गुरुवार, २८ मार्च, २०१३

टेक्सास लॉंगहॉर्न गायींमध्ये 15 टक्के भारतीय जनुकांचा समावेश



टेक्सास लॉंगहॉर्न गायींमध्ये 

15 टक्के भारतीय जनुकांचा समावेश


58 प्रजातींच्या जनुकिय मार्करच्या अभ्यासातून उलगडला इतिहास


टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी लांब शिंगाच्या गाईंच्या जनुकिय इतिहासाची मांडणी केली असून या गाईंमध्ये भारतीय वंशासह, मध्य पुर्वेतील प्राचीन वंशांच्या जनुकांचा सुमारे 15 टक्के इतका अंतर्भाव उत्क्रांतीच्या ओघात झाल्याचे दिसून आले आहे. या अभ्यासासाठी जगभरातील 58 गाई प्रजातींच्या 50 हजार जनुकिय मार्करचा विस्तृत अभ्यास व विश्लेषण करण्यात आले आहे.  अनेक प्राचीन गाईंच्या जनुकांच्या विविधता अंतर्भूत असल्याने टेक्सास लॉंगहॉर्न ही गाय अधिक संशोधनासाठी उपयुक्त ठरणार आहे. हे संशोधन प्रोसिडिंग्स ऑफ दि नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
अमेरिकेतील टेक्सास राज्यातील जंगलामध्ये लांब शिंगाच्या गाई (लॉंग हॉर्न कॅटल) आढळतात. या गायींचा जनुकिय अभ्यास टेक्सास विद्यापीठातील संशोधक डेव्हीड हिल्स यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधिका जेन मॅकटाविश यांनी केला आहे. त्यात माणसांच्या स्थलांतराच्या इतिहासाशी गायींच्या स्थलांतराचा इतिहास जोडलेला आढळला आहे. या गायींच्या जनुकिय मार्करमध्ये स्पेन, पुर्व मध्य आणि भारतातील प्राचीन गाईंच्या जातींचा संकर घडून आल्याचे अभ्यासात आढळले आहे. या गाईंच्या इतिहासाचे धागे क्रिस्तोफर कोलंबसच्या स्पेन येथील मुरीश, मध्य पुर्व आणि भारत येथील दुसऱ्या सफरीपर्यंतच्या प्रवासापर्यंत पोचले आहेत. या बाबत माहिती देताना संशोधिका एमिली जेन मॅकटाविश यांनी सांगितले, की बऱ्याच काळापासून नव्या काळातील गायी यांच्या शुद्ध युरोपीय वंशाच्या असल्याचे मानले जात होते, मात्र लांब शिंगाच्या गायींच्या जनुकिय अभ्यासात त्या अधिक गुंतागुंतीच्या, संकरीत आणि जागतिक प्राचीन वंशातील जनुकिय विविधतेचे पुरावे आढळून आले आहेत. या विविधतेमुळे टेक्सास लॉंगहॉर्न या गायी अधिक तीव्र वातावरणातही अधिक चांगल्या प्रकारे तग धरू शकतात.

... असा आहे इतिहास
- 1493 मध्ये कोलंबसने प्राचीन गाय हिस्पोनियोलाच्या बेटावर प्रथम आणली होती. त्यानंतर उर्वरीत मार्गावर प्रवास करत 1521 मध्ये स्पॅनिश वसाहतीमध्ये पोचल्या.
- पुढील दोन शतकामध्ये स्पॅनिशांनी या गायींना उत्तरेकडे हलवले. पुढे याच क्षेत्रामध्ये 17 व्या शतकांच्या अंतिम टप्प्यामध्ये टेक्सास तयार झाले.
- या भागामध्ये काही गायी सुटून गेल्या किंवा निसटल्या.. त्या तशाच पुढील दोन शतकांमध्ये जंगली राहिल्या.
- पुढे या गाईं स्पेनमधील स्थानिक मानल्या जाऊ लागल्या. या विषयी माहिती देताना संशोधक हिल्स यांनी सांगितले, की या गाईंची ठेवण ही स्पेन आणि पोर्तुगीजमधील अन्य गाईंपेक्षा वेगळी आहे. त्यात एक शक्यता अशीही आहे, की या गाईंचा संकर अन्य युरोपातून आयात केलेल्या गाईंशी करण्यात आल्याने त्यांच्यामध्ये बदल होत गेले असावेत. तरीही त्यांच्यामध्ये कोलंबसने आणलेल्या गाईंचे मूळ जनुकिय गुणधर्म तसेच पुढे आलेले आहेत.
- या मुर गाईं घेऊन कोलंबस दुसऱ्या सफरीच्या वेळी आफ्रिकेत, पुढे युरोपात स्थानिक गाईंसह गेला. या सर्व गाईंच्या गुणधर्मांचा संकर आयब्रीयन पेनिनसुला भागातील गाईंमध्ये दिसून येतो. उत्क्रांतीच्या ओघात प्रतिकारकतेचे गुणधर्म अधिक विसकित होत गेले. तसेच जंगली भागात राहताना वन्य श्वापदांपासून रक्षणासाठी लांब शिंगे वाढली. अतिशय उष्णता, तसेच अवर्षणामध्ये तग धरण्याची क्षमता त्यांच्यात विकसित होत गेली.

जनुकिय अभ्यासातील महत्त्वाचे...
- टेक्सास लॉंगहॉर्न या गायींचा जनुकिय इतिहासाची मांडणी करण्यासाठी मिसौरी - कोलंबिया विद्यापीठातील मॅकताविस, हिल्स आणि सहकाऱ्यांनी 58 गायींच्या प्रजातींच्या 50 हजार जनुकिय मार्करचे विश्लेषण केले आहे.
- या अभ्यासात आयब्रीयन पेनिनसुला येथील गाईंच्या जनुकिय मार्करवरून अधिक गुंतागुंतीचे गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे. अंदाजे 85 टक्के लॉंगहॉर्न गाईंची जनुकीय रचना ही तौरीन प्रजातीच्या गाईंसारखी असून मध्य पुर्वेतील 8 ते 10 हजार वर्षापूर्वी आढळणाऱ्या जंगली गाईंमधून आलेली आहे. त्यामुळे लॉंगहॉर्न गाय ही शुद्ध तौरीन प्रजातींच्या होलस्टिन, हेरफोर्ड गाईंसारखी दिसते. एकूण जनुकांच्या 15 टक्के भाग हा भारतीय प्राचीन गाईंच्या वंशातून आला आहे. या गाईंचे वैशिष्ट्य म्हणजे गाईंच्या पाठीवरील वशिंड. पुढे या गाईंचा प्रसार आफ्रिकेत आणि तेथून आयब्रेयीन पेनिनसुलापर्यंत झाला. 8 ते 13 व्या शतकांच्या कालावधीतील मुरीश वंशाचे गुण त्यात स्थिर असल्याचे दिसून येतात. युरोपापेक्षा भारतीय भागामध्ये अधिक उष्ण आणि कोरडे वातावरण असल्याने प्रतिकारकक्षमताही अधिक असते.
- या विस्तृत विश्लेषणासाठी कॅटलमनस् टेक्सा लॉंगहॉर्न कॉन्झर्व्हन्सी यांनी आर्थिक साह्य केले होते.

...असे होतील संशोधनाचे फायदे
- लॉंगहॉर्न गाईंचे दिसणे हे प्राचीन गाईंसारखेच आहे. जंगली भागामध्ये राहत असल्याने या गाई स्वयंपुर्ण राहिल्या आहेत.  या गाईंमध्ये जनुकिय विविधतेचे भांडार असल्याने त्याचा लाभ भविष्यातील संशोधनासाठी होऊ शकत असल्याचे मॅकताविश यांनी सांगितले.
-वाढत्या तापमानामध्ये उष्ण आणि कोरड्या वातावरणामध्ये तग धरतील अशा जातीमध्ये टेक्सास लॉंगहॉर्न गाईंचा नक्की समावेश करावा लागेल.  या गाईंची जनुकीय माहितींचा वापर अन्य गाईंमध्ये सहनशीलता विकसित करण्यासाठी होऊ शकतो.

कमी मेदामुळे वाचली प्रजाती
अमेरिकेच्या अंतर्गत यादवीच्या कालावधीनंतरच्या काळात जंगली प्राण्याच्या मांसाची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असे. त्यात या जंगली प्राण्यांची मोठ्या प्रमाणात हत्या झाली. टेक्सास लॉंगहॉर्न या गाईंमध्ये कमी प्रमाणात मेद असल्याने त्यांची शिकार कमी प्रमाणात झाली.  तसेच मेद मिळवण्यासाठी अधिक मेद असलेल्या प्रजातींची आयात केली जात असे. त्यातून अमेरिकेमध्ये मेदयुक्त मांसाची आवड निर्माण होत गेली. त्यामुळे मांसासाठी होत असलेली शिकारही कमी झाली. त्यामुळे ही प्रजाती लुप्त होण्यापासून वाचल्या.

जर्नल संदर्भ ः
Emily Jane McTavish, Jared E. Decker, Robert D. Schnabel, Jeremy F. Taylor, and David M. Hillis. New World cattle show ancestry from multiple independent domestication events. PNAS, March 25, 2013 DOI: 10.1073/pnas.1303367110


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा