शनिवार, १९ मार्च, २०१६

जंगली माश्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर होतात कीटकनाशकांचे परीणाम


जंगली माश्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर होतात कीटकनाशकांचे परीणाम

कीटकनाशकांच्या संपर्कात आलेल्या बंबल बी (जंगली माशी)ची शिकण्याची प्रक्रिया खुंटत असून, त्यांच्या खाद्यविषयक सवयीमध्ये बदल होत असल्याचे गुयेल्फ विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष फंक्शनल इकोलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आले.
   बंबल बी (जंगली मधमाश्या) व अन्य जंगली कीटक हे जंगलातील गुंतागुंतीच्या आकाराच्या फुलांतील मध व पराग मिळवितात. हे कीटक जगभरातील अन्नधान्य पिके आणि जंगली वनस्पतीच्या परागीकरणामध्ये मोलाची भूमिका निभावतात. मात्र, अनियंत्रित पद्धतीने झालेल्या फवारणीमुळे त्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. नियोनिकोटीनॉईड गटातील किटकनाशकांच्या संपर्कात आलेल्या जंगली माश्यांनी अधिक परागकण गोळा केले असले तरी त्यासाठी त्यांना नियंत्रित माश्यांच्या तुलनेमध्ये अधिक वेळ लागला. त्याच प्रमाणे या माश्यांनी नेहमीपेक्षा वेगळ्या फुलांची निवड केली. या आधी झालेल्या संशोधनामध्ये मधमाशींच्या मेंदूमध्ये विशेषतः शिकणे आणि स्मृतीसंबंधीत भागामध्ये बदल होत असल्याचे दिसून आले होते. या नव्या अभ्यासामध्ये कीटकनाशकांच्या संपर्कात आलेल्या माश्या अधिक प्रमाणे परागकण मिळवित असल्या तरी त्यांच्या त्यासाठी त्यांना अधिक फेऱ्या माराव्या लागल्या किंवा झगडावे लागले.

संशोधकांचे मत...
- गुयेल्फ विद्यापीठातील पर्यावरण शास्त्र विभागातील प्रा. निगेल रैने यांनी सांगितले, की परागीकरण करणाऱ्या माश्या किंवा किटकामध्ये फुलांचे स्थान, त्यातून मिळणाऱ्या मध आणि पराग कणांचे प्रमाण यांचा अंदाज घेण्याचे कौशल्य विकसित होते. या कौशल्यावरच त्याचे तग धरणे अवलंबून असते. कीटकनाशकांच्या कमी पातळीचाही परीणाम त्यांच्या या शिकण्याच्या प्रक्रियेवर होतो. त्यामुळे अन्न मिळविण्यासाठी त्यांना अधिक झगडावे लागते.
- रॉयल हॉलोवे युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथील संशोधिका डारा स्टॅनले म्हणाल्या की, सामान्यतः मधमाश्या या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक वेळ आणि ऊर्जा वापर असतात. मात्र, कीटकनाशकांच्या संपर्कात आलेल्या मधमाश्यामध्ये शिकण्याची प्रक्रिया खुंटत असल्याने त्याचे विपरीत परीणाम एकूणच तग धरण्यावर होतो.

जर्नल संदर्भ ः
    Dara A. Stanley and Nigel E. Raine. Chronic exposure to a neonicotinoid pesticide alters the interactions between bumblebees and wild plants. Functional Ecology, 2016 DOI: 10.1111/1365-2435.12644

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा