केळीवरील मर रोगासाठी फिलीपिन्स राबवतेय प्रतिबंधक उपाय
----------
केळीमध्ये येणाऱ्या कुज किंवा मररोगासाठी (बनाना विल्ट) नैसर्गिक उपायाचा अवलंब करण्यासाठी फिलिपिन्समधील कृषी विभाग प्रयत्न करत आहे. सध्या वापरण्यात येणाऱ्या
रासायनिक उपायाचा फारसा उपयोग होत नसल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षी फिलीपिन्समध्ये सुमारे 200 हेक्टर केळीवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यातही पीक
संरक्षणासाठी अधिक खर्च करू न शकणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतात या रोगामुळे अधिक नुकसान झाले होते. या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी
फिलिपिन्समधील कृषी विभागाने डिसेंबर महिन्यामध्ये 253 दशलक्ष डाॅलरचा निधी दिला होता. तसेच या वर्षी 50 दशलक्ष डाॅलरचा निधी सर्वेक्षण, निरीक्षणे त्याचबरोबर या
रोगाविरूद्ध उपाययोजना करण्यासाठी विविध पर्यायाचा वापर करण्यासाठी देण्यात आला आहे.
असे राबवण्यात येताहेत उपाय
- त्या अंतर्गत पर्यायी केळी जाती विकसित करण्यासाठी पुढील पाच वर्षाचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी 200 दशलक्ष डाॅलरचा निधी संशोधन, विकास आणि
जातींच्या चाचण्यासाठी राखून ठेवला आहे. सध्या पीबीजीईए आणि कॅव्हाॅन्डीश जात जीसीटीसीव्ही 119 (फ्युजारीयम बुरशीसाठी प्रतिकारक )या जाती पनामा रोगासाठी
प्रतिकारक आहेत, त्यांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत.
- रोगबाधीत क्षेत्राला चांगल्या क्षेत्रापासून वेगळे ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रादुर्भावित केळी शेतीच्या भोवतीची जमिनी भाताच्या तुसाच्या साह्याने भाजून
घेण्यात येत आहेत. तसेच फिलिपिनो केळी उत्पादक आणि निर्यातदार संघाच्या सहकार्यांने रोगग्रस्त रोपे व अन्य घटकांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.
- रोगाचा प्रसार रोखण्यासाठी केळी उत्पादकांसाठी विविध प्रकारच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत.
- शास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव मारियो मोन्तेजो यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की पनामा विल्ट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रोगाच्या नियंत्रणासाठी
वेगाने प्रयत्न केले जात आहेत. प्रतिकारक जाती विकसित करण्याबरोबर नैसर्गिक व जैविक घटकांचा वापर करण्यासाठी संशोधन केले जात आहे.
- सध्या ट्रायकोडर्मा या बुरशीचा वापर रोप प्रक्रियेसाठी करण्यात येत आहे. त्यामुळे दोन महिन्यापर्यंत विल्टींग रोखणे शक्य असल्याचे पुढे आले आहे.मात्र त्याचे देशांतर्गत
उत्पादन फार कमी आहे. ते वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 73 टक्के प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रावर ट्रायकोडर्माचा वापर फायदेशीर ठरला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा