सोमवार, १४ सप्टेंबर, २०१५

रोपावस्थेतच कळणार वनस्पतीचे अनेक गुणधर्म


रोपावस्थेतच कळणार वनस्पतीचे अनेक गुणधर्म

रोपावस्थेमध्ये वनस्पतीची नेमकी उंची, पानांचा आकार या सारख्या गुणधर्मांचा अंदाज मिळविण्याची नवी पद्धती बेल्जियम येथील संशोधकांनी विकसित केली आहे. ही पद्धती पानांच्या पूर्ण वाढीनंतरच्या आकारासाठी कार्यरत जनुकांच्या आधारावर कार्य करते. या विशिष्ठ गुणधर्मासाठी कारणीभूत आरएनएचे विश्लेषण करणे शक्य असल्याने, वनस्पतीच्या पैदाशीमध्ये योग्य त्या उपाययोजना वेगाने करणे शक्य होणार आहे. परीणामी पैदास प्रक्रियेचा वेग वाढ आहे.

वनस्पतींच्या वाढीसाठी विविध टप्प्यावर वेगवेगळे जनुक गट कार्यरत होतात. त्यांच्या कार्यरत होण्याच्या क्षमतेवर वनस्पतींचा आकार ठरतो. वनस्पतींचा विकास व पिकांची वाढ यांच्यासाठी कारणीभूत असलेल्या डिएनए किंवा रेण्वीय पातळीवर प्रक्रिया अलिकडे जाणून घेतल्या जात आहेत. त्यातील डिएनएच्या सिक्वेन्सेस ( जेनेटीक मार्कर) ओळखल्याने त्या वनस्पतींच्या गुणधर्मांची नेमकी माहिती सुरवातीच्या अवस्थेतच शक्य होते. यांचा वापर करून केलेल्या पैदाशीला मार्कर असिस्टेड ब्रिडींग असे म्हणतात. वनस्पतींच्या पानांचा आकार व वाढ जाणून घेण्यासाठी बेल्जियम येथील व्हीआयबी आणि युजेन्ट या संशोधन संस्थेतील प्रो. डिर्क इंझे यांच्या नेतृत्वाखाली डिएनए पेक्षाही आरएनए वर आधारीत नवी पद्धती विकसित केली आहे. ही पद्धती कार्यक्षम आणि वेगवान आहे. पूर्वी संकराच्या पैदास प्रक्रियेतून नव्या जाती विकसित करण्यासाठी अधिक वेळ व मनुष्यबळ लागत असे. तो वाचणार आहे.

आरएनए वर आधारीत पद्धती
- वनस्पतीच्या डिएनए मध्ये आनुवंशिक गुणधर्माची माहिती असली तरी प्रत्येक पेशीमध्ये संपूर्ण माहिती असण्याची गरज नसते. थोडक्यात, फुलांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला जनुकिय गट हा मुळाच्या पेशीमध्ये असण्याची गरज नाही. मात्र, डिएनए मधील माहिती कार्यान्वित होण्यापूर्वी त्याचे रुपांतर आरएनए रेणूमध्ये व्हावे लागते. पुढे ते प्रथिनामध्ये रुपांतरीत होतात. थोडक्यात, वनस्पतीच्या आरएनए रेणूंचा गट वाढीच्या टप्प्यामध्ये काय काम करणार आहे, याची अधिक चांगली माहिती पुरवू शकतो.
- प्रो. डिर्क इंझे यांच्या गटातील वनस्पती शास्त्रज्ञ व पिसा येथील इटालियन इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेस येथील डॉ. जोक बाउटे यांनी मका रोपांच्या पानातील पेशींच्या विभाजनामध्ये कार्यान्वित आरएनए गटांचा अभ्यास केला. या आरएनए गटाचा संबंध बाह्य गुणधर्मांशी जोडण्यातही त्यांना यश आले. वास्तविक ही आरएनए वनस्पतीच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वेळी कार्यान्वित होत असतात. (उदा. पानांचा आकार, बायोमास उत्पादन इ.) मात्र, या पद्धतीमुळे वनस्पतीच्या वाढीच्या सुरवातीच्या टप्प्यातच त्यांचे गुणधर्म ओळखणे शक्य होणार आहे.
- या बाबतची दोन संशोधने जर्नल जिनोम बायोलॉजी मध्ये नुकतीच प्रकाशित झाली आहेत.
-----------------
कोट ः
पैदास प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यावरच वनस्पतींच्या आकारासह विविध गुणधर्माचा छडा लावणे या पद्धतीमुळे शक्य होणार आहे. त्यामुळे पैदास प्रक्रियेतील मोठा खर्च, वेळ यांची बचत होणार आहे.
- डिर्क इंझे, व्हीआयबी शास्त्रज्ञ.
--------------
छायाचित्र ः प्रयोगामध्ये वापरलेल्या वनस्पतींची रोपे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा