शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

भारतात जन्मले पहिले टेस्ट ट्यूब याक वासरू

भारतात जन्मले पहिले टेस्ट ट्यूब याक वासरू

भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या डिरंग (अरूणाचल प्रदेश) येथील राष्ट्रीय याक संशोधन केंद्रामध्ये याक या प्राण्याचे जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब वासराचा जन्म झाला आहे. हे वासरू नर असून, त्याचे वजन 19 किलो आहे.  त्याला स्थानिक भाषेमधअये नोर्गयाल (म्हणजेच रत्नराज) असे नाव देण्यात आले आहे.

अल्ट्रासाऊड गायडेड ओव्हम पिकअप या आधुनिक पद्धतीने दाता याक पासून मिळवलेल्या बीजाचे प्रयोगशाळेमध्ये फलन करण्यात आले. हे फलित बीजाचे रोपण न्युकमाडंग येथील याकच्या गर्भाशयामध्ये वाढविण्यात आले. गर्भाचा वाढीचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर 15 जुलै रोजी या याक वासराचा जन्म झाला.
अतिउंचावरील डोंगराळ भागासाठी याक हे उपयुक्त पाळिव प्राणी असून, त्यांच्या संवर्धनासाठी
टेस्ट ट्यूब पद्धतीने याकचा जन्म ही महत्त्वाची बाब ठरणार असल्याचे सांगत अरूणाचल प्रदेशचे राज्यपाल निर्भय शर्मा यांनी संशोधक, डॉक्टर आणि संपुर्ण गटाचे अभिनंदन केले आहे.

शास्त्र व तंत्रज्ञान मंत्रालय, जैवतंत्रज्ञान विभाग यांच्या आर्थिक पाठबळाने राष्ट्रीय याक संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी. चक्रवर्ती, कर्नाल येथील राष्ट्रीय डे्री संशोधन संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एम, एस. चौहान यांच्या नेतृत्वाखाली  हे संशोधन करण्यात आले. गेल्या चार वर्षापासून सुरू असलेल्या या संशोधनाला माजी संचालक डॉ. एम. भट्टाचार्य आणि डॉ. के. के. भरूच यांच्यासह संचालक डॉ. एस.एम. देब यांचे मार्गदर्शन आणि मदत मिळाली आहे.

तापमानावरून किडींच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेण्यासाठी प्रारुप विकसित

तापमानावरून वा
तापमानावरून किडींच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेण्यासाठी प्रारुप विकसित

तापमान बदलाने वाढतोय किडींचा प्रादुर्भाव,

आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाचे संशोधन

तापमानात होणाऱ्या बदलामुळे किडीच्या प्रादुर्भावाच्या पॅटर्नमध्ये बदल होत असल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने टी टॉरट्रिक्स या पतंगावर केलेल्या अभ्यासामध्ये ही बाब पुढे आली आहे.  या संशोधनातील निष्कर्ष कीडनियंत्रण आणि तापमान बदलामुळे होणाऱ्या सजीवांवरील परिणामाच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार आहे.  हे संशोधन सायन्स एक्सप्रेस मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

सध्या कृषी तज्ज्ञ किडींच्या प्रादुर्भावाचा अंदाज मिळविण्यासाठी तापमानाचा विचार करतात. त्यासाठी किडीच्या जीवनसाखलीतील अवस्था, त्यांचा कालावधी आणि आवश्यक अनुकूल तापमान यांचा अभ्यास केला जातो. त्यावर आधारीत कीडनियंत्रणाचे वेळापत्रक बनविणे शक्य असते. मात्र या गृहितकाचा आधार घेऊन संशोधकांनी तापमानाची व किडीच्या दिसण्याची प्रत्येक हंगामामध्ये निरीक्षणे घेण्यात आली. तरीही किडीच्या वाढीची सातत्यपूर्ण आणि वेळोवेळी होणाऱ्या प्रजनन प्रक्रियेचा योग्य अंदाज मिळत नव्हता. किडीच्या प्रत्येक पिढीच्या वाढीची अवस्था व त्यांचा कालावधी माहिती असणे, ही कीडनियंत्रणातील महत्त्वाची बाब असते. कारण बहुतांश किडनाशके ही किडीच्या एका किंवा दोन अवस्थांवर कार्य करतात. या संशोधनाबाबत माहिती देताना पेनसल्व्हानिया विद्यापीठातील किटकशास्त्र विभागातील प्राध्यापक ओत्तर एन जोर्नस्टॅड यांनी सांगितले, की तापमानाचे एका किडीच्या जीवनावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास आजवर केला जात होता. मात्र तापमानातील बदलामुळे त्यांच्या संख्येमध्ये किंवा प्रजननाच्या साखळीमध्ये होणाऱ्या बदलांवर या संशोधनामध्ये लक्ष केद्रिंत करण्यात आले. किडीच्या प्रादुर्भावाचा अंदाज येण्यासाठी तापमानात होणाऱ्या बदलांचाही उपयोग होऊ शकतो.

तापमान आणि किडींचा प्रादुर्भाव यांचा संबंध योग्य प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न या संशोधनात करण्यात आला आहे. तापमानामध्ये किडींच्या वाढीच्या अवस्थेवर परिणाम करण्याची मोठी क्षमता असल्याचे दिसून आल्या आहेत. जागतिक तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर किडींच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेण्यासाठी हे प्रारुप उपयुक्त ठरू शकेल. तापमान वाढीमुळे किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, त्यांच्या संख्येत वेगाने वाढ होऊ शकते.

...असा झाला अभ्यास
संशोधकांनी टी टॉरट्रिक्स या मुलतः जपानी असलेल्या पतंगाच्या बाबतीत गेल्या 50 वर्षांची माहितीचा अभ्यास केला. त्यावरून संख्येचे किंवा प्रादुर्भावाचे एक प्रारुप तयार केले. या प्रारुपाच्या आधाराने या किडीच्या सातत्यपुर्ण आणि हंगामी संख्या वाढीचा अंदाज मिळविण्याचा प्रयत्न केला.
- या पतंगासारखे स्प्रुस बड मॉथ, लाईड ब्राऊन ऍपल मॉथ, समर फ्रुट टॉरट्रिक्स असे अनेक पतंग उत्तर अमेरिकेमध्ये आढळून येतात.
- जपान येथील कोगोशिमा येथील चहाच्या मळ्यामधून दर पाच दिवसांनी तापमान आणि किडीच्या प्रादुर्भावाची माहिती गोळा करण्यात आली. ही कीड हिवाळ्यामध्ये सुप्तावस्थेमध्ये जाते आणि वसंतामध्ये योग्य तापमान मिळताच सुप्तावस्थेमधून बाहेर येते. तापमान मिळताच पहिल्या पिढीची संख्या वेगाने वाढते.
- गेल्या 51 वर्षामध्ये 200 पेक्षा अधिक वेळा टी टॉरट्रिक्स या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे.
- जोर्नस्टॅड यांनी सांगितले, की टि टॉरट्रिक्स या किडींविषयी गोळा केलेली माहितीतून अनेक नाविन्यपूर्ण बाबी पुढे आल्या. उत्तर अमेरिकेमध्ये हिवाळ्यामध्ये आम्हाला एकाचवेळी अनेक पिढ्या आढळून येत. त्याच वेळी वर्षभर अनेक पिढ्या दिसत असत.
-उन्हाळ्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव अधिक दिसून येई. तापमान अधिक असताना त्यांचा प्रजननाचा दर अधिक असून वाढीचा दरही सर्वाधिक असे. या किडींची संख्या वेगाने वाढून, त्यांच्या पिकावरील प्रादुर्भावामध्ये प्रचंड वाढ होते. एका विशिष्ट तापमानानंतर, संख्येमध्ये होणारी ही प्रचंड वाढ आणि त्यानंतर येणारी नवी पिढीचीही त्यात भर पडते.

असे आहे हे प्रारुप
- टी टॉरट्रिक्स आणि अन्य किडीच्या  संख्येवर तापमानाचा होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी संशोधकांनी एक गणितीय संख्या प्रारुप तयार केले. त्यासाठी त्या किडीच्या जीवनसाखळीतील वाढीच्या अवस्था, त्या अवस्थेवरील तापमानाचे परिणाम यांचा वापर केला. या प्रारुपांद्वारे किडींच्या संख्येचा किंवा प्रादुर्भावाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.
- या प्रारुपाबद्दल सांगताना संशोधक विल्यम नेल्सन म्हणाले, की या प्रारुपातून किडीचे संपुर्ण जीवशास्त्र उलगडू शकते. हे प्रारुप वास्तवावर आधारीत, पुर्णपणे विकसित आणि कोणत्याही प्रक्षेत्र माहितीशिवाय किडीच्या प्रादुर्भावाचा अंदाज देऊ शकते. प्रयोगशाळेतील माहिती, निरीक्षण यावर आधारीत हे प्रारुप पुर्णपणे स्वतंत्र आहे. अगदी जपानी माहितीसाठ्यापासूनही स्वतंत्र आहे.

जर्नल संदर्भ ः
William A. Nelson, Ottar N. Bjørnstad, and Takehiko Yamanaka. Recurrent Insect Outbreaks Caused by Temperature-Driven Changes in System Stability. Science, 1 August 2013 DOI: 10.1126/science.1238477

फोटो ः चहाच्या मळ्यामध्ये टि टॉरट्रिक्स चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
(स्रोत ः हिरोशी सुइनागा)

सेंद्रिय खत एका दिवसात...


सेंद्रिय खत एका दिवसात...

सिंगापूर येथील कंपनीने विकसित केली पेटंटेड प्रक्रिया

साधारणपणे सेंद्रिय पदार्थ कुजण्यासाठी 45 दिवसापासून 90 दिवसापर्यंत वेळ लागतो. त्यातही लिग्निनचे प्रमाण अधिक असलेली झाडाची खोडे अथवा अन्य लवकर न कुजणारे घटक असल्यानंतर या कालावधीत वाढच होते. मात्र,
सिंगापूर येथील बायोमिक्स टेक्नॉलॉजीज या कंपनीने विविध सेंद्रिय पदार्थांचे विघटन एका दिवसात करण्याची पद्धती विकसित केली असून, त्याबाबतचे पेटंट घेतले आहे.
शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खत हे अत्यंत महत्त्वाचे असून, प्रत्येकाकडे आपला कंपोस्ट खताचा खड्डा असतो. त्यामध्ये तो वर्षभर शेण व अन्य टाकाऊ सेंद्रिय पदार्थ टाकतो. वर्षाअखेरीला एकदा त्यातून उपलब्ध झालेले खत शेतासाठी वापरतो. त्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये गांडूळांचा व कंपोस्ट कुजविणाऱ्या जिवाणूंचा समावेश करून कुजविण्याचा कालावधी 90 दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. सेंद्रिय पदार्थामध्ये योग्य तितकी आर्द्रता राखत, त्यातून हवेचा प्रवाह खेळता राहण्यासाठी सातत्याने हलविण्याची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमध्ये काही बदल करत बायोमॅक्स टेक्नॉलॉजीज या सिंगापूर येथील कंपनीने सेंद्रिय टाकाऊ पदार्थांचे रुपांतर सेंद्रिय खतामध्ये करण्यात यश मिळवले आहे. त्यांनी या प्रक्रियेचे पेटंट घेतले आहे. या सेंद्रिय खतामध्ये पोषक घटकांचे प्रमाण ही वाढवले असल्याचा त्यांचा दावा आहे.

अशी आहे प्रक्रिया
- टाकाऊ घटकांचे सेंद्रिय खतामध्ये रुपांतर करण्यासाठी या तंत्रज्ञानामध्ये विकरांची मदत घेतली आहे. त्यासोबतच ही प्रक्रिया पुर्णपणे नियंत्रीत वातावरणामध्ये केली जाते. त्यासाठी कंपनीने बायोमॅक्स डायजेस्टर तयार केले आहेत.या डायजेस्टरमध्ये तापमान, हवा आणि विकरांचे मिश्रण करण्याची प्रणाली यांचा समावेश आहे.

- घरगुती पद्धतीने कंपोस्टींगच्या पद्धती दिसायला स्वस्त दिसत असल्या तरी त्यांना अधिक वेळ लागतो तसेच त्यापासून आरोग्याच्या समस्या उदभवू शकतात. तसेच विविध प्रकारच्या पिकांवर रोगासाठी कारणीभूत होणाऱ्या बुरशी, जिवाणूदेखील या कंपोस्टमध्ये वाढू शकतात. या नव्या तंत्रज्ञानामध्ये हा धोका टाळण्यासाठी टाकाऊ घटकांचे तापमान सुरवातीला 80 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवले जाते. या तापमानाला बहुतांश बुरशी, जिवाणू यांचा नाश होतो.

- नियंत्रित वातावरणामध्ये खतांची निर्मिती होत असल्याने दर्जा चांगला राहतो. त्यात अन्य घटकांचे प्रदुषण होत नाही. तसेच तयार होणाऱ्या खतातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होत नाही. तसेच सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण 70 टक्क्यांपेक्षा अधिक राहते. त्याचा परिणाम पिकांमध्ये पाणी धरून ठेवले जाते.

- या प्रकारच्या खतामुळे पिकांच्या मुळांच्या परिसरामध्ये सूक्ष्म जिवांच्या प्रमाणात वाढ होते. मातीची सुपीकता वाढते.

- शेतातील टाकाऊ अवशेषापासून त्वरीत खत निर्मितीमुळे सेंद्रिय खताचा वापर वाढेल. रासायनिक खतांचा वापर कमी होऊ शकतो. या पद्धतीमुळे टाकाऊ कचऱ्याचे रुपांतर खतामध्ये होण्याचा दर 70 टक्के इतका आहे. 15 टन आकाराच्या डायजेस्टरमध्ये साधारणपणे 10 टन सेंद्रिय खत तयार होऊ शकते. अशा प्रकारचे तंत्रज्ञान कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सध्या 13 पेक्षा अधिक देशांमध्ये वापरले जात आहे. त्यामध्ये प्राण्याचे खत, फळबागेतील टाकाऊ अवशेष, खराब झालेले अन्नपदार्थ व अन्य प्रकारच्या कुजू शकणाऱ्या कचऱ्यांचा समावेश होतो.

तंत्रज्ञान काय आहे
- वाढत्या तापमानामध्ये कार्यरत राहणाऱअया बीएम1 या विकरांचा वापर केला जातो.
- बीएम 1 हे विकर सेंद्रिय कचऱ्यातील गुंतागुंतीच्या सेंद्रिय घटकांचे साध्या सेंद्रिय घटकात रुपांतर करते. त्यामुळे कुजण्याचा वेग वाढतो.
- हे पदार्थ कुजविण्यासाठी तयार केलेले डायजेस्टर विविध ऊर्जेवर चालू शकतात. त्याची कार्यक्षमता अधिक असून देखभाल कमी लागते.
कचऱ्यांच्या समस्येवर मिळू शकेल उपाय
- या डायजेस्टरमध्ये शेतीतील अवशेष, शेती प्रक्रियेमध्ये शिल्लक घटक, पशुपालनातील मलमुत्र, पोल्ट्री व कत्तलखान्यातील टाकाऊ भाग, बायोगॅसची स्लरी, शहरातील कचरा व टाकाऊ पाणी यांचा वापर करून सेंद्रिय खत मिळवता येते.
- यातून निर्माण झालेले खत हे 100 टक्के सेंद्रिय असून वास रहित आणि सूक्ष्मजिवापासून मुक्त असते.

फळे, भाज्यांनी दिली फॅशनला प्रेरणा

फळे, भाज्यांनी दिली फॅशनला प्रेरणा

इटालियन फोटोग्राफर फुलव्हियो बोनव्हिया यांनी फळे आणि भाजीपाल्यातून विविध साधने बनविली असून फॅशनमध्ये स्टाईल स्टेटमेंट म्हणून त्यांचे प्रदर्शन केले आहे. भाज्या आणि फळांचा वापर करण्यासाठी फॅशनच्या दुनियेमध्ये नावाजलेल्या ऍलेक्झॉडर मॅक्विन, लुईस वुइटन या सारख्या डिझायनरपासून त्यांनी प्रेरणा घेतली आहे.

1) हेल्मेट ः डोक्यावर वजनाचा ताण येतो, म्हणून गरजेचे आणि सक्तीचे असतानाही हेल्मेट लोक वापरत नाहीत. आता मात्र महिलांना फुलांच्या रचनेमुळे मिळालेल्या स्टाईलमुळे हेल्मेट वापरण्याचा मोह टाळता येणार नाही.
2) पादत्राणे ः पुरूष व महिलांसाठीही वापरता येतील असे वांग्यापासून शुज बनविण्यात आले आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या छायाचित्रात नारळांच्या व केळीच्या पानांचा वापर करीत बनविलेल्या सॅंडलची रचना आकर्षक आहे.
3) स्ट्रॉबेरी आणि ब्रोकोलीच्या रचनेची पर्स.
4) फळांच्या रचनेचे घड्याळ

ताणामध्ये थांबते पेशींची वाढ

छायाचित्र ः
ताणामध्ये पेशीमध्ये होणाऱ्या बदलांसाठी कार्यरत यंत्रणा उलगडण्यात संशोधकाना यश आले आहे. ताणाच्या परिस्थितीमध्ये प्रथिनांच्या आकारामध्ये बदल होऊन त्यांच्या काम थांबवले जाते. पेशी संरक्षण कामांना प्राधान्य देतात. एलओएन हे विकर प्रथिनांचा काही भाग वापरून ताणांमध्ये पेशींचे संरक्षण करण्याचे काम करते. मात्र, ज्या वेळी  आकारात बदल झालेल्या प्रथिनांची संख्या अधिक असते, त्यावेळी हे विकर चांगल्या प्रथिनांना नष्ट करण्याचे काम करते. (स्रोत ः पीटर चियेन, मॅसेच्युसेटस विद्यापीठ)
------------------------------------------------
ताणामध्ये थांबते पेशींची वाढ

- ताणाच्या परिस्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या विकरांची कार्य पद्धती उलगडण्यात आले यश
- मॅसेच्युसेटस विद्यापीठातील संशोधन

ताणाची परिस्थिती माणसांप्रमाणे अन्य प्राणी आणि सूक्ष्म जीवांवरही विपरीत परिणाम करत असल्याचे मॅसेच्युसेटस विद्यापीठातील संशोधनामध्ये समोर आले आहे. अत्युच्च तापमानासारख्या विपरीत परिस्थितीचे पेशींच्या वाढीवर होणाऱ्या परिणामामागे कार्यरत असलेली यंत्रणा उलगडण्यात यश आले आहे.

ताणाच्या परिस्थितीमध्ये काही प्रथिनांच्या आकारात बदल होतात, तर काही दुमडली जातात. त्यांच्या कार्य थांबवले जाते. त्या बाबत माहिती देताना संशोधक चियेन यांनी सांगितले, की हे आकारातील बदल आपल्याला तापमानामधील नेहमीची घटना वाटू शकते. मात्र जिवाणू अशा ताणाच्या परिस्थितीमध्ये प्रथिनांचा नाश करतात. विशेषतः काही विशिष्ट प्रकारचे जिवाणू उच्च तापमानाला डिएनए च्या पुनरावृत्तीसाठी गरजेच्या असलेल्या प्रथिनांचा नाश करत असल्याचे आम्हाला प्रयोगादरम्यान दिसून आले आहे. या वेळी ते आपली वाढ थांबवितात. प्रथिनांच्या नाशासाठीचा संदेश त्यांना ताणामुळे बदललेल्या प्रथिनांकडून उपलब्ध होतो.
वाढीसाठी योग्य असलेल्या वातावरणामध्ये पेशी वेगाने वाढत असतात. त्यावेळी डिएनए च्या पुनरावृत्तीही वेगाने होत असतात. मात्र, ताणाच्या परिस्थितीमध्ये ही डिएनए ची पुनरावृत्ती रोखली जाऊन संरक्षणात्मक बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते. त्या बाबत चियेन यांनी स्पष्ट केले, की जिवाणूंसहीत प्रत्येक पेशीमध्ये प्रथिने व मुलद्रव्यांचे मोठ्या प्रमाणात वैविध्य असते. त्याद्वारे जीवनासाठी आवश्यक विविध रासायनिक प्रक्रिया केल्या जातात.प्रथिनांच्या आकारावरून प्रथिन कोणते कार्य करते, हे ठरवले जाते.

असे आहे संशोधन
- पर्यावरणातील ताण अथव अनुकूलता यांची माहिती पेशींतील यंत्रणांपर्यंत कशा प्रकारे पोचते, या विषयी फारशी माहिती उपलब्ध नव्हती. मात्र, चियेन यांच्या मार्गदर्शनाखाली जिंग लियू यांनी कौलोबॅक्टर (Caulobacter) या जिवाणूंमधील ताणांच्या परिस्थितीमध्ये संरक्षणासाठी कार्यरत होणारे एलओएन हे विकर शोधले आहे. हे विकर आकार बदललेल्या प्रथिनांचा नाश करते. मात्र, ज्यावेळी नाश करण्यासाठी आकार बदललेली प्रथिने उपलब्ध नसतात, त्यावेळी वाढीसाठी आवश्यक चांगल्या प्रथिनांना नष्ट करण्यास सुरुवात करते. या प्रथिनांचा नाश झाल्याने पेशींची वाढ थांबते.  
 -  जेव्हा ताण कमी होतो, तेव्हा चांगल्या प्रथिनांचा नाश करणे थांबवले जाते. पेशींचा वाढ पुन्हा सुरू होते.
ताणांची परिस्थिती आणि ताण निवळल्यानंतरची परिस्थिती या दोन्ही घटनांना जिवाणू अत्यंत त्वरीत प्रतिसाद देते.
- ताण आणि प्रथिनांचे दुमडणे हा जीवनांचा एक वैश्विक भाग आहे. त्यामुळे जीवाणूंतील ही प्रक्रिया उलगडल्याने प्रत्येक पेशीतील ताणाची परिस्थितीशी कशा प्रकारे सामना करतात, हे लक्षात येण्यास मदत होते.
- या संशोधनासाठी राष्ट्रीय आरोग्य संस्था, हॉवर्ड ह्युजेस वैद्यकिय संस्था आणि मॅसेट्युसेटस ऍमहेरेस्ट विद्यापीठ यांनी अर्थसाह्य केले होते.

हॉटेलच्या छतावर वाढवली जातेय स्पिरुलिना

हॉटेलच्या छतावर वाढवली जातेय स्पिरुलिना

स्पीरुलिनायुक्त अन्नपदार्थांची वाढतेय बॅंकॉकमध्ये लोकप्रियता

बॅंकॉक येथील पत्साकोर्न थाविचूकोर्न या हॉटेलच्या छतावर स्पिरूलिना या शेवाळाची शेती केली जाते. प्रथिनाचा स्रोत म्हणून हे शेवाळ उपयुक्त ठरू शकते. स्पिरुलिनाच्या वाढीसाठी केवळ सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. बॅंकॉक येथील हॉटेलच्या गच्चीवर स्पिरुलिनाची वाढ कऱण्यात येत असून, ग्राहकांना ताज्या स्पिरुलिनापासून विविध पदार्थ तयार करून देणे शक्य होत असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.

प्रथिनांचा उत्तम स्रोत
- सध्या प्रथिनांसाठी मांस आणि कडधान्यावर अवलंबून राहावे लागते. त्यातील मांसाच्या निर्मितीसाठी अधिक ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून स्पिरुलिना हे प्रथिनांचा उत्तम स्रोत ठरू शकत असल्याचे दिसून आले आहे.
- हे शेवाळ अत्यंत वेगाने वाढते. साधारणतः 24 तासामध्ये ते दुप्पट होते. एक किलो मांस निर्मितीसाठी साधारणतः सहा महिने लागतात. त्याचवेळी स्पिरुलिनाचे केवळ आठवड्यामध्ये एक किलो उत्पादन मिळते.
- वाढीसाठी अत्यंत कमी जागा लागते.

अशी आहे प्रक्रिया
स्पिरुलिनाच्या प्रक्रियेविषयी माहिती देताना इनरगाया चे तंत्रज्ञान संचालक डेरेक ब्लिट्झ यांनी सांगितल्याप्रमाणे
- प्रत्येक आठवड्यामध्ये तीन वेळा स्पिरुलिनांची काढणी केली जाते.
- काढणीनंतर निथळून त्यातील पाणी कमी केले जाते.
- कोरडे करण्यासाठी ते सुधारणा केलेल्या वॉशिंग मशिनमध्ये घालून फिरवले जाते.
- शिल्लक राहिलेल्या जेलीसारख्या स्पिरुलिनाला हाताच्या साह्याने भांड्यामध्ये दाबून भरले जाते. हे सारे अंदाजाने केले जाते.

- काढणीनंतर हे शेवाळ ती फ्रिजरमध्ये आठवड्यापर्यंत चांगले राहते. ताज्या स्पिरुलिनाला कोणतीही चव नसल्याने कोणत्याही पदार्थासोबत त्यांचा वापर करता येतो.
- स्पिरुलिना शेवाळाची शुद्ध स्वरुपात पैदास करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध आकाराच्या परीक्षा नळ्या एकमेकांना जोडलेल्या असतात.
- तसेच प्रत्यक्ष उत्पादन छतावरील बॅरलमध्ये केले जाते. इथे सू्र्यप्रकाशामध्ये असलेल्या बॅरलमध्ये स्पिरुलिनाची वाढ केली जाते. ताज्या स्पिरुलिना वाढ आणि विक्री करणारी ही एकमेव कंपनी असल्याचा दावा त्यांनी केला. बहुतांश कंपन्या वाळलेल्या आणि प्रक्रियायुक्त स्पिरुलिनाची विक्री केली जाते.
- ताज्या स्पिरुलिनामधून अधिक पोषक घटक मिळतात. त्यामुळे ताज्या भाज्या खाण्याप्रमाणेच यातून अधिक पोषक घटक उपलब्ध होतात. त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ करून त्याची निर्यात करण्याचा मानस आहे.

बॅंकॉकमध्ये शेफ वळताहेत स्पिरुलिनांच्या विविध पदार्थांकडे
- बॅंकॉक येथील ओइस्टर बार येथील बिली मारिनेल्ली यांनी सांगितले, की अन्नपदार्थांचे पोषकत्व वाढविण्यासाठी स्पिरुलिनांचा वापर शेफ करत आहेत. या शेवाळापासून बनविलेला ग्रीन पास्ता सध्या लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे.
- स्पिरुलिनाचा रंग गडद हिरवा आहे. कोणत्याही पदार्थामध्ये स्पिरुलिना मिसळल्यास त्याचा रंग हिरवा होतो.
- मांसातील प्रथिनांना हा शाकाहारी पर्याय मोलाचा ठरू शकतो. शरीरसौष्ठव या क्रिडाप्रकारामध्ये खाद्याकडे प्रचंड लक्ष द्यावे लागते. त्यांच्यामध्ये स्पिरुलिनायुक्त खाद्य सध्याही मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यात उपलब्धी वाढल्यानंतर आणखी वाढ होऊ शकेल.

येथे होते नैसर्गिकरित्या स्पिरुलिनाची वाढ ः
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि शेती संघटना एफएओ च्या प्रवक्त्या रोसा रोले यांनी सांगितले, की स्पिरुलिना हे भविष्यातील अन्नसुरक्षेसाठी महत्त्वाचा अन्नघटक ठरू शकतो. त्याची मेक्सिकोतील टेक्सकोको या तलावामध्ये नैसर्गिकरीत्या वाढ होते. त्यांचा वापर गेल्या काही शतकापासून खाद्यामध्ये केला जात आहे. तसेच पश्चिम आफ्रिकेतील छाड या तलावाच्या सिमेवर असलेल्या अनेक देशांमध्ये स्पिरुलिना हा प्रथिनांचा मुख्य स्रोत आहे. मात्र, त्यांचा खाद्यामध्ये वापर करताना योग्य त्या काळजी घेण्याची आवश्यकता असते. स्पिरुलिना अयोग्य पद्धतीने आहारात घेतल्याने युरीक आम्लांच्या निर्मितीत वाढ होते. अर्थात प्रथिने आणि पोषक घटकांचे प्रमाण उच्चतम असल्याने स्पिरुलिना हे सर्व लोकांसाठी उपयुक्त पोषक आहार ठरू शकते.

तज्ज्ञांचे मत ...
स्पिरुलिना हे उच्च प्रतीने प्रथिन देणारे शेवाळ असून, पाण्याचा सामू अधिक असलेल्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढते. आपल्याकडे अनेक तलावामध्ये स्पिरुलिना हे शेवाळ मिळते. त्यात लोणार येथील प्रसिद्ध खाऱ्या पाण्याच्या सरावेरातही स्पिरुलिना आहे. मात्र, त्यासोबत अन्य अखाद्य शैवाळ वाढत असल्याने त्याचा खाद्य म्हणून वापर करता येत नाही. स्पिरुलिना शुद्ध स्वरुपात मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.
- डॉ. मोनिका कवळे, भारतीय पश्चिम किनारपट्टीवरील शैवाळाच्या अभ्यासक.

ट्रॅक्टरच्या ट्रेलरवरही उभारता येईल शीतकक्ष

ट्रॅक्टरच्या ट्रेलरवरही उभारता येईल शीतकक्ष

- इंधन पेशींवर चालणारी शीतकरण प्रणाली कमी ऊर्जेतही देते अधिक कार्यक्षमता


शेतीमाल एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी रेफ्रिजरेटेड व्हॅन आवश्यक असतात. मात्र त्यांची निर्मिती आणि देखभालीचा खर्च अधिक असल्याने शेतकरी वापरू शकत नाहीत. मात्र शीतकरण प्रणाली चालविण्यासाठी इंधन पेशींचा वापर करण्याचे तंत्रज्ञान अमेरिकी ऊर्जा विभागाच्या प्रयोगशाळेमध्ये विकसित करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान वापरून छोट्या आकाराच्या डिझेल इंजिनद्वारे बंदिस्त ट्रेलरमध्ये शीतकरण करणे शक्य होणार आहे.

काढणीपश्चात शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शीतसाखळीचा अवलंब केला जातो. मात्र, शीतगृहे आणि रेफ्रिजरेटेड व्हॅन यांच्या निर्मितीच्या आणि देखभालीचा खर्च मोठा असल्याने विकसनशील देशातील शेतकऱ्यांना हा खर्च परवडत नाही. त्यावर अमेरिकी ऊर्जा विभागाच्या पॅसिफिक वायव्य राष्ट्रीय प्रयोगशाळेतील संशोधकांनी फ्युयल सेल (इंधन पेशी) च्या माध्यमातून शेतीमालाचे तापमान कमी करण्याची पद्धती शोधून काढली आहे. ही पद्धती साध्या लहान डिझेल इंजिनच्या साह्याने चालविता येत असल्याने ट्रॅक्टरच्या बंदिस्त ट्रेलरवरही बसविता येऊ शकते.
सध्या रेफ्रिजरेटेड व्हॅनच्या एकूण संख्येपैकी एक चतुर्थांश व्हॅन या मुख्य डिझेल इंजीनशी जोडलेल्या असतात. त्यामुळे अधिक क्षमतेच्या इंजीनची आवश्यकता रेफ्रिजरेटेड व्हॅनसाठी लागते. नव्या तंत्रानुसार, रेफ्रिजरेटेड ट्रकसाठी इंधन पेशींचा वापर करण्यात येतो. या उपकरणामध्ये हवा आणि हायड्रोजनच्या रासायनिक प्रक्रियांमधून विद्यूत ऊर्जा निर्माण केली जाते. या प्रक्रियेत उष्णता आणि पाणी हे घटक बाहेर टाकले जातात.  या प्रक्रियेविषयी माहिती देताना संशोधक क्रिस्टोन ब्रुकस यांनी सांगितले, की इंधन पेशींचा वापर ट्रेलरवरील रेफ्रिजरेशनसाठी केला आहे. त्यासाठी केवळ एक लहान डिझेल इंजीन किंवा विद्यूत मोटार लागते. कमी ऊर्जेमध्ये शीतकरणासाठीचे कॉम्प्रेसर चालवले जाते. इंधन पेशींमुळे स्वच्छ, शांत आणि कार्यक्षम ऊर्जा पर्याय उपलब्ध झाला आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी ठरतील उपयुक्त
 रेफ्रिजरेटेड उद्योगातील अंदाजानुसार, अमेरिकेमध्ये मुख्य इंजीनच्या ऊर्जेवर चालणारे अंदाजे तीन लाख ट्रक धावत आहेत. इंधन पेशीवर चालणाऱ्या लहान डिझेल इंजीनच्या साह्याने त्यातील मुख्य इंजिनवरील भार कमी करणे शक्य आहे. त्यातून इंधनामध्ये प्रति इंजीन सुमारे 10 गॅलन डिझेलची बचत होऊ शकते. ही ऊर्जा स्वच्छ असल्याने प्रदूषणात घट आणि आवाजाचे प्रदुषणही कमी होण्यास मदत होईल.

निर्मिती वाढली की खर्च होईल आणखी कमी
- इंधन पेशी तंत्रज्ञानातील तज्ज्ञ जेमी हॉल्लाडे यांनी सांगितले, की इंधन पेशींचा वापर ऊर्जा क्षेत्रामध्येही करणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी इंधन पेशी निर्मात्यांच्या संख्येत वाढ होण्याची आवश्यकता असून, किंमती कमी व्हायला हव्यात. - सध्या बांधकाम आणि वाहन उद्योगामध्ये या पद्धतींचा वापर होतो. खर्चात बचत होण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.
- सध्या हे तंत्रज्ञान व उपकरणे महाग असली तरी त्याची उच्च कार्यक्षमता आणि शुन्य उत्सर्जन हे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत. काही गोदामामध्ये ऊर्जेसाठी त्याचा वापर होत आहे. न्युवेरा या खासगी इंधन पेशी निर्मात्यासोबत थर्मो किंग ही कंपनी अशा प्रकारचे ट्रक बनविण्यासाठी काम करत आहे.  या ट्रकमधून अन्नपदार्थांचे सॅन ऍन्टोनियो, टेक्सास कॅलिफोर्निया आणि रिव्हरसाईड या ठिकाणी वहन केले जाणार आहे.
--------------------------------------
इंधन पेशी कशा प्रकारे कार्य करतात-
-1- ऍनोडच्या एका बाजूला असलेल्या प्लेटसमधून हायड्रोजन इंधन प्रवाहित केले जाते. तर कॅथोडच्या बाजूला असलेल्या प्लेटसमधून हवा किंवा ऑक्सिजन प्रवाहित केली जाते.
-2- ऍनोडमध्ये प्लॅटिनम धातूंचा संप्रेरक वापरलेला असतो, त्यामुळे हायड्रोजनचे धन हायड्रोजन आयन (प्रोटॉन) आणि ऋण इलेक्ट्रॉनमध्ये विभाजन होते.
-3- पॉलिमर इलेक्ट्रोलाईट मेम्ब्रेन (पीईएम) हे फक्त धन विद्यूत भार असलेल्या आयनना पुढे कॅथोडकडे जाऊ देते. ऋण विद्यूत भार असलेल्या इलेक्ट्रॉनना बाह्य मार्गांने कॅथोडपर्यंत जावे लागते. त्यामुळे वीजेचा प्रवाह तयार होतो.  
-4- कॅथोडमध्ये इलेक्ट्रॉन आणि धन भारीत हायड्रोजन यांचे ऑक्सिजनशी संयोग होतो. त्यातून पाणी तयार होते. हे पाणी उपकरणाच्या बाहेर काढले जाते.

या संपुर्ण प्रक्रियेत पाणी आणि उष्णता या शिवाय काहीही उत्सर्जन होत नाही. त्यामुळे  पर्यावरणाच्या दृष्टीने स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी ही पद्धती फायदेशीर ठरते.

ग्राफिकसाठी शब्द
- हायड्रोजन वायू--हायड्रोजनच्या प्रवाहाचे क्षेत्र--आधारासाठीचे थर--हवा (ऑक्सिजन)--ऑक्सिजनच्या प्रवाहाचे क्षेत्र
--न वापरलेला हायड्रोजन वायू-- ऍनोड--पॉलिमर इलेक्ट्रोलाईट मेम्ब्रेन--कॅथोड-- पाणी-- विजेचा प्रवाह--दिवा.

http://www.fueleconomy.gov/feg/fcv_pem.shtml