शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

न उघडताही वाचता येईल पुस्तक!

न उघडताही वाचता येईल पुस्तक!

आता पुस्तक वाचण्यासाठी ते उघडण्याचीही आवश्यकता राहणार नाही, असे तंत्रज्ञान अमेरिकेतील मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील संशोधकांनी विकसित केले आहे. हे संशोधन जर्नल नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

   प्राचीन पुस्तके किंवा भुजपत्रांचे संवर्धन ही सर्व संग्रहालयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असते. तसेच ते योग्य त्या अभ्यासकांना संदर्भासाठी किंवा  अर्थ लावण्यासाठी उपलब्ध करावे लागते. वास्तविक या दोन्ही बाबी एकमेंकाना छेद देणाऱ्या ठरू शकतात. कारण अत्यंत जुने, जीर्ण झालेले पुस्तक हाताळताना त्याचे तुकडे पडू शकतात. मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील संशोधकांनी या अडचणीवर मार्ग काढला आहे. या संशोधक गटामध्ये भारतीय वंशाचे रमेश रासकर यांचाही समावेश आहे. त्यांनी पुस्तक न उघडताही त्यातील मजकूर मिळवणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे.  
न्युयॉर्क येथील मेट्रोपोलिटन संग्रहालयाने या संशोधनामध्ये उत्साह दाखवला आहे. उत्खनन तज्ज्ञांना सापडणाऱ्या प्राचीन ग्रंथाच्या विश्लेषणासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. हे तंत्रज्ञान यंत्रे किंवा औषधांवरील वेगवेगळे थरांचे विश्लेषण करण्यासाठीही उपयुक्त आहे.

काय आहे तंत्रज्ञान
या तंत्रज्ञानामध्ये `टेराहर्टझ रॅडीएशन ` (मायक्रोवेव्ह आणि अवरक्त किरणांच्या दरम्यानचा विद्यूत चुंबकीय किरणांचा एक प्रकार) वापरलेला आहे. ही लहर एक्स रे किंवा आवाजाच्या लहरीप्रमाणे कोणत्याही पृष्ठभागातून पलिकडे जाऊ शकते.
- या लहरी शाई आणि कोरा कागद यांतील फरक वेगळा दाखवू शकतात.
- बंद पुस्तकाच्या दोन पानामधील हवेचे कणही (२० मायक्रोमीटर) त्यातून दिसून येतात.
- हवेतील बदलामुळे येणारी परावर्तित प्रकाशातील वक्रता (रिफ्रॅक्टीव्ह इंडेक्स) मोजून, त्याचे विश्लेषण केले जाते. 
- सध्या पहिल्या वीस पानांपर्यंतची माहिती मिळवणे शक्य असले तरी नऊ पानांनंतर येणारे सिग्नल हे कमी होतात. त्यामुळे अक्षरे ओळखण्यामध्ये अडचणी येतात. टेराहर्टझ इमेजिंग हे तंत्र नवीन असून, अधिक अभ्यासातून या अडचणीवर मात करण्याकरीता प्रयत्न सुरू असल्याचे संशोधकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा