शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

हॉटेलच्या छतावर वाढवली जातेय स्पिरुलिना

हॉटेलच्या छतावर वाढवली जातेय स्पिरुलिना

स्पीरुलिनायुक्त अन्नपदार्थांची वाढतेय बॅंकॉकमध्ये लोकप्रियता

बॅंकॉक येथील पत्साकोर्न थाविचूकोर्न या हॉटेलच्या छतावर स्पिरूलिना या शेवाळाची शेती केली जाते. प्रथिनाचा स्रोत म्हणून हे शेवाळ उपयुक्त ठरू शकते. स्पिरुलिनाच्या वाढीसाठी केवळ सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. बॅंकॉक येथील हॉटेलच्या गच्चीवर स्पिरुलिनाची वाढ कऱण्यात येत असून, ग्राहकांना ताज्या स्पिरुलिनापासून विविध पदार्थ तयार करून देणे शक्य होत असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.

प्रथिनांचा उत्तम स्रोत
- सध्या प्रथिनांसाठी मांस आणि कडधान्यावर अवलंबून राहावे लागते. त्यातील मांसाच्या निर्मितीसाठी अधिक ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून स्पिरुलिना हे प्रथिनांचा उत्तम स्रोत ठरू शकत असल्याचे दिसून आले आहे.
- हे शेवाळ अत्यंत वेगाने वाढते. साधारणतः 24 तासामध्ये ते दुप्पट होते. एक किलो मांस निर्मितीसाठी साधारणतः सहा महिने लागतात. त्याचवेळी स्पिरुलिनाचे केवळ आठवड्यामध्ये एक किलो उत्पादन मिळते.
- वाढीसाठी अत्यंत कमी जागा लागते.

अशी आहे प्रक्रिया
स्पिरुलिनाच्या प्रक्रियेविषयी माहिती देताना इनरगाया चे तंत्रज्ञान संचालक डेरेक ब्लिट्झ यांनी सांगितल्याप्रमाणे
- प्रत्येक आठवड्यामध्ये तीन वेळा स्पिरुलिनांची काढणी केली जाते.
- काढणीनंतर निथळून त्यातील पाणी कमी केले जाते.
- कोरडे करण्यासाठी ते सुधारणा केलेल्या वॉशिंग मशिनमध्ये घालून फिरवले जाते.
- शिल्लक राहिलेल्या जेलीसारख्या स्पिरुलिनाला हाताच्या साह्याने भांड्यामध्ये दाबून भरले जाते. हे सारे अंदाजाने केले जाते.

- काढणीनंतर हे शेवाळ ती फ्रिजरमध्ये आठवड्यापर्यंत चांगले राहते. ताज्या स्पिरुलिनाला कोणतीही चव नसल्याने कोणत्याही पदार्थासोबत त्यांचा वापर करता येतो.
- स्पिरुलिना शेवाळाची शुद्ध स्वरुपात पैदास करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध आकाराच्या परीक्षा नळ्या एकमेकांना जोडलेल्या असतात.
- तसेच प्रत्यक्ष उत्पादन छतावरील बॅरलमध्ये केले जाते. इथे सू्र्यप्रकाशामध्ये असलेल्या बॅरलमध्ये स्पिरुलिनाची वाढ केली जाते. ताज्या स्पिरुलिना वाढ आणि विक्री करणारी ही एकमेव कंपनी असल्याचा दावा त्यांनी केला. बहुतांश कंपन्या वाळलेल्या आणि प्रक्रियायुक्त स्पिरुलिनाची विक्री केली जाते.
- ताज्या स्पिरुलिनामधून अधिक पोषक घटक मिळतात. त्यामुळे ताज्या भाज्या खाण्याप्रमाणेच यातून अधिक पोषक घटक उपलब्ध होतात. त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ करून त्याची निर्यात करण्याचा मानस आहे.

बॅंकॉकमध्ये शेफ वळताहेत स्पिरुलिनांच्या विविध पदार्थांकडे
- बॅंकॉक येथील ओइस्टर बार येथील बिली मारिनेल्ली यांनी सांगितले, की अन्नपदार्थांचे पोषकत्व वाढविण्यासाठी स्पिरुलिनांचा वापर शेफ करत आहेत. या शेवाळापासून बनविलेला ग्रीन पास्ता सध्या लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे.
- स्पिरुलिनाचा रंग गडद हिरवा आहे. कोणत्याही पदार्थामध्ये स्पिरुलिना मिसळल्यास त्याचा रंग हिरवा होतो.
- मांसातील प्रथिनांना हा शाकाहारी पर्याय मोलाचा ठरू शकतो. शरीरसौष्ठव या क्रिडाप्रकारामध्ये खाद्याकडे प्रचंड लक्ष द्यावे लागते. त्यांच्यामध्ये स्पिरुलिनायुक्त खाद्य सध्याही मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यात उपलब्धी वाढल्यानंतर आणखी वाढ होऊ शकेल.

येथे होते नैसर्गिकरित्या स्पिरुलिनाची वाढ ः
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि शेती संघटना एफएओ च्या प्रवक्त्या रोसा रोले यांनी सांगितले, की स्पिरुलिना हे भविष्यातील अन्नसुरक्षेसाठी महत्त्वाचा अन्नघटक ठरू शकतो. त्याची मेक्सिकोतील टेक्सकोको या तलावामध्ये नैसर्गिकरीत्या वाढ होते. त्यांचा वापर गेल्या काही शतकापासून खाद्यामध्ये केला जात आहे. तसेच पश्चिम आफ्रिकेतील छाड या तलावाच्या सिमेवर असलेल्या अनेक देशांमध्ये स्पिरुलिना हा प्रथिनांचा मुख्य स्रोत आहे. मात्र, त्यांचा खाद्यामध्ये वापर करताना योग्य त्या काळजी घेण्याची आवश्यकता असते. स्पिरुलिना अयोग्य पद्धतीने आहारात घेतल्याने युरीक आम्लांच्या निर्मितीत वाढ होते. अर्थात प्रथिने आणि पोषक घटकांचे प्रमाण उच्चतम असल्याने स्पिरुलिना हे सर्व लोकांसाठी उपयुक्त पोषक आहार ठरू शकते.

तज्ज्ञांचे मत ...
स्पिरुलिना हे उच्च प्रतीने प्रथिन देणारे शेवाळ असून, पाण्याचा सामू अधिक असलेल्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढते. आपल्याकडे अनेक तलावामध्ये स्पिरुलिना हे शेवाळ मिळते. त्यात लोणार येथील प्रसिद्ध खाऱ्या पाण्याच्या सरावेरातही स्पिरुलिना आहे. मात्र, त्यासोबत अन्य अखाद्य शैवाळ वाढत असल्याने त्याचा खाद्य म्हणून वापर करता येत नाही. स्पिरुलिना शुद्ध स्वरुपात मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.
- डॉ. मोनिका कवळे, भारतीय पश्चिम किनारपट्टीवरील शैवाळाच्या अभ्यासक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा