वाळवीच्या नियंत्रणासाठी सूत्रकृमी ठरतील फायदेशीर
- वाळवीच्या मेंदूच्या रोगासाठी कारणीभूत जिवाणूंचे वाहक असतात सूत्रकृमी
लाकडी फर्निचरसाठी, घरासाठी वाळवी ही मोठी समस्या आहे. त्यातही फॉरमोसॅन सबटेरानियन टर्माईट या नावाने ओळखली जाणारी आशियातील वाळवीची जात लाकडाचा फडशा वेगाने पाडते. त्यामुळे घरेच्या घरे जमीनदोस्त झाल्याचे चित्र दिसून येते. त्यावर अमेरिकी कृषी विभागाने केलेल्या संशोधनामध्ये वाळवीच्या मेंदूवर परिणाम करून त्याला रोगग्रस्त करणाऱ्या सूत्रकृमींना ओळखण्यात यश आले आहे. काही प्रकारचे अन्य सूत्रकृमीही टॅरेनटूला मेंदूवर जगत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाळवीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक घटक म्हणून पर्याय मिळणार आहे.
फॉरमोसॅन वाळवी ही झाडाच्या खोडामध्ये आढळणाऱ्या सेल्युलोजवर जगते. इमारतीच्या लाकडावरही तिचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. साधारणपणे या वाळवीमुळे नुकसान, देखभाल आणि नियंत्रणासाठी प्रती वर्ष एक अब्ज डॉलर इतका खर्च होतो. एखाद्या किडीवर जैविक दृष्ट्या नियंत्रण करण्याची कल्पना नवीन नाही. तरिही जिवाणूंसाठी वाहक म्हणून काम करत या सूत्रकृमीच्या जाती वाळवीला रोगग्रस्त करण्यामध्ये मोलाची मदत करत असल्याचे अमेरिकी कृषी विभागाच्या सूत्रकृमी प्रयोगशाळेतील वनस्पती रोग तज्ज्ञ लेन कार्टा यांनी सांगितले.
अमेरिकी कृषी संशोधन संस्थेतील कीटकशास्त्राचे निवृत्त संशोधक अशोक रैना यांनी सुत्रकृमीच्या वाळवीच्या शरीरातील काही जाती वेगळ्या केल्या होत्या. त्यांची ओळख कार्टा यांनी पटवली आहे. उझबेकिस्तानमध्ये आढळणाऱ्या स्थानिक वाळवीच्या मृत किंवा आजारी नमुन्यातून सूत्रकृमीच्या सात जाती ओळखल्या आहेत. हे संशोधन आंतरराष्ट्रीय सुत्रकृमी शास्त्राच्या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.
असे आहे संशोधन
- कार्टा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सूत्रकृमीबाबत अधिक संशोधन करून जिवाणूंशी असलेले सहजीवी संबंध शोधण्याचा प्रयत्न केला. - एका नमुन्यामध्ये पोइकिलोलॅइमस ( Poikilolaimus ) सूत्रकृमी आणि जिवाणूंचे वाळवीच्या डोक्यामध्ये एकत्रीत राहतात. हेच सूक्ष्म जीव वाळवीच्या आजारीपणासाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आले आहे. या घटनेमध्ये असलेले सूत्रकृमीसह जिवाणूंचे अस्तित्व ही लक्षणीय बाब आहे. जैविक घटकामध्ये वाहक म्हणून सूत्रकृमीचे वाहक म्हणून त्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो.
- अन्य एका नमुन्यावर सध्या संशोधन करण्यात येत असून, पॅनाग्रेलस सुत्रकृमी जातीचा टॅरेनटूलाच्या बाल्यावस्थेवर होणार परिणाम तपासला जात आहे.
- कीटक आणि यीस्टच्या काही प्रजाती या कीट नियंत्रणामध्ये नवीन पर्याय म्हणून पुढे येत आहेत. त्यातून कीडनियंत्रणाच्या नव्या पद्धती विकसित होऊ शकतील.
-----
फोटोओळ- पोइकिलोलॅइमस ( Poikilolaimus ) सूत्रकृमी हे फॉरमोसॅन वाळवीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतील. (स्रोत- लेन कार्टा, एआरएस)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा