गुरुवार, ९ मे, २०१३

चला, जग पाहू या कीटकांच्या डोळ्यांनी!


चला, जग पाहू या कीटकांच्या डोळ्यांनी! 


कीटकांच्या संयुक्त डोळ्यांच्या नकलेतून विकसित केला कॅमेरा


बाजारामध्ये अनेक महागडे कॅमेरे उपलब्ध आहेत. मात्र एकाच वेळी वाईड ऍंगल आणि पुर्ण खोली असलेले छायाचित्र घेता येत नाही. मात्र लवकरच एकाच वेळी 180 अंशामधील दृष्य सहजतेने टिपू शकेल, अशा प्रकारचा कॅमेरा अमेरिकेतील इल्लिनॉईज विद्यापीठामध्ये विकसित करण्यात येत आहे. अर्थात या संशोधकासमोर आदर्श आहे, तो कीटकांच्या संयुक्त प्रकारच्या डोळ्यांचा. हे संशोधन नेचर या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

माणसांचे डोळे हे साध्या प्रकारचे तर कीटकांचे किंवा मुंग्याचे डोळे हे संयुक्त प्रकारचे असतात. साध्या भाषेत एका भिंगाचे म्हणजे साधे डोळे आणि अनेक भिंगाचे म्हणजे संयुक्त डोळे असे ढोबळमानाने म्हणता येईल. आपले आताचे सर्व कॅमेरे हे एका भिंगाचे (लेन्सचे) असतात. त्यामुळे त्यातून कमी कोनातून दृष्य टिपले जाते, ही त्यांची मर्यादा आहे.  सर्वात उत्तम डिजीटल कॅमेरा विकसित करण्यासाठी इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधकांनी कीटकाच्या डोळ्याच्या रचनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे.
संशोधकांनी एका अर्धगोलाकार पायावर एकाच वेळी सुमारे 180 लहान लेन्स किंवा भिंगांचा समावेश केला आहे. या सर्व लेन्सेस या इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने जोडलेल्या असतात. त्याखाली प्रत्येक भिंगासाठी एक प्रकाश संवेदक असणार आहे.  सध्या विकसित केलेले प्रारूप कमी क्षमतेचे असून त्याच्या प्रतिमा या कमी रिझॉल्युशनच्या असणार आहेत. मात्र प्रत्यक्षासारखी खोली आणि वाईड ऍंगल दृष्य पकडणे शक्य होणार आहे. सध्याच्या कॅमेरांच्या मर्यादा कमी होण्यास मदत होणार आहे.

---------------------------------------------------------------------

 तुलनात्मक विश्लेषण -

1) कीटकांच्या डोळ्याची रचना  - 


कीटकातील संयुक्त डोळे
कोलोरॅडो विद्यापीठातील संशोधक डॉ. जियानलियांग झायो यांनी सांगितले, की घरमाशीच्या डोळ्यांची संयुक्त प्रकारची रचना ही एकाच वेळी 28 हजार लहान डोळे एकत्र केल्यासारखी असते. त्या रचनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत संशोधन करण्यात येत आहे. संयुक्त डोळ्यातील या प्रत्येक लहान भागामध्ये (इंग्रजीमध्ये त्याला ओमॅटीडीअम ommatidium  असे म्हणतात.) वेगळे बुबुळ किंवा कोरनल लेन्स, स्फटिकमय शंकू आणि त्या खाली प्रकाश संवेदक अवयव असतो. एक पुर्ण चित्राचे अनेक भाग या मार्फत टिपले जातात.  कीटक आजूबाजूला झालेली अगदी सूक्ष्म हालचालही टिपू शकतात.


2) कृत्रिम डोळ्याची रचना- 



एका रचनेमध्ये सुमारे 180 सूक्ष्म भिंग हे प्रकाश संवेदकाच्या वर बसवलेले आहेत. ते इलेक्ट्रॉनिक्स व संगणकिय पद्धतीने जोडलेले असतात. या प्रत्येक भिंगातून आलेल्या संदेश संगणकामध्ये एकत्रित केले जातात. ही सर्व यंत्रणा एका आडव्या पट्टीवर बसवलेल्या 160 अंशाच्या कोन करेल, अशा अर्धगोलाकार आकारावर बसवलेली असते. त्यामध्ये ताणता येणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक रचनाचा वापर करण्यात आला आहे.  ही एक रचना 180 अंशामध्ये पाहू शकेल, तर दोन रचना योग्य अंतरावर बसविल्यास एकाच वेळी 360 अंशमध्ये पाहणे शक्य होऊ शकत असल्याचे डॉ. झायो यांनी सांगितले.

 -------------------------------------------------------

असे होतील या संशोधनाचे फायदे

- या संशोधनाचा फायदा विस्तृत अशा सर्वेक्षणासाठी करता येईल. त्याचबरोबर मानवी शरीराच्या अंतर्गत तपासणीसाठी, शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या इन्डोस्कोपिक लेन्सेसमध्ये करता येईल.
- जर्मनी येथील मॅक्स प्लॅंक मेंदूजीवशास्त्र संस्थेतील संशोधक ऍलेक्झाडर बोर्स्ट आणि जोहान्स प्लेट्ट (जे या संशोधनाशी संबंधित नाहीत.) यांनी या संशोधनाचे नेचर या संशोधनपत्रिकेसाठी विश्लेषण केले होते. त्या विश्लेषणामध्ये ते म्हणतात, की या प्रकारच्या संशोधनाचे भविष्य उज्ज्वल आहे. कारण एक लहान आकाराचे हवेत उडू शकणारे वाहनावर असे लेन्सेस बसविल्यास ते अधिक सक्षमपणे अडथळ्यामधून मार्गक्रमणा करू शकेल. विशेषतः आपत्तीच्या प्रसंगी अशा यंत्राचा वापर अधिक फायदेशीर ठरेल. या यंत्रावर धुर संवेदक, रेडिओऍक्टिव्ह संवेदक कार्यरत असतील. आपत्तीमध्ये अडकलेल्या लोकांचा माग घेणे सोपे होणार आहे.



अधिक माहितीसाठी वाचा ऍग्रोवन www.epaper.agrowon.com











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा