मंगळवार, १५ जानेवारी, २०१३

तंबाकूच्या रोपांना मिळाले चिरतारूण्य

तंबाकूच्या रोपांना मिळाले चिरतारूण्य

हिरव्यागार पानांचे आठ वर्षे जुने, साडेसहा मीटर उंच तंबाकूचे रोप मिळवले जनुकिय सुधारणेतून
बायोमास निर्मितीसाठी संशोधन ठरेल उपयुक्त

साधारणपणे तंबाकूची रोपे तीन ते चार महिन्यासाठी जगतात, त्यानंतर फुले आल्यानंतर काही कालावधीत मरून जातात. मात्र जर्मनीतील संशोधकांनी तंबाकूची ही रोपे अधिक काळ जगविण्यासाठी आणि अधिक वाढ मिळविण्यासाठी जनुकिय संशोधन केले आहे. त्यातून तंबाकू्च्या रोपातील फुलावर येण्याची प्रक्रिया लांबवली आहे. त्यामुळे ही रोपे अधिक काळ जिवंत राहणार असून वाढत राहतात. या संशोधनामुळे जैवइंधनासाठी बायोमास उपलब्ध होण्यास मदत होईल. 
तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये तंबाकूची रोपे एक ते जास्तीत जास्त दोन मीटर उंचीपर्यत वाढतात. त्याच्या पानांचा आकारही मर्यादीत असतो. फुले  आल्यानंतर तंबाकूंचे रोप मरून जाते. या पिकाच्या जनुकिय माहितीवर फ्राऊनहॉपर इन्स्टिट्यूट फॉर मॉलेक्युलर बायोलॉजी ऍण्ड ऍप्लाईड इकॉलॉजी (आयएमई) येथील संशोधक संशोधन करत होते. या संशोधनात रोपे अंकुरल्यानंतर फुलावर येईपर्यंतची स्थिती रोखण्यासाठी आवश्यक जनुकिय माहितीची उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या रोपातील वाढीवर बंधने आणणाऱ्या घटकांना रोखणे शक्य होणार आहे. ही रोपे अधिक काळ तरूण राहण्यास, वाढीस मदत मिळणार आहे. या संशोधनाविषयी माहिती देताना संशोधक डिर्क प्रुफेर यांनी सांगितले, की आमच्या पहिल्या तंबाकू रोपांपैकी एक रोप हे आठ वर्षे इतके जूने आहे. त्यानंतरही ते जिवंत असून चांगल्या प्रकारे वाढत आहे. सातत्याने त्याची छाटणी करण्यात येत असून सध्या त्याची उंची साडेसहा मीटर इतकी आहे. त्याची काडीही दहा सेंटीमीटरइतक्या जाडीची झाली आहे. ज्या हरितगृहाच्या उंचीच्या मर्यादेमुळे झाडाची उंचीही मर्यादित ठेवली आहे. अन्यथा ती अधिक ठेवणे शक्य आहे. 
सामान्य तंबाखूच्या रोपांना काडीच्या एकदम खालून पाने येण्यास सुरवात होते. त्यानंतर काही दिवसात ती पिवळी पडून गळतात. त्याचवेळी नवी जनुकिय सुधारीत रोपांची पाने आरोग्यपूर्ण आणि हिरवी राहतात. जणू त्यांना तारूण्याचे वरदान मिळाले आहे.


कोट ः
तंबाकूच्या फुलावर येण्यासाठी कारणीभूत असलेल्या जनुकांतील माहितीमध्ये बदल करण्यात आला आहे. यासाठी जनुकिय माहिती पोचवण्यासाठी सूक्ष्म जीवांचा वापर केला आहे. या सुधारीत जनुकामुळे ही रोपे फुलावर येत नाहीत. आणि फुलावर येत नाहीत, तोवर त्यांची वाढ होत राहणार आहे.
-डिर्क प्रुफेर, संशोधक, आयएमई

अधिक बायोमास निर्मितीसाठी

- हे तंत्र अन्य पिकामध्येही वापरणे शक्य असून जपानमधील एक रसायन उद्योग बटाटा रोपावर या तंत्राचे प्रयोग करत आहे. बटाट्यातून अधिक प्रमाणात स्टार्च उपलब्ध होण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे.
- या पद्धतीतून साधापणपणे 2050 सालापर्यंत प्रति हेक्टर उत्पादनामध्ये दुपटीने वाढ करणे शक्य होणार असल्याचा दावा जर्मनीतील जैवअर्थविषयक परिषदेने केला आहे.
- ज्या पिकामध्ये फुलांचे फारसे महत्त्व नाही, अशा पिकामध्ये ( उदा. शुगर बीट) या तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरणार आहे. ज्या पिकामध्ये फुले आणि त्यातून फळे, बिया यांचे उत्पादन घेतले जाते, तिथे हे तंत्र वापरणे शक्य नाही.
- तसेच या प्रकारामध्ये फुले येत नसल्याने अमर्यादीत संख्येने वाढ होऊन पर्यावरणात मिसळण्याचा धोका नाही.

भविष्य संशोधनाचे...

भविष्यात वनस्पतीची वाढ मर्यादित ठेवणारे गुणधर्म बियामध्येच रसायनांच्या साह्याने रोखणे शक्य होईल. त्यामुळे प्रत्येकवेळी पिकाच्या जनुकिय गुणधर्मामध्ये बदल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही रोपे आपल्या सामान्य पिक पद्धतीत लागवड करणे शक्य होईल. त्यासाठी जनुकांचे गुणधर्माविषयी अधिक माहिती उपलब्ध होण्याची आवश्यकता राहिल. पुढील वर्षापासून या रोपाच्यां लागवडीचे प्रयोग करण्यात येणार असून सामान्य रोपाप्रमाणेच यांचा लागवड करण्यात येईल. 


फोटोओळ -संशोधक डिर्क प्रुफेर आपल्या सहकाऱ्यांसह हरितगृहातील तंबाकू रोपांसोबत ( सहकाऱ्यामध्ये उजवीकडे गुंडूला नोल आणि डावीकडे लेना हॅऱिग )

स्टिंक बगसाठी गंध सापळे होताहेत विकसित

स्टिंक बगसाठी गंध सापळे होताहेत विकसित

अमेरिकेतील फळबागेतील हानीकारक कीडींचे जैविक नियंत्रण शक्य

गेल्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये पहिल्यांदा तपकिरी रंगाचे स्टिंक बग ( BMSB) आढळले होते. आता त्यांचा प्रादुर्भाव जवळजवळ 39 राज्यामध्ये आढळून येतो. त्याचा प्रादुर्भाव फळबागा, भाजीपाला आणि अन्य काही पिकांमध्ये दिसून येतो. अमेरिकेतील सर्वाधिक हानीकारक कीडीमध्ये या कीडीची गणना केली जाते. या कीडीच्या नियंत्रणासाठी अमेरिकन कृषी संशोधन संस्थेच्या बेल्टव्हिले येथील जैविक कीड नियंत्रण आणि वर्तणूक प्रयोगशाळेतील संशोधकांनी संशोधन केले आहे. या कीडीचा जनुकिय अभ्यास केला असून त्यांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या गंधाचे विश्लेषण केले आहे. त्यांचा या कीडींना आकर्षित करणारे व्यावसायिक सापळे बनविण्यासाठी उपयोग करण्यात येणार आहे. या दोन्ही संशोधनामुळे या कीडीचे चांगल्या प्रकारे नियंत्रण करणे शक्य होणार आहे. हे संशोधन ऍग्रीकल्चरल रिसर्च मॅगेझीन या अमेरिकेतील संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.

गंध विषयक संशोधन

- एआरएस मधील रसायनतज्ज्ञ ऍशोट ख्रिमियन व सहकाऱ्यांनी या कीडीतील आक्रमकतेसाठी कारणीभूत असलेला गंध ओळखला आहे. हा गंध खाद्य खाणाऱ्या नर- मादी आणि त्यांच्या पिल्लांनाही आकर्षित करतो. जेव्हा हा गंध अन्य गंध रसायने ( स्टेरियोआयसोमर ) यांच्या सोबत मिसळला जातो. त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो.
- ख्रिमियन आणि ऐजून झांग यांनी नेमका स्टेरियोआयसोमर घटक ओळखण्याचे संशोधन पूर्ण केले आहे. स्टिंक बग अन्य कीडींना आकर्षित करण्यासाठी त्याचा वापर करतात. त्यामध्ये हा गंध अधिक काळ टिकण्यासाठी अन्य घटक रसायने मिसळून त्याचेही फॉर्म्यूलेशन बनविले आहे. त्याच्या 2012 च्या उन्हाळ्यामध्ये विविध प्रक्षेत्रावर चाचण्या घेऊन कीडींचे आकर्षित होण्याचे संख्येतील प्रमाण मिळवले आहे.  या चाचण्याच्या माहितीवर आधारित पेटंटसाठी अर्ज दाखल केला आहे.

जनुकिय संशोधन

वेल्टसव्हिले येथील संशोधिका डॉन गुंडेरसेन-रिन्डाल हे स्टिंक बग या कीडीचा जनुकिय अभ्यास करत असून नियंत्रणासाठी त्याचा फायदा होणार आहे. तसेच गुंडेरसेन-रिन्डाल या होस्टन (टेक्सास) येथील बेलॉर वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकांसह स्टिंक बगचे जनुकिय नकाशा तयार करण्यासाठी संशोधन करत आहे. त्यामुळे या कीडीच्या नियंत्रणासाठी त्याचा लाभ होईल.

अधिक माहितीसाठी ः http://www.ars.usda.gov/is/AR/archive/jan13/stinkbug0113.htm
-

बुधवार, ९ जानेवारी, २०१३

तण नियंत्रणासाठी मका जाती चीनमध्ये होताहेत विकसित

तण नियंत्रणासाठी मका जाती चीनमध्ये होताहेत विकसित

सनफ्लॉवर ब्रुमरेप या परजिवी तणांच्या नियंत्रण होईल शक्य

 मका या पिकाची लागवड अन्न, पशुखाद्य आणि इंधनासाठी जगभर केली जाते. मात्र चीनमधील संशोधकांना मका या पिकामध्ये ब्रुमरेप या परजिवी तणांचे नियंत्रण करण्यासाठी सापळा पीक म्हणून उपयुक्त असल्याचे आढळले आहे. या अभ्यासावर आधारीत योग्य गुणधर्माच्या मका जाती पैदास करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी करण्यात आला असून  भविष्यामध्ये मका या पिकाला तण नियंत्रक अशी नवी उपयुक्त ओळख मिळणार आहे. हे संशोधन क्रॉप सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

हानीकारक परजिवी तण ः
आशिया, आफ्रिका आणि आग्नेय युरोप या खंडामध्ये भाज्या आणि अन्य पिकामध्ये सनफ्लॉवर ब्रुमरेप हे परजिवी तण प्रामुख्याने आढळून येते.  या तणामध्ये हरितद्रव्य नसल्याने ते पाणी आणि अन्नद्रव्यासाठी पुर्णपणे यजमान पिकावर अवलंबून असते. सुर्यफूल पिकामध्ये या तणांचा प्रादुर्भाव झाल्या उत्पादनामध्ये सुमारे 50 टक्क्यापर्यंत घट येते. चीनमध्ये सुर्यफूल हे महत्त्वाचे तेलबिया पीक असून एकूण क्षेत्राच्या सुमारे 64 टक्के ( 24 हजार हेक्टरपेक्षा अधिक) पिकावर या तणांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

असा झाला अभ्यास
- ब्रुमरेप या तणांचे नियंत्रण करण्यासाठी रासायनिक आणि लागवडीच्या विविध पद्धतीचा वापर सध्या केला जातो. गेल्या काही अभ्यासामध्ये या तणांचे अंकुरण थांबवण्यासाठी सापळा पीकांचा वापर काही प्रमाणात फायदेशीर दिसून आला होता. त्या पद्धतीला आत्मघाती अंकुरण असे म्हटले जाते.
- तणाचे पुर्णपणे नियंत्रण करण्यासाठी चीनमधील आग्नेय ए आणि एफ विद्यापीठातील संशोधक यॉंगक्विंग मा आणि सहकाऱ्यांनी मका या पिकाचा सापळा पीक म्हणून उपयोग करण्यासाठी अभ्यास केला आहे.
- चीनमध्ये मका आणि सूर्यफूल  या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. मका या पिकावर ब्रुमरेप या तणाचा प्रादुर्भाव होत नाही.त्यामुळे सूर्यफूलामध्ये मक्याच्या काही ओळी पेरून तणाला अटकाव करणे शक्य आहे. त्याचवेळी या मक्यापासून जनावरासाठी चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
-विविध मका जातीचे  ब्रुमरेप च्या अंकुरणावर होणारे परिणाम तपासण्यात आले. त्यामध्ये संकरीत आणि साध्या दोन्ही वाणांचा वापर केला गेला. त्यातील एक संकरीत जात आणि तिची मुळ प्रजाती ही सर्वाधिक अंकुरण दर देणारी आहे.
- सापळा पीक म्हणून वापर करतानाच मका पिकाच्या मुळा, कोंबाचा रस वापरण्याबरोबरच मुळाशेजारची माती यांचा तणावर होणारा परिणाम पाहण्यात आला. त्यामध्ये मुळांच्या रसामुळे कोंबाच्या रसाच्या तुलनेत अधिक अंकुरण मिळते.
- अंकुरणासाठी कारणीभूत रसायनामध्ये स्ट्रिगोलॅक्टोन हे महत्त्वाचे असते. ते मक्याच्या मुळामध्ये तयार होते.

तण नियंत्रक मका जाती विकसनासाठी कार्यक्रम
- या अभ्यासावर आधारीत ब्रुमरेप या तणामध्ये आत्मघाती अंकुरणायोग्य मक्याच्या जाती पैदास करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून भविष्यात मका हे पीक ब्रुमरेप या तणांच्या नियंत्रणासाठी वापरणे शक्य होईल.
- सूर्यफूलामध्ये मक्याचे सापळा पीक जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी फायद्याचे ठरेल. त्यातून त्याचा खर्च वसूल होईल.

फोटोओळ1ः सूर्यफुलामध्ये आढळणारे ब्रुमरेप परजिवी तण (Orobanche cumana) 
फोटोओळ 2 ः सुर्यफूलावर परजिवी ब्रुमरेप तणांच्या प्रादुर्भाव
जर्नल संदर्भ ः
Yongqing Ma, Jinnan Jia, Yu An, Zhong Wang, Jianchang Mao. Potential of Some Hybrid Maize Lines to Induce Germination of Sunflower Broomrape. Crop Science, 2012; DOI: 10.2135/cropsci2012.03.0197
-