गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

जैवइंधऩासाठी स्कायलार्क आले धोक्यात



जैवइंधनासाठी बायोमास मिळवण्यासाठी पडीक जमिनींचा वापर वेगाने वाढत आहे. त्यामुळे मोकळ्या जमिनीवर रहिवास करणाऱ्या अनेक प्राणी , पक्षी व किटकांच्या प्रजाती धोक्यात येऊ शकतात. त्यामध्ये स्कायलार्क सारखे काही पक्षी जमिनीवर घरटी करून त्यात अंडी घालतात. त्यांच्या रहिवासासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने पक्ष्यांच्या प्रजननावर परीणाम होत असल्याचे जर्मनीतील हेल्महोल्टझ पर्यावरण संशोधन संस्थेने केलेल्या अभ्यासामध्ये पुढे आले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ग्लोबल चेंज बायोलाॅजी बायोएनर्जी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
स्कायलार्क हे पक्षी मोकळ्या माळरानावर जमिनीवर घरटी करून त्यात आपली अंडी घालतात. जैव इंधनाच्या आत्यंतिक गरजेपोटी पपडिक जमिनी लागवडीखाली आणण्यात येत आहेत. त्यामुळे या परीसरामध्ये माणसांचा वावर वाढला आहे. पक्ष्यांच्या प्रजननासाठी कमी जागा शिल्लक राहत आहे. विद्यापीठातील एंजल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्कायलार्कच्या रहिवासासाठी लागणारी कमीत कमी जागा किती असली पाहिजे, हे कळण्यासाठी पर्यावरणावर आधारीत एक संगणकिय प्रारुप विकसित केले आहे. त्याचा वापर करून जैवइंधन आणि पर्यावरणातील पक्षी,प्राणी, किटक यांच्या संवर्धनाचा मेळ घालण्याची आवश्यकता एंजल यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा