दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणांचा शास्त्रज्ञांकडून मोठ्या प्रमाणात अभ्यास झालेला आहे. त्या तुलनेमध्ये कालवडीवरील विस्तूत अभ्यास कमी झालेले आहे. उलट लहान असताना गाईंवर उष्णतेच्या ताणांचे होणारे विपरीत परिणाम संपूर्ण आयुष्यभरच नव्हे, तर पुढील पिढ्यांपर्यंतही भोगावे लागत असल्याचा दावा फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष जेडीएस कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित झाले आहेत.
उष्णतेच्या ताणामुळे लहान कालवडींच्या एकूण व अवयवांची वाढ विशेषतः प्रतिकाशक्तीशी संबंधित अवयवांवरील परिणामांचा अभ्यास करण्यात आला. गाईंच्या प्रसूतीदरम्यान नर खोंडांवरील उष्णतेच्या ताणांमुळे पेशीय पातळीवरील परिणामांवर लक्ष केंद्रिय करण्यात आले. या प्रयोगदरम्यान होलस्टिन गर्भवती गाईला फ्लोरिडा येथील उन्हाळ्यातील उष्णतेचा ताण निर्माण करण्यात आला. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तिची आणि तिच्या पिल्लांची नोंदी घेण्यात आल्या. तुलनेसाठी अन्य एका होलस्टिन गर्भवती मातेसाठी तापमान योग्य प्रकारे नियंत्रित ठेवण्यात आले. ज्या मातेला उष्णतेचा ताण दिला होता, तिचे पिल्लू कमी वजनाचे झाले. त्यातही त्याच्या प्रत्येक अवयवांचे उदा. ह्रदय, यकृत, किडनी, थायमस, स्प्लीन इ. वजन अपेक्षेपेक्षा कमी आले. आतड्यातील पेशींच्या मृत्यूचा दरही त्यांच्यामध्ये अधिक होता.
गाईंच्या गर्भारपणाच्या सुरुवातीच्या काळापासून उष्णतेचा ताण असल्यास नाळेची (प्लॅसेंटा) कार्यक्षमता कमी राहत असावी. त्यामुळेच गर्भाचा विकास कमी होतो. पिल्लाच्या वजन व अवयवांच्या वजनामध्ये घट येत असावी. त्याच प्रमाणे प्रसूती लवकर होण्याचा धोका असल्याचे सुतोवाचही संशोधक करतात.
अन्य सर्व प्राण्यांप्रमाणेच गाईंच्या पिल्लांमध्येही सुरुवातीच्या अवस्थेत मृत्यूचा आणि विकृती निर्माण होण्याचा दर अधिक असतो. वेळेपूर्वी झालेल्या प्रसुतीमध्ये या धोक्यात आणखीनच वाढ होते. पिल्लांची विशेषतः भविष्यातील प्रतिकारशक्तीसाठी कारणीभूत अवयवांची वाढ योग्य प्रकारे न झाल्यास त्याचे नुकसान पिल्लाच्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये भोगावे लागते. इतकेच नाही तर त्यांच्या पुढील पिढ्यांनाही भोगावे लागू शकते.
- जियोफ्रे इ. दाल (Dahl), संशोधक, फ्लोरिडा विद्यापीठ.
निष्कर्ष ः
- थायमस आणि स्प्लीन या अवयवांच्या वजनातील घटीमुळे गर्भाच्या वाढीचा वेग मंदावतो.
- प्रतिकारक यंत्रणेमध्ये तडजोडी होत असल्यामुळे पुढे प्रतिकारशक्ती कमकुवत राहण्याचा धोका वाढतो.
- -आतड्यातील पेशींच्या मृत्यूंचा दर अधिक राहिल्यामुळे मातेकडून चिकाद्वारे मिळणारी प्रतिकारशक्तीचे शोषणही योग्य प्रकारे होत नसल्याचे काही पुरावे या संशोधनात मिळालेले आहेत. जन्मानंतर दिले जाणारे पहिले दूध (चीक) हे पिल्लांच्या प्रतिकारशक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते.
- जन्माच्या पूर्वी पचनसंस्थेचे तोंड बंद होण्याची प्रक्रिया सुरू असते. त्यामध्ये काही बाधा आल्यास जन्मानंतर त्यामध्ये काही बदल करणे शक्य होत नाही. त्यामुळे गाईंच्या गर्भार काळामध्येच तापमान नियंत्रणाची योग्य ती काळजी घेतल्यास भविष्यातील विपरीत परिणाम रोखता येतील. अगदीच शक्य नसल्यास गर्भारपणाच्या शेवटच्या काळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
- डेअरी उद्योगासाठी जनावरांच्या आरोग्य आणि पुनरुत्पादन हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे असते. त्यातूनच पर्यावरण आणि आर्थिक शाश्वतता मिळू शकते.
मूळ संशोधन संदर्भ ः
B.M.S. Ahmed, U. Younas, T.O. Asar, A.P.A. Monteiro, M.J. Hayen, S. Tao, G.E. Dahl. Maternal heat stress reduces body and organ growth in calves: Relationship to immune status. JDS Communications, 2021; DOI: 10.3168/jdsc.2021-0098