बुधवार, २० मार्च, २०१३

उत्पादनवाढीसाठी मधमाशांइतकेच जंगली कीटकही महत्त्वाचे


उत्पादनवाढीसाठी मधमाशांइतकेच जंगली कीटकही महत्त्वाचे

 शेतीतील उत्पादनासाठी परागीभवनाचे महत्त्व मोठे आहे. योग्य उत्पादनवाढीसाठी परागीभवन करणारे जंगली मधमाश्या व अन्य कीटक हे महत्त्वाचे असून जंगली कीटकांचे प्रमाण कमी होत असल्याने परागीभवनावर विपरित परिणाम होत असल्याचे  आंतरराष्ट्रीय संशोधक गटाने केलेल्या अभ्यासातून पुढे आले आहे. कीटकांच्या जैवविविधतेचे महत्त्व या अभ्यासातून अधोरेखित झाले आहे. काही ठराविक जातीच्या मधमाशा पाळून शेतीची उत्पादकता वाढणार नसून परागीभवन करणाऱ्या कीटकांचे जैवविविध्य जपणे आवश्यक असल्याचे सांगणारा निष्कर्ष सायन्स या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित झाला आहे.


विविध पिकामध्ये परागीभवन करण्यासाठी मधमाशीपालनाला प्रोत्साहन दिले जाते. अर्थात मधमाशाइतकेच अन्य जंगली मधमाशा आणि कीटकही उत्पादनवाढीमध्ये उपयुक्त ठरतात. या जंगली कीटकांमुळे फुलांचे फळांत रुपांतर होण्याचा दर मोजण्यासाठी जगभरातील  600 प्रक्षेत्रावर अभ्यास करण्यात आला आहे. संशोधकांच्या गटामध्ये 20 देशामधील 50 संशोधकांचा समावेश होता. या प्रयोगामध्ये जगभरातील फळे, भाज्या आणि कॉफीसह 41 प्रकारच्या पीक पद्धतीचे विश्लेषण केले आहे. कॅलगरी विद्यापीठातील संशोधक लॉरेन्स हार्डर यांनी पिकांच्या परागीभवनातील जंगली कीटकांच्या कार्याचे विश्लेषण केले आहे. त्या बद्दल माहिती देताना हार्डर यांनी सांगितले, की योग्य प्रमाणात परागीभवन न झाल्याने टोमॅटो, कॉफी आणि टरबूजाच्या उत्पादनात लक्षणीय घट होत असून केवळ एकाच प्रकारच्या मधमाश्या उत्पादनवाढीसाठी उपयुक्त ठरणार नाहीत. मात्र त्यासाठी जंगली कीटक अधिक फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे.

विविध पिकांच्या फुलांवर बसणाऱ्या कीटकामुळे परागांचे सिंचन एका फुलावरून दुसऱ्या फुलावर होत असते. त्यामध्ये मधमाशा, माश्या, फुलपाखरे, पतंग आणि भुंगेरे यांच्या समावेश असतो. हे कीटक जंगल, कुरणे आणि गवताळ प्रदेशासारख्या नैसर्गिक आणि अर्धनैसर्गिक अधिवासामध्ये राहतात. हे अधिवास नाहीसे होत असल्याने या कीटकांच्या संख्येमध्ये, जैवविविधतेमध्ये घट होत आहे.  फुलांचे फळामध्ये रुपातंर होण्याच्या प्रमाणाचा अभ्यास केल्यानंतर ज्या बागामध्ये जंगली कीटकांचे प्रमाण कमी होते, तिथे फळांचे उत्पादन कमी असल्याचे दिसून आले आहे. एकूणच जंगली कीटकांचे प्रमाण कमी झाल्याने पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो.

जंगली कीटक कमी होण्याची कारणे
- अधिवास कमी होत आहे.
- सर्व जमीन लागवडीखाली आणली जाते.
- कीडनाशकांचा अतिरीक्त वापर

काय करावे लागेल
- मधमाशा आणि जंगली कीटकांच्या वाढीसाठी एकात्मिक पद्धतीचा वापर वाढविण्याची आवश्यकता आहे.
- प्रत्येक पिक क्षेत्रामध्ये योग्य प्रमाणात झाडी, झाडोरा, गवताळ प्रदेश अशा नैसर्गिक किंवा अर्धनैसर्गिक क्षेत्र ठेवण्याची आवश्यकता.
- फुलोरा असलेल्या वनस्पतीची वाढ केल्याने या कीटकांच्या रहिवास आणि खाद्य स्रोतामध्ये वाढ होईल.

Journal Reference:

Lucas A. Garibaldi, Ingolf Steffan-Dewenter, Rachael Winfree, Marcelo A. Aizen, Riccardo Bommarco, Saul A. Cunningham, Claire Kremen, Luísa G. Carvalheiro, Lawrence D. Harder, Ohad Afik, Ignasi Bartomeus, Faye Benjamin, Virginie Boreux, Daniel Cariveau, Natacha P. Chacoff, Jan H. Dudenhöffer, Breno M. Freitas, Jaboury Ghazoul, Sarah Greenleaf, Juliana Hipólito, Andrea Holzschuh, Brad Howlett, Rufus Isaacs, Steven K. Javorek, Christina M. Kennedy, Kristin Krewenka, Smitha Krishnan, Yael Mandelik, Margaret M. Mayfield, Iris Motzke, Theodore Munyuli, Brian A. Nault, Mark Otieno, Jessica Petersen, Gideon Pisanty, Simon G. Potts, Romina Rader, Taylor H. Ricketts, Maj Rundlöf, Colleen L. Seymour, Christof Schüepp, Hajnalka Szentgyörgyi, Hisatomo Taki, Teja Tscharntke, Carlos H. Vergara, Blandina F. Viana, Thomas C. Wanger, Catrin Westphal, Neal Williams, and Alexandra M. Klein. Wild Pollinators Enhance Fruit Set of Crops Regardless of Honey Bee Abundance. Science, 2013; DOI: 10.1126/science.1230200

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा