सोमवार, २ एप्रिल, २०१२

जीएम गहू म्हणतोय माव्याला नो पार्कींग


पिकामध्ये कीडी आणि रोगासाठी विविध प्रकारची कीडनाशके फवारली जातात. त्यावर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. तरिही विविध कीडनाशकासाठी कीडींनी प्रतिकारकता विकसित केलेली असल्याने त्यांचे नियंत्रण करण्यामध्ये अडचणी येतात. कीडींना दुर ठेवण्यासाठी जनुकीय सुधारीत गव्हाची प्रजाती विकसित करण्यात आली आहे. या प्रजातीमध्ये एक प्रकारचा उग्र वास सोडत असल्याने कीडी पिकापासून दूर राहण्यास मदत मिळणार आहे.  हर्टफोर्डशायर कंट्रीसाईडमधील प्रक्षेत्रामध्ये या जनुकीय सुधारीत गव्हाच्या चाचण्या घेण्यात येत आहेत.
इंग्लंडमध्ये तृणधान्य पिकामध्ये मावा या कीडीमुळे सुमारे 120 अब्ज डाॅलरचे नुकसान होते.
संशोधकांनी विकसित केलेल्या व्हिपी या जनुकीय सुधारीत जातीमुळे हे नुकसान कमी होणार आहे. जीएम पिकांची ही दुसरी पिढी मानली जाते. तणनाशकांना सहनशील कडधान्याच्या पहिल्या पिढीतील जीएम पिकांना युरोपामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. मात्र या जीएम पिकांना विरोध होणार नाही अशी आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे.

जीएम पिकाची पार्श्वभूमी
जगातील पहिले व्यावसायिक जी. एम. टोमॅटो पिक 1990 सालाच्या पुर्वार्धामध्ये विकसित करण्यात आले होते. काढणीनंतर अधिक काळापर्यंत साठवणक्षमता असलेल्या या टोमॅटोचे अमेरिकेमध्ये उत्पादन घेतले जाते. मात्र अद्यापही जगाच्या काही भागामध्ये जीएम पिकांच्या लागवडीवर व विक्रीवर बंधने आहेत. त्या पार्श्वभूमीवर जीएम गव्हाच्या संशोधनाकडेही साशंकतेने पाहिले जात आहे.
असे आहे संशोधन
- जीएम गव्हामध्ये सिंथेटीक जनुक वाढवण्यात आले असून या जनुकामुळे वनस्पतीची पाने एक विशिष्ट कारचा तीव्र गंध बाहेर सोडतात. हा गंध मावा कीडी धोक्यात असताना अन्य मावा कीडींना येण्यापासून रोखण्याचा संदेशासारखा असतो. त्यामुळे मावा ही कीड पिकाच्या जवळ येत नाही. हा गंध मानवी नाकाद्वारे ओळखता येत नाही.  तृणधान्यामध्ये येणाऱ्या मावा या कीडीमुळे रस शोषला जाऊन नुकसान होते, त्याबरोबरच विविध विषाणूजन्य रोग ही पसरतात. हे टाळणे या जीएम गव्हामुळे शक्य होणार आहे.
- मावा कीडीला धोका वाटल्यानंतर त्यांच्यामध्ये तयार होणाऱ्या गंधाला फार्निसिन म्हणून ओळखले
जाते. या गंधामुळे अन्य मावा कीटक त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. तसेच ढाल्या कीटकासारखे मित्रकीटक त्या गंधाकडे आकर्षित होतात. मावा कीडीचा फडशा पाडतात.
- हार्पेनडेन जवळ रोथामस्टेड संशोधन संस्थेमध्ये शासकीय अर्थसाह्याने प्रक्षेत्र चाचण्या घेण्यात येत आहेत. तेथील संचालक माॅरीस मोलोनी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की कोणत्या तरी कीडींना मारणे म्हणजे जीएम असा समज करून घेतला जातो. मात्र या ठिकाणी पिकांच्या पानावर नो पार्कीग चा सिग्नल देण्यासाठी जीएम काम करणार आहे. या प्रणालीमुळे अनेक नैसर्गिक यंत्रणा कार्यरत होत असून कीडीपासून पिकाचे संरक्षण करणे शक्य होते. त्यामुळे कीडनाशकांचा वापर कमी करणे शक्य होणार आहे.
- अनेक जंगली फुलामध्ये नैसर्गिकरित्या हा मावा कीडीला रोखणारा गंध तयार होत असतो. त्यातील
पेपरमिंट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीतील हे जनुक वेगळे करून गहू पिकामध्ये घालण्यात आले आहे. या गंधाच्या रासायनिक प्रक्रियेला जाणून घेतल्यानंतर ही नैसर्गिक पद्धती असल्याने कीडनाशकाच्या तुलनेत अधिक सुरक्षित असल्याचे मोलोनी यांनी सांगितले. वनस्पतीमध्ये असलेल्या नैसर्गिक प्रतिकारकक्षमतेचा विकास या प्रक्रियेत केला जात आहे.
 -----
कडेकोट बंदोवस्तात चाचण्या
 या चाचण्यांना शासकीय सल्लागार समितीने परवानगी दिलेली आहे. परवानगी देताना मान्य केलेल्या
अनेक शर्ती आणि नियमाचे पालन कटाक्षाने करण्यात येत आहे. हा जीएम गहू माणसांनी अथवा
जनावरांना खाण्यासाठी वापरता येणार नाही. त्याच बरोबर अन्य पिकांशी परागीकरण होऊ नये, यासाठी जैविक अडथळे तयार केले आहेत. बियाणे, दाणे यांची लागवड करता येणार नाही. या चाचणी प्रक्षेत्राभोवती उंच धातूची भिंत उभी करण्यात आली असून पक्षी, ससे व अन्य जनावरे येऊ शकणार नाहीत.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा