पावसामुळे किंवा अन्य कारणामुळे मातीची मोठ्या प्रमाणात झीज होत असते. मातीचा सुपीक थर वाहून गेल्याने शेतीचेही नुकसान होते. दरवर्षी मातीची किती झीज होते, याचे उत्तर मिळवण्यासाठी अमेरिकी कृषि विभागाने सुमारे 50 वर्षापुर्वी एक सुत्र विकसित केले होते. या सुत्राला युनिव्हर्सल साॅईल लाॅस इक्वेशन (USLE) असे म्हणतात. त्यामध्ये संगणकिय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सक्षम असे मातीच्या झीजेविषयी माहिती देणारे प्रारूप अमेरिकेतील कृषि संशोधन संस्थेने विकसित केले आहे. या नव्या प्रारूपामध्ये मातीच्या नवीन प्रकाराचा तसेच झीजेच्या प्रक्रियेविषयी दरम्यानच्या कालावधीत झालेल्या संशोधनाचीही उपयोग करून घेण्यात आला आहे.
मूळ युएसएलई च्या सूत्रानुसार, प्रति एकर प्रति वर्ष मातीची झीज काढण्यासाठी त्या वर्षामध्ये पडलेल्या पावसांच्या परीणामाचा तसेच वाहत्या पाण्याच्या परीणामाचा अभ्यास केला जातो. शेताची नांगरणी व अन्य मशागतीमुळे मातीची झीज मोठ्या प्रमाणात होत असते. त्याचाही विचार करण्यात येतो. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात येऊन त्याचे आरयुएसएलई व आरयुएसएलई2 असे दोन नवी प्रारुपे विकसित करण्यात आली आहेत. कृषि संशोधन संस्थेच्या आॅक्सफोर्ड- मिसिसिपी येथील जलसंधारण भौतिकी प्रक्रिया संशोधन विभागातील संशोधक सेथ डाबने यांच्या नेतृत्वाखाली आरयुएसएलई2 च्या सुधारणेसाठी निरीक्षणे व प्रक्रिया विज्ञानाचा वापर केला असून मातीची झीज मिळवणे शक्य होणार आहे.
...असे आहे सुधारीत प्रारूप
- या नवीन प्रारूपामध्ये कुरणामध्ये वाढणाऱ्या गवताच्या जीवनसाखळीचा तसेच त्या भागामध्ये चरण्यासाठी फिरणाऱ्या जनावरांच्या पॅटर्नचाही विचार करण्यात आला आहे. या सूत्राच्या साह्याने मातीची कमीत कमी झीज होईल अशा प्रकारे इथेनाॅल निर्मितीसाठी जास्तीत जास्त मिळू शकणाऱ्या बायोमासचाही अंदाज मिळू शकणार आहे.
- अमेरिकेतील हवामान व मातीच्या गुणधर्माचा या सुधारीत आरयुएसएलई2 मध्ये विचार करण्यात आला आहे. तसेच अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या 75 प्रकारच्या पिक व्यवस्थापन पद्धतीचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अधिक अचूकपणे मातीच्या झीजेची माहिती व अंदाज उपलब्ध होऊ शकणार आहेत.
- या प्रारूपाविषयीचे संशोधन अॅग्रीकल्चरल रिसर्च मॅगेझीन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
-----
फोटोओळ- पावसाच्या वाहत्या पाण्यामुळे दरवर्षी होणारी झीज या सुधारीत प्रारूपामुळे मोजणे शक्य होणार आहे. त्याचा मृदा संवर्धनासाठी फायदा होणार आहे. ( स्रोत- लेन बट्ट)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा