शेणकिड्यांमुळे होते शेणातून मिथेनचे उत्सर्जन कमी
हरितगृह वायूच्या उत्सर्जनामध्ये दुधाळ जनावरांचा मोठा वाटा आहे. गाईंच्या शेण साठवलेल्या खड्ड्यामधून मिथेन आणि अन्य वायू बाहेर पडतात. या शेणाचा वापर आपल्या खाद्यासाठी भुंगेरे खोलवर शिरत असतात. हे भुंगेरे शेणातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूमध्ये घट करत असल्याचे हेलसिंकी विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनात दिसून आले आहे. हे संशोधन प्लॉसवन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले.
हरितगृह वायूच्या उत्सर्जनामध्ये शेती आणि दूधाळ जनावरांचे पालन हे मुख्य स्रोत आहेत. विशेषतः रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या पचनसंस्थेमध्ये मिथेन वायू निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. त्यातही त्यांच्या शेणाच्या खड्ड्यातून हरितगृह वायू अधिक बाहेर पडतात. हेलसिंकी विद्यापीठामध्ये झालेल्या अभ्यासामध्ये या शेणामध्ये राहत असलेल्या शेणकीड्यांमुळे या मिथेनच्या उत्सर्जनामध्ये घट होत असल्याचे दिसून आले आहे.
शेणामध्ये विविध प्रकारचे जीव राहत असतात. त्यामध्ये भुंग्याच्या विविध प्रजाती आहेत. त्यातील उत्तर युरोपमध्ये आढळणाऱ्या शेणकिड्यामुळे शेणामध्ये घडणाऱ्या बदलांचा अभ्यास विद्यापीठातील विद्यार्थी ऍट्टे पेनट्टीला यांनी केला आहे. शेणामध्ये हवारहित स्थितीमध्ये मिथेन वायू तयार होतो. शेणकिडे आपल्या खाद्यासाठी त्यामध्ये छिद्रे पाडत बोगदे करतात. त्यामुळे शेणामध्ये हवारहित स्थिती राहत नाही. पर्यायाने मिथेन वायू कमी प्रमाणात तयार होतो.
जर्नल संदर्भ ः
Atte Penttilä, Eleanor M. Slade, Asko Simojoki, Terhi Riutta, Kari Minkkinen, Tomas Roslin. Quantifying Beetle-Mediated Effects on Gas Fluxes from Dung Pats. PLoS ONE, 2013; 8 (8): e71454 DOI: 10.1371/journal.pone.0071454
फोटोओळी ः शेण खात खोलवर जात असलेल्या शेणकिड्यामुळे शेणामध्ये हवा खेळती राहिल्याने मिथेनच्या उत्सर्जनामध्ये सुधारणा होते. छायाचित्रात Aphodius pedellus प्रजातीचा शेणकिडा. (स्रोत ः कारी केलियोवारा)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा