माया संस्कृतीच्या शेतीचे नकाशे झाले उपलब्ध
आधुनिक मृदा संशोधन साधनाचा वापर ठरला फायदेशीर
उत्क्रांती आणि त्यांच्याशी संबंधित घटकांचा अभ्यास करण्यासाठी प्राचीन संस्कृतीचे उत्खनन उपयोगी पडत असते. या उत्खननातून मिळालेल्या माहितीवरच आधुनिक संशोधनाचा डोलारा उभा राहत असतो. अमेरिकेतील ग्वाटेमाला येथील प्राचीन माया संस्कृतीच्या कालावधीत होणाऱ्या शेती संबंधी उत्खननामध्ये प्रथमच आधुनिक मृदा संशोधन साधनाचा वापर करण्यात आला होता. त्यातून त्या काळी होणाऱ्या मक्याच्या शेतीचे नकाशे उपलब्ध करण्यात आले आहेत.
बहुतेक वेळा इतिहासातील गोष्टीचा काय उपयोग असा निराशावादी सूर अनेकजण आवळत असतात. मात्र प्राचीन इतिहासाच्या संशोधनातून नव्या आणि आधुनिक संशोधनाला चालना मिळत असते. अमेरिकेमध्ये ख्रिस्त पूर्व 1000 वर्षापूर्वी माया ही आधुनिक आणि सुसंस्कृत कोलंबियन पूर्व संस्कृती उदयास आली. साधारणपणे दहा हजार लोकांची वस्ती जंगलामध्ये झाली होती. त्यातील एक वस्ती ग्वाटेमाला येथील टिकल राष्ट्रीय पार्क च्या परिसरामध्ये होती. ही संस्कृती ख्रिस्त उदयानंतर 250 आणि 900 वर्षाच्या कालावधीमध्ये उत्कर्षावस्थेत होती. या संस्कृतीतील विविध घटकाबाबत अभ्यास केला जात आहे. त्याबाबत नुकतेच एक संशोधन सॉईल सायन्स ऑफ अमेरिका जर्नल या संशोधनपत्रिकेच्या नोव्हेंबर - डिसेंबरच्या अंकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
ब्रिगॅम यंग विद्यापीठातील मृदा शास्त्रज्ञ रिचर्ड टेरी यांच्या नेतृत्वाखाली आंतरशाखीय संशोधकांचा गट माया संस्कृतीबाबत संशोधन करत आहे. त्यांनी त्या काळातील मक्याच्या शेतीविषयी अभ्यास केला असून अत्यंत उताराच्या जागेवरील शेती पद्धती माया संस्कृतीतील लोक अवलंबित असल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. त्यांच्या साठ हजार लोकांच्या समुदायासाठी चांगल्या दर्जाचे शेती उत्पादन ते घेत असल्याचे आढळून आले आहे. अधिक उताराच्या जमिनीवर होणारी शेती मातीच्या झिजेमुळे काही शतकानंतर शेतीसाठी उपयुक्त राहिली नसावी. त्यामुळे अन्नधान्यांच्या उत्पादनामध्ये घट होत गेली असावी, अशा निष्कर्षाप्रत ते आले आहेत. प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासाविषयी आपली भुमिका सांगताना मृदा शास्त्रज्ञ रिचर्ड टेरी यांनी सांगितले, की प्राचीन संस्कृतीच्या उत्खननामध्ये बहुतांश वेळा घरे, त्या काळची राहणी व्यवस्था, रस्ते, चौक आणि प्रासाद यांचा समावेश असतो. मात्र जंगलामध्ये असलेली त्यांची शेती आणि अन्य कृषी संबंधित घटकाकडे दुर्लक्ष होण्याचा संभव असतो. काहीवेळा त्यावर प्रकाश पडलाच, तरी त्यातील मृदा रसायनशास्त्राशी सांगड घातली जातेच असे नाही.
...असे आहे संशोधन
- टिकल परिसरातील जंगलामध्ये स्थानिक वनस्पती या प्रकाश संश्लेषणाच्या सी 3 या मार्गाचा अवलंब करत असून मका हे पिक सी 4 या मार्गाचा वापर करते. या दोन्ही पद्धतीमध्ये मातीतील सेंद्रिय घटक वेगळे असतात. त्यावरून त्या वेळी या मातीमध्ये कोणती पिके होत असावीत, याविषयी अंदाज बांधता येतो.
- या परिसरातील विविध ठिकाणी मातीच्या नमुन्यांचे विश्लेषण केले आहे. त्यावरून टेरी आणि सहकाऱ्यांनी प्राचीन काळातील मका उत्पादनाचा नकाशा विकसित केला आहे. त्यावरून अन्नधान्याची कमतरता वाढत गेल्याने खोल दरीमध्ये आणि अधिक उताराच्या ठिकाणीही मक्याची शेती होत असल्याचे दिसून आले आहे.
- पुरातत्व संशोधकांच्या दृष्टीने शेती आणि पद्धतीविषयी कुतूहल असते. प्रत्यक्ष धान्य किंवा दाणे उपलब्ध झाल्यावरच सध्या माहिती उपलब्ध होते.मात्र मृदा शास्त्राच्या आधुनिक साधनाचा वापर केल्यास अधिक माहिती उपलब्ध होऊ शकते.
- या आधुनिक साधनाचा वापर केल्यामुळे प्राचीन संस्कृतीबाबतच्या अनेक समजूती नक्कीच बदलून जातील, यात शंका नाही.
जर्नल संदर्भ ः
Richard L. Burnett, Richard E. Terry, Ryan V. Sweetwood, David Webster, Tim Murtha, Jay Silverstein. Upland and Lowland Soil Resources of the Ancient Maya at Tikal, Guatemala. Soil Science Society of America Journal, 2012; DOI: 10.2136/sssaj2010.0224

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा