मोबाईलची बॅटरी संपली, काळजी नको
ऊर्जेशिवायही साधता येईल संपर्क
टिव्ही सिग्नलची ऊर्जा आणि संपर्क माध्यम म्हणून करता येईल वापर
अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील अभियंत्यानी नवी वायररहित संपर्क प्रणाली विकसित केली असून, त्यामध्ये दोन उपकरणे कोणत्याही बॅटरी किंवा ऊर्जेवर न अवलंबता एकमेकांशी संपर्क करू शकतील. त्यातून दोन वस्तूंचे इंटरनेट या संकल्पनेच्या दिशेने हे पुढचे पाऊल मानले जात आहे. या तंत्रज्ञानाला संशोधकांनी ऍम्बियंट बॅकस्कॅटर असे नाव दिले आहे.
सामान्यापासून हाय प्रोफाईल लोकांपर्यंत मोबाईल हे आता संपर्काचे साधन झाले आहेत. मात्र, मोबाईलची बॅटरी संपणे ही एक मोठी समस्या झाली आहे. बॅटरी संपल्यानंतर मोबाईलचा काहीही उपयोग राहत नाही. या समस्येवर उपाय शोधताना अमेरिकेतील वॉशिग्टंन विद्यापीठातील संगणक शास्त्र आणि विद्यूत अभियांत्रिकीच्या संशोधकांनी आपल्या आसपास असलेल्या टिव्ही किंवा रेडिओ सिग्नलचा वापर ऊर्जेचा स्रोत आणि संपर्कासाठीचे माध्यम म्हणून करण्याचे तंत्रज्ञान शोधले आहे. कोणत्याही बॅटरीशिवाय दोन उपकरणे एकमेंकाशी संपर्क करू शकतील. या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देताना वॉशिग्टंन विद्यापीठातील संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक शाम गोल्लाकोटा यांनी सांगितले, की आपल्या सभोवती पसरलेल्या वायरलेस सिग्नलचा उपयोग ऊर्जेचा स्रोत आणि संपर्काचे माध्यम म्हणून केला जातो. या तंत्रज्ञानाचा वापर अंगावर घेऊन फिरता येणारी संगणकिय उपकरणे, स्मार्ट घरे आणि संवेदकांचे शाश्वत जाळे तयार करण्यासाठी होऊ शकतो. या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी मानवी लक्ष ठेवण्याची आवश्यकता नाही.
या संशोधनाचे निष्कर्ष 13 ऑगस्ट रोजी हॉंगकॉंग येथे झालेल्या असोशियशन ऑफ कॉम्प्युटिंग मशिनरी च्या परिषदेमध्ये सादर करण्यात आले. या संशोधनाला परिषदेमध्ये सर्वोत्कृष्ठ संशोधनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संशोधनामध्ये संगणक शास्त्र व अभियांत्रिकीचे डेव्हिड वेदरॉल, व्हिन्सेट लियू यांच्यासह विद्यूत अभियांत्रिकीचे ऍरॉन पार्कस आणि वाम्सी टाल्ला या संशोधनाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या संशोधनासाठी गुगल फॅकल्टी रिसर्च ऍवॉर्ड मधून आणि राष्ट्रीय शास्त्र फाऊंडेशन या संस्थेतर्फे अनुदान देण्यात आले.
काय आहे हे तंत्रज्ञान
या तंत्रज्ञानामध्ये आपल्या आजूबाजूला सातत्याने असलेल्या टि. व्ही किंवा मोबाईलच्या लहरीचा उपयोग करून घेण्यात आला आहे. दोन प्रसारीत असलेल्या सिग्नलच्या परावर्तनातून दोन उपकरणामध्ये संपर्क होऊ शकतो. त्यासाठी संशोधकांनी बॅटरी नसलेल्या दोन उपकरणामध्ये लहान आकाराचे ऍण्टेने बसविले. एका उपकरणातून टिव्हीचे सिग्नल परावर्तित केले जातात, दुसऱ्या या सारख्याच उपकरणातून हे सिग्नल ग्रहण केले जातात. या तंत्रज्ञानासाठी कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेची आवश्यकता नसते.
हवेच्या पातळ थरातून या तंत्रज्ञानातून उपकरणे नेटवर्क स्थापित करू शकतात. हे सिग्नल परावर्तित होऊन मोर्स कोड सारखी संपर्काची निर्मिती करू शकत असल्याचे संशोधिका जोशुआ स्मिथ यांनी सांगितले.
चाचण्या आणि त्याचे निष्कर्ष ः
संशोधकांनी ऍम्बियंट बॅकस्कॅटर तंत्राची चाचणी क्रेडिट कार्ड आकाराच्या प्रारुपामध्ये केली. त्यावेळी त्या दोन उपकरणामध्ये काही फूटांचे अंतर ठेवले होते. त्यावर लावलेल्या ऍण्टेनामध्ये सिग्नल ग्रहण केले जात असताना कळण्यासाठी एलईडी दिव्यांची रचना केली होती.
- सियाटल भागामध्ये या उपकरणाच्या गटांच्या विविध ठिकाणी चाचण्या घेण्यात आल्या. ही ठिकाणे टिव्ही टॉवरपासून अर्धा ते 6.5 मैल अंतराच्या परिघात होती. एक उपकरण टिव्ही टॉवरच्या परिघाबाहेर असतानाही संपर्क होऊ शकतो.
- सध्या असलेल्या प्रारुपामध्ये एक किलोबीट प्रति सेकंद सिग्नलमध्ये बाह्य वातावरणासाठी 2.5 फूट अंतरापर्यंत, तर घराच्या आतमध्ये 1.5 फूट अंतरापर्यंत योग्य प्रकारे संपर्क होऊ शकतो. त्यातून सध्या संवेदकाचे निरीक्षण, शब्दातील मजकूर आणि माहिती पाठविणे शक्य होते.
संशोधनाचे फायदे
- हे स्मार्ट संवेदक कोणत्याही उपकरणामध्ये बसविता येऊ शकतात.
- हे संवेदक पूलांमध्ये वापरल्यास कॉंक्रिट आणि स्टिलच्या स्थितीचा अंदाज सातत्याने देऊ शकतील. कॉंक्रिटमध्ये अगदी केसाएवढीही भेग पडल्यास त्याची माहिती त्वरीत पोचवतील.
- संपर्कासाठी वापर करताना उपकरणाद्वारे शब्दातील मजकूर किंवा इमेल बॅटरीशिवाय पाठवू शकतील.
- मोबाईलची बॅटरी संपल्यानंतरही या तंत्राचा वापर करून मेसेज पाठविणे शक्य होईल.
- या तंत्राचा वापर इंटरनेटसारखे नेटवर्क स्थापित करण्यासाठी संशोधक प्रयत्नशील आहेत.
छायाचित्रे ः
1-ऍम्बियंट बॅकस्कॅटर तंत्रज्ञानाने रेडिओ सिग्नल द्वारे एकमेकाशी संपर्क होऊ शकेल. या बॅटरीची आवश्यकता नाही.
2 - कोणत्याही वस्तूमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य असून, काऊच आपल्या चाव्या कुठे राहिल्या, हे देखील ओळखू शकेल.
3- वायरलेस सिग्नलद्वारे एका क्रेडिट कार्डमधून दुसऱ्या कार्डडमध्ये पैशांची देवाणघेवाण कशा प्रकारे होईल, हे दाखविताना संशोधक. (छायाचित्रे स्रोत ः वॉशिग्टंन विद्यापीठ )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा