बुधवार, ३० मार्च, २०१६

उत्पादकता वाढीसाठी प्रकाश संश्लेषण कार्यक्षमता वाढविण्यावर भर

उत्पादकता वाढीसाठी प्रकाश संश्लेषण कार्यक्षमता वाढविण्यावर भर

इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधकांनी वाढते तापमान आणि कार्बन डायऑक्साईड पातळीमध्ये उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी खाद्य पिकांची प्रकाश संश्लेषणाची कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला आहे. यासाठी त्यांनी जनुकीय तंत्रज्ञानाची मदत घेतली असून, कमी कालावधीमध्ये तीव्र स्थितीतही अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचे विकसन शक्य होणार आहे. हे संशोधन प्रोसिडिंग्स ऑफ दी रॉयल सोसायटी बी. बायोलॉजीकल सायन्सेस मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
जागतिक लोकसंख्या वाढ, शहरीकरण आणि बदलत्या तापमानामुळे येत्या भविष्यामध्ये लोकांसाठी खाद्य पिकांचे नियोजन करताना उत्पादकतेचा विचार महत्त्वाचा ठरणार आहे. साधारणतः २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्येला पुरेल एवढे खाद्य तयार कऱण्यासाठी भात, गहू, सोयाबीन आणि मका या चार प्रमुख पिकांच्या उत्पादनामध्ये ८७ टक्केपेक्षा अधिक वाढ करण्याची आवश्यकता आहे. त्याच वेळी पुढील ३० वर्षामध्ये तापमानामध्ये व कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. या पर्यावरणातील बदलाला पिके आपल्यातील नैसर्गिक बदलाद्वारे (उत्त्कांती) तग धरण्याचा प्रयत्न करतील. मात्र, हा वेग लोकसंख्येच्या वेगाशी मेळ खाऊ शकणार नाही. पारंपरिक पद्धतीने या गुणधर्माच्या जाती विकसित करण्यासाठी सुमारे २० ते ३० वर्षाचा कालावधी लागू शकतो. आपल्या संशोधनाविषयी माहिती देताना इल्लिनॉईज विद्यापीठातील पीक शास्त्रज्ञ स्टिफन लॉंग यांनी सांगितले, की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुढील वीस वर्षासाठी योग्य ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. भात आणि सोयाबीन या पिकातील प्रकाश संश्लेषणाचा दर हा दोन घटकांद्वारे ठरवला जातो.
१. कार्बन डायऑक्साईड पकडणाऱ्या विकराला रुबिस्को म्हणतात. वातावरणातील कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी आणि तापमान अधिक असताना रुबिस्को गफलत करतो. तो कार्बनडायऑक्साईडऐवजी ऑक्सिजनचा वापर करतो. या प्रक्रियेतून वातावऱणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण अधिक असताना प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढत असला तरी रुबिस्कोकडून कार्बनडायऑक्साईडचे रुपांतर कर्बोदकांमध्ये केले जाते. यांचा वापर धान्य, फळे आणि शाकीय वाढीसाठी ऊर्जा म्हणून होतो. वाढत्या तापमानामध्ये रुबिस्कोच्या कार्यात अडथळा येतो. भविष्यातील वाढते तापमान आणि कार्बनडायऑक्साईडची पातळी या दोन्ही मुद्द्यासाठी कारणीभूत रुबिस्कोवर सध्या संशोधन करण्यात येत आहे. अशा वातावरणामध्ये कार्य करू शकणाऱ्या विविध सजीवातील रुबिस्को मिळवून त्यांचे प्रयोग करण्यात येत आहेत.
२. प्रकाश संश्लेषणाच्या दरावर परीणाम करणारा दुसरा एक घटक म्हणजे कार्बनडायऑक्साईडचे ग्रहण करणारे पानातील मुलद्रव्य (आरयूबीपी).वाढत्या कर्बवायूच्या प्रमाणामध्ये ग्रहणावर मर्यादा घालण्याचे काम त्यांच्या कडून होते.
----
संशोधनाने घेतलाय वेग
वरील दोन्ही मर्यादावर मात करण्यासाठी संशोधकांनी गणितीय प्रारुप विकसित केले आहेत. त्या द्वारे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये नायट्रोजनच्या विभाजनामध्ये काही बदल केल्यास अधिक कर्बोदके उपलब्ध होऊ शकतील. हे अधिक तापमान आणि कार्बनडायऑक्साईडमध्ये शक्य असून, त्यासाठी अतिरीक्त नत्राद्वारे प्रकाश संश्लेषणाची आवश्यकता नाही.
- सध्या या प्रारुपाच्या प्रत्यक्ष शेतामध्ये चाचण्या घेण्यात येत आहेत. जनुकिय सुधारणांद्वारे तंबाखुतील आरयुबीपीच्या निर्मिती प्रक्रियेला वेग देण्यात आला. त्यामुळे प्रकाश संश्लेषण आणि उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.
- दुसऱ्या टप्प्यामध्ये पुरक खाद्य असलेल्या पिकांमध्ये नियंत्रित वातावऱणामध्ये चाचण्या करण्यात येणार आहेत. या नियंत्रित चाचण्यामध्ये संभाव्य वातावरण व दीर्घ ताण निर्माण करण्यात येत आहेत. व्यावसायिक पातळीवर हे संशोधन येण्यासाठी वेळ लागणार असला तरी भविष्यातील उत्पादन वाढीसाठी हे प्रयोग अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, याच शंका नाही.

 ------------------
छायाचित्र ः वाढत्या तापमान आणि कार्बन डायऑक्साईडच्या पातळीमध्ये प्रकाश संश्लेषणाचा कार्यक्षमता वाढवलेली जनुकिय सुधारीत तंबाखुची रोपे. (स्रोत ः स्टिफन लॉंग)
-----------------------------------------------------------

जर्नल संदर्भ ः
    Johannes Kromdijk, Stephen P. Long. One crop breeding cycle from starvation? How engineering crop photosynthesis for rising CO2and temperature could be one important route to alleviation. Proceedings of the Royal Society B: Biological Sciences, 2016; 283 (1826): 20152578 DOI: 10.1098/rspb.2015.2578
000

सोमवार, २८ मार्च, २०१६

वातावरणातील बदलाने बदलतोय द्राक्ष काढणीचा हंगाम

वातावरणातील बदलाने बदलतोय द्राक्ष काढणीचा हंगाम

शीत प्रदेशातील वाईन द्राक्षबागेवर होतोय परीणाम

वातावरणातील बदलामुळे फ्रान्स आणि स्वित्झर्लंड येथील द्राक्षाच्या काढणीचा हंगामामध्ये बदल होत असल्याचे अमेरिकी अवकाश संशोधन संस्था (नासा) आणि हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. हे संशोधन ‘जर्नल नेचर क्लायमेट चेंज’ मध्ये प्रकाशित झाले आहे.
   गेल्या काही दशकामध्ये द्राक्ष काढणीच्या हंगामामध्ये बदल झाले असून, त्यांचा संबंध नासा आणि हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी वातावरणातील घटकांशी लावला आहेत. त्यांनी १६०० ते २००७ या काळातील वाईनसाठीच्या द्राक्षांच्या काढणीच्या तारखांचे विश्लेषण केले असून, त्यातून विसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये काढणीचा हंगाम लक्षणीयरीत्या लवकर येत असल्याचे लक्षात आले.
- १६०० ते १९८० या काळातील वर्षे ही अधिक उष्ण असून वसंत आणि उन्हाळ्यामध्ये अधिक कोरडे होते. त्यानंतर १९८१ ते २००७ या काळामध्ये उष्णता वाढली असली तरी दुष्काळ नव्हता, त्याचाही परीणाम लवकर काढणीमध्ये झाला.
- फ्रान्स आणि स्वित्झर्लंड या सारख्या थंड प्रदेशातील द्राक्ष विभागामध्ये द्राक्षाची लवकर काढणी ही चांगल्या दर्जाशी जोडली गेलेली आहे. त्याविषयी माहिती देताना ‘नासा’ च्या ‘गोड्डार्ड इन्स्टिट्यूट फॉर स्पेस स्टडीज’ आणि कोलंबिया विद्यापीठातील ‘लॅमोंट डोहर्टी अर्थ ऑब्झर्वेटरी’ येथील पर्यावरण शास्त्रज्ञ बेन कुक यांनी सांगितले, की फळबागेमध्ये वाईनची द्राक्षे ही अत्यंत फायदेशीर पीक असून, गेल्या काही दशकामध्ये होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे काढणीचा हंगाम अलिकडे आला आहे. हंगामाच्या चांगलेपण हे वाईनच्या निर्देशांकानुसार ठरविण्यात आले. त्यानुसार उष्ण उन्हाळे आणि सुरवातीच्या काळात झालेला सरासरीपेक्षा अधिक पाऊस या सोबतच हंगामात उशीरा दुष्काळी स्थिती द्राक्ष पिकासाठी उपयुक्त ठरली आहे.
- या संशोधनातील सहलेखक व हार्वर्ड विद्यापीठातील पर्यावरणतज्ज्ञ एलिझाबेथ वॉल्कोविच यांनी सांगितले, की वाढत्या उष्णतेमुळे वेलींना चांगली उष्णता आणि सुरवातीच्या काळात आर्द्रता मिळाली. हंगामामध्ये उशीरा असलेल्या कोरड्या वातावरणामुळे वेलींच्या शाकीय वाढ रोखली जाऊन, अधिक घडांचे उत्पादन मिळणे शक्य झाले.

असा झाला अभ्यास
- संशोधकांनी पश्चिम युरोपातील गेल्या ४०० वर्षाच्या काढणीच्या माहितीचे विश्लेषण केले आहे.
- या अभ्यासामध्ये काढणीच्या तारखांतील बदल आणि कल यांचा संबंध वातावरणातील माहितीशी जोडण्यात आला. वातावरणातील २० व्या शतकातील माहिती ही उपकरणाद्वारे मिळाली, तर त्या आधीची सुमारे १६०० पर्यतची तापमान, पाऊस आणि मातीचा ओलावा यांची माहिती झाडांच्या खोडातील रिंगावरून मिळवण्यात आली.
- वरील विश्लेषणाची तुलना ही फ्रान्सच्या बोर्डेक्स आमि बुरगुंडी प्रांतातील वाईनच्या दर्जाच्या निर्देशांकाशी ( हे गेल्या १०० वर्षातील उपलब्ध होते) करण्यात आली.
- या निष्कर्षातून द्राक्षाच्या हंगामातील मुलभूत बदल समोर आले असून, त्यासाठी दुष्काळ आणि आर्द्रता हेच महत्त्वाचे बदलकर्ते ठरले आहेत. वातावरणातील उष्ण वातावरणाने काढणीचा हंगाम आणि द्राक्षाच्या दर्जावर सातत्याने बदल केले आहेत.
----
कोट ः
द्राक्षाच्या उत्तम दर्जावर हवामानाशिवाय नव्या जाती, माती, बागेचे व्यवस्थापन आणि वाईन निर्मात्यांच्या व्यवस्थापनासारख्या अन्य बाबीही कारणीभूत असतात. मात्र, आमच्या संशोधनामध्ये या स्थानिक घटकाच्या तुलनेमध्ये हवामान हाच घटक अधिक कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे.
- बेन कुक, पर्यावरणशास्त्रज्ञ.
-------------------------
छायाचित्रे ः

- फ्रान्स येथील द्राक्षबागेत गेल्या काही वर्षामध्ये काढणीचा हंगाम अलिकडे येत असल्याचे दिसून आले आहे.

 
- हिरव्या द्राक्षाची वेल, पाने यांची स्थिती उत्तम आहे. गेल्या हंगामामध्ये सुरवातीच्या व अंतिम काळात उष्ण उन्हाळा आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस अशा वातावरणामुळे द्राक्षासाठी चांगले वातावरण होते.
(स्रोत ः एलिझाबेथ वॉल्कोविच /हार्वर्ड विद्यापीठ)