रविवार, १९ मार्च, २०२३

जीएम जिवाणू देतील पिकांना पुरेसे नत्र

 जीएम जिवाणू देतील पिकांना पुरेसे नत्र


मातीमध्ये हवेतील नत्राचे रूपांतर पिकांना उपयुक्त स्वरूपामध्ये उपलब्ध करणाऱ्या अॅझोटोबॅक्टर विनेलॅण्डीई या जिवाणूंमध्ये जनुकीय अभियांत्रिकीद्वारे योग्य ते बदल करण्यात वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. हे जनुकीय अभियांत्रिकीद्वारे बदललेले (जीएम) जिवाणू अमोनियाची निर्मिती करून पिकांना पुरवतील. त्यामुळे पारंपरिक रासायनिक खतांचा वापर कमी करणे शक्य होईल, असा दावा संशोधक करत आहेत.

वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील सहायक संशोधन प्राध्यापक फ्लोरेन्स मुस यांनी सांगितले, की सूक्ष्मजीवांनी उत्सर्जित केलेल्या अमोनियांचा वापर सरळ सरळ भात पिकाला झाल्याचे पुरावे आम्हाला मिळाले आहेत. या जनुकीय अभियांत्रिकीद्वारे खास तयार करण्यात आलेल्या जिवाणूंमुळे भविष्यात रासायनिक खतांना पर्याय देणे शक्य होईल. पर्यावरणामध्ये निर्माण होणाऱ्या नायट्रस ऑक्साइडसारख्या हरितगृह वायूलाही आळा बसू शकेल. तसेच नत्रयुक्त खतांच्या निचऱ्यामुळे वाढत असलेल्या जलस्रोतांच्या प्रदूषणाची समस्याही आटोक्यात येईल.

हे संशोधन ‘अप्लाइड अॅण्ड एन्व्हायर्न्मेंटल मायक्रोबायोलॉजी’ या ‘अमेरिकन सोसायटी फॉर मायक्रोबायोलॉजी’ यांच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.


अॅझोटोबॅक्टर विनेलॅण्डीई या जिवाणू प्रजातींमध्ये काही जनुकीय बदल करण्यात आले. त्यामुळे ते अमोनियाची निर्मिती वातावरणातील बदलाच्या निरपेक्ष नियमित करू लागले. त्यांच्याकडून उत्सर्जित होणाऱ्या नत्राची तीव्रता पिकाला अन्नद्रव्ये पुरवण्याइतकी शक्य झाली. नैसर्गिकरीत्या पिकांच्या वाढीसाठी आवश्यक तितकी मूलद्रव्ये तिथेच उपलब्ध होतील. तसे झाल्यास सध्याच्या नत्रयुक्त खतांच्या वापरामुळे निर्माण होणारा पर्यावरणावरील ताण कमी होण्यास मदत होईल. एकूण नत्र साखळीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

या संशोधनामुळे अमोनियाची निर्मिती एक स्थिर दराने करणाऱ्या जिवाणूंची निर्मिती शक्य होईल. भविष्यामध्ये A.vinlandii या प्रजातीचे वेगवेगळ्या दराने अमोनियाची निर्मिती करणारे गट विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे पिकांच्या गरजेनुसार योग्य तितक्या प्रमाणातच नत्रयुक्त घटक पिकांना उपलब्ध केले जातील. मातीची सुपीकता वाढण्यासोबतच शाश्‍वत पद्धतीने पिकांचे उत्पादन घेता येईल, असा दावा मुस यांनी केला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा