मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२


अंधासाठी व्हिडिओ खेळातून शिक्षण शक्य


अपरिचित जागी वावरण्याचा आत्मविश्वास मिळेल व्हिडिओ गेम मधून

अलिकडे मुलांमध्ये विविध प्रकारचे व्हिडिओ गेम प्रचंड लोकप्रिय आहेत. विविध खेळाची निर्मिती होत असून त्याचे वेड मुलांना लागले आहे.  या खेळांचा वापरही वाढल्याने त्यांचे उद्योगात रुपांतर झाले आहे. त्याच्या वापराचे अनेक तोटे समोर येत आहेत. त्याच वेळी चिली विद्यापीठातील संशोधक लोट्फी मेराबेट आणि जेमी सॅन्चेझ यांनी अंध मुलांनाही वापरात येईल, अशा प्रकारचा व्हिडिओ गेम विकसित केला आहे.  त्यासाठी आवाजाचे विविध परिणामाचा वापर केला आहे. या खेळामुळे अंध मुलामध्ये नवीन जागेच्या संदर्भात जाणीव निर्माण करणे शक्य असल्याचे संशोधकाचे मत आहे. हे संशोधन प्लॉस वन च्या सप्टेंबर महिन्याच्या अंकात प्रकाशित केले आहे. 

परिचित ठिकाणी अंध व्यक्ती अंदाजामुळे चांगल्या प्रकारे वावरू शकतात. मात्र नव्या ठिकाणी गेल्यानंतर काठीच्या साह्याने चाचपडत चालण्याचा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे.  या जागा किंवा ठिकाणे नवीन असल्याने कोणताही अंदाज नसतो. त्यामुळे हा अंदाज येण्यासाठी वेळ जातो. या अडचणीवर मात करण्यासाठी हार्वर्ड वैद्यकिय विद्यालय येथील लोट्फी मेराबेट आणि चिली विद्यापीठ येथील संशोधक जेमी सॅन्चेझ यांनी प्रणाली विकसित केली आहे. त्याला ऑडिओबेसड एन्व्हायर्नमेंट स्टिम्युलेटर असे नाव देण्यात आले आहे. या प्रणालीमध्ये प्रत्यक्ष ठिकाणासारख्या जागेची अनुभूती आवाजाच्या माध्यमातून अंध व्यक्तींना करून देण्यात येते. त्यासाठी व्हिडिओ गेममधील त्रीमितीय आवाज प्रणालीचा वापर केला आहे. विविध दुव्यांच्या साह्याने नव्या जागेविषयी, इमारतीविषयी अनुभव मिळवता येईल.

हा खेळ खेळल्यानंतर प्रत्यक्ष त्या इमारतीमध्ये किंवा जागेमध्ये अधिक चांगल्या प्रकारे वावरू शकेल. त्यासाठी नित्य वापरातील इमारतीचे अचूक असे नकशावर आधारीत खेळ तयार करता येतील.  अन्य अनेक प्रकारच्या बाबी या खेळाच्या माध्यमातून शिकवणे शक्य होणार आहे. याबाबत माहिती देताना संशोधक मेराबेट यांनी सांगितले, की व्हिडोओ गेमच्या साह्याने एखादी गोष्ट शिकणे नाविन्यपुर्ण व सोपी गोष्ट आहे. त्यातून विविध प्रकारची कौशल्ये विकसित करता येतात. या आवाजावर आधारीत खेळामधून अंध व्यक्तीच्या मेंदूमध्ये त्या अपरिचित जागेचा नकाशा तयार होतो. त्याचा लाभ त्यांना त्या जागेमध्ये प्रत्यक्ष वावरताना होतो.या दुहेरी पद्धतीच्या खेळातून अंध व्यक्तीचे परावलंबीपण कमी करणे शक्य होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा