शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

अमेरिकेत सफरचंदाच्या दोन नव्या जाती विकसित

अमेरिकेत सफरचंदाच्या दोन नव्या जाती विकसित

कॉर्नेल विद्यापीठातील पैदासकार आणि फळबाग विभागातील प्राध्यापक सुझान ब्राऊन आणि न्युयॉर्क येथील सफरचंद उत्पादकांच्या संघाने (NYAG) भागीदारीमध्ये सफरचंदाच्या दोन नव्या जाती विकसित केल्या आहेत. कॉर्नेल विद्यापीठातील पैदासकारांनी विकसित केलेल्या सफरचंदाच्या दोन नव्या जातींच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या जातींना चाचण्यापुरते "NY1" आणि "NY2" अशी नावे देण्यात आली होती. त्यांचे नामकरण नुकतेच स्नॅप ड्रॅगन आणि रूबीफ्रॉस्ट असे करण्यात आले आहे.

अशी आहेत या जातींची वैशिष्ट्ये
1) स्नॅपड्रॅगन ः एनवायएजी चे सदस्य शेतकरी मार्क रसेल यांनी सांगितले, की स्नॅपड्रॅगन ही गोड आणि खाण्यासाठी कुरकुरीत अशी सफरचंदाची जात आहे. हनी क्रिस्प या त्यांच्या मूळजातीपासून या जातीमध्ये रसाळ कुरकुरीतपणा घेण्यात आला आहे. किंचीत मसालेदार-गोडसर चव आजवर झालेल्या चवींच्या चाचण्यामध्ये लोकप्रिय ठरली आहे. मुलांमध्येही ही जात प्रसिद्ध होईल, असा विश्वास आहे.
ब्राऊन यांनी सांगितले, की पहिल्यांदा या जातीच्या सफरचंदाची घेतलेली चव माझ्या आजही लक्षात आहे. या जातीचे व्यावसायिकरण लवकरात लवकर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या जातीचा साठवण कालावधी अधिक असल्याने विक्रेत्यांच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरू शकते.

2) रूबी फ्रॉस्ट ः ही सफरचंदाची जातही साठवणीसाठी उपयुक्त असून हिवाळ्यामध्ये क जीवनसत्त्व पुरवण्यासाठी फायद्याची ठरेल. ही जात सध्याच्या एंपायर आणि ग्रॅनी स्मिथ या जातीच्या चाहत्यामध्ये लोकप्रिय होऊ शकेल. याची साल सुंदर असून आंबट- गोडीचा योग्य मिलाफ या मध्ये झालेला आहे. रसाळपणा, कुरकुरीतपणा हा एक महत्त्वाचा गुणधर्म ठरणार आहे.
या दोन्ही जाती विकसित करण्यासाठी एक दशक लागले असून, कॉर्नेल सफरचंद पैदास प्रकल्प आणि न्युयॉर्क सफरचंद उद्योगामध्ये ती प्रसारीत करण्यात आली आहे.

संशोधनातूनच मिळेल विकास आणि प्रसारासाठी निधी
  या आधी विद्यापीठामध्ये सफरचंदाच्या जाती विकसित करून त्या उद्योगांना मोफत दिल्या जात असत. मात्र, 1980 मध्ये बायह- डोले कायद्यानुसार, विद्यापीठांना त्यांच्या संशोधनाचे स्वामीत्व हक्क मिळविण्याचा अधिकार मिळाला.
- त्यानंतर मे 2010 मध्ये कॉर्नेल विद्यापीठाने न्युयॉर्क सफरचंद उत्पादक संघाच्या भागीदारीमध्ये दोन सफरचंदाच्या जाती विकसित केल्या आहेत. या जातीच्या रोपांच्या खरेदीच्या वेळी विद्यापीठाला स्वामीत्व हक्कापोटी काही रक्कम द्यावी लागते. यातून उपलब्ध झालेला निदी नव्या जातींच्या व्यावसायिकरणासाठी आणि कॉर्नेल विद्यापीठातील सफरचंदाच्या विकास कार्यक्रमासाठी वापरला जाणार आहे.
- 2011 मध्ये शेतकऱ्यांच्या बागामध्ये या सफरचंदाच्या जातीची लागवड सुरू झाली. आता राज्यामध्ये 400 एकर क्षेत्रावर त्याची लागवड झाली आहे. साधारणतः 2015 पर्यंत या जातींची फळे अन्य जातीसोबत बाजारात उपलब्ध होतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा