शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

कोंबड्यांच्या आफ्रिकेपर्यंतच्या प्रवासाचा घेतला वेध

कोंबड्यांच्या आफ्रिकेपर्यंतच्या प्रवासाचा घेतला वेध


इथोपियातील उत्खननामध्ये आढळलेल्या ३० कोंबड्यांच्या हाडांवरून आफ्रिकेसाऱख्या ठिकाणी कोंबड्यांचे स्थानिकीकरण कसे झाले, याचा वेध घेण्याचा प्रयत्न संशोधन वॉशिग्टंन विद्यापीठातील पुरातत्त्व शास्त्रज्ञ करीत आहेत. त्यांनी काढलेले निष्कर्ष इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओस्टेओआक्रिलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

         आफ्रिकी खंडामध्ये सध्या इथोपियात होत असलेल्या एका प्राचीन खेड्यातील उत्खननामध्ये कोंबडीच्या स्थानिकीकरणांचे पुरावे मिळाले आहेत. तिथे हजारो वर्षापूर्वीच्या एका प्राचीन खेड्यात खाऊन टाकून देण्यात आलेल्या कोंबड्यांच्या पायांची ३० हाडे मिळाली आहेत. त्यावर वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यास करत आहेत. याविषयी माहिती देताना वॉशिंग्टन विद्यापीठातील पुरातत्त्व संशोधक हेलिना वोल्डेकिरोज यांनी सांगितले, की हजारो वर्षापूर्वी आफ्रिकेत कोंबड्यांचा खाद्यात होत असलेल्या वापरातून त्या काळातील लाल समुद्राच्या माध्यमातून होत असलेल्या पूर्व आफ्रिकी व्यापाराचाही वेध घेता येतो.

- आजच्या कोंबडीचा पूर्वज म्हणून ज्ञात असलेली रेड जंगलफॉल गॅलस गॅलस ही प्रजात हिमालयीन भूभाग उत्तर भारत, दक्षिण चीन आणि आग्नेय आशिया येथील मानली जाते. या ठिकाणी ६००० ते ८००० वर्षापू्री त्यांचे प्रथम स्थानिकीकरण झाले. या पहिल्या स्थानिकीकरण झालेल्या कोंबडीच्या सर्वदूर प्रसारातून प्राचीन कृषी आणि व्यापारी संबंधाचेही विश्लेषण करता येऊ शकेल.

- आफ्रिकेमध्ये कोंबडीच्या आगमनाच्या नेमक्या मार्गाचा अद्याप अंदाज येत नसला तरी प्राचीन भांडी व अन्य चित्रातील कोंबड्यांच्या अस्तित्त्वावर या आधी संशोधन झाले आहे. त्यात आता या कोंबड्यांच्या हाडांची भर पडणार आहे. त्यातून साधारणपणे उत्तर आफ्रिका, इजिप्त आणि नाईल खोद्याच्या माध्यमातून सुमारे २५०० वर्षापूर्वी आफ्रिकेत कोंबडीचे आगमन झाले असावे, असा अंदाज आहे.

- या आधी ब्युटो (इजिप्त) येथील उत्खननामध्ये ख्रिस्तपूर्व ६८५- ५२५ काळातील कोंबडीची हाडे मिळाली होती. मात्र, या नुकत्याच झालेल्या संशोधनामुळे हा कालखंड सुमारे तीन शतके मागे गेला आहे.  यातील काही हाडे ही रेडियोकार्बेन तारखेनुसार ख्रिस्तपूर्व ८१९ ते ७५५, तर चारकोल तारखेनुसार ख्रिस्तपूर्व ९१९ ते ८०१ वर्षे इतकी जुनी असावीत.
-----------

भाषेंतील शब्दांआधारे मार्गाचा शोध ः

भाषांच्या अभ्यासातून कोंबडीच्या प्राचीन प्रवास मार्गांचा शोध घेण्याचाही प्रयत्न झाला. त्यातआफ्रिकेमध्ये कोंबडी ही खालील वेगवेगळ्या मार्गातून आल्याचे सुचवले जाते.
१. उत्तर आफ्रिकेतून सहारामार्गे पश्चिम आफ्रिका
२. पूर्व आफ्रिकी किनाऱ्यावरून मध्य आफ्रिकेत
-----------
आमच्या अभ्यासातूनही आफ्रिकन लाल समु्दाच्या किनारपट्टीवर आफ्रिकेत कोंबडीचा शिरकाव होण्याचा एक मार्ग असल्याचे स्पष्ट होते. त्याकाळातील कृषी माल व अन्य घटकांच्या व्यापारांचा मार्ग लक्षात घेता ही शक्यता अधिक वाटते. 
- हेलिना वोल्डेकिरोज

उत्तर इथोपियातील मेझबेर येथील उत्खनन क्षेत्र ( स्रोत ः इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओस्टेओआक्रिलॉजी)


----------------------
संदर्भ ः
    H. S. Woldekiros, A. C. D'Andrea. Early Evidence for Domestic Chickens (Gallus gallus domesticus) in the Horn of Africa. International Journal of Osteoarchaeology, 2016; DOI: 10.1002/oa.2540
0000000000000000000000

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

न उघडताही वाचता येईल पुस्तक!

न उघडताही वाचता येईल पुस्तक!

आता पुस्तक वाचण्यासाठी ते उघडण्याचीही आवश्यकता राहणार नाही, असे तंत्रज्ञान अमेरिकेतील मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील संशोधकांनी विकसित केले आहे. हे संशोधन जर्नल नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

   प्राचीन पुस्तके किंवा भुजपत्रांचे संवर्धन ही सर्व संग्रहालयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असते. तसेच ते योग्य त्या अभ्यासकांना संदर्भासाठी किंवा  अर्थ लावण्यासाठी उपलब्ध करावे लागते. वास्तविक या दोन्ही बाबी एकमेंकाना छेद देणाऱ्या ठरू शकतात. कारण अत्यंत जुने, जीर्ण झालेले पुस्तक हाताळताना त्याचे तुकडे पडू शकतात. मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील संशोधकांनी या अडचणीवर मार्ग काढला आहे. या संशोधक गटामध्ये भारतीय वंशाचे रमेश रासकर यांचाही समावेश आहे. त्यांनी पुस्तक न उघडताही त्यातील मजकूर मिळवणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे.  
न्युयॉर्क येथील मेट्रोपोलिटन संग्रहालयाने या संशोधनामध्ये उत्साह दाखवला आहे. उत्खनन तज्ज्ञांना सापडणाऱ्या प्राचीन ग्रंथाच्या विश्लेषणासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. हे तंत्रज्ञान यंत्रे किंवा औषधांवरील वेगवेगळे थरांचे विश्लेषण करण्यासाठीही उपयुक्त आहे.

काय आहे तंत्रज्ञान
या तंत्रज्ञानामध्ये `टेराहर्टझ रॅडीएशन ` (मायक्रोवेव्ह आणि अवरक्त किरणांच्या दरम्यानचा विद्यूत चुंबकीय किरणांचा एक प्रकार) वापरलेला आहे. ही लहर एक्स रे किंवा आवाजाच्या लहरीप्रमाणे कोणत्याही पृष्ठभागातून पलिकडे जाऊ शकते.
- या लहरी शाई आणि कोरा कागद यांतील फरक वेगळा दाखवू शकतात.
- बंद पुस्तकाच्या दोन पानामधील हवेचे कणही (२० मायक्रोमीटर) त्यातून दिसून येतात.
- हवेतील बदलामुळे येणारी परावर्तित प्रकाशातील वक्रता (रिफ्रॅक्टीव्ह इंडेक्स) मोजून, त्याचे विश्लेषण केले जाते. 
- सध्या पहिल्या वीस पानांपर्यंतची माहिती मिळवणे शक्य असले तरी नऊ पानांनंतर येणारे सिग्नल हे कमी होतात. त्यामुळे अक्षरे ओळखण्यामध्ये अडचणी येतात. टेराहर्टझ इमेजिंग हे तंत्र नवीन असून, अधिक अभ्यासातून या अडचणीवर मात करण्याकरीता प्रयत्न सुरू असल्याचे संशोधकांनी सांगितले.