रविवार, २९ एप्रिल, २०१२

नॅनो तंत्रज्ञानाने वाढेल फळांची साठवणक्षमता



तमिळनाडू कृषि विद्यापीठात राबवणार दक्षिण आशिया फळ साठवण सुधारणा प्रकल्प

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फळ उत्पादक देश आहे. आंबा, केळी आणि अन्य काही फळांच्या बाबतीत भारत हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. मात्र उत्पादित केलेल्या फळांच्या सुमारे 40 टक्के फळे ही वाहतूक आणि साठवणीमध्ये खराब होतात. हे नुकसान रोखण्यासाठी तमिळनाडू कृषि विद्यापीठामध्ये नॅनो तंत्रज्ञानावर आधारित दक्षिण आशिया फळ साठवण सुधारणा हा दोन वर्षाचा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे तमिळनाडू कृषि विद्यापीठाचे कुलगुरू पी. मुरूगेसा भूपती यांनी सांगितले. ते कृषि विद्यापीठामध्ये अतिसुक्ष्म तंत्रज्ञान ( नॅनो तंत्रज्ञान) या विषयावर नुकत्याच झालेल्या कार्यशाळेमध्ये बोलत होते.

नॅनो तंत्रज्ञानाच्या वापरामधून फळांची साठवणक्षमता वाढवणे शक्य असून साठवण आणि वाहतूकिमध्ये होणारे फळांचे नुकसान रोखता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिसुक्ष्म शास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख के. एस. सुब्रमनीयन यांनी सांगितले, की कॅनडा येथील गुएल्फ विद्यापीठामध्ये वनस्पतीतील रसायनांचा वापर करून हेक्झानाॅल विकसित केले आहे. या घटकामुळे फळे आणि भाजीपाला अधिक काळापर्यंत चांगल्या दर्जेदार अवस्थेत साठवता येणे शक्य़ होते.तमिळनाडू कृषि विद्यापीठातील संशोधकांनी अति सुक्ष्म तंत्रज्ञानाच्या साह्याने विकसित केलेली फिल्म आणली आहे. या दोन्ही तंत्रज्ञानाच्या एकत्रिकरणाच्या साह्याने हेक्झानाॅल असलेली नॅनो फिल्म तयार करता येणे शक्य आहे. त्यामुळे फळांची साठवण मर्यादा वाढवता येईल. त्यातून सुमार तीस टक्के नुकसान कमी करणे शक्य होणार आहे. फळे आणि भाजीपाल्यांची निर्यात वाढल्यामुळे विक्रीमध्ये वाढ होऊन शेती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळणार आहे.
प्रथम या तंत्रज्ञानाचा वापर आंबा फळांसाठी करण्यात येणार असून त्याच्या यशस्वीतेनंतर अन्य फळासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येईल.  हेक्झानाॅल हे पर्यावरणपूरक घटक असून त्याला अमेरिकन अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक चाचण्यानंतर मान्यता दिलेली आहे.  हेक्झानाॅलचा वापर केळी किंवा नारळांच्या फळांपासून विकसित करण्यात आलेल्या अतिसूक्ष्म फिल्ममध्ये वापरण्यात येणार आहे. त्यामुळे हि फिल्म सहजपणे विघटित होऊ शकेल.

दक्षिण आशिया फळ साठवण सुधारणा या प्रकल्पासाठी कॅनडातील आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा संशोधन निधी (CIFSRF)यांनी आर्थिक साह्य दिले असून गुएल्फ विद्यापीठ व श्रीलंकामधील औद्योगिक तंत्रज्ञान संस्था (ITI)  यांच्यासह तमिळनाडू कृषी विद्यापीठामध्ये संयुक्तपणे राबवण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा