शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

अबब, भोपळ्याच्या एका बी ची किंमत 13 हजार 973 रुपये

अबब, भोपळ्याच्या एका बी ची किंमत 13 हजार 973 रुपये

एका ब्रिटीश बियाणे कंपनीने एका भोपळ्याच्या बी साठी 170 पौंड म्हणजेच 13 हजार 973 रुपये मोजले आहेत. अर्थात हा भोपळा काही साधा नाही. जगातील सर्वात मोठ्या आकाराचा भोपळा म्हणून नुकताच त्याचा गौरव करण्यात आला होता. या भोपळ्याच्या बी साठी इंटरनेटवर लिलाव पुकारण्यात आला होता.

इंग्लंडमधील सफोल्क येथील थॉम्पसन ऍण्ड मॉर्गन यांनी साधारण किमतीच्या चारशेपट अधिक किंमत देत या लिलावात बाजी मारली. या बी च्या साह्याने अधिक मोठ्या आकाराचे भोपळे विकसित करणे शक्य असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. त्याबाबत माहिती देताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पॉल हॅन्सॉर्ड म्हणाले की, मोठ्या आकाराचे भोपळे मिळविण्यासाठी जनुकियदृष्ट्या विश्वासार्ह व दर्जेदार बियाणांची आवश्यकता असते. साधारणपणे मोठ्या आकाराच्या भोपळ्याची किंमत सरासरी 46 पौंड इतकी असते. पण योग्य गोष्टीसाठी अधिक किंमत देण्यात काहीही हरकत नाही.

हे भोपळा बी साधारण भोपळ्याच्या बीच्या आकाराच्या तीनपट मोठे आहे.  प्रचंड आकाराच्या भोपळ्याचे अमेरिकन उत्पादक रॉन वॅलेस यांनी गेल्या वर्षी भोपळ्यांच्या आकार आणि वजनाबाबत जागतिक रेकॉर्ड केल्याचा दावा केला होता. या भोपळ्याचे वजन दोन हजार नऊ पौंड होते. 

 

बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१३

सोन्याचा साठा करणारे जिवाणू सापडले

सोन्याचा साठा करणारे जिवाणू सापडले

सोने जमा करण्याचा हव्यास काही केवळ मानवामध्येच असतो असे नाही़, तर काही जिवाणूही सोन्याचे सूक्ष्म कण जमा करत असल्याचे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथे झालेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. हे जिवाणू सोने कण वाचविण्यामध्ये मोलाची भुमिका बजावू शकतील. हे संशोधन नेचर केमिकल बायोलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.   

जागतिक विनिमयाकरिता सोने हा मुलभूत आणि महत्त्वाचा धातू मानला जातो. सोन्याच्या खाण उद्योगामध्ये टाकाऊ समजल्या जाणाऱ्या घटकांपासूनही काही प्रमाणात सोने मिळवण्यासाठी एक प्रकारचे जिवाणू मदत करू शकतील, असे ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. हे जिवाणू स्वतःच्या वाढीसाठी सोन्यातील विषारी घटकांचा वापर करतात. त्यासाठी अतिसूक्ष्म सुवर्णकण एकत्र करतात.

ऑस्ट्रेलियातील ऍडलेड विद्यापीठातील पर्यावरण जीवशास्त्रज्ञ फ्रॅंक रिथ हे सोने प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त ठरतील अशा जिवाणूंबाबत संशोधन करत आहेत. त्यांना दहा वर्षापूर्वी प्रथम  Cupriavidus metallidurans हे जैविक फिल्म वर आढळणारे जिवाणू सोन्याच्या कणावर आढळले होते. अधिक संशोधन केले असता हे जिवाणू सोन्याच्या अतिसूक्ष्म विषारी कण त्यांच्या पेशीत साठवून ठेवत असल्याचे आढळले आहे.

अन्य संशोधन

- जैविक फिल्मवर आढळणारी दुसरी जिवाणू प्रजाती  Delftia acidovarans ही असून कॅनडा येथील मॅकमास्टर विद्यापीठातील संशोधक नॅथन मॅगार्वे आणि गटाने त्यावर संशोधन केले आहे. त्यांनी या जिवाणूंची वाढ सोन्याच्या द्रवामध्ये केली असता त्यांच्या वसाहतीच्या बाजूने सोन्याचे अतिसूक्ष्म कण जमा झालेले दिसले. या जिवाणूमध्ये पेशीच्या बाहेर हे कण होते. सी. मेटालड्युरॅन जिवाणूंच्या पेशीमध्ये हे कण आढळले आहेत.

सोनेरी जनुके

- जैवरसायने आणि जनुकिय विश्लेषणातून संशोधकांनी सोने एकत्रीकरणासाठीची जनुके आणि रासायनिक प्रक्रिया उलगडली आहे.
- ही जनुके वगळून जनुकिय सुधारीत जिवाणू तयार केले असता, त्यांनी सोने एकत्रीकरण केले नाही.
-  Delftia acidovarans हे जिवाणू सोन्याचे कण आपल्या पेशीमध्ये येऊ न देता बाह्य भागात साठवतात. तर Cupriavidus metallidurans हे जिवाणू सोने धातूतील विषारीपणा कमी करून स्वतःच्या पेशीमध्ये सामावून घेतात.
- संशोधक रिथ यांनी सांगितले, की हे दोन्ही जिवाणू सहजिवी पद्धतीने राहू शकतात. त्यांच्या प्रक्रिया उलगडणे शक्य झाल्यास आजवर सोन्याचे जे कण मिळवणे शक्य होत नव्हते, तेही येत्या काही वर्षात मिळवता येतील.


-------------------
फोटोओळ ः सोने धातूचा विषारीपणा दूर करत काही प्रजातीचे जिवाणू सोन्याचा साठा जमा करतात. (स्रोत ः बर्ट्रान्ड रिजर, हेमिस, कोस)