विजेशिवाय द्रव थंड करणारा कॅन विकसित,
अमेरिकेतील खासगी उद्योगाचे पर्यावरणपूरक संशोधन
-----------
भारतासारख्या उष्ण देशामध्ये थंड पाणी किंवा शीतपेयांच्या विक्री आणि वाहतुकीसाठी शीतगहाच्या साखळीची आवश्यकता असते. मात्र त्यासाठी अधिक प्रमाणात भांडवली गुंतवणूकीची आवश्यकता असते. ग्रामीण भागामध्ये भारनियमनाचे प्रमाणही अधिक असल्याने शीतपेयांच्या साठवणीमध्ये अडचणी येतात. त्यावर अमेरिकेतील जोसेफ कंपनी इंटरनॅशनल या खासगी उद्योगाने मार्ग काढला आहे. त्यांनी जगातील पहिले स्वयंचलितपणे पेय थंड करणारे कॅन विकसित केले आहे. त्याची चाचणी नासा या संस्थेने घेतली असून त्याला कोणत्याही बाह्य रेफ्रिजरेशनची गरज नाही. अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया आणि लास वेगास येथील काही निवडक स्टोअरमध्ये या कॅनमधून एनर्जी ड्रीकचे वितरण करण्यात येणार आहे.
कोणत्याही प्रकारचे थंड पदार्थ मिळवण्यासाठी रेफ्रिजरेशन आणि विजेची आवश्यकता असते. विकसनशील देशामध्ये दुर्गम, ग्रामीण भागामध्ये नेमकी याची वानवा असल्याने थंड पदार्थ विक्री व्यवस्था राबवण्यामध्ये अडचणी येतात. त्यावर जोसेफ कंपनी इंटरनॅशनल या उद्योगाने मार्ग काढला आहे. त्यांनी गेल्या 19 वर्षाच्या अथक संशोधनानंतर इपीए स्ट्रॅटोस्फेरीक मायक्रोकुल तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचे पेटंट आणि परवानाही कंपनीने मिळवला आहे.
असे आहे हे तंत्रज्ञान
या तंत्रज्ञानाविषयी माहिती देताना मिशेल जोसेफ यांनी सांगितले, की प्रत्येक कॅनच्या आतमध्ये आणखी एक उष्णता वाहक युनिट असते. त्यामध्ये नारळांच्या कवट्यापासून मिळवण्यात आलेल्या कार्बनचा वापर करण्यात आला आहे. हा सेंद्रीय घटक आहे. हवेतील कार्बनचे प्रदु्षण कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानाला 1998 साली युएस इपीए हे पारितोषिक मिळाले आहे. या कॅनच्या खालील बाजूला एक बटन असते, ते दाबले असता अंतर्गत भागातील कार्बन मोकळा होऊन रेफ्रिजरेशन यंत्रणेसारखे कार्य घडून येते. हे घडण्यासाठी कोणत्याही ऊर्जेची आवश्यकता नसते. तसेच हे पर्यावरणपूरक, सहज वापरता येण्याजोगे शाश्वत तंत्रज्ञान असल्याने शीतपेयाच्या उद्योगामध्ये क्रांती घडून येणार आहे.
----------
कॅनमधील द्रव आपोआप होईल थंड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा