सोमवार, १ जुलै, २०१३

युजी 99 रोगासाठी प्रतिकारक जनुक सापडले

युजी 99 रोगासाठी प्रतिकारक जनुक सापडले

गव्हावरील युजी 99 धोकादायक रोगाच्या नियंत्रणासाठी मुलद्रव्यीय साधन विकसित करणे शक्य

अमेरिकी कृषी विभागाच्या संशोधकांनी गहू पिकातील तांबेरा किंवा युजी 99 या रोगाच्या नियंत्रणासाठी मुलद्रव्यीय साधन विकसित केले आहे. युजी 99 या रोगासाठी प्रतिकारक जनुक शोधले असून, त्याची नक्कल करण्यात संशोधकांना यश आले आहे. हे संशोधन सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
1999 मध्ये प्रथम युगांडा येथे आढळलेल्या गव्हावरील तांबेरा (युजी 99 ) या रोगाचा अनेक आफ्रिकी देश आणि मध्य पूर्वेतील देशात प्रादुर्भाव आढळतो. जगातील गव्हाच्या उत्पादनावर या रोगामुळे विपरीत परिणाम होत असून सुमारे 70 टक्क्यांपर्यत नुकसान होते.
जगभरामध्ये लागवड होत असलेल्या सुमारे 90 टक्के जाती या रोगासाठी संवेदनशील असून
रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होऊन अन्न सुरक्षिततेसाठी धोका निर्माण होऊ शकतो.
मिन्निसोटा येथील तृणधान्य रोग प्रयोगशाळेतील कृषी संशोधन संस्थेतील संशोधकांनी गहू पीक आणि त्यांच्या जंगली जातीतून युजी 99 या रोगासासाठी प्रतिकारक असे जनुक एसआर35 (Sr35 ) शोधले आहे. हे जनुक गव्हाच्या Triticum monococcum या जातीतून मिळाले आहे. संशोधक कान्सास राज्य विद्यापीठातील संशोधक एडवर्ड अखुनोव्ह आणि कॅलिफोर्निया डेव्हिय विद्यापीठातील संशोधक जॉर्ज डुब्कोव्हस्की यांनी या जनुकाची नक्कल केली आहे.

या संशोधनाचे फायदे
- या प्रकल्पाचा भाग म्हणून मॅट राऊज यांनी युजी 99 च्या प्रतिकारतेसाठी गहू जातींचे विश्लेषण केले.
-  Sr35 या जनुकाचा अंतर्भाव व्यावसायिक गहू जाती करण्यात येणार आहे. सध्या या जनुकाची नक्कल करण्यात यश आले आहे. त्या जैवतंत्रज्ञानाच्या वापरातून युजी 99 या रोगाचे नियंत्रण करण्यात यश येऊ शकते.
- तांबेरा रोग आणि गहू पिक यांच्यातील संबंधाचे मुलद्रव्यीय यंत्रणा शोधण्यासाठी सामायिक व्यासपीठ तयार होण्यास मदत मिळेल.
- तसेच कार्यक्षम रोग नियंत्रण पद्धती विकसित करणे शक्य होईल.

- See more at: http://blogs.usda.gov/2013/06/27/scientists-discover-gene-to-combat-devastating-wheat-rust/#sthash.dZdUCyUr.dpuf

ढेकणांचा बंदोवस्त करणार अतिसूक्ष्म तंत्रज्ञान

ढेकणांचा बंदोवस्त करणार अतिसूक्ष्म तंत्रज्ञान

अति सूक्ष्म तंत्रज्ञानाचे फायदे आपल्याला काय होणार असे अनेक वेळी सर्वसामान्यांना वाटत असते. मात्र अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचा फायदा तुमच्या घरातील ढेकणांचा बंदोवस्त करण्यासाठीही होऊ शकतो. नुकतेच तसे संशोधन अमेरिकेतील स्टोनी ब्रुक विद्यापीठामध्ये करण्यात आले आहे. विद्यापीठातील संशोधकांनी अतिसूक्ष्म (अब्जांशी) तंत्रज्ञानाचा वापर करील मानवी केसांच्या जाडीपेक्षक्षा 50 पट कमी जाडीच्या धाग्यापासून जाळ्याची निर्मिती केली आहे. त्यामुळे ढेकूण किंवा अन्य रक्तशोषक कीडींना रोखणे शक्य होणार आहे. बिनविषारी पद्धतीने कीडीचे नियंत्रण करणे शक्य होणार आहे. या संशोधनाच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला असून त्याची उत्पादने खासगी कंपनीद्वारा बाजारात आणण्यात येणार आहेत.  

ढेकणांच्या त्रासाने वैतागलेल्या माणसाची राम गडकरी यांनी लिहिलेली एक विनोदी कथा मराठीमध्ये प्रसिद्ध आहे. शेवटी त्यातील नायक घराला आग लाऊन काशीला निघून जातो. ढेकूण किंवा रक्तशोषक कीडींचा प्रादुर्भाव झाला की त्यांचा बंदोवस्त करणे कठीण होऊन जाते. मात्र आता स्टोनी ब्रुक विद्यापीठातील संवेदक पदार्थातील अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्रातील संशोधक मिरीयम रॅफेलोविच यांनी या किडीच्या बंदोवस्तासाठी अब्जांशी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. रॅफलोविचन यांनी सांगितले की,  अब्जांशी तंत्रज्ञानाद्वारे कापडापेक्षाही दशलक्ष पट जवळ धागे विणण्यात आले आहेत. या धाग्यामुळे कीडीच्या पायामध्ये अडकल्यामुळे हालचाली करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ढेकणासारख्या किडीच्या खाद्य मिळवण्यावर, तसेच प्रजननावर विपरीत परिणाम होईल. पर्यायाने त्यांच्या संख्येत घट होण्यास मदत होईल.

या संशोधनाच्या चाचण्या जिवंत ढेकूण आणि वाळवीवर घेण्यात आल्या असून, त्या यशस्वी ठरल्या आहेत. हे अतिसूक्ष्म जाळ्याचे माणसे व पाळीव प्राण्यावर कोणतेही दुष्परीणाम नसल्याचे संशोधकानी सांगितले.

कृत्रिम ह्रद्य निर्मितीसाठी गाईंचे स्नायू ठरले उपयुक्त

कृत्रिम ह्रद्य निर्मितीसाठी गाईंचे स्नायू ठरले उपयुक्त

पॅरीस येथील कारमॅट संस्थेने बनविले शरीरात बसणारे कृत्रिम ह्रद्य

सध्या ह्रद्य रोगावर अन्य दात्याच्या ह्रद्याचे प्रत्यारोपण केले जाते. प्रति वर्ष अमेरिकेमध्ये दोन ते तीनहजार अशा शस्त्रक्रिया होत असतात. साधारणतः तितकेच लोक प्रतिक्षा यादीमध्ये असतात आणि योग्य दाता न मिळाल्याने अनेक रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागते.
मानवी अवयवामध्ये गर्भामध्ये सुरू झालेले ह्रद्याचे ठोके अंतिम क्षणापर्यंत सुरू असते. कृत्रिम ह्रद्याचा वापर दात्यांचे ह्रद्य मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात केला जातो.  त्यामध्ये आता सुधारणा होत कृत्रिम ह्रद्याचे काम करणाऱ्या सिनाकार्डिया सिस्टिम्समुळे त्यात सुमारे 1374 दिवसापर्यंत ह्रद्य चालू ठेवण्यात यश आले आहे. अर्थात हे पूर्ण उत्तर नाही. कारण या कृत्रिम उपायासाठी बाहेरून ऊर्जा पुरवावी लागतो. या बाह्य संपर्कातून विविध रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढते.

पॅरीस येथील कारमॅट संस्थेने पहिले शरीरात बसविता येईल असे कृत्रिम ह्रद्य विकसित केले आहे. ते पुर्णतः छातीच्या पोकळीत बसत असून त्याला काहीही बाह्य घटक नाहीत. त्यामुळे जंतूच्या प्रादुर्भावाची शक्यता कमी होते.
- या उपकरणामध्ये एक पातळ पडद्याने अलग केलेले दोन कक्ष असतात. एका भागात हायड्रोलीक द्रव पदार्थ व दुसऱ्यामध्ये रक्त असते. हा हायड्रॉलिक द्रव कक्षामध्ये आत बाहेर होत राहतो. त्यामुळे मधल्या पातळ पडद्याचे आकुंचन व प्रसरण झाल्याने खऱ्या ह्रद्याप्रमाणे रक्ताचे वहन होते.
- दोन कक्षामधील पातळ पडद्याची रक्ताकडील बाजू आणि व्हॉल्व्हसाठी गाईंच्या स्नायूंचा वापर केलेला आहे. या गाईंच्या स्नायूंमुळे रक्ताच्या गुठळ्या होणे टाळता येते. गुठळ्या कमी होण्यासाठी कमीत कमी औषधांचा वापर करावा लागणार आहे.
- या उपकरणामध्ये संवेदकांची (सेन्सर) प्रणाली वापरली असून रुग्णांबाबतची माहिती संगणकाकडे पाठवून त्या सुचनेनुसार रक्तांच्या पंपींगचा दर बदलून घेईल. या संवेदकांना चालविण्यासाठी बॅटरीचा वापर केलेला असून इंडक्शन प्रक्रियेने बाहेरून चार्ज करता येते.

ह्रद्याची कार्यक्षमता गाठण्यासाठी अधिक संशोधनाची गरज
- कोणत्याही यांत्रिक उपकरणाला मानवी शरीरात सामावून घेतले जात नाही. सामावून घेण्यासाठी सातत्याने औषधांची गरज असते.
- शरीर हे क्षारयुक्त असल्याने यांत्रिक पार्ट लवकर झिजतात.
- कोणत्याही यंत्रासाठी ह्द्यांची कार्यक्षमता गाठणे अवघड आहे. कारण ह्रद्य प्रति मिनीट 60 वेळा धडकते. म्हणजेच दिवसाला 86 हजार 400 वेळा, तर वर्षाला 31.5 दशलक्ष वेळा धडकते.
- या उपकरणाच्या चाचण्या युरोप आणि मध्य पूर्वेतील रुग्णांवर करण्यात येणार आहेत. अर्थात हे उपकरण मानवी शरीरात नक्की किती काळ चालू शकेल, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहेत.

जमिनीतील पाण्याचे प्रमाण सांगणार उपग्रह प्रणाली

जमिनीतील पाण्याचे प्रमाण सांगणार उपग्रह प्रणाली

ऑस्ट्रेलियातील संशोधन


 ऑस्ट्रेलियातील अभियंत्यांनी उपग्रहाद्वारे जमिनीतील किंवा मातीतील पाण्याचे प्रमाण शोधणारी प्रणाली विकसित केली आहे. ती प्रणाली प्रत्येक तीन दिवसानंतर मातीतील ओलाव्याचे प्रमाण सांगू शकेल.

एनएसडब्लू विद्यापीठातील ऑस्ट्रेलियन अंतरिक्ष अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या संशोधकांनी पृथ्वीचे निरीक्षण करणाऱ्या दोन उपग्रहाचे आरेखन केले आहे. हे उपग्रह देशावरून फिरत असताना रडार प्रणालीचा वापर करतील. या बाबत माहिती देताना संस्थेचे संचालक ऍन्ड्र्यू डेम्पस्टर म्हणाले की, या उपग्रहाद्वारे मिळालेले मातीतील पाण्याचे प्रमाण कृषी, पर्यावरण, हवामान विभाग आणि संशोधक यांच्या वापरता येईल.
पर्यावरणातील बदलामुळे ऑस्ट्रेलियातील काही भाग हे कोरडे आणि काही भाग हे अधिक पाण्याचे असल्याचे दिसून येतात. त्याचे नेमके प्रमाण मिळणे शक्य होणार आहे. त्याच सोबत उपग्रहाद्वारे कर्ब मोजणीसाठी जंगलाचे बायोमास मोजणे शक्य होणार आहे. या उपग्रह प्रणालीच्या उभारणीसाठी रूड शासनाकडून 2010 मध्ये 4.6 0शलक्ष आणि अंतरीक्ष संशोधनासाठी 40 दशलक्ष डॉलर पुरविण्यात आले होते.
या संशोधनाचा अहवाल अन्य 13 गटासह नाविन्यता, उद्योग, शास्त्र आणि संशोधन विभागासमोर मांडण्यात येणार आहे. साधारणतः आठ वर्षे आयुष्यकाळ असलेली उपग्रह प्रणआलीविकसित करण्यासाठी आठ वर्षे आणि सुमारे 800 दशलक्ष डॉलरचा खर्च होतो. त्यामुळे या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी संघराज्य आणि राज्य शासनाकडे आर्थिक मदतीची अपेक्षा असून त्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे डेम्पस्टर यांनी सांगितले.

अंतरीक्ष धोरण अपुरे
ऑस्ट्रेलिया हा एकमेव देश असा आहे, की जिथे स्वतःची स्पेस एजन्सी नाही. हवामान आणि माहितीसाठी अमेरिका आणि जपान या देशांवर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी साधारणतः चार अब्ज डॉलरपर्यंत किंमत 2015 पर्यंत मोजावी लागणार आहे. सातत्याने प्रयत्न केल्यानंतर एप्रिल महिन्यात शासनाने देशाची पहिले अंतरीक्ष धोरण जाहीर केले असून उपग्रह वापरांचे धोरणही त्यात अंतर्भूत आहे. मात्र अंतरीक्ष स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने ते अपूरे असल्याचे डेम्पस्टर म्हणाले.

शाकाहार ठरतो दिर्घायुष्यासाठी कारणीभूत

शाकाहार ठरतो दिर्घायुष्यासाठी कारणीभूत

शाकाहार हा माणसांच्या दीर्घायुष्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे नुकत्याच कॅलिफोर्निया येथील लोमा लिंडा विद्यापीठामधील संशोधक मायकेल जे. ओरलिच आणि सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. त्यातही शाकाहाराचा लाभ महिलांपेक्षा पुरूषांना अधिक प्रमाणात होत असल्याचे आढळून आले आहे. हे संशोधन जेएएमए इंटर्नल मेडिसीन मध्ये प्रकाशित झाला आहे.
आहार आणि मृत्यूचा दर यांच्याती संबंधाचा शोध घेण्यासाठी सुमारे 73 हजार 308 लोकांच्या गटाचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी तयार केलेल्या प्रश्नावलीमध्ये सामिष आहार, मिश्र आहार, मासे व तत्सम पदार्थ खाणारे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश असलेले आणि कोणत्याही प्राणीज पदार्थांचा आहारात वापर नसलेले लोक असे पाच गट केले होते.
- पुर्णपणे शाकाहारी असलेल्या लोकांमध्ये विविध प्राणघातक रोगांचे प्रमाण कमी आढळून आले.
- या अभ्यासामध्ये काही पुरावे शाकाहाराच्या पॅटर्नकडे झुकलेले असले तरी मृत्यूदराशीं त्याचा संबंध स्पष्टपणे समोर येत नाही. पुरूषामध्ये सामिष आहार करणाऱ्या लोकांच्याय तुलनेत शाहाकरी लोकांच्या मृत्यूच्या दराचे प्रमाण 12 टक्क्यांनी कमी आढळले आहे. या लोकांमध्ये ह्रद्यरोगांचे प्रमाणही कमी दिसून आले आहे.
- मात्र महिलामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी गटामध्ये फारसा फरक दिसून आला नाही.
 - संशोधकाच्या मते, दुधजन्य पदार्थ, मासे व तत्सम पदार्थ खाणारे आणि पूर्णपणे शाकाहारी गटामध्ये मांसाहारी लोकापेक्षा मृत्यूचे प्रमाण कमी दिसून आले आहे.

जर्नल संदर्भ ः
Michael J. Orlich, Pramil N Singh, Joan Sabaté, Karen Jaceldo-Siegl, Jing Fan, Synnove Knutsen, W. Lawrence Beeson, Gary E. Fraser. Vegetarian Dietary Patterns and Mortality in Adventist Health Study 2. JAMA Internal Medicine, 2013 DOI: 10.1001/jamainternmed.2013.6473

जखमांच्या स्वच्छतेसाठी कीटकांचा वापर

जखमांच्या स्वच्छतेसाठी कीटकांचा वापर

प्राचीन काळी जगभर जखमा साफ करण्यासाठी काही कीटकांचा वापर केला जात असे. प्राचीन भारतातही जळूसारख्या रक्त शोषक जिवांचा वापर जखमा स्वच्छ करण्यासाठी केला जात असे. ग्रीक रोमन लोकांमध्ये मॅगोट (माशीची प्रजाती) या माशीच्या अळीअवस्थेचा वापर जखमांच्या स्वच्छतेसाठी केला जाई. मात्र पुढे आधुनिक वैद्यकांच्या (विशेषतः प्रतिजैविकांच्या शोधानंतर) प्रगतीनंतर अशा पद्धतींचा वापर पुर्णपणे थांबला. फ्रान्समध्ये एका संशोधकांच्या गटाने या पद्धतीच्या वापराबाबत संशोधन केले आहे. काही प्रकारच्या जखमा भरून येण्यासाठी मॅगोट सारख्या सजीवांचा वापर शस्त्रक्रियेपेक्षा फायदेशीर ठरत असल्याचे त्यांना दिसून आले आहे.

काय करतात मॅगोट
मॅगोटची अंडी मांसामध्ये घातली जातात. त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या या मांसावर जगत मोठ्या होतात. या अळ्या विशेषतः मृत स्नायू आणि पेशी खातात. खराब झालेल्या स्नायूंवर विशिष्ट असा द्रव सोडत त्याचे काही प्रमाणात विघटन करतात. त्यानंतर विघटीत झालेले स्नायू खातात. जखमेमध्ये मॅगोटस हीच क्रिया करतात. मृत पेशी खाल्यामुळे आरोग्यदायी पेशी वाढीला मदत होते.

असा झाला अभ्यास
या अभ्यासासाठी संशोधकांनी 119 माणसांचे दोन गटामध्ये विभाजन केले. एका गटाला जखमेवर नेहमीच्या शस्त्रक्रियेद्वारे उपचार करण्यात आले, तर उर्वरीत गटावर मॅगोटच्या साह्याने उपचार केले गेले.
- दोन्ही गटांना दोन आठवड्यासाठी दवाखान्यात ठेवण्यात आले. दोन्ही गटाला त्यांच्यावर कोणत्या पद्धतीने उपचार होणार आहेत, याची माहिती दिलेली नव्हती.
- मॅगोट या जीवांच्या साह्याने उपचार होत असलेल्या गटातील लोकांच्या जखमामध्ये किंचीत हालचाल होत असल्याचे जाणवत असले तरी वेदना कमी प्रमाणात होत्या.
- एका आठवड्यानंतर या गटाच्या जखमा अधिक वेगाने भरत असल्याचे दिसून आले. जखमा भरण्याचे प्रमाण 66.5 टक्के ( शस्त्रक्रियेद्वारे हेच प्रमाण 54.5 टक्के ) होते.
- अर्थात या पद्धतीवर अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.


मॅगोट थेरपीचा आधुनिक इतिहास
-1920 मध्ये जॉन हाफकिन्स संस्थेतील सर्जन डॉ. विल्यय बाईर यांनी मॅगोट पद्धतीचा वापर osteomyelitis नावांने ओळखल्या जाणाऱ्या हाडाच्या जंतू प्रादुर्भावावर केला होता. त्याचे निष्कर्षही त्यांनी प्रकाशित केले होते.
- पहिल्या महायुद्धाच्या काळात दोन सैनिंक जखमी झाल्यानंतर सुमारे सात दिवस अन्न पाण्याविना पडून होते. त्यांची केस डॉ. विल्यम बाईर यांच्याकडे उपचारासाठी आले. या दोघांच्या जखमा इतक्या प्रचंड असूनही त्यांना ताप आला नव्हता की सेप्टीक झालेले नव्हते. हे पाहिल्यानंतर डॉक्टर आश्चर्यचकित झाले. कारण या जखमां मॅगोटस च्या अळ्यांनी भरून गेलेल्या होत्या. हे चित्र दिसायला खराब दिसत असले तरी जखमा स्वच्छ केल्यानंतर त्या जखमा ताज्या नव्या गुलाबी रंगाच्या स्नायूंनी युक्त आणि भरत आलेल्या दिसून आल्या.
-  या अनुभव आल्यानंतर डॉ. विल्यम बाईर यांनी प्रयोग सुरू केले. मॅगोट पद्धतीच्या वापर जखमासाठी करण्यास प्रारंभ झाला. त्यांच्या प्रयोगातील पायाची जखम मॅगोटस थेरपीनंतर भरल्याचे छायाचित्रात दिसून येत आहे.
- त्यानंतर या उपचार पद्धतीचा वापर अमेरिकेमध्ये विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मोठ्या प्रमाणात केला जात होता. त्यानंतर प्रतिजैविकांच्या शोधानंतर ही पद्धती मागे पडत गेली.
- 2004 मध्ये अमेरिकेच्या एफडीए संस्थेकडून या पद्धतीला वैद्यकीय साधन म्हणून मान्यता दिली होती. त्यामुळे अमेरिकेमध्ये मॅगोट या सजीवाच्या विक्रीचा व्यवसाय एफडीएच्या नियमानुसार केला जात होता. पुढे रिचर्ड शेरमनसारख्या वैद्यकिय तज्ज्ञाने आपल्या मोनार्च प्रयोगशाळेच्या माध्यमातून वैद्यकिय उपचारासाठी मॅगोट पुरवठ्याचा व्यवसाय सुरू केला.

आतड्यातील जिवाणू निभावतात प्रतिकारकतेमध्ये महत्त्वाची भुमिका

आतड्यातील जिवाणू निभावतात प्रतिकारकतेमध्ये महत्त्वाची भुमिका

मानवी पचनसंस्थेमध्ये असलेल्या जिवाणूंचा उपयोग प्रतिकारकतेसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकत असल्याचे अमेरिकेतील मेरीलॅंड विद्यापीठामध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनात दिसून आले आहे. माणसांनी घेतलेल्या विविध औषधांच्या किंवा पचनसंस्थेमध्ये येणाऱ्या आगंतूक जिवांच्या प्रादुर्भावाला प्रतिक्रिया देणाऱ्या या जिवाणूंचा फायदा करून घेणे शक्य आहे. या बाबत दोन संशोधने प्लॉसवन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यामुळे पचनसंस्थेतील चांगले जिवाणू औषधशास्त्र आणि उपचारासाठी नव्या दिशा दर्शवणार आहेत.

मेरीलॅट विद्यापीठातील स्कुल ऑफ मेडीसीन इन्स्टिट्यूट फॉर जिनोम सायन्सेस आणि सेंटर फॉर व्हॅख्सीन डेव्हलपमेंट या संस्थांनी माणसांच्या आणि मानवाशिवाय अन्य सस्तन प्राण्यांच्या पचनसंस्थेत असलेल्या जिवाणूंच्या संख्येवर औषध आणि रोगजंतूच्या परिणामांचा अभ्यास एकत्रितरीत्या केला आहे. त्याचे निष्कर्ष आशादायी असून भविष्यात त्याचे औषधशास्त्र आणि प्रतिकारकता शास्त्र या दोन्ही विषयावर मोठे परिणाम होणार आहेत.

 असे आहेत दोन अभ्यास
मानवी आतड्यामध्ये आढळणाऱ्या जिवाणूंच्या संख्येवर टायफॉईडवरील उपाचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांचे परिणामाचा अभ्यास करण्यात आला. तसेच दुसऱ्या अभ्यासामध्ये माकडाच्या एका गटामध्ये आतड्यात असलेल्या जिवाणूंच्या संख्येवर शिगेला या रोगासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचे आणि शिगेला या आजाराच्या रोगजंतूचे आतड्यातील जिवाणूंवर होणारे परिणाम तपासण्यात आले आहेत.
त्यामध्ये जिवाणूंच्या विविधतेचे प्रमाण अधिक असल्यास औषधांना दिल्या जाणाऱ्या प्रतिकारक प्रतिक्रियेवर परिणाम होतात. तसेच परिणाम माकडामध्ये शिगेला रोगजंतूच्या प्रादुर्भावासाठी दिसून आला आहे. त्यावरून मानवी आरोग्यासाठी पचनसंस्थेतील जिवाणू महत्त्वाची भूमिका निभावू शकत असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे.
 या बाबत माहिती देताना दोन्ही संशोधनाचे मुख्य संशोधक क्लेअर फ्रेजर यांनी सांगितले, की एखाद्या औषधाची परिणामकारकता किंवा एखाद्या रोगजंतूविषयी संवेदनशीलता यावर पचनसंस्थेतील जिवाणूंचा मोठा प्रभाव असल्याचे दिसून आले आहे. सध्या प्राथमिक निष्कर्ष आमच्या अपेक्षेप्रमाणे आले असले तरी भविष्यामध्ये या विषयावर सखोल संशोधन करण्यात येणार आहे. तसेच त्यात जनुकिय विश्लेषणाची मदत घेण्यात येईल. त्यामध्ये विविध प्रकारकच्या औषधांच्या मात्रेमुळे होणारे परिणाम तपासता येतील.

अभ्यास 1
पहिल्या अभ्यासात टायफॉईड वर तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या  औषधाचे माणसांच्या पचनसंस्थेतील जिवाणूंच्या संख्येवर होणारे परिणाम तपासले आहेत. त्यामध्ये प्रतिकारकतेच्या संदर्भात पचनसंस्थेतील जिवाणू आजारपूर्व ते आजारानंतर 56 दिवसामध्ये दहा टप्प्यावर मोलाची भूमिका निभावत असल्याचे प्राथमिक निष्कर्ष मिळाले आहेत.


अभ्यास 2
दुसऱ्या अभ्यासामध्ये विविध विद्याशाखेतील संशोधकांनी एकत्रितरित्या संशोधन केले आहे. माकडावर केलेल्या या संशोधनातही शिगेला डिसेंन्ट्री 1 या रोगजंतूच्या प्रादुर्भावाविरूद्ध आतड्यात आढळणाऱ्या जिवाणूंची विविधतेचा  प्रतिकारकतेवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्यावरून माणूस किंवा मानवाशिवाय अन्य सस्तन प्राण्यामध्ये आतड्यात पोचणाऱ्या विविध आगंतूक रोगजंतूसाठी आतड्यातील जिवाणूंच्या प्रतिक्रिया उपयुक्त ठरू शकतील.

असे होतील फायदे ः
टायफॉईडशी संबंधित आजारामुळे जगभर दरवर्षी 20 दशलक्ष लोक आजारी पडतात. या रोगाला प्रतिरोध करणारी तोंडावाटे देण्यायोग्य औषधांच्या निर्मितीसाठी सेंटर फॉर व्हॅक्सीन डेव्हलपमेंट या संस्थेसह जगभर सातत्याने संशोधन केले जात आहे. त्याला हे संशोधन नवी दिशा देईल.