शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

सिंचनाच्या सोयी करतानाच डासांच्या नियंत्रणासाठी शाश्वत उपाययोजना आवश्यक

सिंचनाच्या सोयी करतानाच डासांच्या नियंत्रणासाठी शाश्वत उपाययोजना आवश्यक

- गुजरात येथील कोरडवाहू भागामध्ये वाढलेल्या सिंचन सोयींनी मलेरियाच्या वाढलेल्या धोक्याचा झाला अभ्यास
- आंतरराष्ट्रीय संशोधकांचा संशोधनात सहभाग

शेतीसाठी सिंचनाची सोय करण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करत असतात. एखाद्या अवर्षणग्रस्त भागामध्ये सिंचनाची सोय केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात चांगली वाढ होत असली तरी त्या भागामध्ये मलेरिया या रोगाच्या प्रादुर्भावाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे गुजरातसह वायव्य भारतामध्ये मिशीगन विद्यापीठाच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केलेल्या अभ्यासात ही बाब पुढे आली आहे. सातत्यपुर्ण आणि महागड्या कीडनाशकांचा वापर करूनही हा धोका एक दशकापेक्षाही अधिक काळ (पुर्वापार समजाच्या कितीतरीपट अधिक काळ) राहत असल्याचेही दिसून आले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष प्रोसिडिंग्स ऑप दी नॅशनल ऍकडमी ऑफ सायन्सेस मध्ये प्रकाशित करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने गुजरात येथे कोरडवाहू भागामध्ये सिंचनाच्या मोठ्या सोयी उपलब्ध झाल्यानंतरच्या परिस्थितीचा अभ्यास केला आहे. या ठिकाणी सुमारे 47 दशलक्ष एकर क्षेत्रासाठी सिंचनाची सोय उपलब्ध झाली असून, त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. या ठिकाणी पाणी साठून राहण्याचे प्रमाण वाढल्याने डासांच्या पैदासीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. या अभ्यास प्रकल्पामध्ये कार्यरत असलेले विद्यार्थी ऍण्ड्रेस बेईझा यांनी सांगितले की, पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या भागापेक्षा कोरडवाहू भागामध्ये सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्यानंतर मलेरियाचा प्रसार अधिक वेगाने होत असल्याचे दिसून आले आहे. ज्या ठिकणी पावसाचे प्रमाण अधिक असते, तिथे डासांचे प्रमाणही कमी असते.

असा झाला अभ्यास
- इतिहासातील अशा परिस्थितीचा अभ्यास केला असता, सिंचनामुळे अन्नाची उपलब्धता वाढली तरी या भागात रोगांचे प्रमाण वाढल्याचेही दिसून आले आहे. याच मुद्द्याला धरून अभ्यास करण्यात आला.
 - या अभ्यासामध्ये 1997 पासून ग्रामीण भागामध्ये प्रयोगशाळेमध्ये सिद्ध झालेल्या मलेरिया रुग्णांची माहिती घेतली.
- त्याच वेळी त्या भागातील बागायती शेती आणि कोरडवाहू शेती यांच्या प्रमाणांचे उपग्रहिय छायाचित्रांचा अभ्यास केला. त्यातून मलेरियाच्या रूग्णांच्या संख्येत होत गेलेल्या वाढीचा प्रत्यय येतो.
- अर्थात यामध्ये उच्च प्रादुर्भावग्रस्त भागामध्ये शिक्षणाचे प्रमाण व पिण्याच्या स्वच्छ पाण्याच्या स्रोतांचे प्रमाणही कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणातील फरकांचा अभ्यास जुन्या व नव्या बागायती भागामध्ये करण्याची आवश्यकता आहे. त्यातून संपुर्ण परिस्थितीविषयी जाणून घेणे शक्य होणार असल्याचे संशोधकांचे मत आहे.
-सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितता प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ही बाब गंभीर असून, मलेरियासारख्या प्राणघातक रोगांचा प्रसार थांबविण्यासाठी सिंचनाची सोय उपलब्ध करत असतानाच दूरदृष्टीने योग्य त्या उपाययोजना आखण्याची गरज आहे.
- या संशोधनामध्ये लंडन स्कुल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन ऍण्ड हायजीन चे मेन्नो जान बोऊमा, राष्ट्रीय मलेरिया संस्थेचे रमेश धिमान आणि राजपाल यादव, मिशीगन विद्यापीठातील एडवर्ड बास्करव्हिले, कोलंबिया विद्यापीठातील पियेत्रो सिक्काटो या संशोधकांचा समावेश होता.
------------------------------
इन्फो 1
उपाययोजना हव्यात शाश्वत
- मलेरियाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ,  बागायती शेती, आणि सामाजिक आर्थिक माहिती यांचा अभ्यास केला असता, गेल्या दशकामध्ये मलेरियाच्या रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. या दहा वर्षापेक्षा अधिक कालावधीत डासांच्या नियंत्रणासाठीही मोठ्या प्रमाणात उपाययोजना करूनही ही वाढ दिसून येत असल्याचे रोझमेरी ग्रॅट कॉलेज येथील प्राध्यापक पास्कल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की रोगाच्या नियंत्रणासाठी शाश्वत अशा उपाययोजना त्वरीत करण्याची गरज आहे. त्याचसोबत कालव्याचे वेळोवेळी योग्य प्रकारे निचरा करणे आवश्यक आहे.  या बाबी स्थानिक पातळीवरही कमी खर्चामध्ये आणि कार्यक्षमपणे राबविणे शक्य होऊ शकतात.
- सिंचनाच्या पद्धती बदलणे, कालव्यातील पाण्याचा निचरा यासारख्या बाबी सर्व क्षेत्रामध्ये अधिक काळासाठी राबवणे हे तसे आव्हान आहे.
-----
इन्फो 2
मलेरियाविषयी...
मलेरीया हा रोग प्लाजमोडीयम या परजिवीमुळे होतो. या परजिवीचा प्रसार प्रादुर्भावग्रस्त ऍनाफेलिस स्टिफनी या डासाच्या मादीच्या चाव्यामुळे होतो. चाव्याच्या वेळी रक्तामध्ये मिसळलेले प्लाजमोडीयम परजिवी यकृतामध्ये आपली वाढ करतात. त्याचा रक्तपेशीमध्ये प्रादुर्भाव वाढत जातो.
----------------------
फोटोओळी ः मलेरिया रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरणारी ऍनाफेलिस स्टिफनी या प्रजातीची डास मादी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा