सोमवार, १६ एप्रिल, २०१२

अन्न सुरक्षिततेसाठी बुरशीजन्य रोग आटोक्यात ठेवण्याची आवश्यकता


---
हार्वर्ड विद्यापीठ व इपिरिएल काॅलेजमधील संशोधकांचा संशोधनात्मक अहवाल
-------------
जगातील पाच प्रमुख पिकावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांना आटोक्यात ठेवल्यास अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होऊन सुमारे 600 दशलक्षपेक्षा अधिक लोकांच्या अन्नाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचा संशोधनात्मक अभ्यास पुढे आला आहे.
दरवर्षी भात, गहू, मका, बटाटे आणि सोयबीन या प्रमुख पिकावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगामुळे 125 दशलक्ष टन अन्नधान्याची नासाडी होते. इंग्लंडमधील आॅक्सफोर्ड विद्यापीठ आणि इपिरिअल काॅलेजच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. त्यामध्ये 75 टक्के केसेसमध्ये प्राणी आणि वनस्पतीमध्ये येणाऱ्या रोगांच्या काही प्रजाती आढळून येतात. त्यासाठी सध्या प्रचलित असलेल्या आणि भविष्यात येऊ घातलेल्या बुरशींचा सामना करण्याचे प्रयत्न करण्याची आवश्यकता वाढली आहे. त्यामुळे अन्न सुरक्षिततेबरोबर जैवविविधतेचे संवर्धन करणे शक्य होणार आहे. या अभ्यासाचा अहवाल नेचर या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.


अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
- प्रति वर्ष पाच प्रमुख पिकांचे बुरशीजन्य रोगामुळे होणारे नुकसान हे 6- अब्ज डाॅलर.
- सध्या विकसनशील देशातील 1.4  अब्ज लोक हे अन्नावर प्रति दिन 1.25 डाॅलर एवढाच खर्च करू शकतात. त्यामुळे त्यांना कमी प्रतीचे किंवा कॅलरी असलेले अन्न वापरावे लागते.
- राईस ब्लास्ट, सोयबीन रस्ट, गव्हातील स्टेम रस्ट, मक्यातील काॅर्न स्मट, बटाट्यातील लेट ब्लाईट या रोगामुळे केवळ उत्पादनावरच नाही, तर लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर विपरित परीणाम होतो. बुरशीमुळे झाडांच्या नासाडीतून हवेतील कर्बाच्या ग्रहणक्षमतेवर परीणाम होत असून 230 ते 580 मेगाटन वातावरणातील कर्बवायू ग्रहण करणे शक्य होत नाही. हे प्रमाण  एकूण कर्बाच्या 0.07 टक्के एवढे असून जागतिक तापमान वाढीमध्ये या घटकाचा महत्त्वाची भुमिका असते.
- बुरशीजन्य रोगामुळे उभयचर प्राणी, माश्या, समुद्री कासवे, प्रवाळ यांच्या  सुमारे 500 प्रजाती धोक्यात आल्या आहेत. एकट्या अमेरिकेमध्ये वटवाघळामध्ये होणाऱ्या व्हाईट नोज सिंड्रोम या रोगामुळे मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने भातामधील अन्य किडीच्या प्रमाणात वाढ होऊन प्रति वर्ष सुमारे 3.7 अब्ज डाॅलर पेक्षा अधिक नुकसान होत आहे.
- बुरशीच्या वाढत्या प्रभावाविषयी इशारा देताना डाॅ. मॅथ्यू फिशर म्हणाले, की नवनवीन प्रकारच्या बुरशींच्या प्रादुर्भावामुळे वनस्पती, झाडे व प्राणी यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. जीवनप्रणालीमध्ये बुरशीच विजेता ठरण्याची हि चिन्हे आहेत. त्याकडे दुर्लक्ष न करता उपायोजना करण्याची आवश्यकता आहे.
- या अहवालामध्ये गेल्या शतकातील संदर्भ देत या प्रश्नाची तीव्रता आणि वाढते प्रमाण दाखवण्यात आले आहे.


जर्नल संदर्भ-
Matthew C. Fisher, Daniel. A. Henk, Cheryl J. Briggs, John S. Brownstein, Lawrence C. Madoff, Sarah L. McCraw, Sarah J. Gurr. Emerging fungal threats to animal, plant and ecosystem health. Nature, 2012; 484 (7393): 186 DOI: 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा