शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

मासे जाळ्याकडे आकर्षित करण्यासाठी क्रिम विकसित

मासे जाळ्याकडे आकर्षित करण्यासाठी क्रिम विकसित

परिणामकारक गंधाचे, तरिही पाण्यात अधिक काळ न विरघळता राहू शकते पॉलीबेट, नॉर्वेतील संशोधन


मासेमारीच्या जाळ्याकडे मासे आकर्षित करण्यासाठी पारंपरिकरीत्या विविध आमिषांचा वापर केला जातो. मात्र त्याची परिणामकारता तपासणे शक्य होत नाही. नॉर्वेतील नोफिमा या माशांच्या अन्नविषयक संशोधन करणाऱ्या संस्थेने माशांना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रकारची क्रिम तयार केली आहे. या क्रिमच्या गंधाकडे मासे 700 मीटर अंतरावरूनही आकर्षित होत असल्याचे दिसून आले आहे.
सध्या बाजारामध्ये मासेमारीसाठी विविध गंध असलेली आमिषे मिळतात. मात्र, ती कितपत काम करतात, याविषयी संशोधकाकडे पुरावे उपलब्ध नाहीत. त्यासाठी माशांना आकर्षित करणाऱ्या गंधाचा अभ्यास करून खात्रीशीरपणे माशांना आकर्षित करू शकेल, असे आमिष तयार करण्यासाठी संशोधकानी विविध घटकांचा वापर केला आहे. या गंधाकडे मासे आकर्षित होऊन जाळ्यामध्ये अडकतात. कमी खर्चामध्ये जाळ्यामध्ये अधिक मासे उपलब्ध होऊ शकतात. तसेच माशांसाठी पारंपरिक पद्धतीने आमिष साठविण्यासाठी फ्रिजरची आवश्यकता असते. त्यासाठी ऊर्जा आणि जागा ही मोठ्या प्रमाणात लागते. या क्रिममुळे त्यामध्ये बचत होणार आहे.
 नोफिमा ही संशोधन संस्था विविध कंपन्यांच्या सहकार्यांने माशांच्या खाद्यासाठी संशोधन करत असते. हे संशोधन त्यांनी पॉलीबेट या माशांच्या खाद्य निर्मितीसाठी स्थापन केलेल्या नव्या कंपनीसाठी केले आहे.

असे आहे संशोधन
- पॉलीबेट या कंपनीचे संस्थापक स्वेईन क्वालविक यांनी सांगितले, की नोफिमा आणि सिन्टेफ या संस्थामध्ये गंधाचे प्रमाण अधिक असलेल्या कृत्रिम आमिषाची निर्मिती करण्यासाठी संशोधन करीत होती. या प्रक्रियेमध्ये मिळालेला उपपदार्थ म्हणजेच ही क्रिम आहे. समुद्रातील विविध घटकापासून मिळवलेले क्रिम व्यावसायिक किंवा मौजेसाठीची मासेमारी या दोन्ही प्रकारासाठी उपयुक्त ठरते.
- नोफिमा च्या संशोधकांच्या चाचण्यानुसार, कॉड माशांना 700 मीटरपर्यंत यांचा गंध लक्षात येऊन ते याकडे आकर्षित होतात.
- कॉड, हॅलिबट आणि सॅलमोन माशांचना आकर्षित करणारे तीन प्रकार या गंधामध्ये आहेत. त्यामध्ये या माशांच्या आवडीचे भक्ष्य असलेल्या प्रजातींचा गंध मिसळण्यात आला आहे.
- प्रत्येक माशांची आवड जाणून घेण्यासाठी तलावामध्ये खास चाचण्या करण्यात आल्या होत्या.

क्रिम पाण्यात लवकर विरघळू नये म्हणून...
गंधाचे मुलद्रव्ये घट्ट करण्यासाठी सिन्टेफ या धातू आणि रसायनांची निर्मिती करणाऱ्या संस्थेची मदत घेण्यात आली होती. त्या बाबत माहिती देताना फेर्डिनांड मॅनले यांनी सांगितले, की पुर्ण जाळे पसरल्यानंतर मासे आकर्षित होण्यासाठी या क्रिमला पाण्यामध्ये विरघळताना अधिक वेळ लागावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी त्यात घटक मिसळण्यात आले. त्यामुळे ही क्रिम लगेच पाण्यात विरघळून जात नाही. तसेच पाण्यात उठणाऱ्या लाटांचाही त्यावर फारसा परिणाम होत नाही. मात्र हे करताना त्याची परिणामकारकता कमी होणार नाही, याकडे लक्ष दिले. तसेच ही क्रिम पुर्णपणे पुनर्वापर करण्यायोग्य पदार्थापासून बनविण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा