गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

त्सुनामीचा इशारा मिऴणार दहापट वेगाने



जीपीएस नेटवर्क व उपग्रहावर आधारीत अचूक इशारा पद्धती विकसित
------
उपग्रहाच्या मदतीने त्सुनामी व भुकंपाच्या धोक्याचा इषारा अधिक वेगाने उपलब्ध होऊ शकत असल्याचे नासा व वाॅसिग्टंन विद्यापीठ यांच्या संयुक्तपणे झालेल्या संशोधनात पुढे आले आहे.  रिडआय (READI ) नेटवर्क या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानामध्ये उपग्रहाच्या साह्याने जीपीएस प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. हि प्रणाली अत्यंत वेगवान असून मार्च 2011 मध्ये जपानमध्ये झालेल्या भुकंप व त्सुनामीचा इशारा मिळण्यामध्ये जेवढा वेळ लागला होता,  त्याच्या दहापट कमी वेळेमध्ये इषारा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे जिवित हानी व वित्तहानी कमी करणे शक्य होणार आहे.

युएस पॅसिफिक नाॅर्थ ईस्ट जिओडेटीक अॅरे या जीपीएस च्या साह्याने उत्तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया व ब्रिटिश कोलंबिया या दरम्यानच्या समुद्रामध्ये या तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. यामध्ये वापरण्यात आलेले सेन्सर हे प्रत्यक्ष प्रमाणवेळेनुसार जमिनीच्या होणाऱ्या हालचालीचा अंदाज जवळच्या कार्यालयाला देतात.

नुकत्याच सॅनदियागो येथील सेसमाॅलाॅजिकल सोसायटी आॅफ अमेरिका या संस्थेच्या बैठकीमध्ये माहिती देताना वाॅशिग्टंन विद्यापीठातील संशोधक टिम मेलबोर्न यांनी सांगितले, की जागतिक स्थान निर्धारण प्रणाली ( जीपीएस) पृथ्वीच्या थरामध्ये होणाऱ्या हालचालीचा अंदाज घेण्यासाठी 1980 साली प्रथम वापरण्यात आली होती. त्यामध्ये 2000 साली सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणामुळे अत्यंत अचूक माहिती उपलब्ध होण्यात मदत मिळणार आहे. जमिनीच्या थरामध्ये होणाऱ्या बदलाची नोंद प्रथम या भागात लावण्यात आलेल्या सेन्सरला मिळून त्यांच्याकडून सेकंदाच्या आत एक मेसेज कार्यालयाला पाठवण्यात येईल. सेकंदाच्या दहाव्या भागामध्ये ही माहिती कार्यालयाला उपलब्ध होऊन, भुकंपाच्या हादऱ्याची जागा  2 सेंटीमीटर इतक्या अचूकपणे कळणार आहे.

वेगवान व अत्यंत अचूक
बर्कले येथील भुकपमापन प्रयोगशाळेचे संचालक रिचर्ड अॅलन यांनी सांगितले, की अरोमा (कॅलीफोर्निया) मध्ये झालेल्या 3.5 क्षमतेचा भुकंपाची नोंद बर्कलेमध्ये  पारंपरिक सेसमोमीटरकडून 25 सेकंदामध्ये मिळाली होती. या पारंपरिक सेसमोमीटरला काही मर्यादा आहेत. 2 ते 6 रिश्चर स्केलपर्यंत हे चांगले काम करतात. मात्र 8 आणि 9 रिश्चर स्केलच्या भुकंपाची नोंद घेताना, त्यामध्ये अडचणी येतात. कारण मोठ्या भुकंपामध्ये अधिक काळापर्यंत जमिनी हादरत असते. जीपीएस प्रणालीमध्ये सेन्सर जमिनीवर विविध ठिकाणी एकाच वेळी नोंदी घेत असल्याने अचूक नोंदी मिळतात.

- मार्च 2011 मध्ये जपानमध्ये झालेल्या भुकंपाचा इशारा 8 सेकंदामध्ये मिळाला होता. 7.1 रिश्चर स्केल भुकंपाची तीव्रता दोन मिनिटात वाढून नंतर 8.1 रिश्चर स्केल दाखवण्यात आली. पुढच्या 9 रिश्चर स्केलच्या भुकंपाची नोंद होईतो 20 मिनीट लागले होते. मात्र भुकंपानंतर या भुकंपामुळे उठलेल्या त्सुनामीने जपानच्या किनाऱ्यावरती केवळ 30 मिनिटामध्ये धडक दिली होती. त्यामुळे लोकांना इशारा मिळून सावरण्यासही वेळ मिळाला नाही. या नव्या जीपीएस प्रणालीमुळे दहापट अधिक वेगाने म्हणजेच केवळ 2 मिनिटामध्ये 8 रिश्टर स्केलची नोंद होऊ शकते. त्यामुळे सावरण्यास अधिक अवधी मिळत असल्याने प्राणहानी व वित्त हानी रोखणे शक्य होऊ शकते.
हे संशोधन नेचर या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा