शनिवार, १० जानेवारी, २०१५

शेतकऱ्यांसाठी खास फॅबलेट


शेतकऱ्यांसाठी खास फॅबलेट

हैदराबाद येथील इक्रिसॅट चे संशोधन

हैदराबाद येथील इक्रीसॅट या संस्थेने खास शेतकऱ्यांसाठी मोबाईल, टॅबलेट कॉम्पुटर संपर्क, समन्वय आणि माहिती साठ्याचे काम करणारा ग्रीन फॅबलेट विकसित केला आहे. त्यासाठी हैदराबाद येथील एनयूएनसी सिस्टिम्स या कंपनीची मदत घेण्यात आली असून, या ग्रीन फॅबलेटमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या निविष्ठा खरेदीपासून विक्रीपर्यंतच्या माहितीचा साठा उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा त्याला शेतीतील आवश्यक निर्णयासाठी होणार आहे. या उपकरणाची किंमत 299 अमेरिकी डॉलर (सुमारे 18900 रुपये) इतकी आहे.

डिजिटल तंत्रज्ञानामध्ये सातत्याने व वेगाने बदल होत आहेत. या तंत्रज्ञानाचा लाभ अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यापर्यंत पोचविण्यासाठी हैदराबाद येथील इक्रिसॅट संस्थेने विविध खासगी कंपन्यांच्या सहकार्यांने ग्रीन फॅबलेट तयार केले आहे.  या ग्रीन फॅबलेटचा कृषी उद्योजक आणि विस्तार कार्यक्रमासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. यातून विस्तार कार्यकर्ते लहान शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीपासून विविध टप्प्यावर आवश्यक ती माहिती पुरवू शकतील. त्या विषयी माहिती देताना इक्रीसॅट चे संचालक डॉ. दिलीपकुमार गुंटूकू यांनी सांगितले, की गावामध्ये माहिती साठ्याप्रमाणे हा ग्रीन फॅबलेट काम करेल. त्यातून शेतकऱ्यांना आवश्यक ती माहिती व समन्वयाचे तंत्रज्ञान उपलब्ध होऊ शकेल. त्याच प्रमाणे दुर्गम अशा ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधांचा वापर वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल. कृषी विषयामध्ये कार्यरत सर्व घटकांना एकत्रित आणण्यामध्ये हे फॅबलेट महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.

या फॅबलेटच्या निर्मितीमध्ये कार्यरत एनयूएनसी सिस्टिम्स चे वरीष्ठ संचालक संदीप डागा म्हणाले, की शेतकरी, संशोधकांमधील त्वरीत संपर्क, समन्वयातून पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. तसेच संशोधनासाठीही या माहिती साठ्याचा उपयोग होणार आहे. या साठी खास ग्रीन सीम तयार करण्यात आले आहे. त्याचा वापर मोबाईलसह फॅबलेटमध्ये करता येईल.
- फॅबलेटच्या माध्यमातून हवामान आणि कीड प्रादुर्भावाचे अंदाज मेसेजच्या माध्यमातून मोफत उपलब्ध होतील.

--------
ग्रीन सीम प्रकल्प ः
या तंत्रज्ञानाच्या चाचण्या ग्रीनसीम प्रोग्राम या नावाने सहा महिने घेण्यात आल्या. भारतातील तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या तीन राज्यातील 171 खेड्यांचा त्यात समावेश होता. या प्रकल्पामध्ये 40 हजार शेतकरी सहभागी झाले होते.  
- त्यातील एक आहेत महिला शेतकरी चंद्रकला. त्यांनी सांगितले, की गेल्या हंगामामध्ये अवकाळी पावसामुळे भुईमुगाच्या पिकाचे पुर्ण नुकसान झाले होते. मात्र, या वर्षी ग्रीन सीमच्या माध्यमातून हवामानाचे अंदाज आवाजाच्या स्वरुपात येत होते. त्यामुळे अवकाळी पावसाचा अंदाज मिळताच काढणीच्या वेळेआधीच तीन दिवस भुईमुग काढून घेतला. परीणामी पूर्ण पीक वाचले. 
- उद्योजकतेला चालना ः एका ग्रीन सीम विक्रीमागे साधारणपणे दहा रुपये व पुढील प्रत्येक रिचार्जसाठी 2.3 टक्के वाटा विक्रेत्याला मिळत असल्याने ग्रामीण भागामध्ये सीम व रिचार्ज विक्रीचा व्यवसाय अनेक तरूणांनी सुरू केला.
- ग्रीन सीमच्या निर्मितीसाठी इंडीयन फार्मर्स फर्टीलायझर कोऑपरेटिव्ह (इफको), किसान संचार लि. (IKSL) यांच्यासह एअरटेल यांची मदत घेण्यात आली. या ग्रीन सीमला भारतीय विपनन संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा फ्लेम पुरस्कार 2013 मिळाला आहे.

फॅबलेटची वैशिष्ट्ये ः
ग्रीन फॅबलेट हा ग्रीनसीमचा पुढील टप्पा असून, माहितीची देवाणघेवाण अत्यंत वेगाने होऊ शकेल.
ग्रामीण भागामध्ये वापरता येईल अशी याची रचना केली असून, त्याच्या जल प्रतिबंधक, धक्का प्रतिरोधक, धूळी, कचऱ्यापासून मुक्त, वाचता येईल अशी मोठी अक्षरे, प्रखर उन्हामध्ये वाचता येईल अशी स्क्रिन या वैशिष्ट्यामुळे त्याची उपयुक्तता वाढली आहे.

---

दीलीपकुमार गुंटूकू ग्रामीण महिलांना फॅबलेटचे प्रात्यक्षिक दाखविताना.
For more information please contact: Dileepkumar Guntuku, +91 40 30713205. G.Dileepkumar@cgiar.org or Joanna Kane-Potaka, +91 40 30713227,
j.kane-potaka@cgiar.org or Showkat Rather at +91 897 888 2187 or r.showkat@cgiar.org


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा