मंगळवार, १५ जानेवारी, २०१३

तंबाकूच्या रोपांना मिळाले चिरतारूण्य

तंबाकूच्या रोपांना मिळाले चिरतारूण्य

हिरव्यागार पानांचे आठ वर्षे जुने, साडेसहा मीटर उंच तंबाकूचे रोप मिळवले जनुकिय सुधारणेतून
बायोमास निर्मितीसाठी संशोधन ठरेल उपयुक्त

साधारणपणे तंबाकूची रोपे तीन ते चार महिन्यासाठी जगतात, त्यानंतर फुले आल्यानंतर काही कालावधीत मरून जातात. मात्र जर्मनीतील संशोधकांनी तंबाकूची ही रोपे अधिक काळ जगविण्यासाठी आणि अधिक वाढ मिळविण्यासाठी जनुकिय संशोधन केले आहे. त्यातून तंबाकू्च्या रोपातील फुलावर येण्याची प्रक्रिया लांबवली आहे. त्यामुळे ही रोपे अधिक काळ जिवंत राहणार असून वाढत राहतात. या संशोधनामुळे जैवइंधनासाठी बायोमास उपलब्ध होण्यास मदत होईल. 
तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये तंबाकूची रोपे एक ते जास्तीत जास्त दोन मीटर उंचीपर्यत वाढतात. त्याच्या पानांचा आकारही मर्यादीत असतो. फुले  आल्यानंतर तंबाकूंचे रोप मरून जाते. या पिकाच्या जनुकिय माहितीवर फ्राऊनहॉपर इन्स्टिट्यूट फॉर मॉलेक्युलर बायोलॉजी ऍण्ड ऍप्लाईड इकॉलॉजी (आयएमई) येथील संशोधक संशोधन करत होते. या संशोधनात रोपे अंकुरल्यानंतर फुलावर येईपर्यंतची स्थिती रोखण्यासाठी आवश्यक जनुकिय माहितीची उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या रोपातील वाढीवर बंधने आणणाऱ्या घटकांना रोखणे शक्य होणार आहे. ही रोपे अधिक काळ तरूण राहण्यास, वाढीस मदत मिळणार आहे. या संशोधनाविषयी माहिती देताना संशोधक डिर्क प्रुफेर यांनी सांगितले, की आमच्या पहिल्या तंबाकू रोपांपैकी एक रोप हे आठ वर्षे इतके जूने आहे. त्यानंतरही ते जिवंत असून चांगल्या प्रकारे वाढत आहे. सातत्याने त्याची छाटणी करण्यात येत असून सध्या त्याची उंची साडेसहा मीटर इतकी आहे. त्याची काडीही दहा सेंटीमीटरइतक्या जाडीची झाली आहे. ज्या हरितगृहाच्या उंचीच्या मर्यादेमुळे झाडाची उंचीही मर्यादित ठेवली आहे. अन्यथा ती अधिक ठेवणे शक्य आहे. 
सामान्य तंबाखूच्या रोपांना काडीच्या एकदम खालून पाने येण्यास सुरवात होते. त्यानंतर काही दिवसात ती पिवळी पडून गळतात. त्याचवेळी नवी जनुकिय सुधारीत रोपांची पाने आरोग्यपूर्ण आणि हिरवी राहतात. जणू त्यांना तारूण्याचे वरदान मिळाले आहे.


कोट ः
तंबाकूच्या फुलावर येण्यासाठी कारणीभूत असलेल्या जनुकांतील माहितीमध्ये बदल करण्यात आला आहे. यासाठी जनुकिय माहिती पोचवण्यासाठी सूक्ष्म जीवांचा वापर केला आहे. या सुधारीत जनुकामुळे ही रोपे फुलावर येत नाहीत. आणि फुलावर येत नाहीत, तोवर त्यांची वाढ होत राहणार आहे.
-डिर्क प्रुफेर, संशोधक, आयएमई

अधिक बायोमास निर्मितीसाठी

- हे तंत्र अन्य पिकामध्येही वापरणे शक्य असून जपानमधील एक रसायन उद्योग बटाटा रोपावर या तंत्राचे प्रयोग करत आहे. बटाट्यातून अधिक प्रमाणात स्टार्च उपलब्ध होण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे.
- या पद्धतीतून साधापणपणे 2050 सालापर्यंत प्रति हेक्टर उत्पादनामध्ये दुपटीने वाढ करणे शक्य होणार असल्याचा दावा जर्मनीतील जैवअर्थविषयक परिषदेने केला आहे.
- ज्या पिकामध्ये फुलांचे फारसे महत्त्व नाही, अशा पिकामध्ये ( उदा. शुगर बीट) या तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरणार आहे. ज्या पिकामध्ये फुले आणि त्यातून फळे, बिया यांचे उत्पादन घेतले जाते, तिथे हे तंत्र वापरणे शक्य नाही.
- तसेच या प्रकारामध्ये फुले येत नसल्याने अमर्यादीत संख्येने वाढ होऊन पर्यावरणात मिसळण्याचा धोका नाही.

भविष्य संशोधनाचे...

भविष्यात वनस्पतीची वाढ मर्यादित ठेवणारे गुणधर्म बियामध्येच रसायनांच्या साह्याने रोखणे शक्य होईल. त्यामुळे प्रत्येकवेळी पिकाच्या जनुकिय गुणधर्मामध्ये बदल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही रोपे आपल्या सामान्य पिक पद्धतीत लागवड करणे शक्य होईल. त्यासाठी जनुकांचे गुणधर्माविषयी अधिक माहिती उपलब्ध होण्याची आवश्यकता राहिल. पुढील वर्षापासून या रोपाच्यां लागवडीचे प्रयोग करण्यात येणार असून सामान्य रोपाप्रमाणेच यांचा लागवड करण्यात येईल. 


फोटोओळ -संशोधक डिर्क प्रुफेर आपल्या सहकाऱ्यांसह हरितगृहातील तंबाकू रोपांसोबत ( सहकाऱ्यामध्ये उजवीकडे गुंडूला नोल आणि डावीकडे लेना हॅऱिग )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा