व्हायोलीनचे सुर सजवणार बुरशी !
- स्ट्रॅडीव्हॅरीयस व्हायोलीनइतकाच सूरेल सूर मिळतो बुरशी प्रक्रियायुक्त व्हायोलीनमधून
व्हायोलिन वाद्यातून निघणाऱ्या सुरावटी या वाजवणाऱ्या इतक्याच ते बनविणाऱ्यावर अवलंबून असतात, असे म्हटले जाते. कारण ते बनविण्यासाठी वापरले जाणारे लाकडावर आवाजाचा दर्जा ठरतो. स्वित्झर्लंड येथील मटेरियल्स सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी लॅबोरेटरीतील फ्रान्सिस स्कार्झ यांनी व्हायोलीनसाठीच्या लाकडावर विशिष्ट जातीच्या बुरशींची प्रक्रिया केली आहे. त्यामुळे आवाजाच्या दर्जा अधिक चांगला मिळतो. तो स्ट्रॅडीव्हॅरियस व्हायोलीनइतका चांगला असल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच बर्लीन येथील युनिव्हर्सिटेट मेडिझीन आणि मॅक्स डेलब्रुक मॉलेक्यिअर मेडिसीन येथे झालेल्या परिषदेत स्कार्झ यांनी या पद्धतीची प्रात्यक्षिक दाखविले.
संगीताच्या जगामध्ये स्ट्रॅडीव्हॅरीयस प्रकारचे व्हायोलीनच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्या सर्वसामान्य वादकांला विकत घेऊन वाजविणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. त्यातून मिळणारा आवाजाचा दर्जा किंवा प्रत मिळविण्यासाठी स्वित्झर्लंड येथील मटेरियल्स सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी लॅबोरेटरीतील संशोधक स्कार्झ यांनी स्ट्रॅडीव्हरी प्रकारचे लाकूड मिळविण्यासाठी संशोधन केले आहे. त्यांनी नॉर्वे स्प्रुस आणि सायकामोर या व्हायोलीनसाठी वापरल्या जाणाऱ्य लाकडाच्या कुजवण्याच्या प्रक्रियेत भाग घेणाऱ्या बुरशीच्या फिजिसपोरीनस व्हिट्रेयस आणि झायलारिया लॉंगीप्स (Physisporinus vitreus and Xylaria longipes) दोन प्रजाती ओळखल्या आहेत. या बुरशीच्या प्रक्रियेमुळे आवाजाच्या प्रत वाढण्यास मदत होते. याबाबत माहिती देताना संशोधकांनी सांगितले की, सर्वासाधारणपणे बुरसी या लाकडाच्या घनता कमी करते, मात्र त्याचवेळी लाकडातून प्रवाहित होणाऱ्या आवाजाच्या वेग कमी होतो. नव्या सापडलेल्या या प्रजाती पेशीभित्तिकेचे सावकाश विघटन करत भित्तिका पातळ करतात. त्यामुळे लाकडाचे विघटन होत असतानाही त्याची घनता तशीच राहते. त्यातून आवाज वेगाने जाऊ शकतो. लवचिकता कमी होत नाही. त्याचवेळी लाकुड अन्य बुरशीच्या प्रजातीसाठी प्रतिकारक राहते. त्यामुळे व्हायोलीन अधिक काळ टिकू शकते. अर्थात व्हायोलीन तयार करण्यापुर्वी त्यावर इथिलीन ऑक्साईडची प्रक्रिया केली जाते.
सध्या स्कार्झ हे व्हायोलीन लाकडासाठी आंतरशाखीय प्रकल्पाची आखणी करत आहेत. त्यातून अधिक विश्वासार्ह निष्कर्ष मिळण्याची शक्यता आहे. बुरशीची प्रक्रिया केलेल्या लाकडापासून 30 व्हायोलीन बनवण्यात आले आहेत. वाद्य आणि संगीताच्या विकसनामध्ये जैव तंत्रज्ञानात्मक पद्धती अत्यंत उपयुक्त ठरेल. आज नव्याने शिकणाऱ्या कलाकाराना स्ट्रॅडीव्हॅरीयस व्हायोलीन विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान नव्याने व्हायोलीन किंवा वाद्ये शिकणाऱ्या व्यक्तीच्या हाती चांगल्या दर्जाचे व्हायोलीन देऊ शकेल. संगीतप्रेमीसाठी ती पर्वणी ठरेल.
चाचणीतही उतरले खरे
-या बुरशीच्या प्रक्रियेचा वापर करून मार्टीन श्लेक्से आणि मायकल र्होनहायमर या व्हायोलीन तयार करणाऱ्या कारागीराकडून व्हायोलीन तयार करून घेतले.
- 2009 साली पडद्याच्या आड त्याचे वादन 1715 तील स्ट्रॅडीव्हॅरियस व्हायोलीनसह करण्यात आले. हे वादन प्रसिद्ध व्हायोलीन वादक मॅथअयू ट्रसलर यांनी केले.
- प्रेक्षक आणि तज्ज्ञ समीक्षक यांना दोन्ही वादनातील फरक ओळखता आला नाही. मायको लाकडापासून केवळ नऊ महिन्याची बुरशींची प्रक्रिया केलेले व्हायोलीन पारंपरिक स्ट्रॅडीव्हॅरियसच्या तुलनेत सर्व कसोट्यावर खरे उतरले.
- एखाद्या वाद्याची आवाजाची प्रत, दर्जा ओळखण्याची कोणतीही शास्त्रीय पद्धत नाही.
चौकट-
कारागीराच्या कलेचे कौतूक...
व्हायोलीनच्या आवाजामध्ये कमी तीव्रता, अधिक वेग आणि लवचिकता असावी लागते. 17 व्या शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध व्हायोलीन कारागीर ऍन्टोनियो स्ट्रडीव्हरी यांने 1645 ते 1715 या शीतकालीन वर्षामध्ये वाढलेल्या झाडांच्या विशिष्ट लाकडाचा वापर व्हायोलीन तयार करण्यासाठी केला. त्याकाळातील प्रदीर्घ थंडी आणि उन्हाळे यामुळे झाडांची वाढ संथपणे झाली. त्यातून कमी तीव्रता आणि लवचिकता विकसित होते. आवाजाचा अत्यूच्च दर्जा या लाकडांच्या वापरातून मिळतो. हा कारागीर आणि त्याचे घराणे व्हायोलीन तयार करण्यामध्ये इतके प्रसिद्ध झाले, की तत्कालीन प्रसिद्ध चित्रकार एडगर बुंडी यांने ऍन्टोनियो स्ट्रडीव्हरी याचे एक चित्र काढले आहे. तेही कलावर्तुळात कारागीराच्या कलेचे केलेले कौतूक मानले जाते. आवाजाचा दर्जा मिळविण्यासाठी आधुनिक विज्ञानाने लाकडावर विविध प्रयोग केले. मात्र स्ट्रडीव्हरी व्हायोलीनचा दर्जा मिळवणे शक्य झाले नव्हते. आजही युरोपात चांगल्या दर्जाच्या व्हायोलीनला स्ट्रडीव्हरी व्हायोलीन असे म्हटले जाते.
-----------------
फोटोओळ- पालासियो रियल डी माद्रिद येथील प्रदर्शनात ठेवलेले 1687 सालचे प्रसिद्ध स्पॅनिश स्ट्रॅडिव्हरियस. ( स्रोत- हाकन एसन्हेसन द्वारा विकीमिडिया)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा