीतीने मिळविण्याचा प्रयत्न दक्षिण ऑस्ट्रेलियाची राजधानी ऍडलेडपासून ३०० किमी उत्तरेकडे असलेल्या पोर्ट ऑगस्टा येथील सनड्रॉप फार्म ही कंपनी करणार आहे. २० हेक्टर क्षेत्रावर हरितगृह उभारणी करून त्यात टोमॅटो लागवड केली जाणार आहे.

असा असेल हा प्रकल्प
- संगणकाच्या साह्याने नियंत्रित करून आरश्यांचा प्रकाश व उष्णता एका उंच टॉवरवर केंद्रीत केली जाईल. त्या उष्णतेच्या साह्याने सागरी पाण्याचे रुपांतर वाफेत करून, त्यावर टर्बाईन फिरवले जाईल. त्यातून विद्यूत ऊर्जा उपलब्ध होईल. हीच वाफ पुढे अमोनिया शीतकरण प्रक्रियेद्वारे थंड केली जाईल.
- या शीतकरण प्रक्रियेची यंत्रणा कोल्ड लॉजिक या कंपनीकडून उभारून घेतली आहे. ३५ अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी १८ अंश सेल्सिअसपर्यंत थंड केले जाईल. प्रति दिन २.८ दशलक्ष लिटर पाणी त्यातून उपलब्ध होईल. त्याचा वापर पिकांच्या वाढीसाठी केला जाणार आहे.
- अमोनिया शीतकरण प्रक्रिया विस्त्ृत पातळीवर राबविल्यास अधिक पर्यावरण पुरक असल्याचे कोल्ड लॉजिक कंपनीचे प्रवक्ते इडी लेन यांनी सांगितले.

उत्पादनाआधीच तयार आहे विक्रीचे नियोजन
- प्रति वर्ष १५ हजार टन वेली टोमॅटो उत्पादन या प्रकल्पातून उपलब्ध होईल. त्याच्या विक्रीसाठी पुढील दहा वर्षासाठी ७५० कोल्स सुपर मार्केट यांच्या आऊटलेटद्वारे कऱण्याचा करार करण्यात आला आहे.

---
छायाचित्र ः
- सनड्रॉप फार्म्स च्या चाचणी प्रक्षेत्रावर वेली टोमॅटोची लागवड केली असून, त्यामध्ये उभे मुख्य उत्पादन अॅण्ड्रीयन सिमकिन्स ( स्रोत ः डिन मार्टिन)
- असा आहे हा प्रकल्प.
------------------
संपर्क ः
Eddie Lane, 61 8 8240 3333
(solutions@coldlogic.com.au)