रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

अॅलन टुरींग ः दी एनिग्मा


अॅलन टुरींग ः दी एनिग्मा 




 

तुम्हाला एकाच वेळी रहस्य, धाडस, वेडेपणा, अनोखे प्रेम, मित्र प्रेम, युद्ध, युद्धातील पेच, गुढ संदेश, गणिते या विषयावर वाचायचे असेल, तर तुम्ही अॅन्ड्र्यू होजेसने लिहिलेले - अॅलन टुरींग ः दी एनिग्मा हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

कोण हा अॅलन टुरींग असे ज्यांना वाटत असेल, त्यांच्यासाठी सांगतो, आज आपण जो संगणक, मोबाईल किंवा कोणतीही कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले साधन वापरत असू, तर अशा यंत्रांचे मूळ तिथे पोचते, त्या टुरींग मशीनचा निर्माता. हा मजकूर ज्या कोणत्याही साधनावर आपण वाचत आहात, त्यामागे त्याचीच बुद्धीमत्ता झळाळत आहे.

-------------------------------------------------------------------
नुकतेच १५ ऑगस्ट पार पडले. यावेळी नेहमी येतो तसा देशभक्तीचा, राष्ट्रभावनेचा पूर सर्व समाजमाध्यमांमध्ये वाहिला. आपणास सामान्यतः युध्दावर लढणाऱ्या सैनिकांचे प्रचंड कौतूक वाटते. कारण ते आपल्याला प्रत्यक्ष सीमेवर जिवाची बाजी लावत असताना दिसत असतात. मात्र, कोणतेही युद्ध लढताना प्रत्यक्ष लढणाऱ्याइतकेच किंबहुना त्याही पेक्षा अधिक महत्त्व गुप्तचर यंत्रणांना असते. त्यांनी मिळवलेली एकमेकांची माहिती, आधीच जाणून घेतलेले डावपेच, एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या सामान्यतः अज्ञात राहतात. असे गुप्तहेर, गुप्त प्रकल्प कधीही सर्वसामान्यांच्या नजरेला येत नाहीत. मात्र, त्यांनी युद्धामध्ये बजावलेली भूमिका कोणत्याही देशासाठी अभिमानास्पदच असली त्याचा उघड उल्लेख करता येत नाहीत, की त्यांना कोणतेही पुरस्कार, दोन स्टार, तीन स्टार दिले जात नाहीत. अशाच अज्ञात विराची कहाणी आहे ही...

च च्या भाषेने चाळवले कुतूहल

मागे एकदा अच्यूत कहाते लिखित च ची भाषा हे पुस्तक वाचनात आले होते. `च ची भाषा ः गुढ संदेश आणि माहितीची चित्तथरारक कहाणी` असे त्याचे नाव. नावाप्रमाणेच एक अनोखे विश्व माझ्यासमोर उलगडले होते. त्याविषयी एका इंग्रजी वाचन चांगले असलेल्या मित्रापाशी सहज बोललो. तेव्हा मला त्याने वरील वाक्य कोट केले. त्याने मला ज्या पुस्तकाविषयी सांगितले, त्या `अॅलन टुरींग ः दी एनिग्मा` चा शोध सुरू झाला. अखेर एका ऑनलाईन मागवून घेतले. पानांची संख्या सुमारे ८०० असल्याने तसा हबकूनच गेलो. एका महिन्यात काही वाचून होणार नाही, असे उगीचच वाटू लागले. तेव्हा फारसा विचार न करता ठरवले की जेवढे होईल तेवढे तर वाचूयात!

आणि झाली सुरूवात...

होजेस हे स्वतः ऑक्सफोर्ड विद्यापीठातील वॅडहॅम महाविद्यालयामध्ये गणिताचे प्रपाठक (ट्यूटर म्हणायचे आहे मला...बरोबर आहे ना?) आहेत. एक गणितज्ज्ञ म्हणून त्यांना कदाचित अॅलन टुरींग याने भुरळ घातली असेल. मात्र, जसेजसे पुढे त्याच्याविषयी वाचत गेले तसेतसे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू त्यांच्या समोर उलगडत गेले. गणित, शास्त्र, गणनशास्त्र (कॉम्युटिंग), दुसऱ्या महायुद्धातील त्याने इंग्लंडसाठी केलेली कामगिरी, इतिहास या बरोबरच त्याच्या व्यक्तिमत्त्वात दडलेले समलैगिकत्व आणि त्यामुळे तत्कालीन कालबाह्य कायद्यामुळे त्याला सोसावा लागणारा त्रास, जेल किंवा हार्मोनल थेरपी यापैकी एकाची करावी लागलेली निवड अशा अनेक गोष्टी एकाच व्यक्तिमत्त्वात दडलेल्या आढळून आल्या. या माणसांचे अदभूत असे चरीत्र सर्वांसमोर आलेच पाहिजे असे वाटल्याने लिहायला सुरूवात केली. १९८३ मध्ये प्रथम हे पुस्तक सर्वासमोर आले. पुढे त्याचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले.
एखाद्या व्यक्तीचे चरित्र कसे लिहिले पाहिजे, याचे काही ठाम आडाखे असतात. नायकाचे कर्तूत्त्व उठावदार करणारे अनेक प्रसंग मांडले जातात, त्याचवेळी त्याच्या समकालिनांकडे चक्क दूर्लक्ष केले जाते, अगदी दूर्लक्ष करणे शक्य नसेल तेव्हा त्यांना अडगळीत टाकले जाते, खलनायक दाखवले जाते. त्यांचे खुजे पाय दाखवले जातात. ही सर्वसाधारण रीत. मात्र, कोणालाही खलनायक न दाखवताही चरित्र लिहिता येते, ते असे, एनिग्मा सारखे...

माझे अजून संपूर्ण पुस्तक वाचून झालेले नाही, हे प्रथम कबूल करतो. पण अगदीच राहवेना. त्याविषयी कोणाशी तरी बोलावे म्हणताना एका सिनेवेड्या मित्राशी त्याविषयी बोललो. तर त्याने मला या चरित्रांवर आधारीत सिनेमा हॉलिवुडमध्ये आल्याचे सांगितले. त्यालाही नाव आठवत नव्हते. शेवटी थोडे शोधताच नाव मिळाले.

दी इमिटेशन गेम

खरेतर सिनेमा आणि कांदबरी यातील निवडायला सांगितले तर मी प्रथम कांदबरीला प्राधान्य देतो. कारण त्यापासून सिनेमा होताना अनेक तडजोडी, तोडफोडी होत असतात. स्क्रिन प्लेच्या दृष्टीने अनेक बाबी अनावश्यक म्हणून वगळल्या जातात. कधी कधी इतकी काटछाट होते की कादंबरीचे गाभा बदलून जातो.

मात्र, ८०० पानांचे ते पुस्तक माझ्यासमोर होते. त्या तुलनेत दोन तासाचा सिनेमा दुसऱ्या पारड्यात होता. निवड करायची होती. अगदीच टाळत होतो, मात्र गुरूवारी रात्री पंढरपूरवरून पुण्याकडे येतानाच्या प्रवासामध्ये सिनेमा पाहण्यास सुरवात केली. खरेतर अगदी नकळत....
मी त्यात गुंगून गेलो. अगदी मी कांदवरी बऱ्यापैकी वाचत आणलेली असली तरी त्या सिनेमाचा स्क्रिन प्ले इतका सुंदर आहे की बस्स्. ८०० पानाची कादंबरी, त्यातील नायक हा दोन तासामध्ये बसवणे हे किती अवघड असेल, याचा अंदाजच नाही. दिग्दर्शक मोर्टन टयलदुम आणि त्याचा स्क्रिन प्ले रायटर ग्रॅहम मूर यांना सॅल्यूट. त्यांच्या या कलाकृतीविषयी वेगळे बोललेच पाहिजे. या सिनेमालाही ८ अॅकेडमी अॅवॉर्डस मिळाले आहेत. बेस्ट पिक्चर, अॅक्टर बेनेडिक्ट कंबबर्च, सहाय्यक अभिनेत्री कियेरा नाइटली, ओऱिजिनल स्कोअर, प्रोडक्शन डिझाईन, डायरेक्टर फिल्म एडिंटींग इ.

एक उत्तुंग आणि महान नायक, त्याचा तितकाच उत्तम चरीत्र लेखक आणि त्याच्यावरील सिनेमाचे क्लासिक लेखक -दिग्दर्शक या तिघांच्याही प्रतिभेला सॅल्युट...

बोलल्याविना राहवेनाच... म्हणून हा पंक्तिप्रपंच.

पुस्तक वाचून झाल्यावर त्याविषयी पुन्हा सविस्तर लिहीनच. तोपर्यंत कुणीतरी ही पुस्तके वाचल्यास त्यावर नक्कीच चर्चा करता येईल. कदाचित मला न उलगडलेले काही तुमच्यासोबत बोलताना समजून जाईल.

----
वरील लेखामध्ये उल्लेखलेली पुस्तके येथे मिळतील...
च ची भाषा - लेखक अच्यूत कहाते
https://amzn.to/2L8zVKK

The Enigma =
https://amzn.to/2w82sdK

सिनेमा पाहायचा असेल तर त्याची डिव्हीडी ः
https://amzn.to/2BpRt5z