आंतरराष्ट्रीय संशोधक गटाने प्रथमच उलगडले पक्ष्यांच्या शेतीचे रहस्य
ठिपक्याचा बोअर पक्षी ( Ptilonorhynchus maculata) |
मानव शिकार सोडून हळूहळू शेतीकडे वळला आणि त्यांच्या राहणीमानामध्ये बदल होत जाऊन कुटूंबरचना अस्तित्वात आली असे मानले जाते. मानवाशिवाय अन्य सजीव हे अन्न मिळवण्याव्यतिरिक्त अन्य कारणासाठी शेती अथवा कोणत्याही प्रकारची लागवड करत नाहीत. मुंग्यासारखे काही किटक हे बॅक्टेरियाची वाढ खाद्यासाठी करतात. त्यामुळे बोअर पक्षी त्यांच्या घरट्याच्या परिसरामध्ये विविध फळांच्या पिकांची लागवड करून त्याचे अन्य पक्ष्यांसाठी प्रदर्शन करत असल्याचे निरीक्षणावर संशोधकांचाही प्रथम विश्वास बसला नाही. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने बोअर पक्ष्यांच्या वर्तनाचे गुढ उलगण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू करण्यात आले.
आॅस्ट्रेलिया व पापूआ न्यू जिनेवा या ठिकाणी आढळून येणारे बोअर पक्षी त्यांच्या घरटी सजवण्याच्या सवयीमुळे लोकप्रिय आहेत. घरटी सजवण्यासाठी नर पक्षी विविध प्रकारच्या गडद रंगाच्या वस्तू जमवित असतो. ज्याचे घरटे अधिक आकर्षक असते, त्या नराला जोडीदार मिळतो. मध्य क्विन्सलॅंडमधील टाऊंटन राष्टीय पार्कमध्ये बोअर पक्ष्यांच्या रहिवासाचे संशोधकांनी निरीक्षण केले असता, त्यांना या घरट्याच्या परिसरामध्ये सोलानम इलिप्टिकम, बटाटा या सारख्या अनेक रोपांची वाढ करण्यात आलेली दिसून आली. या रोपांना गडद जांभळ्या रंगाची फुले व हिरव्या रंगाची फळे येतात. विशेष म्हणजे हे पक्षी घरटी बांधण्यासाठी ही रोपे असलेली जागा निवडत नसून, त्यांच्या घरट्याभोवती या रोपांची लागवड करत असल्याचेही दिसून आले आहे. ज्या नर पक्ष्याच्या घरट्याजवळ अधिक प्रकारची फळे उपलब्ध असतील, त्याची निवड मादी पक्षी करत असतात.
या संशोधनाबाबत बोलताना डाॅ. जो मद्दान यांनी सांगितले, की मानव प्राणी अन्न आणि इतर अनेक कारणासाठी पिकांची लागवड करतो. कपडे बनवण्यासाठी कापूस, नशेसाठी तंबाकू किंवा अन्य पदार्थ या बरोबरच जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी गुलांबासारख्या अनेक फुलांची लागवड केली जाते. मात्र निसर्गामध्ये त्याचे हे एकमेवाद्वीतीयपणा बोअर पक्ष्यांच्या शेतीमुळे संपुष्टात आला आहे. या वनस्पती आणि बोअर पक्षी यांच्या सहजीवनाच्या पद्धतीचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
अशी असते बोअर पक्ष्यांची फळ शेती
- घरट्याच्या जवळ बोअर पक्षी विविध प्रकारची फळे गोळा करतात. ती वाळल्यानंतर जवळच ती फोडली जातात. त्यातून बाहेर पडणाऱ्या बियामधून रोपे तयार होतात. त्यांच्या वाढीसाठी ही जागा पक्षी साफ ठेवतात. अन्य गवते व तणे या जागेमध्ये वाढू दिली जात नाहीत. नर पक्षी त्यांच्या घरट्याच्या परीसरामध्ये ही शेती सुमारे दहा वर्षापर्यंत करतात. त्यामुळे फळ झाडांच्या वाढीसाठी योग्य तेवढा कालावधी त्यांना उपलब्ध होतो.
- ज्या प्रमाणे शेतकरी चांगल्या दर्जाचे बियाणे तयार करण्यासाठी निवड पद्धतीचा वापर करतो. त्या प्रमाणे बोअर पक्षी मोठी फळे, अधिक गडद रंगाची, अधिक बिया असलेली फळे निवडतात. त्यांच्या शेतीतील फळांचा रंग हा अन्य ठिकाणी वाढलेल्या फळांपेक्षा अधिक गडद असतात.
फोटोओळ- जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी बोअर पक्षी फळांची लागवड करत असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे. (स्रोत- एक्सटर विद्यापीठ, इंग्लंड)
जर्नल संदर्भ-
Joah R. Madden, Caroline Dingle, Jess Isden, Janka Sparfeld, Anne W. Goldizen, John A. Endler. Male spotted bowerbirds propagate fruit for use in their sexual display. Current Biology, 2012; 22 (8): R264 DOI:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा