शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

मुत्रपिंडातील इजा रोखतील अल्ट्रासाऊंड उपचार

मुत्रपिंडातील इजा रोखतील अल्ट्रासाऊंड उपचार

शस्त्रक्रियेनंतरच्या मुत्रपिंडाच्या इजा रोखण्यासाठी ठरेल सोपी, औषधविरहित उपचार पद्धती

मुख्य शस्त्रक्रियेनंतर बहुतांश वेळा मुत्रपिंडामध्ये इजा होण्याचे प्रमाण अधिक असते. या इजा टाळण्यासाठी अल्ट्रासाऊंड उपचारपद्धती उपयुक्त ठरत असल्याचे व्हर्जिनिया विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात दिसून आले आहे. ही पद्धती रूग्णातील मुत्रपिंडाला असलेला धोका साध्या आणि सुरक्षितपणे रोखण्यासाठी फायद्याची ठरणार आहे. हे संशोधन जर्नल ऑफ अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे.

मुत्रपिंड (किडनी) ला झालेली इजा हे त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करते. त्यामुळे रूग्णाला अधिक काळपर्यंत रूग्णालयात राहावे लागते. मार्क ओकूसा, जोसेफ गिगलियोट्टी या व्हर्जिनिया विद्यापीठातील संशोधकांनी शस्त्रक्रियेदरम्यान मुत्रपिंडाला होणाऱ्या इजा रोखण्यासाठी अल्ट्रासाऊंड आधारीत उपचार पद्धतींचा वापर उंदरावर केला आहे. त्यामध्ये त्याची उपयुक्तता सिद्ध झाली आहे.
या संशोधनाबाबत माहिती देताना डॉ. ओकुसा म्हणाले की मुत्रपिंडाला झालेल्या इजेला रोखण्यासाठी अल्ट्रासाऊंड उपचार पद्धती चांगल्या प्रकारे कार्य करते. ही पद्धती औषध विरहित, सोपी असून अत्यंत कार्यंक्षम ठरणार आहे. या आधी ही पद्धती स्नायू किंवा अवयवाना होणाऱ्या इजा रोखण्यासाठी कधीही वापरली गेली नाही. तसेच पुढे या पद्धतीचा वापर फुफ्फुस, ह्रदय, यकृतांच्या इजावरही चांगल्या प्रकारे होऊ शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा