रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

होमो नालेदी ः मानववंशातील निखळलेला दुवा

मानववंशातील निखळलेला दुवा मिळाला...


आजवर अज्ञात नवी प्रजात सापडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

दक्षिण आफ्रिकेतील एका खोल गुहेमध्ये प्रचंड प्रमाणात अस्थी अवशेष मिळाले असून, ही प्राचीन मानवाची आजवर अज्ञात असलेली नवी प्रजात असल्याचा दावा संशोधकांनी "जर्नल इ लाईफ' मध्ये प्रकाशित संशोधनामध्ये केला आहे. आधुनिक माणसांच्या तुलनेत मेंदूचा लहान आकार आणि झाडावर चढण्याच्या क्रियेसाठी सक्षम असे एप माकडाप्रमाणे असलेले मजबूत खांदे ही या प्रजातीची वैशिष्ट्ये ही मानव वंशीय प्राण्यांशी मिळतीजुळती आहेत. या प्रजातीचे नाव संशोधकांनी "होमो नालेदी' असे ठेवले आहे.

 
दोन वर्षापूर्वी जोहान्सबर्गपासून वायव्येला 30 मैल अंतरावर असलेल्या रायझिंग स्टार येथील गुहेत संशोधकांना हाडांचे सुमारे 1550 नमुने सापडले. हा गेल्या अर्धशतकातील जिवाश्‍माचा सर्वांत मोठा शोध असून, ही एकूण 15 व्यक्तींची हाडे असण्याची शक्‍यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. त्यावरून "होमो नालेदी' हा दोन्ही पायांवर ताठ उभा राहून चालत असावा. त्याच्या हात आणि पायाच्या हाडांची रचना "होमो' या विकसित होत असलेल्या मानवाशी मिळतीजुळती असून, खांदे आणि कवटीची रचना मात्र आदिमानवाप्रमाणे आहे. त्याचा मेंदू लहान आहे. "होमो नालेदी'चे मूळ "होमो' कुळातच असून, सापडलेली हाडे 25 ते 28 लाख वर्षांपूर्वीची आहेत, असे संशोधकांच्या गटाचे प्रमुख ली बर्जर यांनी सांगितले.

होमो नालेदीचा रहिवास आणि मानववंश वृक्षामधील त्यांचे नक्की स्थान या विषयी आताच फारसे भाष्य करणे योग्य होणार नसल्याचे संशोधकांचे मत आहे. मात्र, होमो नालेदीच्या मेंदूचा अत्यंत लहान आकार पाहता गुहेची रचना व त्यांची मृतांना त्यात टाकण्याची किंवा विल्हेवाट लावण्याची क्रिया इतका विचार करण्याची त्यांची क्षमता असेल काय, यावर तज्ज्ञांचे मतभेद आहेत.
--------------------------------------------------

असा दिसत असावा होमो नालेदी ः


चेहऱ्याची हाडे, कवटी आणि दात यांच्या साह्याने होमो नालेदी प्रजातीचे दृश्‍य स्वरूप कसे असेल, याची मांडणी करण्यासाठी गुर्चे या कलाकाराला सुमारे 700 तास लागले. (छायाचित्र ः मार्क थिएस्सन, नॅशनल जिऑग्राफिक)
------------------------------

संशोधकाविषयी थोडेसे...


- ली बर्जर हे 1990 पासून विटवॉटर्सरॅंड विद्यापीठामध्ये मानववंशशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. ते पूर्व आफ्रिकेतील ग्रेट रिफ्ट व्हॅली परिसरामध्ये कार्यरत आहेत. 2008 मध्ये रायझिंग स्टारपासून दहा मैल अंतरावर असलेल्या मालापा या ठिकाणी त्यांना व त्यांच्या नऊ वर्षाचा मुलगा मॅथ्यू याला डोलोमाईटच्या ढिगामध्ये "होमो' प्रजातीचे अवशेष मिळाले होते.
त्यानंतर 2009 मध्ये बर्जर यांच्या गटाला एका खडकामध्ये 20 लाख वर्षांपूर्वीचे दोन पूर्ण सापळे मिळाले. असे संपूर्ण सापळे सापडणे ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यात एकाच वेळी प्राचीन वंशाचे व काही प्रमाणात आधुनिक मानवाची वैशिष्ट्ये दिसून आली होती. त्यामुळे तिला नवी प्रजात मानून बर्जर यांनी त्याचे नामकरण "ऑस्ट्रलोपिथेसिएस सेडिबा' असे केले. आणि रोझेटा स्टोन हा परिसर होमो या मूळ वंशाचे उगमस्थान असल्याचा दावा केला. मात्र, त्यांचा हा दावा संशोधकांनी नाकारला. त्यानंतर सुरवातीच्या काळातील होमो प्रजातीविषयी अनेक संशोधने प्रकाशित झाली, त्यातही बर्जर यांचे नाव अथवा संशोधनाला श्रेय देण्यात आले नाही.
- आपले संशोधन नाकारले गेल्यानंतरही बर्जर यांनी आपले मालापा येथील उत्खनन व संशोधन चालूच ठेवले. त्यानंतर गुहांचे अभ्यासक पेड्रो बोशोफ आणि भूगर्भशास्त्रज्ञ स्टीव्हन टकर यांनी बर्जर यांना रायझिंग स्टार परिसरातील गुहांबाबत माहिती दिली. आणि पुढील संशोधन आता आपल्या समोर आहे.

सापडलेल्या जिवाश्‍माप्रमाणे असा आहे मानववंशाचा इतिहास


- अर्डिपिथेकस रॅमिडस - 44 लाख वर्षापूर्वी ः 1990 मध्ये इथोपियात जीवाश्‍म सापडले. ओटीपोटाची रचना झाडावर चढणे व उभे राहून चालण्यास योग्य.
- ऑस्ट्रलोपिथेकस आर्फेन्सिस - 39 ते 29 लाख वर्षापूर्वी ः प्रसिद्ध असा लकी हा सापळा पूर्व आफ्रिकेत सापडला. त्याची रचना उभे राहून चालण्यायोग्य असली तरी काही काळ ते झाडावर घालवत असावेत.
- होमो हॅबिलिस - 28 ते 15 लाख वर्षापूर्वी ः हा मानवाच्या जवळचा नातेवाईक म्हणता येईल. मेंदूचा आकार थोडा मोठा, आधीच्या प्रजातीपेक्षा दातांचा आकार लहान. हातांची लांबी अधिक.
- होमो नालेदी - काळ अद्याप सांगता येत नाही. मात्र, संशोधकांच्या मते 30 लाख वर्षे ः लहान माणसाप्रमाणे दात, पाय, मात्र बोटांची रचना थोडीशी वेगळी. मेंदूचा आकार लहान.
- होमो इरेक्‍टस - 19 लाख वर्षांपूर्वीचा असावा. ः बहुतांश वैशिष्ट्ये मानवाप्रमाणेच असून, मेंदूचा आकार लहान व चेहरा आदिमानवाप्रमाणे.
- होमो नियान्ड्रेथॅलिन्सिस -दोन लाख ते 40 हजार वर्षे ः आपल्या प्रजातींनी आफ्रिका सोडण्यापूर्वीची वेगळी पोटजात. आधुनिक मानवाच्या तुलनेत उंचीला कमी आणि अधिक बलवान. मेंदूचा आकार थोडा मोठा.
- होमो सेपियन्स - दोन लाख ते आतापर्यंत ः साधारण 60 हजार वर्षापूर्वी यातील लहान गटाने आफ्रिका सोडली व जगामध्ये इतरत्र राहण्यास सुरवात केली. अन्य मानवी प्रजातींना हटवत किंवा काही प्रमाणात आंतरपैदाशीतून त्यांची वाढ झाली. आधुनिक मानवाची उत्पत्ती ही आफ्रिकेतील होमो हेईडेलबर्गेन्सिस पासून झाल्याचे मानले जाते.

असे झाले संशोधन...


- गुहा विषयतज्ज्ञ टकर आणि रिक हंटर यांना रायझिंग स्टार गुहेमध्ये 40 फूट खोलीपर्यंत तिरक्‍या उतरत्या अरुंद जागेतून आत आल्यानंतर 30 फूट लांबीची व काही फूट रुंदीची मोठी पोकळी आढळली. तिथे खाली जमिनीवर कुणीतरी फेकल्याप्रमाणे सगळीकडे हाडे पसरलेली होती. त्यातील एक हाड हे माणसाच्या खालील दातासह जबड्याप्रमाणे होते. ही जागा प्रवेशाद्वारापासून सुमारे 100 यार्ड इतक्‍या अंतरावर होती. ही कदाचित मृत माणसांच्या विल्हेवाटीची जागा असावी. प्रवेशद्वारातून सरळ आत मृतदेह टाकण्याची त्यांची रीत असावी.

- ही हाडे दाखवल्यानंतर बर्जर यांना त्याचे महत्त्व कळाले. ही सर्व हाडे व जीवाश्‍म बाहेर काढण्यासाठी चिंचोळ्या मार्गातून आत जाऊन काम करणाऱ्या व खोदकाम करणाऱ्या तरुण संशोधकांची आवश्‍यकता होती. त्यासाठी फेसबुकवर जाहिरात देण्यात आली. आलेल्या 60 अर्जातून सहा तरुण महिलांची निवड केली. बर्जर यांनी त्यांना "भूमिगत अंतराळवीर' असे नाव दिले.

- मारीना एलियट (सिमॉन फ्रेझर विद्यापीठातील पदवी विद्यार्थिनी) यांच्यासह सहा तरुण महिला संशोधकांनी चिंचोळ्या जागेतून आत जाऊन खोदकाम करून ही हाडे बाहेर काढली. बाहेरून ली बर्जर हे अत्याधुनिक प्रणालीद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवून सूचना देत होते.
- या कामासाठी साठ संशोधक व त्यांचे सहाय्यक कार्यरत होते. या कामासाठी नॅशनल जिऑग्राफिक कडून आर्थिक साह्य मिळाले.
त्यांनी सुमारे 400 पोत्यामध्ये सुमारे 1550 हाडे बाहेर काढली. या 1550 हाडाच्या नमुन्यामध्ये वृद्ध, मुले आणि नवजात बालकांच्याही हाडांचा समावेश आहे. त्यांचे व्यवस्थित विश्‍लेषण करण्यासाठी विविध 15 देशातून नुकतेच पी. एचडी झालेले 30 तरुण संशोधकांना आमंत्रित केले. तरीही हे काम पूर्ण करण्यासाठी सहा आठवडे लागले.
- होमो हॅबिलीस प्रजातीच्या संशोधनाला बरोबर 50 वर्षे झाल्याचा मुहूर्त साधत बर्जर यांनी हे संशोधन प्रकाशित केले.

(स्रोत ः ली बर्जर, विटस. नकाशा ः जेसन ट्रीट नॅशनल जिऑग्राफिक)
(छायाचित्र ः एलियट रॉस)

----------------------------------

काय फरक आहे होमो नालेदी व आधुनिक माणसामध्ये


- होमो नालेदी प्रजातीच्या पुरुषाच्या कवटीचे घनफळ हे 560 घन सेंटीमीटर असून, ते आधुनिक माणसाच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे. तर महिलांच्या कवटीचे घनफळ हे 465 घन सेंटीमीटर असून, ते होमो इरेक्‍टसच्या सरासरी 900 घन सेंटीमीटरपेक्षा खूप लहान आहे.

- होमो नालेदीच्या हाताच्या बोटाची हाडे काहीशी वक्र असून, ती झाडावर किंवा खडकांवर चढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र, अंगठा, मनगट आणि पंजाचे हाड हे आधुनिक माणसांप्रमाणेच आहे.
- खांदे एप माकडाप्रमाणे आहेत. ओटीपोटाची हाडे काटेदार ब्लेडप्रमाणे असून, त्याचा खालील भाग हा आधुनिक मानवाप्रमाणे आहे.

- पायाची हाडे ही ऑस्ट्रलोपीथिसिन सारखी असली तरी आधुनिक मानवाच्या पायाप्रमाणे एकत्र आलेली आहेत.

- कवटीतील पोकळी (मेंदूची जागा) लहान असली तरी या प्रौढ माणसाची उंची साधारणपणे पाच फूट असून, वजन 50 किलोपर्यंत आहे, महिलांची उंची व वजन किंचित कमी असल्याचे न्यूयॉर्क राज्य विद्यापीठातील फ्रेड ग्रीने यांनी सांगितले. त्यावरून ऑस्ट्रलोपीथिसिन ते होमो या दरम्यानच्या बदलाच्या काळातील हा प्राणी असावा.
- बर्जर यांच्या मते, हा प्राणी कोणत्याही कालखंडातील असला तरी त्याचा एकूणच मानववंशशास्त्रावर मोठा परिणाम असणार आहे. अर्थात, कालखंडासंदर्भात अधिक अभ्यास करण्यात येणार आहे.
-------------------------

साम्य व फरक


सामान्यतः होमो नालेदी हा ऑस्ट्रलोपिथेसिन्सपेक्षाही होमो इरेक्‍टसच्या जास्त जवळचा आहे. (वरील छायाचित्रात डावीकडून...)
- ऑस्ट्रलोपिथेसिन्स प्रजाती ः 32 लक्ष वर्षापूर्वी ः नाव- लकी - प्रौढ महिला 3 फूट 8 इंच उंच व वजन 60 ते 65 पौंड.
- होमो इरेक्‍टस ः 16 लक्ष वर्षापूर्वी ः नाव-तुर्काना बॉय, कुमारअवस्थेतील मुलगा, उंची 5 फूट, वजन 110-115 पौंड.
- होमो नालेदी ः सध्या नेमके सांगता येत नाही ः नाव रायझिंग स्टार होमिनीन, प्रौढ, उंची 4 फूट 10 इंच, वजन 100 ते 110 पौंड
(डिजिटल आरेखन ः जॉन गुर्चे, स्रोत ः ली बर्जर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा