मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२

अमेरिकेत होतेय गोड ज्वारीवर संशोधन

खनिज तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जैवइंधन निर्मितीसाठी वेगाने केले जाताहेत प्रयत्न

अमेरिकेमध्ये खनिज तेलाचा वापर प्रचंड प्रमाणात केला जातो. हे खनिज तेलाचे साठे मर्यादीत असल्याने भविष्यात ऊर्जा उपलब्धेतेविषयी प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे खनिज तेलाऐवजी जैवइंधन निर्मितीसाठी अमेरिकेने संशोधनावर जोर दिला आहे. त्यासाठी धोरण आखले असून 36 अब्ज गॅलन जैवइंधन मिळविण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे. इथेनॉल मिळविण्यासाठी धान्याचा वापर कमी करून अन्य स्रोताच्या माध्यमातून  21 अब्ज गॅलन तेल मिळविण्यात येणार आहे. त्यासाठी जैवइंधन मिळवता येईल, अशा पिकाच्या संशोधनावर अमेरिकेने लक्ष केंद्रित केले आहे.
अमेरिकेमध्ये गोड ज्वारीची लागवड प्रामुख्याने साखर सिरप आणि मोलॅसिससाठी केली जाते. हे पीक कोरडवाहू असून दुष्काळातही चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकत असल्याने त्याबाबत अधिक संशोधन केले जात आहे. अमेरिकेतील कृषी विभागाने केलेल्या संशोधनामध्ये ज्वारीच्या कडब्याचा वापर जैव इंधन निर्मितीसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकत असल्याचे दिसून आले आहे.

अवर्षण सहनशीलता, बदलत्या वातावरणाला जुळवून घेण्याची क्षमता, नत्रयुक्त खताचा कमी वापर आणि त्याच वेळी अधिक बायोमास उत्पादन यामुळे ज्वारी हे पीक आदर्श पीक आहे. तसेच हे पीक विद्राव्य साखर तयार करते. साखरेसाठी रस काढून घेतल्यानंतर शिल्लक चोथाही विद्यूत निर्मितीसाठी वापरता येतो. अतिरिक्त रसाचे रूपांतर जैवइंधन म्हणून करणे शक्य असल्याचे मुलद्रव्यीय जीवशास्त्रज्ञ स्कॉट सॅटलर आणि जेफ पेंडरसन यांनी सांगितले. स्कॉट सॅटलर हे स्वतः  वनस्पीतीत सुक्रोज आणि अन्य प्रकारच्या शर्करा उत्पादन करण्याच्या प्रक्रियेतील जनुके, विकरे आणि जैवरसायनिक प्रक्रिया ओळखण्यासाठी संशोधन करत आहेत. त्यांच्या संशोधनातून साखर निर्मितीचे प्रमाण आणि वेग वाढविण्यासाठी या जैवरासायनिक प्रक्रियांना वेग देणे शक्य होणार आहे.  तसेच पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगाने नव्या जाती विकसित होण्यास मदत होणार आहे.

उद्दीष्ट 36 अब्ज गॅलनचे...

- अमेरिकन सरकारने खनिज इंधनाचा वापर कमीत कमी करण्यासाठी धोरण आखून संशोधन आणि प्रसारासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 2022 सालीपर्यंत 36 अब्ज गॅलन जैवइंधन निर्मितीचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. त्यातील 15 अब्ज गॅलन जैवइंधन हे धान्यापासून मिळवलेल्या इथेनॉलवर आधारीत असणार असून उर्वरीत 21 अब्ज गॅलन जैवइंधन अन्य स्रोतापासून मिळवण्यात येणार आहे. अन्य स्रोतामध्ये ज्वारी, ऊस, स्विचग्रास सारखी विविध प्रकारची गवते, मोहरी, सोयाबीनसारखी गळीत धान्ये यांचा वापर केला जाणार आहे. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गोड ज्वारीवर संशोधन करण्यात येत आहे.

- आग्नेय अमेरिकेमध्ये ज्वारी आणि ऊस ही पीके महत्त्वाची आहेत. त्याचे उत्पादन आणि हंगाम हे एकमेकांना पुरक आहेत. तसेच एकाच प्रकारच्या यंत्र सामुग्रीवर त्यापासून  इथेनॉल मिळवणे शक्य आहे. त्यामुळे अमेरिकी कृषी संशोधन संस्थेच्या टिफॉन येतील पीक जुनकिय आणि पैदास संशोधन संस्थेमधील संशोधक विल्यम एँडरसन आणि त्यांचे सहकारी गोड ज्वारीची योग्य ती जनुके ओळखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या जनुकांच्या वापरातून सुधारी जातीची निर्मिती करता येईल. त्यासाठी 117 प्रकारच्या ज्वारी नमुन्याचे जनुकिय विश्लेषण केले जात आहे. त्याचा वापर लवकर तयार होणारे, लष्करी अळींसाठी प्रतिकारक आणि अँथ्राकनोज सारख्या बुरशीजन्य रोगाला प्रतिकारक जाती वाण विकसित करण्यासाठी होणार आहे. 

- कृषी संशोधन सेवा संस्थेमध्ये गोड ज्वारीचा इतिहास जमा करण्यात आला असून त्यांच्याकडे जगभरातील 2163 गोड ज्वारीच्या जातींचे जतन करण्यात आलेले आहे. हे कार्य ग्रिफिन येथील वनस्पती जनुकिय स्रोत संवर्धन केंद्रामध्ये गॅरी पेंडरसन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. अन्य काही प्रकल्पामध्ये ज्वारीतील साखरेच्या प्रमाणाविषयी आणि त्यांच्या जनुकिय गुणधर्माविषयी डीएनए मार्किंगचा वापर करण्यात येत आहे. या सर्व माहितीचा फायदा पैदासकार आणि संशोधकांना जैवइंधन निर्मितीसाठी नव्या जाती विकसित करण्यासाठी होणार आहे.

- न्यु ओरेलॉन येथील दक्षिणी प्रादेशिक संशोधन संस्थेमधील संशोधक गील्लीयन इगलस्टोन, साराह लिंगल ( निवृत्त) , आणि मौरिन राईट गोड ज्वारीपासून सिरप तयार करण्यासाठी व्यावसायिक प्रक्रिया तंत्रज्ञान विकसनासाठी संशोधन करत आहेत. त्यामुळे सिरपची वर्षभर साठवण, वाहतूक सोपी होण्यासह अधिक प्रमाणात जैवइंधन निर्मितीसाठी आणि त्यांच्यापासून सुकिनिक आम्लासारखे मूल्यवर्धित पदार्थ मिळवणे शक्य होणार आहे.  तसेच कुजवण प्रक्रियेचा वेग कमी करणाऱ्या स्टार्च. ऍकॉनिटीक आम्ल आणि अन्य अशुद्ध घटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे उत्पादन ख्रचामध्ये बचत होणार आहे.

- मॅनहटन येथील धान्य दर्जा आणि संरचना संशोधन विभागामध्ये स्कॉट बेन आणि सहकारी वॅक्सी धान्यांच्या कुजवन प्रक्रियेतील इथेनॉल निर्मिती क्षमतेविषयी संशोधन करत आहेत. 
- या सर्व संशोधनाविषयी ऍग्रीकल्चरल रिसर्च मॅगेझीन या अमेरिकन अधिकृत संशोधनपत्रिकेच्या सप्टेंबर 2012 च्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे.

फोटोओळ 1- ज्वारीची जैवइंधन क्षमता वाढविण्यासाठी अनेक संशोधने होत आहेत. त्यातील आफ्रिकन जंगली दुरंगी ज्वारी जातीशी अधिक उत्पादनक्षम जातीचे संकर करण्यात येत आहे. 

फोटोओळ 2-  2163 गोड ज्वारी जातीचा जनुकिय संग्रह केला असून संशोधन गॅऱी पेंडरसन हे गोड ज्वारीच्या नमुन्याचे वजन करताना. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा