गुरुवार, २८ मार्च, २०१३

टेक्सास लॉंगहॉर्न गायींमध्ये 15 टक्के भारतीय जनुकांचा समावेश



टेक्सास लॉंगहॉर्न गायींमध्ये 

15 टक्के भारतीय जनुकांचा समावेश


58 प्रजातींच्या जनुकिय मार्करच्या अभ्यासातून उलगडला इतिहास


टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी लांब शिंगाच्या गाईंच्या जनुकिय इतिहासाची मांडणी केली असून या गाईंमध्ये भारतीय वंशासह, मध्य पुर्वेतील प्राचीन वंशांच्या जनुकांचा सुमारे 15 टक्के इतका अंतर्भाव उत्क्रांतीच्या ओघात झाल्याचे दिसून आले आहे. या अभ्यासासाठी जगभरातील 58 गाई प्रजातींच्या 50 हजार जनुकिय मार्करचा विस्तृत अभ्यास व विश्लेषण करण्यात आले आहे.  अनेक प्राचीन गाईंच्या जनुकांच्या विविधता अंतर्भूत असल्याने टेक्सास लॉंगहॉर्न ही गाय अधिक संशोधनासाठी उपयुक्त ठरणार आहे. हे संशोधन प्रोसिडिंग्स ऑफ दि नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
अमेरिकेतील टेक्सास राज्यातील जंगलामध्ये लांब शिंगाच्या गाई (लॉंग हॉर्न कॅटल) आढळतात. या गायींचा जनुकिय अभ्यास टेक्सास विद्यापीठातील संशोधक डेव्हीड हिल्स यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधिका जेन मॅकटाविश यांनी केला आहे. त्यात माणसांच्या स्थलांतराच्या इतिहासाशी गायींच्या स्थलांतराचा इतिहास जोडलेला आढळला आहे. या गायींच्या जनुकिय मार्करमध्ये स्पेन, पुर्व मध्य आणि भारतातील प्राचीन गाईंच्या जातींचा संकर घडून आल्याचे अभ्यासात आढळले आहे. या गाईंच्या इतिहासाचे धागे क्रिस्तोफर कोलंबसच्या स्पेन येथील मुरीश, मध्य पुर्व आणि भारत येथील दुसऱ्या सफरीपर्यंतच्या प्रवासापर्यंत पोचले आहेत. या बाबत माहिती देताना संशोधिका एमिली जेन मॅकटाविश यांनी सांगितले, की बऱ्याच काळापासून नव्या काळातील गायी यांच्या शुद्ध युरोपीय वंशाच्या असल्याचे मानले जात होते, मात्र लांब शिंगाच्या गायींच्या जनुकिय अभ्यासात त्या अधिक गुंतागुंतीच्या, संकरीत आणि जागतिक प्राचीन वंशातील जनुकिय विविधतेचे पुरावे आढळून आले आहेत. या विविधतेमुळे टेक्सास लॉंगहॉर्न या गायी अधिक तीव्र वातावरणातही अधिक चांगल्या प्रकारे तग धरू शकतात.

... असा आहे इतिहास
- 1493 मध्ये कोलंबसने प्राचीन गाय हिस्पोनियोलाच्या बेटावर प्रथम आणली होती. त्यानंतर उर्वरीत मार्गावर प्रवास करत 1521 मध्ये स्पॅनिश वसाहतीमध्ये पोचल्या.
- पुढील दोन शतकामध्ये स्पॅनिशांनी या गायींना उत्तरेकडे हलवले. पुढे याच क्षेत्रामध्ये 17 व्या शतकांच्या अंतिम टप्प्यामध्ये टेक्सास तयार झाले.
- या भागामध्ये काही गायी सुटून गेल्या किंवा निसटल्या.. त्या तशाच पुढील दोन शतकांमध्ये जंगली राहिल्या.
- पुढे या गाईं स्पेनमधील स्थानिक मानल्या जाऊ लागल्या. या विषयी माहिती देताना संशोधक हिल्स यांनी सांगितले, की या गाईंची ठेवण ही स्पेन आणि पोर्तुगीजमधील अन्य गाईंपेक्षा वेगळी आहे. त्यात एक शक्यता अशीही आहे, की या गाईंचा संकर अन्य युरोपातून आयात केलेल्या गाईंशी करण्यात आल्याने त्यांच्यामध्ये बदल होत गेले असावेत. तरीही त्यांच्यामध्ये कोलंबसने आणलेल्या गाईंचे मूळ जनुकिय गुणधर्म तसेच पुढे आलेले आहेत.
- या मुर गाईं घेऊन कोलंबस दुसऱ्या सफरीच्या वेळी आफ्रिकेत, पुढे युरोपात स्थानिक गाईंसह गेला. या सर्व गाईंच्या गुणधर्मांचा संकर आयब्रीयन पेनिनसुला भागातील गाईंमध्ये दिसून येतो. उत्क्रांतीच्या ओघात प्रतिकारकतेचे गुणधर्म अधिक विसकित होत गेले. तसेच जंगली भागात राहताना वन्य श्वापदांपासून रक्षणासाठी लांब शिंगे वाढली. अतिशय उष्णता, तसेच अवर्षणामध्ये तग धरण्याची क्षमता त्यांच्यात विकसित होत गेली.

जनुकिय अभ्यासातील महत्त्वाचे...
- टेक्सास लॉंगहॉर्न या गायींचा जनुकिय इतिहासाची मांडणी करण्यासाठी मिसौरी - कोलंबिया विद्यापीठातील मॅकताविस, हिल्स आणि सहकाऱ्यांनी 58 गायींच्या प्रजातींच्या 50 हजार जनुकिय मार्करचे विश्लेषण केले आहे.
- या अभ्यासात आयब्रीयन पेनिनसुला येथील गाईंच्या जनुकिय मार्करवरून अधिक गुंतागुंतीचे गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे. अंदाजे 85 टक्के लॉंगहॉर्न गाईंची जनुकीय रचना ही तौरीन प्रजातीच्या गाईंसारखी असून मध्य पुर्वेतील 8 ते 10 हजार वर्षापूर्वी आढळणाऱ्या जंगली गाईंमधून आलेली आहे. त्यामुळे लॉंगहॉर्न गाय ही शुद्ध तौरीन प्रजातींच्या होलस्टिन, हेरफोर्ड गाईंसारखी दिसते. एकूण जनुकांच्या 15 टक्के भाग हा भारतीय प्राचीन गाईंच्या वंशातून आला आहे. या गाईंचे वैशिष्ट्य म्हणजे गाईंच्या पाठीवरील वशिंड. पुढे या गाईंचा प्रसार आफ्रिकेत आणि तेथून आयब्रेयीन पेनिनसुलापर्यंत झाला. 8 ते 13 व्या शतकांच्या कालावधीतील मुरीश वंशाचे गुण त्यात स्थिर असल्याचे दिसून येतात. युरोपापेक्षा भारतीय भागामध्ये अधिक उष्ण आणि कोरडे वातावरण असल्याने प्रतिकारकक्षमताही अधिक असते.
- या विस्तृत विश्लेषणासाठी कॅटलमनस् टेक्सा लॉंगहॉर्न कॉन्झर्व्हन्सी यांनी आर्थिक साह्य केले होते.

...असे होतील संशोधनाचे फायदे
- लॉंगहॉर्न गाईंचे दिसणे हे प्राचीन गाईंसारखेच आहे. जंगली भागामध्ये राहत असल्याने या गाई स्वयंपुर्ण राहिल्या आहेत.  या गाईंमध्ये जनुकिय विविधतेचे भांडार असल्याने त्याचा लाभ भविष्यातील संशोधनासाठी होऊ शकत असल्याचे मॅकताविश यांनी सांगितले.
-वाढत्या तापमानामध्ये उष्ण आणि कोरड्या वातावरणामध्ये तग धरतील अशा जातीमध्ये टेक्सास लॉंगहॉर्न गाईंचा नक्की समावेश करावा लागेल.  या गाईंची जनुकीय माहितींचा वापर अन्य गाईंमध्ये सहनशीलता विकसित करण्यासाठी होऊ शकतो.

कमी मेदामुळे वाचली प्रजाती
अमेरिकेच्या अंतर्गत यादवीच्या कालावधीनंतरच्या काळात जंगली प्राण्याच्या मांसाची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असे. त्यात या जंगली प्राण्यांची मोठ्या प्रमाणात हत्या झाली. टेक्सास लॉंगहॉर्न या गाईंमध्ये कमी प्रमाणात मेद असल्याने त्यांची शिकार कमी प्रमाणात झाली.  तसेच मेद मिळवण्यासाठी अधिक मेद असलेल्या प्रजातींची आयात केली जात असे. त्यातून अमेरिकेमध्ये मेदयुक्त मांसाची आवड निर्माण होत गेली. त्यामुळे मांसासाठी होत असलेली शिकारही कमी झाली. त्यामुळे ही प्रजाती लुप्त होण्यापासून वाचल्या.

जर्नल संदर्भ ः
Emily Jane McTavish, Jared E. Decker, Robert D. Schnabel, Jeremy F. Taylor, and David M. Hillis. New World cattle show ancestry from multiple independent domestication events. PNAS, March 25, 2013 DOI: 10.1073/pnas.1303367110


बुधवार, २० मार्च, २०१३

इंद्रधनुषी रंगाचे झाड



इंद्रधनुषी रंगाचे झाड

झाडावर स्प्रे पेटींग केलेले नसून झाडाचे हे नैसर्गिक रंग आहेत. उत्तर गोलार्धामध्ये Eucalyptus deglupta  हे उंच वाढणारे झाड असून त्याला इंद्रधनुषी रेन्बो इकालिप्टस, मिन्डानो गम किंवा रेन्बो गम या नावाने ओळखले जाते. या झाडाचे खोडावर विविध रंग पसरलेले असून निघणाऱ्या प्रत्येक सालीगणिक त्यांचे रंग बदलत जातात. काही ठिकाणी या झाडाचा वापर बागेमध्ये सुशोभिकरणासाठी केला जातो.



उत्पादनवाढीसाठी मधमाशांइतकेच जंगली कीटकही महत्त्वाचे


उत्पादनवाढीसाठी मधमाशांइतकेच जंगली कीटकही महत्त्वाचे

 शेतीतील उत्पादनासाठी परागीभवनाचे महत्त्व मोठे आहे. योग्य उत्पादनवाढीसाठी परागीभवन करणारे जंगली मधमाश्या व अन्य कीटक हे महत्त्वाचे असून जंगली कीटकांचे प्रमाण कमी होत असल्याने परागीभवनावर विपरित परिणाम होत असल्याचे  आंतरराष्ट्रीय संशोधक गटाने केलेल्या अभ्यासातून पुढे आले आहे. कीटकांच्या जैवविविधतेचे महत्त्व या अभ्यासातून अधोरेखित झाले आहे. काही ठराविक जातीच्या मधमाशा पाळून शेतीची उत्पादकता वाढणार नसून परागीभवन करणाऱ्या कीटकांचे जैवविविध्य जपणे आवश्यक असल्याचे सांगणारा निष्कर्ष सायन्स या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित झाला आहे.


विविध पिकामध्ये परागीभवन करण्यासाठी मधमाशीपालनाला प्रोत्साहन दिले जाते. अर्थात मधमाशाइतकेच अन्य जंगली मधमाशा आणि कीटकही उत्पादनवाढीमध्ये उपयुक्त ठरतात. या जंगली कीटकांमुळे फुलांचे फळांत रुपांतर होण्याचा दर मोजण्यासाठी जगभरातील  600 प्रक्षेत्रावर अभ्यास करण्यात आला आहे. संशोधकांच्या गटामध्ये 20 देशामधील 50 संशोधकांचा समावेश होता. या प्रयोगामध्ये जगभरातील फळे, भाज्या आणि कॉफीसह 41 प्रकारच्या पीक पद्धतीचे विश्लेषण केले आहे. कॅलगरी विद्यापीठातील संशोधक लॉरेन्स हार्डर यांनी पिकांच्या परागीभवनातील जंगली कीटकांच्या कार्याचे विश्लेषण केले आहे. त्या बद्दल माहिती देताना हार्डर यांनी सांगितले, की योग्य प्रमाणात परागीभवन न झाल्याने टोमॅटो, कॉफी आणि टरबूजाच्या उत्पादनात लक्षणीय घट होत असून केवळ एकाच प्रकारच्या मधमाश्या उत्पादनवाढीसाठी उपयुक्त ठरणार नाहीत. मात्र त्यासाठी जंगली कीटक अधिक फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे.

विविध पिकांच्या फुलांवर बसणाऱ्या कीटकामुळे परागांचे सिंचन एका फुलावरून दुसऱ्या फुलावर होत असते. त्यामध्ये मधमाशा, माश्या, फुलपाखरे, पतंग आणि भुंगेरे यांच्या समावेश असतो. हे कीटक जंगल, कुरणे आणि गवताळ प्रदेशासारख्या नैसर्गिक आणि अर्धनैसर्गिक अधिवासामध्ये राहतात. हे अधिवास नाहीसे होत असल्याने या कीटकांच्या संख्येमध्ये, जैवविविधतेमध्ये घट होत आहे.  फुलांचे फळामध्ये रुपातंर होण्याच्या प्रमाणाचा अभ्यास केल्यानंतर ज्या बागामध्ये जंगली कीटकांचे प्रमाण कमी होते, तिथे फळांचे उत्पादन कमी असल्याचे दिसून आले आहे. एकूणच जंगली कीटकांचे प्रमाण कमी झाल्याने पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो.

जंगली कीटक कमी होण्याची कारणे
- अधिवास कमी होत आहे.
- सर्व जमीन लागवडीखाली आणली जाते.
- कीडनाशकांचा अतिरीक्त वापर

काय करावे लागेल
- मधमाशा आणि जंगली कीटकांच्या वाढीसाठी एकात्मिक पद्धतीचा वापर वाढविण्याची आवश्यकता आहे.
- प्रत्येक पिक क्षेत्रामध्ये योग्य प्रमाणात झाडी, झाडोरा, गवताळ प्रदेश अशा नैसर्गिक किंवा अर्धनैसर्गिक क्षेत्र ठेवण्याची आवश्यकता.
- फुलोरा असलेल्या वनस्पतीची वाढ केल्याने या कीटकांच्या रहिवास आणि खाद्य स्रोतामध्ये वाढ होईल.

Journal Reference:

Lucas A. Garibaldi, Ingolf Steffan-Dewenter, Rachael Winfree, Marcelo A. Aizen, Riccardo Bommarco, Saul A. Cunningham, Claire Kremen, Luísa G. Carvalheiro, Lawrence D. Harder, Ohad Afik, Ignasi Bartomeus, Faye Benjamin, Virginie Boreux, Daniel Cariveau, Natacha P. Chacoff, Jan H. Dudenhöffer, Breno M. Freitas, Jaboury Ghazoul, Sarah Greenleaf, Juliana Hipólito, Andrea Holzschuh, Brad Howlett, Rufus Isaacs, Steven K. Javorek, Christina M. Kennedy, Kristin Krewenka, Smitha Krishnan, Yael Mandelik, Margaret M. Mayfield, Iris Motzke, Theodore Munyuli, Brian A. Nault, Mark Otieno, Jessica Petersen, Gideon Pisanty, Simon G. Potts, Romina Rader, Taylor H. Ricketts, Maj Rundlöf, Colleen L. Seymour, Christof Schüepp, Hajnalka Szentgyörgyi, Hisatomo Taki, Teja Tscharntke, Carlos H. Vergara, Blandina F. Viana, Thomas C. Wanger, Catrin Westphal, Neal Williams, and Alexandra M. Klein. Wild Pollinators Enhance Fruit Set of Crops Regardless of Honey Bee Abundance. Science, 2013; DOI: 10.1126/science.1230200

कृत्रिम पानांच्या निर्मितीचा नकाशा तयार


कृत्रिम पानांच्या निर्मितीचा नकाशा तयार

स्वस्त वीजनिर्मितीसाठी ठरेल उपयुक्त

झाडाच्या पानासारखीच कृत्रिम पाने तयार करण्याच्या दिशेने संशोधन सुरू आहे. अमेरिकेतील एमआयटी संस्थेतील  संशोधकांनी प्रकाश संश्लेषणासाठी कृत्रिम संरचनेतील घटकांच्या कार्यक्षमतेचे विश्लेषण केले असून अधिक कार्यक्षम प्रारुप विकसनासाठी नकाशा तयार केला आहे.  या विश्लेषणामुळे संशोधन प्रकल्पातील कार्यक्षमतेच्या सुधारणेला वाव मिळणार आहे. पर्यायाने स्वस्त, व्यहवार्य आणि व्यावसायिक दृष्ट्या उपयुक्त असे प्रारुप विकसित करणे शक्य होणार आहे. हे संशोधन प्रोसिडिंग्स ऑफ दी नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

कमीत कमी खर्चामध्ये वीज निर्मितीचे आव्हान मोठे आहे. अनेक विकसनशील देशामध्ये दुर्गम भागापर्यंत वीज पोचविण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. त्यावर मात करण्यासाठी सूर्यप्रकाशाचे ग्रहन करून साठविता येईल अशा प्रकारचे (हायड्रोजनसारखे ) इंधन तयार करण्यासाठी प्रारुप बनविण्यात आले आहे. विद्यूत ऊर्जेऐवजी तात्काळ त्याचा वापर करता येईल. या प्रक्रियेमुळे आकाशात सुर्य नसताना सौर ऊर्जेचा वापर करता येईल. अमेरिकेतील एमआयटी संस्थेतील संशोधन टोनिओ बुनॅस्सिसी,  डॅनियल नोसेरा (हे आता हार्वर्ड विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत. ), मार्क विन्कलर, कॅसेन्ड्रा कॉक्स यांनी प्रक्रियेतील घटकांचे विश्लेषण केले आहे.

असे आहे हे मुळ उपकरण

2011 मध्ये लहानशा उपकरणाद्वारे सूर्यप्रकाशाचा वापर करून हायड्रोजन आणि ऑक्सीजनचे बुडबुडे मिळवण्यात आले होते. त्या संशोधनाचा पाठपुरावा करण्यात आला आहे.  या उपकरणामध्ये सुर्यप्रकाशाचे रुपांतर विद्यूत ऊर्जेमध्ये करण्यासाठी प्रमाणित सिलीकॉन सोलर सेल आणि रासायनिक उत्प्रेरक वापरण्यात आले होते. या दोन्ही तंत्राच्या उपयोगातून बाजूच्या पाण्यामधून हायड्रोजन आणि ऑक्सीजन अणू मिळवण्यात येतात.  या प्रयोगाचे व्यवस्थिक विश्लेषण करत व्यहवार्य उपयोजन तयार करण्यासाठी प्रयत्न या संशोधनामध्ये केला असल्याचे संशोधिका कॉक्स यांनी सांगितले.

------------------------------------------
असे झाले प्रक्रियेतील टप्प्यांचे विश्लेषण

मुळ कार्यक्षमता ः
1.प्रायोगिक मुळ कृत्रिम पानांवर पडणाऱ्या एकूण सुर्य प्रकाशाचे रुपांतर इंधनात करण्याची कार्यक्षमता 4.7 टक्के इतकी कमी होती.
2. व्होल्टेज निर्मिती -0.7 व्होल्टस
3. काही वेळेला पाणी स्वतः इलेक्ट्रॉनच्या वहनामध्ये प्रतिरोध तयार करते.
4. पारंपरिक सिलीकॉन सेलची मर्यादा 16 टक्के आहे.

विश्लेषणातील पर्यायाप्रमाणे -
1.क्रिस्टलाईन सिलीकॉन चा वापर केल्यास ती 16 टक्क्यांपर्यत जाऊ शकते.
2. 1.2 व्होल्टस इतक्या तीव्रतेच्या वीजेची आवश्यकता असते. त्यासाठी एक द्रावणामध्ये अनेक सोलर सेलच्या जोड्या वापरण्याचा पर्याय वापरता येईल.
3. पाण्याचा प्रतिरोध कमी करणे हे आव्हानात्मक आहे. त्यामुळे दोन प्लेटमधील अंतर कमी करून कार्यक्षमतेत वाढ करणे शक्य आहे.
4. गॅलिएम आर्सेनाईड सेल चा वापर केल्यास ही मर्यादा 18 टक्क्यांपर्यत वाढवता येईल.

Journal Reference:

Mark T. Winkler, Casandra R. Cox, Daniel G. Nocera and Tonio Buonassisi. Modeling integrated photovoltaic–electrochemical devices using steady-state equivalent circuits. PNAS, 2013 DOI: 10.1073/pnas.1301532110
-

पालेभाजी काढणीसाठी सुलभ यंत्र विकसित


पालेभाजी काढणीसाठी सुलभ यंत्र विकसित










पालेभाजीच्या काढणीसाठी कुशल कागमारांची आवश्यकता असते. परदेशामध्ये सॅलड व स्पिनॅच या भाजीखालील क्षेत्र मोठे असल्यामुळे काढणीच्या कामाकरीता मनुष्यबळांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते. यावर मात करण्यासाठी भाजी खुडण्याचे यंत्र इटलीतील हारटेक या कंपनीने विकसित केले आहे. या यंत्रामध्ये भाजी योग्य रितीने खुडणे शक्य होते. त्याचबरोबर कोवळी पानेही काढण्यामध्ये अडचण येत नाही. तसेच या यंत्रासोबत विविध प्रकारची यंत्रे जोडणे शक्य असून एकाच वेळी अनेक कामे शेतातच करणे शक्य होते. या यंत्राचा वापर टनेलमधील भाजी काढण्यासाठीही करता येतो.स्पिनॅच बीट पाने, रॉकेट, लाल आणि हिरवी लेट्यूस आणि पार्सले अशा विविध प्रकारच्या पालेभाज्यांची काढणी करता येते.

------------------------
फोटो ः स्वयंचलित काढणी यंत्राने स्पिनॅच या भाजीची काढणी केली जात असताना.
फोटो ः या यंत्रासोबत अन्य यंत्राची जोडणी करणे शक्य आहे. काढणी केल्यानंतर त्वरीत त्याचे बॉक्सही भरता येतात.

सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी मिळू शकेल नैसर्गिक पर्याय



सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी मिळू शकेल नैसर्गिक पर्याय

बटाट्यातून स्त्रवणारी रसायने ठरतील उपयुक्त


बटाटा रोपांच्या मुळातून काही रसायने स्त्रवतात. ही रसायने ग्लोबोडेरा पॅल्लिडा (Globodera pallida) या सुत्रकृमीच्या अंड्याच्या उबवणीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आले आहे. याच रसायनांचा वापर सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी करण्यासंदर्भात अमेरिकी कृषी संशोधन संस्थेमध्ये संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनातील निष्कर्षांचा वापर करून सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी प्रणाली विकसित करण्यात येत आहे. हे संशोधन ऍग्रीकल्चरल रिसर्च मॅगेझीन मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

अमेरिकेतील इदाहो राज्यामध्ये बटाटा पिकामध्ये ग्लोबोडेरा पॅल्लिडा (Globodera pallida) या सूत्रकृमींचा प्रादुर्भाव वाढत आहे. हे सुत्रकृमी बटाट्याच्या मुळामध्ये शिरून आपले खाद्य मिळवितात. तसेच अन्नद्रव्याच्या वहनामध्ये अडथळे निर्माण करतात. पर्यायाने पिकांची वाढ खुंटते. पाने पिवळी पडतात. यामुळे पर्यायाने रोप मरते. अधिक प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास उत्पादनामध्ये 80 टक्क्यांपर्यत घट होते. या कीडीच्या नियंत्रणासाठी अमेरिकी कृषी विभागाने नैसर्गिक पर्याय शोधला आहे.
जी. पॅल्लिडा या सुत्रकृमीच्या अंडी उबवण्यासाठी बटाट्याच्या मुळातून स्त्रवणाऱ्या रसायनाचा वापर केला जातो. त्याच नैसर्गिक रसायनाचा वापर सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी करण्यासंदर्भात संशोधन केले आहे. सूत्रकृमीच्या अंडी उबविण्यासाठी कारणीभूत ठरणारे रसायन बटाटा आणि सोलान्सिस वर्गातील पिकांच्या मुळातून स्त्रवत असते. ते मिसळलेल्या भोवतालच्या मातीमध्ये सुत्रकृमीची अंडी उबतात. अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लांचे पोषण होण्याच्या दृष्टीने ही नैसर्गिक प्रणाली कार्यरत असते. याचा प्रणालीचा वापर संशोधक नावारे सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी करणार आहेत.

सूत्रकृमीविषयी अधिक माहिती

- Globodera pallida ही मुलतः युरोपमधील प्रजाती असून अमेरिकेमध्ये पहिल्यांदा 2006मध्ये इदाहो राज्यामध्ये आढळली होती.
- त्यानंतर त्यांच्या प्रादुर्भावामध्ये वाढ झाली असून इदाहोच्या बिंगहॅम आणि बोन्नेव्हिले या प्रांतामध्ये 1916 एकर क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला आहे.
- Globodera pallida चा प्रादुर्भाव सध्या काही प्रांतापुरताच मर्यादित असला तरी भविष्यामध्ये त्यात वाढ होत जाण्याची शक्यता आहे.

सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी दोन दृष्टीकोन

- सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी फ्युमीगेशन (निर्जंतुकिकरण) हा एक उपाय असला तरी सुत्रकृमी व अंड्यामध्ये प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते.
- संशोधक नावारे हे अमेरिकी कृषी संशोधन संस्थेच्या वॉस येथील भाजीपाला आणि चारा पिके संशोधन प्रयोगशाळेमध्ये कार्य करतात.  नावारे यांनी अंड्याच्या उबवणीसंदर्भात दोन दृष्टीकोन सांगितले. त्यानुसार यजमान नसताना अंडी उबल्याने त्यांची संख्या कमी होणार आहे. तसेच मातीतील अंडी उबवणीसाठी कारणीभूत ठरणारी रसायने किंवा घटकांचा प्रभाव कमी करण्यासाठी अन्य उपाय शोधण्यात येतील. त्यामुळे मातीचे निर्जंतुकिकरण करणे शक्य होईल.
- काही प्रमाणात अंडी उबवणारी रसायने निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची सापळा पीक म्हणून लागवड करता येईल. ही पिके अंडी उबवणारे रसायने स्त्रवत अशली तरी सुत्रकृमीच्या पुनरुत्पादनाला मदत करणार नाहीत, हे पाहिले जाईल.

...असे होईल नियंत्रण

बटाट्याच्या मुळातून बाहेर पडणारी रसायने मिळवून त्याचा वापर बटाटा पिक नसलेल्या शेतामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे सूत्रकृमीच्या अंड्यांची फसगत होणार असून पोषणासाठी आवश्यक बटाटा उपलब्ध नसताना अंड्याची उबवण होणार आहे. बाहेर आलेल्या पिल्लाच्या वाढीसाठी बटाटा नसल्याने ते नष्ट होतील.
या प्रणालीचा वापर योग्य त्या ठिकाणी विशेषतः प्रयोगशाळेत सूत्रकृमींची अंडी उबवण्यासाठी करणे शक्य आहे.  

फळझाडावरील फुलोरा विरळणीसाठी यंत्र सॅफफ्लावर


फळझाडावरील फुलोरा विरळणीसाठी यंत्र सॅफफ्लावर

योग्य आकार आणि रंगासह दर्जेदार उत्पादनासाठी प्रत्येक फांदीवरील फळांची संख्या मर्यादीत ठेवण्याची आवश्यकता असते. त्यासाठी फळझाडामध्ये विरळणी केली जाते. स्पेनसह युरोपमध्ये चपट्या पिचेस आणि नेक्टरीन यासारख्या फळांच्या उत्पादनवाढीसाठी अधिक प्रमाणात आलेल्या फुलांची विरळणी करावी लागते. ही प्रक्रिया माणसांच्या साह्याने केली जाते. गेल्या काही वर्षापासून यांत्रिक पद्धतीने विरळणी करणारी काही यंत्रे विकसित झाली आहेत. त्यात अगदी सोप्या तंत्रज्ञानावर कार्यरत राहणारे सॅफफ्लावर हे यंत्र शेतकऱ्यामध्ये लोकप्रिय होत आहे. हे यंत्र स्पेन येथील कंपनीने विकसित केले आहे. या यंत्रामुळे वेळेमध्ये सुमारे 35 टक्के बचत होते.
या यंत्राच्या चाचण्या स्पेन येथील लैइडा कृषी अन्न संशोधन आणि तंत्रज्ञान संस्थेमध्ये करण्यात आल्या आहेत.

यंत्राची वैशिष्ट्ये ः

- या यंत्रामध्ये एका आसाभोवती फिरणाऱ्या शाफ्टवरील धाग्यांच्या साह्याने झाडावरील फुलोरा कमी केला जातो.
- या अवजाराचे वजन केवळ 450 ग्रॅम असून लांबी 37 सेंटीमीटर आहे.
- हे यंत्र सलग नऊ तास चालू शकते.
- काही फळझाडाच्या विरळणीसाठी मजूरीच्या खर्चामध्ये बचत होते. एका माणूस पूर्वी 30 झाडांपर्यंत विरळणी करत असे, त्यात या यंत्रामुळे वाढ झाली असून 110 ते 120 झाडांची विरळणी करणे शक्य होते. या यंत्रामुळे वेळेमध्ये सुमारे 35 टक्के बचत होते.

सोमवार, १८ मार्च, २०१३

ठिपके (पिक्सल) देतील अंधाना आधार


ठिपके (पिक्सल) देतील अंधाना आधार


रेटिना प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तीसाठी व्हिडिओ कॅमेरा आणि पिक्सल तंत्रज्ञानाने अधिक  स्पष्ट दृष्टी मिळवणे शक्य आहे. 


डोळ्यासमोर उमटलेल्या प्रतिमांचे ठिपक्यांमध्ये (पिक्सलमध्ये) रूपांतर करून ते डोक्याला जोडलेल्या पडद्यावर  परावर्तित करण्याचा प्रयत्न दक्षिण कॅलिफोर्नियातील संशोधकांनी यशस्वीरित्या केला आहे. त्याचा उपयोग दृष्टीहिन असलेल्या व्यक्तींच्या दररोजच्या हालचालीसाठी विशेषतः दिशा, रस्त्यांचे नियोजन , वस्तूंचा शोध यासाठी होणार आहे.  या तंत्रज्ञानाविषयी अधिक माहिती आयओपीच्या जर्नल ऑफ न्युरल इंजिनिअरिंग मध्ये प्रकाशित झाली आहे.

आजच्या डिजीटल युगामध्ये प्रत्येक डिजीटल उपकरण हे पिक्सेल (म्हणजे सर्वात लहान ठिपके, बिंदू) या स्वरुपामध्ये मोजले जाते. बिदूंच्या साह्याने अक्षरे आणि चित्रे संगणकावर किंवा डीजीटल उपकरणामध्ये तयार केली जातात. विशेषतः व्हिडीओ कॅमेरा, छायाचित्रासाठीचे डिजीटल कॅमेरे या पद्धतीने कार्यरत असतात. या उपकरणात वापरलेल्या तंत्रज्ञानाचा गणिती पद्धतीने मेळ घातल्याने ही उपकरणे अंध व्यक्तीसाठी डोळ्यांचे कार्य करू शकत असल्याचे दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांना दिसून आले आहे. विशेषतः ज्या व्यक्तींच्या डोळ्यातील रेटीना बसविण्याची शस्त्रक्रिया झालेली आहे, त्यांच्या दृष्टीमध्ये सुधारणा करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.

याबाबत माहिती देताना संशोधक जेम्स वेईलॅंड म्हणाले, की दृष्टीहिनामध्ये शस्त्रक्रियेद्वारे डोळ्यातील रेटीना बसविलेल्या व्यक्ती हालचाली, मोठ्या वस्तू पाहू शकतात. सध्या रेटीनाची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींची दृष्टी कमी असते. त्यात सुधारणा होणार असून चालताना दिशा कळण्यासोबतच मोठी अक्षरे वाचणे त्यांना शक्य होणार आहे.
नव्या पिक्सल तंत्रज्ञानाचा वापर केल्याने त्यात सुधारणा करणे शक्य होऊ शकते.

...असे आहे संशोधन

व्हिडीओ कॅमेरात पकडलेल्या प्रतिमांचे असे होते ठिपक्यात रूपांतर
चाचणीसाठी आरोग्य चांगले असलेल्या 19 लोकांना पिक्सलरेटेड प्रतिमा समजून घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी डोक्यावर लावता येतील अशा पडद्यांचा (हेड माऊंटेड डिस्प्ले) वापर केला.
- त्यांच्यावर अडथळ्यांच्या रस्त्याने चालणे, टेबलवरून काही वस्तू शोधणे, अंधाऱ्या वेळेस एखादी ठराविक गोष्ट शोधणे, असे तीन प्रयोग केले.
- एचएमडीवर व्हिडीयो कॅमेरा लाऊन प्रत्यक्ष माहिती गोळा केली. या प्रत्यक्ष प्रतिमांचे गणिती प्रमेयात रूपांतर करून पिक्सलमध्ये परावर्तित केल्या. त्यानंतर समोरील प्रत्येक घटक डोक्यावर लावलेल्या पडद्यावर उमटू लागला.
चुकांचे प्रमाण अत्यंत कमी होत असल्याने वरील आलेखातून दिसून येते.
नव्या वातावरणामध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळते. 
- प्रतिमाच्या तीव्रता, संपृक्तता आणि अन्य माहितीद्वारे पाच मुख्य घटक आणि प्रत्यक्ष जागा ओळखता येतात. मदत म्हणून लुकलुकते ठिपक्याने अतिरिक्त दिशा किंवा अधिक गरजेची माहिती दाखवण्यात आली.
-हे तिन्ही प्रयोग मदतीशिवाय तसेच मदतीने पार पाडण्यात आले. मदतीमुळे चुका होण्याचे प्रमाण कमी झाले.
- पिक्सलरेटेड नजरेमुळे रूग्णांना अधिक आत्मविश्वास मिळण्यास मदत झाली. विशेषतः नव्या वातावरणामध्येही आत्मविश्वास मिळाल्याने चुकांचे प्रमाण कमी झाले.

यासोबत आवाजातून मिळतील सुचना

-या उपकरणासोबत ध्वनीचा समावेश करता आल्यास अधिक फायद्याचे राहणार आहे. सध्या लाल रंगाची बाटली डाव्या बाजूला आहे, अशी सुचना मिळू शकते.
- वेईलॅंड यांनी सांगितले, की वस्तूंची ओळख पटविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येत असून केवळ लाल रंगाची वस्तू डाव्या बाजूला आहे, अशी सुचना मिळण्याऐवजी पाण्याची लाल बाटली डाव्या बाजूला आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

जर्नल संदर्भ ः

N Parikh, L Itti, M Humayun, and J Weiland. Performance of visually guided tasks using simulated prosthetic vision and saliency-based cues. Journal of Neural Engineering, 2013; 10 (2) DOI: 10.1088/1741-2560/10/2/026017 

रविवार, १७ मार्च, २०१३

मक्याच्या उत्पादनवाढीसाठी नत्र स्थिर करणाऱ्या झाडांचा वापर


मक्याच्या उत्पादनवाढीसाठी नत्र स्थिर करणाऱ्या झाडांचा वापर

जागतिक कृषी वनशास्त्र संस्थेने आफ्रिकेत केलेल्या दिर्घकालीन प्रयोगाचे निष्कर्ष
 शेंगावर्गीय ग्लिरीसिडीया सारख्या झाडांचा अंतर्भाव मक्यासारख्या एकदल पिकांच्या शेतामध्ये केल्यास मका पिकांची उत्पादकता वाढवणे शक्य होणार आहे. ही बाब जागतिक कृषी वनशास्त्र संस्थेने दक्षिण आफ्रिकेमध्ये सुमारे 12 वर्षे केलेल्या अभ्यासातून पुढे आली आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष अमेरिकेतील सॉईल सायन्स सोसायटीच्या ऍग्रोनॉमी या संशोधनपत्रिकेमध्य प्रकाशित करण्यात आले आहेत.

आफ्रिकेतील अर्ध्यापेक्षा अधिक क्षेत्रावर मका पिकाची लागवड असून आहारामध्येही मोलाचा वाटा आहे. मका पिकांची उत्पादकता वेगाने घटत आहे. आफ्रिकेमध्ये अल्पभूधारक कोरडवाहू मका उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक असून या पिकांच्या उत्पादनावरच त्यांची आर्थिक स्थिती अवलंबून असते. या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी गेदेता सिलेशि, लिगस्से कास्सा डेबूशो आणि फेस्टस अकिन्निफेसी या संशोधकांनी दक्षिण आफ्रिकेतील कोरडवाहू मका पिकामध्ये शेंगावर्गिय झाडांच्या लागवडीचा पिकांच्या स्थिरतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे.

...असे झाले संशोधन

- त्यांनी 1991 या वर्षापासूम मालावी आणि झांबिया येथे तीन समन्वयीत प्रयोग केले. मक्याच्या शेतामध्ये नत्र स्थिरीकरण करणाऱ्या झाडांचा अंतर्भाव केला. प्रति मक्यांच्या उत्पादनात होणाऱ्या वाढीचे निरीक्षण केले. मक्याच्या उत्पादनामध्ये दरवर्षी वाढ होत गेल्याचे दिसून आले.

- मालावी येथे शेंगावर्गीय झाडांचा अंतर्भाव केलेल्या शेतामध्ये आणि रासायनिक शेती क्षेत्रातील सरासरी मका उत्पादनामध्ये फारसा फरक दिसून आला नाही. काही क्षेत्रामध्ये नेहमी वापरत असलेल्या शिफारसीत खताची निम्मीच मात्रा दिली होती.

-प्रयोगामध्ये ग्लिरीसिडीया या झाडांची मक्यांच्या शेतामध्ये लागवड करण्यात आली. हे झाड हवेतून नत्र शोषून जमिनीमध्ये  स्थिर करते. त्यामुळे नत्रयुक्त खताचा वापर कमी करावा लागतो. तसेच या झाडाची पाने मातीमध्ये मिसळल्यास सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होतात. मातीची रचनात्मक गुणधर्म, स्थिरता, आणि पाणी साठवणक्षमता वाढते.

- रासायनिक खताच्या साह्याने फक्त मका पीक घेतलेल्या क्षेत्रामध्ये पहिला काही वर्षे उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे जिसून आले तरी उत्पादनामध्ये सातत्य ठेवण्यामध्ये अडचणी येत गेल्या. मातीतील उपलब्ध पोषक घटक मका पिकाने उचलल्यानंतर पुढील काही वर्षामध्येच उत्पादनामध्ये घट होताना दिसून आली होती.


कोट ः
 
आफ्रिकेतील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दिर्घकाळासाठी स्थिर आणि चांगले उत्पादन मिळण्याची आवश्यकता आहे. केवळ रासायनिक खताच्या साह्याने हे साध्य होणे शक्य नाही. या शेतकऱ्यांसाठी कृषी पद्धतीमध्ये नत्र स्थिरीकरण करणाऱ्या झाडांचा वापर हिच स्थिर, शाश्वत प्रणाली ठरू शकते.
                         -          फेस्टस अकिन्निफेसी,                                                
                                      समन्वयक, जागतिक कृषीवनशास्त्र संस्था,
                                      दक्षिण आफ्रिका प्रादेशिक प्रकल्प.
--------------------------------


दिर्घकालीन फायद्यासाठी आफ्रिकेत संशोधनाची गरज

- पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करताना वनशास्त्रातील पद्धतीचा वापर दिर्घकालावधीसाठी फायद्याचा ठरत असल्याचे दिसून आले आहे. प्रथमच दिर्घकालावधीसाठी विश्लेषण करण्यात आले आहे. प्रति वर्ष पर्यावरणीय बदलामुळे पावसाच्या प्रमाणामध्ये, कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात बल होत आहेत. त्याचा सरळ परिणाम कोरडवाहू पिकांवर होत आहे. जागतिक तापमान बदलामुळे मका पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. एक अंश सेल्सियसने तापमान वाढल्यास अवर्षणामुळे 75 टक्केपेक्षा अधिक मका क्षेत्रावरील उत्पादनामध्ये 20 टक्के घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

- अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतीमधील मका लागवड ही धोक्यामध्ये असून उत्पादन स्थिर राहिले असून काही ठीकाणी ते घटत आहे.

- वाढत्या लोकसंख्येमुळे काही राज्यामध्ये सरासरी जमीन धारणा ही अर्ध्या हेक्टरपेक्षाही कमी होत आहे.

- सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा न करता सातत्याने पिके घेत राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. काही ठिकाणी मातीची आम्लता वाढली आहे.


अभ्यासाची मालिका...निष्कर्षातील साम्य

-अमेरिकेत,युरोपामध्ये 20 वर्षापासून 120 वर्षापर्यंतच्या निरीक्षणामध्ये विविध पिक पद्धतीचा मातीची पोषकता आणि घटकांवर होणारा परिणाम तपासण्यात आला आहे. 

-नायजेरियामध्ये झालेल्या अभ्यासात केवळ रासायनिक खतावर घेतलेल्या मका पिकाचे उत्पादन 16 वर्षामध्ये प्रचंड घटले.

- पाकिस्तानमध्ये 14 वर्षे भात पिकावर केलेल्या प्रयोगातही असेच निष्कर्ष मिळाले आहेत. योग्य प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाशयपक्त खतांचा वापर करूनही उत्पादन घटल्याचे दिसून आले आहे.

जर्नल संदर्भ ः
Gudeta W. Sileshi, Legesse Kassa Debusho, Festus K. Akinnifesi. Can Integration of Legume Trees Increase Yield Stability in Rainfed Maize Cropping Systems in Southern Africa? Agronomy Journal, 2012; 104 (5): 1392 DOI: 10.2134/agronj2012.0063

शनिवार, १६ मार्च, २०१३



किकाडा कीटक करतात पंखाच्या साह्याने जिवाणूंचा नाश







मधमाशांनाही आवडते कॉफी


मधमाशा घेतात कॉफीचा अधिक स्वाद

आपली सकाळ सुरू होते ती चहा किंवा कॉफीच्या एका कपाने. चहा किंवा कॉफीतील उत्तेजकता आपल्याला ताजेपणा देते. मधमाशाही त्यांच्या दिवसाची सुरूवातही कॅफेन असणाऱ्या फुलांच्या रसाच्या शोषणाने करत असल्याचे इंग्लंडमधील न्यू कॅसल विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. कॅफेनचा रस शोषणाऱ्या मधमाशांच्या स्मृती आणि स्मरणक्षमतेत वाढ होत असून कॅफेन असणाऱ्या झाडाच्या परागीकरणामध्ये ते मोलाची भुमिका निभावतात.

चाचणीमध्ये मधमाशा या कॅफेनयुक्त शर्करा असलेल्या लिंबूवर्गीय फूले आणि कॉफीच्या फूलांवर येत असल्याचे दिसून आले आहे. ज्या मधमाशा या फुलांना भेट देतात, त्यांच्या स्मरणक्षमतेत साध्या शर्करेवर गुजराण करणाऱ्या मधमाशांपेक्षा वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. न्यु कॅसल विद्यापीठातील संशोधक डॉ. गेराल्डीन राईट यांनी मधमाशा व वनस्पती या दोहोतील कॅफेनच्या परिणामाविषयी अभ्यास केला आहे. फुलांच्या विविध प्रजातींच्या ओळख पटविणे, लक्षात ठेवणे यातूनच मधमाशा कमीत कमी श्रमामध्ये अधिक मध गोळा करू शकतात. या प्रक्रियेमध्ये कॅफेन त्यांना मदत करत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.

कमी प्रमाणातील कॅफेन करते मधमाशांना आकर्षित

  1. - मधमाशा एका कॅफेन असलेल्या फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे जात असल्याने या फुलांमध्ये परागीकरण वेगाने होते. त्याचा त्या झाडांनाही फायदा होतो. तसेच ज्या मधमाशा कॅफेन असलेल्या फुलांवरून मध गोळा करतात, त्याच्या परागीकरण करण्याच्या क्षमतेही वाढ होते. 
  2. - अभ्यासामध्ये लिंबूवर्गीय फुले आणि कॉफीच्या प्रजातीमध्ये कमी प्रमाणात कॅफेन असते. त्यांचा वापर फ्रिज ड्राईड कॉफी तयार करण्यासाठी आणि आराबिका चा वापर एक्स्प्रेसो आणि फिल्टर कॉफी तयार करण्यासाठी केला जातो. द्राक्ष, लिंबू, पोमेलो आणि मोसंबी यांच्या नमुन्यामध्येही कॅफेन कमी प्रमाणात उपलब्ध असते. 
  3. - ग्रीनविच विद्यापीठातील रॉयल बॉटॅनिक गार्डनमधील प्रोफेसर फिल स्टिव्हन्सन यांनी सांगितले की, कॅफेन हे वनस्पतीतील संरक्षक रसायन आहे. या रसायनाची चव वेगळी आहे. त्यामुळे फुलांच्या परागकणामध्ये याचे अंश मिळाल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटले होते. त्यांचे प्रमाण कमी असले तरी त्यांचा मधमाशांवर होणारा परिणाम मोठा आहे. त्याचे मधमाशांच्या वर्तणूकीवर अधिक परिणाम करतात. 


 स्मरणशक्तीत होते वाढ 


  • - या कॅफेनच्या मधमाशांच्या दिर्घकालीन स्मरणशक्तीमध्ये तिप्पटीने वाढ होत असल्याचे दिसून आले असून फुलांच्या वासांविषयी त्या 24 तासांनंतर लक्षात ठेवतात. तर दुपटीपेक्षा अधिक मधमाश्यामध्ये फुलांचा वास लक्षात ठेवण्याचे प्रमाण तीन दिवसापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. 
  • - मात्र अधिक कॅफेन असलेली फुले मधमाशांना त्यांच्या उग्र पणामुळे दूर ठेवतात. 
  • - कॅफेनचे माणसांच्या मेंदूवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी मुळ यंत्रणा समजण्यास या संशोधनाने वाव मिळणार आहे. 
  • - ऍरिझोना विद्यापीठातील डॉ. ज्युली मस्टार्ड यांनी सांगितले, की माणुस आणि मधमाश्यांच्या मेंदू रचनेमध्ये प्रचंड फरक अशला तरी पेशीय पातळीवर किंवा प्रथिनांच्या जनुकांच्या पातळीवर मधमाशा आणि मानवी मेंदूमध्ये मोठे साम्य आहे. त्यामुळे मधमाशांच्य मेंदूवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास वर्तणुकिशी जोडला गेल्यास त्याचे मोठे फायदे होणार आहेत. 


मधमाशांच्या सवयी ठरतील शेतीसाठी फायद्याच्या...

नैसर्गिक पर्यावरणातून मधमाशांची संख्या वेगाने कमी होत असून परागीकरणामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पिके आणि जंगली फुले यांच्या परागीभवनासाठी मधमाशा आवश्यक असून सर्व वनस्पतीच्या जैवविविधतेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मधमाशा घेतात कॉफीचा अधिक स्वाद

आपली सकाळ सुरू होते ती चहा किंवा कॉफीच्या एका कपाने. चहा किंवा कॉफीतील उत्तेजकता आपल्याला ताजेपणा देते. मधमाशाही त्यांच्या दिवसाची सुरूवातही कॅफेन असणाऱ्या फुलांच्या रसाच्या शोषणाने करत असल्याचे इंग्लंडमधील न्यू कॅसल विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. कॅफेनचा रस शोषणाऱ्या मधमाशांच्या स्मृती आणि स्मरणक्षमतेत वाढ होत असून कॅफेन असणाऱ्या झाडाच्या परागीकरणामध्ये ते मोलाची भुमिका निभावतात.

चाचणीमध्ये मधमाशा या कॅफेनयुक्त शर्करा असलेल्या लिंबूवर्गीय फूले आणि कॉफीच्या फूलांवर येत असल्याचे दिसून आले आहे. ज्या मधमाशा या फुलांना भेट देतात, त्यांच्या स्मरणक्षमतेत साध्या शर्करेवर गुजराण करणाऱ्या मधमाशांपेक्षा वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. न्यु कॅसल विद्यापीठातील संशोधक डॉ. गेराल्डीन राईट यांनी मधमाशा व वनस्पती या दोहोतील कॅफेनच्या परिणामाविषयी अभ्यास केला आहे. फुलांच्या विविध प्रजातींच्या ओळख पटविणे, लक्षात ठेवणे यातूनच मधमाशा कमीत कमी श्रमामध्ये अधिक मध गोळा करू शकतात. या प्रक्रियेमध्ये कॅफेन त्यांना मदत करत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.

कमी प्रमाणातील कॅफेन करते मधमाशांना आकर्षित


- मधमाशा एका कॅफेन असलेल्या फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे जात असल्याने या फुलांमध्ये परागीकरण वेगाने होते. त्याचा त्या झाडांनाही फायदा होतो. तसेच ज्या मधमाशा कॅफेन असलेल्या फुलांवरून मध गोळा करतात, त्याच्या परागीकरण करण्याच्या क्षमतेही वाढ होते.

- अभ्यासामध्ये लिंबूवर्गीय फुले आणि कॉफीच्या प्रजातीमध्ये कमी प्रमाणात कॅफेन असते. त्यांचा वापर फ्रिज ड्राईड कॉफी तयार करण्यासाठी आणि आराबिका चा वापर एक्स्प्रेसो आणि फिल्टर कॉफी तयार करण्यासाठी केला जातो. द्राक्ष, लिंबू, पोमेलो आणि मोसंबी यांच्या नमुन्यामध्येही कॅफेन कमी प्रमाणात उपलब्ध असते.

- ग्रीनविच विद्यापीठातील रॉयल बॉटॅनिक गार्डनमधील प्रोफेसर फिल स्टिव्हन्सन यांनी सांगितले की, कॅफेन हे वनस्पतीतील संरक्षक रसायन आहे. या रसायनाची चव वेगळी आहे. त्यामुळे फुलांच्या परागकणामध्ये याचे अंश मिळाल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटले होते. त्यांचे प्रमाण कमी असले तरी त्यांचा मधमाशांवर होणारा परिणाम मोठा आहे. त्याचे मधमाशांच्या वर्तणूकीवर अधिक परिणाम करतात.

 स्मरणशक्तीत होते वाढ

  1. - या कॅफेनच्या मधमाशांच्या दिर्घकालीन स्मरणशक्तीमध्ये तिप्पटीने वाढ होत असल्याचे दिसून आले असून फुलांच्या वासांविषयी त्या 24 तासांनंतर लक्षात ठेवतात. तर दुपटीपेक्षा अधिक मधमाश्यामध्ये फुलांचा वास लक्षात ठेवण्याचे प्रमाण तीन दिवसापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. 
  2. - मात्र अधिक कॅफेन असलेली फुले मधमाशांना त्यांच्या उग्र पणामुळे दूर ठेवतात. 
  3. - कॅफेनचे माणसांच्या मेंदूवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी मुळ यंत्रणा समजण्यास या संशोधनाने वाव मिळणार आहे. 
  4. - ऍरिझोना विद्यापीठातील डॉ. ज्युली मस्टार्ड यांनी सांगितले, की माणुस आणि मधमाश्यांच्या मेंदू रचनेमध्ये प्रचंड फरक अशला तरी पेशीय पातळीवर किंवा प्रथिनांच्या जनुकांच्या पातळीवर मधमाशा आणि मानवी मेंदूमध्ये मोठे साम्य आहे. त्यामुळे मधमाशांच्य मेंदूवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास वर्तणुकिशी जोडला गेल्यास त्याचे मोठे फायदे होणार आहेत. 


मधमाशांच्या सवयी ठरतील शेतीसाठी फायद्याच्या...

नैसर्गिक पर्यावरणातून मधमाशांची संख्या वेगाने कमी होत असून परागीकरणामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पिके आणि जंगली फुले यांच्या परागीभवनासाठी मधमाशा आवश्यक असून सर्व वनस्पतीच्या जैवविविधतेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

- मधमाशा कशा प्रकारे फुलांची निवड करतात, याचा मागोवा घेणे शक्य झाल्यास विविध प्रकारच्या जंगली वनस्पतींच्या प्रसारासाठी ते उपयुक्त ठरेल.

- मधमाशाच्या सवयी आणि आवडनिवड याविषयी माहिती उपलब्ध झाल्यास शेती आणि शेती उद्योगासाठी आवश्यक उत्पादन वाढ शक्य होईल.

--
जर्नल संदर्भ ः

G. A. Wright, D. D. Baker, M. J. Palmer, D. Stabler, J. A. Mustard, E. F. Power, A. M. Borland, P. C. Stevenson. Caffeine in Floral Nectar Enhances a Pollinator's Memory of Reward. Science, 2013; 339 (6124): 1202 DOI: 10.1126/science.1228806

------------------------------------


मधमाशांही कॅफेन असलेल्या फुलांची निवड करतात. त्याचा त्यांना स्मरणशक्ती वाढीसाठी फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.
- मधमाशा कशा प्रकारे फुलांची निवड करतात, याचा मागोवा घेणे शक्य झाल्यास विविध प्रकारच्या जंगली वनस्पतींच्या प्रसारासाठी ते उपयुक्त ठरेल.
- मधमाशाच्या सवयी आणि आवडनिवड याविषयी माहिती उपलब्ध झाल्यास शेती आणि शेती उद्योगासाठी आवश्यक उत्पादन वाढ शक्य होईल.
--
जर्नल संदर्भ ः

G. A. Wright, D. D. Baker, M. J. Palmer, D. Stabler, J. A. Mustard, E. F. Power, A. M. Borland, P. C. Stevenson. Caffeine in Floral Nectar Enhances a Pollinator's Memory of Reward. Science, 2013; 339 (6124): 1202 DOI: 10.1126/science.1228806

------------------------------------
फोटोओळी ः
मधमाशांही कॅफेन असलेल्या फुलांची निवड करतात. त्याचा त्यांना स्मरणशक्ती वाढीसाठी फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.