मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२

मधुमेहीसाठी शर्करेची तपासणी होईल वेदनारहित


मधुमेहीसाठी शर्करेची तपासणी होईल वेदनारहित

- अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाधारीत जैवसंवेदक झाला विकसित
- जर्मनीतील फ्राऊनहॉपर संस्थेतील संशोधन

मधुमेही लोकांसाठी शर्करेची तपासणी हा नित्याचा परिपाठ असतो. तसेच इन्सुलिनचे इंजेक्शनही घ्यावे लागते. काही लोकासाठी इंजेक्शनच्या वेदना या रोगापेक्षा अधिक त्रायदायक ठरतात.  त्यातील शर्करेची तपासणी करण्यासाठी जर्मनीतील फ्राऊनहॉपर संस्थेतील संशोधकांनी लिंचपिन हे जैवसंवेदक विकसित केले आहे. त्यामुळे सुईच्या वापराशिवाय या छोट्याशा चिपच्या साह्याने शर्करा मोजणे व विश्लेषण करणे शक्य होणार आहे.  ते मोबाईलशी जोडणे शक्य असल्याने त्वरीत चाचणीचे निष्कर्ष मिळतात.
मधुमेह रोगामध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण रोज तपासावे लागते. विशेषतः टाईप 2 प्रकारच्या रुग्णांसाठी विशेष लक्ष ठेवावे लागते. ग्लुकोजचे विघटन करण्यासाठी आवश्यक असलेले इन्शुलिन त्यांच्या शरीरात तयार होत नाही. काचेच्या पट्टीवर रक्ताचा थेंब घेऊन त्यातील प्रमाण तपासणी करावी लागते. त्यानंतर योग्य प्रमाणात इन्शुलिनची मात्रा इंजेक्शनद्वारे घ्यावी लागते. ही सर्व प्रक्रिया अत्यंत वेदनादायक असते. फ्राऊनहॉपर मायक्रोइलेक्ट्रॉनिक सर्किट ऍण्ड सिस्टिम्स या संस्थेतील संशोधकांनी अतिसुक्ष्म आकाराचे जैवसंवेदक विकसित केले आहे.  या जैवसंवेदकाद्वारे रक्तापेक्षा शरीरातून बाहेर पडणाऱ्या घाम, अश्रू या अन्य द्रव्याच्या माध्यमातून शरीरातील शर्करा मोजली जाते.
निदान पद्धतीसाठी अतिसुक्ष्म तंत्रज्ञान
-शरीरातील विकरामध्ये होणाऱ्या विद्यूतरासायनिक बदलांचे मोजमाप हा निदान तंत्रज्ञानाचा पाया आहे. ग्लुकोज ऑक्सीडेजमुळे गग्लुकोजचे रुपांतर हायड्रोजन पेरॉक्साईड आणि अन्य रसायनामध्ये होते. त्याच्या तीव्रेतेचे मोजमाप पोटॅन्शियोस्टॅट या उपकरणाद्वारे केले जाते. त्यावरून ग्लुकोजची पातळी मोजणे शक्य होते. 
 - जैव संवेदकांचा आकार केवळ 0.5 बाय 2.0 मीलीमीटर असून त्याच्याशी सर्व प्रकारच्या निदान यंत्रणा जोडणे शक्य आहे. संस्थेचे व्यवस्थापक टॉम झिम्मरमॅन यांनी सांगितले की, हे उपकरण सर्व प्रकारच्या विद्यूत रासायनिक लक्षणाचे आणि ऍनालॉग माहितीचे रुपांतर डिजीटल माहितीमध्ये करतो. तसेच त्याचे वहन वायरलेस प्रणालीद्वारे अन्य उपकरणाकडे करू शकतो. अगदी मोबाईलमध्ये ही चाचणीचे निष्कर्ष दिसू शकतात. 
- हे उपकरण चालण्यासाठी केवळ 100 मायक्रो ऍम्पियरेपेक्षाही कमी ऊर्जा लागते. जुन्या संवदेकासाठी साधारणपणे 500 मायक्रो ऍम्पियर आणि 5 व्होल्ट ऊर्जेची आवश्यकता असते. रेडिओ लहरीच्या माध्यमातून माहितीची देवाण घेवाण केली जात असून ऊर्जाही त्या माध्यमातून पुरवली जाते.
- यातील ग्लुकोज संवेदक हे डच वैद्यकिय संस्था नोवियोसनकडून विकसित केले असून व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्यावर आणखी स्वस्तामध्ये उपलब्ध होऊ शकेल.
- हे काही आठवड्यापासून ते महिन्यापर्यंत वापरणे शक्य आहे. ते टिकाऊ आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा