रविवार, १९ मार्च, २०२३

वातावरण बदलामुळे जंगलावर होणार परिणाम #climate change

 

जंगलाची तोड झाल्याने तुकड्यांमध्ये विभागलेल्या जंगलामध्ये उष्णतेचा शिरकाव अधिक होत जाणार आहे. त्याचे परिणाम झाडांवर नक्कीच होणार आहेत.  (स्रोत - मॅरियल्ले स्मिथ) 

वाढत्या उष्णतेचा फटका उंच झाडांना बसू शकतो...

मध्य अॅमेझोनियामधील अधिक उंच झाडांवर अत्युच्च तापमानाच्या कालखंडाचा फटका बसणार आहे. तुलनेने त्यांची खालील पाने, फांद्या याचा बचाव होऊ शकतो. मात्र वाढत्या जंगल तोडीमुळे ठराविक पट्ट्यांमध्ये, तुकड्यांमध्ये विभागली जात आहे. त्यामुळे अंतर्गत भागांपर्यंत अधिक तापमानाचे परिणाम शिरून त्याचा फटका वाढण्याची शक्यता हेलसिंकी विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केली आहे. वातावरणातील बदलांमुळे जागतिक पातळीवरील उंच झाडे ही अधिक धोक्यात येत असल्याचे नवे पुरावे त्यांना भेटले आहेत. हे निष्कर्ष नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. 


जागतिक पातळीवर सर्वाधिक घनदाट जंगले अशी ओळख अशलेल्या अॅमेझॉनमध्ये ही जंगलतोड, वणवे यामुळे झाडांचे प्रमाण कमी होत आहे. त्यांचे वेगवेगळे भाग, तुकडे पडत आहेत. यांचे झाडांवर होणारे नेमके परिणाम जाणून घेण्यासाठी हेलसिंकी विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यास केला. 

कोणत्याही झाडाच्या किंवा वनस्पतीच्या आयुष्यकाळामध्ये प्रत्येक वर्षी डोळे फुटणे, त्यातून अंकूर बाहेर येणे, पाने तयार होऊन वाढणे आणि फांद्या फुटणे, तुटणे इ. घटकांचा समावेश असतो. जंगलातील मोठ्या क्षेत्रातीवर झाडांचे स्कॅनिंग लिडार तंत्रज्ञानाने करून प्रत्येक थरांची अत्यंत अचूक मोजमापे घेण्यात आली. त्यातून बदलत्या वातावरणामुळे जंगलावर होणारे परिणाम तपासण्यात आले. 

लेसर स्कॅनर किंवा लिडार (LiDAR) यांच्या साह्याने मध्य अॅमेझॉनमधील जंगलांच्या सर्वेक्षण अभ्यास करण्यात आला. (स्रोत ः एडूर्डो मायेदा ) 

उष्णतेचे अॅमेझॉन जंगलावर परिणाम 

१) जर २०५० या सालापर्यंत हरितगृह वायू आणि कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन दुप्पट झाले तर वर्षातील किमान १५० दिवस अॅमेझॉनमधील तापमान हे ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आयपीसीसी च्या सहाव्या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. त्याचा आधार घेऊन ३५ अंशापेक्षा अधिक तापमान दीर्घकाळ राहिल्यास त्याचे होणारे परिणाम शास्त्रज्ञाने मांडले आहेत. 

२) अॅमेझॉनच्या विविध प्रदेशामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सामान्यतः ३५ अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले जाते. जुन्या झाडांचा वाढलेला पर्णसंभार त्यांच्या खालील फांद्याचे, झाडांचे काही प्रमाणात तरी संरक्षण करत असतो. मात्र तापमान दीर्घकाळ जास्त राहिले तरी उंच झाडांची वरील पानेही ती सहन करू शकणार नाहीत. ती गळून पडली तर खालील पाने सरळ सूर्यप्रकाशात येतील. तीही गळून पडतील. अशा प्रकारे झाडांची, पर्यायाने एकूणच जंगलाची हानी होण्याची शक्यता आहे. 


पृथ्वीचा श्वास कोंडतोय...

न्युन्स आणि अन्य सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासातील तापमानाच्या प्रतिमा नोंदी.

उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये अनेकवेळा  पाने गळून जाणे, फुट फुटणे याबाबत अनिश्चिततेचे वातावरण असते, मात्र ते सामान्यतः काही काळापुरते किंवा हंगामापुरते असते. त्याचे काही पॅटर्न ठरलेले असतात. ते समजून घेतले की ही जंगले प्रकारे कार्यरत राहतात. याचा अंदाज कोणालाही येऊ शकतो. मात्र बदलत्या वातावरणामध्ये त्या वेगाने बदल होत असून, ते समजून घेणे गरजेचे राहणार आहे. त्याविषयी फिनलॅंड यांच्या आर्थिक साह्याने एक प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाचे समन्वयक एडूर्डो मायेदा यांनी सांगितले, की आम्ही आधुनिक लेसर स्कॅनरच्या साह्याने जंगलाची नियमित अंतराने सर्वेक्षणे सुरू केली. त्यातून जाणवणारे बदल टिपण्यास प्रारंभ केला. 

गेल्या काही दशकांमध्ये अॅमेझॉनमधील झाडांची वाढीवर प्रकाश किंवा पाणी या दोन अत्यावश्यक बाबींच्या कमतरतेमुळे येणाऱ्या मर्यादांवर वादविवाद सुरू होते. मात्र या प्रयोगातून ही समस्या किती गुंतागुंतीची आहे, याचा अंदाज येत आहे. मोठ्या झाडांना अधिक सूर्यप्रकाश आणि उष्णतेचा फटका बसणार आहे. त्याचे परिणाम खालील पर्णसंभारावरही नक्कीच होणार आहेत. 


जंगलाचे तुकडे होणे

प्रादेशिक जंगलतोडीचे एकूण पर्यावरणावरील परिणामांविषयी बोलले जाते. मात्र जंगलाची सलगता तोडली जाणे, त्यांचे तुकडे होणे याच्या विपरीत परिणामाविषयी फारसे बोलले जात नाही. लहान, तुकड्या तुकड्यातील जंगलांना अधिक उष्णतेला सामोरे जावे लागेल. जंगलाच्या तळापर्यंत सूर्यप्रकाश पोचल्यामुळे आजवर शांत, शीतल असलेल्या भागामध्येही उष्णता पोचणार असल्याचे जोसे ल्युईस कॅमार्गो यांनी सांगितले. 

   उंच झाडांवरील उष्णतेचा, सूर्यप्रकाशाचा ताण वर्षातील दीर्घकाळ असणार आहे. त्यातून पाने, फांद्या यावरील ताण खालील भागांमध्ये पोचेल. अॅमेझॉनच्या 176,555 वर्ग कि.मी. क्षेत्रावर काठावरील उष्णतेचा सामना करावा लागेल. जंगलतोड होऊन जंगलातील पर्यावरण व्यवस्थेवरील ताण वाढत जाणार आहे. 

जर्नल संदर्भ - 

Matheus Henrique Nunes, José Luís Campana Camargo, Grégoire Vincent, Kim Calders, Rafael S. Oliveira, Alfredo Huete, Yhasmin Mendes de Moura, Bruce Nelson, Marielle N. Smith, Scott C. Stark, Eduardo Eiji Maeda. Forest fragmentation impacts the seasonality of Amazonian evergreen canopies. Nature Communications, 2022; 13 (1) DOI: 10.1038/s41467-022-28490-7

जीएम जिवाणू देतील पिकांना पुरेसे नत्र

 जीएम जिवाणू देतील पिकांना पुरेसे नत्र


मातीमध्ये हवेतील नत्राचे रूपांतर पिकांना उपयुक्त स्वरूपामध्ये उपलब्ध करणाऱ्या अॅझोटोबॅक्टर विनेलॅण्डीई या जिवाणूंमध्ये जनुकीय अभियांत्रिकीद्वारे योग्य ते बदल करण्यात वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. हे जनुकीय अभियांत्रिकीद्वारे बदललेले (जीएम) जिवाणू अमोनियाची निर्मिती करून पिकांना पुरवतील. त्यामुळे पारंपरिक रासायनिक खतांचा वापर कमी करणे शक्य होईल, असा दावा संशोधक करत आहेत.

वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील सहायक संशोधन प्राध्यापक फ्लोरेन्स मुस यांनी सांगितले, की सूक्ष्मजीवांनी उत्सर्जित केलेल्या अमोनियांचा वापर सरळ सरळ भात पिकाला झाल्याचे पुरावे आम्हाला मिळाले आहेत. या जनुकीय अभियांत्रिकीद्वारे खास तयार करण्यात आलेल्या जिवाणूंमुळे भविष्यात रासायनिक खतांना पर्याय देणे शक्य होईल. पर्यावरणामध्ये निर्माण होणाऱ्या नायट्रस ऑक्साइडसारख्या हरितगृह वायूलाही आळा बसू शकेल. तसेच नत्रयुक्त खतांच्या निचऱ्यामुळे वाढत असलेल्या जलस्रोतांच्या प्रदूषणाची समस्याही आटोक्यात येईल.

हे संशोधन ‘अप्लाइड अॅण्ड एन्व्हायर्न्मेंटल मायक्रोबायोलॉजी’ या ‘अमेरिकन सोसायटी फॉर मायक्रोबायोलॉजी’ यांच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.


अॅझोटोबॅक्टर विनेलॅण्डीई या जिवाणू प्रजातींमध्ये काही जनुकीय बदल करण्यात आले. त्यामुळे ते अमोनियाची निर्मिती वातावरणातील बदलाच्या निरपेक्ष नियमित करू लागले. त्यांच्याकडून उत्सर्जित होणाऱ्या नत्राची तीव्रता पिकाला अन्नद्रव्ये पुरवण्याइतकी शक्य झाली. नैसर्गिकरीत्या पिकांच्या वाढीसाठी आवश्यक तितकी मूलद्रव्ये तिथेच उपलब्ध होतील. तसे झाल्यास सध्याच्या नत्रयुक्त खतांच्या वापरामुळे निर्माण होणारा पर्यावरणावरील ताण कमी होण्यास मदत होईल. एकूण नत्र साखळीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

या संशोधनामुळे अमोनियाची निर्मिती एक स्थिर दराने करणाऱ्या जिवाणूंची निर्मिती शक्य होईल. भविष्यामध्ये A.vinlandii या प्रजातीचे वेगवेगळ्या दराने अमोनियाची निर्मिती करणारे गट विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे पिकांच्या गरजेनुसार योग्य तितक्या प्रमाणातच नत्रयुक्त घटक पिकांना उपलब्ध केले जातील. मातीची सुपीकता वाढण्यासोबतच शाश्‍वत पद्धतीने पिकांचे उत्पादन घेता येईल, असा दावा मुस यांनी केला आहे.