शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

मृत झांडापासून जैवइंधन निर्मितीसाठी संशोधन होतेय सुरू

मृत झांडापासून जैवइंधन निर्मितीसाठी

 संशोधन होतेय सुरू


अमेरिकी कृषी विभागाच्या वतीने दिले 

10 दशलक्ष डॉलरचे आर्थिक साह्य


रॉकीज पर्वताच्या परिसरामध्ये किटकांच्या प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या झाडांचे प्रमाण मोठे आहे. या झांडापासून जैव ऊर्जा इंधन निर्मिती करण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी समग्र अभ्यासाची गरज आहे. त्यासाठी अमेरिकी कृषी विभागाने कोलोरॅडो राज्य विद्यापीठ आणि सहकारी, प्रशासकीय, औद्योगिक आणि शासकीय पातळीवरील संस्थांना संशोधन साह्य म्हणून 10 दशलक्ष डॉलरचे अनुदान जाहिर केले आहे.


रॉकिज पर्वताच्या परिसरातील सुमारे 42 दशलक्ष एकर अमेरिकी जंगलांवर पाइन आणि स्पुरस बार्क भुंगेरे यांचा प्रादुर्भाव झाला आहे. 1996 पासून झाडे मृत होण्याचे प्रमाण वाढले असून त्याचा प्रादुर्भाव पसरत जाण्याचा धोका आहे. या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशोधन आवश्यक आहे. त्यासोबत मृत झालेल्या झाडांपासून उपलब्ध बायोमासचा उपयोग स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी करण्याचा प्रयत्न या संशोधनातून केला जाणार आहे.

अमेरिकेतील कृषी सचिव चॉम विल्सॅक यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुंगेऱ्यामुळे मृत झालेल्या झाडांपासून इंधन निर्मितीचे प्रयत्न केले जात आहेत. या इंधन निर्मितीसाठी उपलब्ध मृत झाडांचा वापर केला जाणार असल्याने नव्या लागवडीचा प्रश्न नाही. तसेच वातावरणावर परिणाम होण्याचीही भिती नाही. अर्थात, या संशोधनामध्येही काही अडचणी आहेत. ही जंगले अत्यंत दुर्गम भागामध्ये पसरलेली आहेत. त्यामुळे काढणी आणि वाहतूकीच्या खर्चामध्ये वाढ होणार आहे. तसेच तांत्रिक अडथळे, पर्यावरणावर होणारे परिणाम, सामाजिक प्रश्न आणि स्थानिक धोरणे यांचेही प्रश्न सोडवावे लागणार आहेत. संशोधनासाठी आर्थिक साह्य राष्ट्रीय अन्न आणि कृषी संस्थेच्या (NIFA) वतीने देण्यात आले आहे.


अमेरिकेतील चार राज्यांचा प्रकल्पात सहभाग


  • कोलोरॅडो विद्यापीठातील संशोधन आणि अन्य विद्यापीठे, शासकीय, कासगी उद्योगातील संशोधकांच्या साह्याने जैवऊर्जा गट तयार करण्यात येणार आहे. जैवइंधन निर्मितीतील अडचणींवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
  • या प्रकल्पाद्वारे आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक, धोरणात्मक बाबींचा समग्र अभ्यास केला जाणार आहे. 
  • या प्रकल्पामध्ये मोंटाना, वायोमिंग, इदाहो या राज्यातील विद्यापीठांचा समावेश असून अमेरिकी वन सेवा रॉकी पर्वतीय संशोधन केंद्र, राष्ट्रीय अपारंपरिक ऊर्जा प्रयोगशाळा आणि शीत ग्रह ऊर्जा प्रणाली या संस्थांचा सहभाग आहे.  


ताणाच्या स्थितीत होतो दीर्घकालीन स्मृतींवर परिणाम


गोगलगायींवरील प्रयोगातील निष्कर्ष

लॅमनिया स्टॅग्नालिस या प्रजातीच्या गोगलगायींवर प्रयोग करण्यात आले.
(स्रोत ः साराह डेल्समन)


ताण वाढल्यानंतर मेंदूतील प्रक्रिया रोखल्या जात असल्याचे तलावातील गोगलगायींवर एक्सटर विद्यापीठ आणि कॅलगरी विद्यापीठामध्ये झालेल्या प्रयोगामध्ये दिसून आले आहे. संशोधकांनी केलेल्या प्रयोगामध्ये प्रशिक्षीत गोगलगायींमध्ये अधिक ताण असलेल्या परिस्थितीत दीर्घकालीन स्मृतींवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन प्लॉसवन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

एक्सटर विद्यापीठातील संशोधिका डॉ. साराह डेल्समन यांनी सांगितले, की प्रत्यक्ष जीवनामध्ये ताणांच्या परिस्थीतीमध्ये प्रत्येक सजीव कशा प्रकारे प्रतिक्रिया देतो, याचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या आधी माणसांवर ताणपूर्ण परिस्थितींच्या परिणामांमध्ये असेच निष्कर्ष मिळाले होते.  असेच प्रयोग प्रशिक्षित गोगलगायींवर करण्यात आले असून, त्यांच्या वर्तवणूकीचा आणि मेंदूमध्ये होत असलेल्या बदलांचा अभ्यास करण्यात आला आहे. एखाद्या ताणामुळे स्मरण शक्तीमध्ये काहीसा फरक पडत असला तरी एकापेक्षा अधिक ताणपूर्ण प्रसंगामध्ये स्मरणशक्तीवर मोठा विपरीत परिणाम होतो. विशेषतः स्मरणांची प्रक्रिया रोखली जात असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.

गोगलगायींवर प्रयोग का केला जातो

हे प्रयोग तलावातील लॅमनिया स्टॅग्नालिस (Lymnaea stagnalis) या प्रजातीच्या गोगलगायींवर करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूतील चेतापेशी मोठ्या असून स्मरणाशी संबंधित प्रक्रियांच्या अभ्यास करणे सोपे असते. या गोगलगायी ताणांच्या परिस्थितीला सस्तन प्राण्यासारखेच प्रतिसाद देतात. त्यामुळे शिकणे आणि स्मरणाशी संबंधित प्रयोगात प्रारूप म्हणून त्यांची निवड केली जाते.

असा झाला प्रयोग


  • गोगलगायी पाण्यामध्ये त्वचेच्या साह्याने श्वसन करतात. पाण्यामध्ये ऑक्सीजनचे प्रमाण कमी असते. जमिनीवर श्वसन करताना त्वचेवर असलेल्या छिद्राचा वापर करून हवा आत घेतात. 
  • गोगलगायींना जेव्हा ऑक्सीजनचे प्रमाण कमी असताना त्यांची हवा आत घेण्यासाठीची छिद्रे प्रत्येक वेळी बंद केली जातात. त्यातून त्यांना त्वचेद्वारे श्वसन करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. त्यातून त्यांची स्मरणशक्ती तयार होते. 
  • त्यांच्या स्मरणशक्तींच्या चाचण्या घेतल्या. त्या चाचणीमध्ये यशस्वी झाल्यानंतर त्या गोगलगायींना अचानक ताणांच्या स्थितीमध्ये सोडले जाते. विशेषतः कमी कॅल्शियम असलेल्या ठिकाणी त्यांच्यावर ताण येतो. कारण कवच निर्मितीसाठी त्यांना कॅल्शिअमची गरज असते. तसेच एका जागी अधिक गोगलगायींची गर्दी झाल्यास त्यांच्यावर ताण येतो. 
  • ताणाच्या परिस्थितीमध्ये दीर्घ स्मरणशक्ती तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. मात्र, एक मिनीट ते तासांच्या कालावधीतील लघू स्मरणशक्तीवर फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून आले आहे. 
  • मात्र, दोन्ही ताण परिस्थिती एकाच वेळी आल्यास त्यांच्या स्मरणशक्ती तयार होणे, शिकण्याची प्रक्रिया रोखले जात असल्याचे दिसून आले. 


जर्नल संदर्भ ः
Sarah Dalesman, Hiroshi Sunada, Morgan Lee Teskey, Ken Lukowiak. Combining Stressors That Individually Impede Long-Term Memory Blocks All Memory Processes. PLoS ONE, 2013; 8 (11): e79561 DOI: 10.1371/journal.pone.0079561

-------------------------


डाळिंब रोखते मेदयुक्त खाद्याचे विपरीत परिणाम


अतिरीक्त मेद असलेल्या पदार्थांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात. या विपरीत परिणामांना रोखण्याची क्षमता डाळिंबामध्ये असल्याचे स्पॅनिश संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.

स्पेन येतील कॅटालन ह्रद्यशास्त्र संस्थेमध्ये झालेल्या प्रयोगामध्ये  फळापासून बनविलेल्या पूरक खाद्यपदार्थामुळे रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असल्याचे दिसून आले आहे. या पूरक खाद्यपदार्थांच्या चाचण्या माणसांसारखेच ह्रद्य असलेल्या वराहावर घेण्यात आल्या. या चाचण्या घेण्यापूर्वी त्यांनी अतिरीक्त मेद असलेला आहार देण्यात आला होता. या पूरक खाद्यामध्ये 200 मिलीग्रॅम पॉलीफिनॉल घटक ( त्यालाच प्युनिकलॅजिन्स असे म्हटले जाते.) ठेवण्यात आला. त्यामुळे मेदयुक्त खाद्यामुळे होणारे रक्तवाहिन्या कडक करण्याचे प्रमाण कमी होते. ह्रद्यरोग आणि अर्धांगवायूसारख्या रोगांना दूर ठेवणे शक्य होते. या संशोधनाबाबत माहिती देताना डॉ. लिना बॅडिमोन यांनी सांगितले, की आहारामध्ये डाळिंबाचा समावेश असल्यास त्यातील पॉलिफिनोलिट घटक ह्रद्य आणि शरीरातील अकार्यक्षमता निर्माण करणाऱ्या विविध घटकांचे परिणाम रोखू शकत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.

हरितगृहाचे ऊर्जा कार्यक्षम प्रारूप विकसनासाठी शोधले नवे गणिती साधन


चिली देशातील संशोधन


चिली येथील संशोधकांनी हरितगृहातील वातावरणांचे नियंत्रण करण्यासाठी नवे गणिती साधन विकसित केले आहे. या साधनामुळे हरितगृहातील तापमान, सूर्यकिरणांचे बदलते प्रमाण यांच्या सोबत गणिती पद्धतीने नियंत्रण करणे शक्य होणार आहे.

आपल्याकडे पुर्णपणे नियंत्रित स्वरुपांची हरितगृहे कमी प्रमाणात आहे. पुर्णपणे नियंत्रित पद्धतीच्या हरितगृहामध्ये वातवरणांच्या नियंत्रणावरच उत्पादनाचे गणित विसंबलेले असते. वातावरणातील बदलते घटक सातत्याने मोजत त्याचे विविध पद्धतीद्वारे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी एक नवे साधन चिली येथील सॅण्टा मारिया तंत्रविद्यापीठातील ऊर्जा नवोन्मेषी संस्थेचे संचालक जैमी इस्पीनोझा आणि स्थापत्य आणि यांत्रिकी अभियांत्रिकीचे विद्यार्थी मॅक्सीमिलिनो रॅमीरेझ यांनी तयार केले आहे. त्याबाबत माहिती देताना इस्पीनोझा म्हणाले, की कृषी क्षेत्रामध्ये लागवड, उत्पादन, पॅकिंग आणि रेफ्रिजरेशन यासारख्या प्रत्येक विभागामध्ये नवेनवे तंत्रज्ञान सातत्याने उपलब्ध होत आहे. सद्यस्थितीतील हरितगृहामध्ये सुधारणा करण्यासाठी सध्या कोणत्या पद्धतीने कामकाज चालते आणि त्यामध्ये कोणत्या शास्त्रीय सुधारणा होऊ शकतात,  यावर काम सुरू केले होते. ऊर्जा नवोन्मेषी संस्थेच्या वतीने ऊर्जेच्या कार्यक्षम वापराच्या दृष्टीने विविध प्रकारचे हरितगृह प्रारूप तयार करण्यात आली आहेत. या आधी झालेल्या अभ्यास आणि संशोधनातून गणितीय साधनांच्या साह्याने नवे प्रारूप तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. हे साधन सातत्याने बदलत राहणाऱ्या सौर किरणे, तापमान या सारख्या घटकांचे मापन करतानाच नियंत्रित करण्यासाठी आवश्यक ते पर्याय उपलब्ध करते.


सर्व शास्त्रांचा समन्वय शेतीसाठी आवश्यक 

हरितगृह हे केवळ कृषी क्षेत्राशी संबंधित नसून त्यात यांत्रिकी, भौतिक शास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक शास्त्र यांचाही वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शास्त्रीय प्रारूप तयार करताना या बाबी महत्त्वाच्या होत्या.

  • हरितगृहातील तापमानाचे मापन करताना दिवसातील तापमान एक मुख्य मुद्दा असतोच, त्यासोबत वर्षातील प्रत्येक दिवसांचे तापमान यांचाही अंदाज असणे आवश्यक असते. तोही दृष्टीकोन समोर ठेवावा लागतो. 
  • वातावरणातील सापेक्ष आर्द्रता आणि येणाऱ्या धुक्यांचा अंदाज मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी विविध माहिती मिळवणे आणि त्यांचे विश्लेषण करत हरितगृह आणि प्रदेशातील वातावरणातील बदलत्या घटकांची सांगड घालण्याची आवश्यकता असते.



विविध वातावरणामध्ये होणार अधिक प्रयोग 


  1. प्रयोगासाठी निवडण्यात आलेले हरितगृह पॉलीइथीलीन आच्छादनाचे व चॅपेल पद्धतीचे होते. विश्लेषणातून हरितगृहाच्या आतील वर्षभराचे तापमान मिळवण्यात आले. त्यातून पिकांना उपलब्ध केलेल्या वातावरणाची संपुर्ण प्रतिमा उभी राहण्यास मदत होते.
  2. भविष्यामध्ये वेगळ्या प्रदेशातील वेगळ्या वातावरण परिस्थितीमध्ये अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानुसार या प्रारूपामध्ये बदल करण्यात येतील. त्यातून अधिक ऊर्जा कार्यक्षम हरितगृहे तायर करणे शक्य होणार आहे.


शेंगातील ऍलर्जीजन्य घटकांचा एकत्रित माहितीसाठा केला तयार

शेंगातील ऍलर्जीजन्य घटकांचा

 एकत्रित माहितीसाठा केला तयार


अमेरिकी कृषी संशोधन संस्थेचे संशोधन


शेंगदाणे किंवा अन्य झाडावरील शेंगवर्गीय दाण्यांचा एकाच वेळी खाण्यामध्ये समावेश केल्यास काहीजणांना ऍलर्जी होते. अमेरिकी कृषी संशोधन संस्थेमध्ये अशा ऍलर्जी निर्माण करणाऱ्या प्रथिनांच्या माहितीचा साठा तयार करण्यात आला असून, त्याद्वारे ऍलर्जीच्या शक्यता ओळखण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे. अशा ऍलर्जीला क्रॉस रिऍक्टिव्हिटी असे म्हटले जाते.

अमेरिकेतील कृषी संशोधन संस्थेच्या न्यु ओरेलॉन्समधील अन्न प्रक्रिया आणि संवेदक दर्जा संशोधन केंद्रातील रसायनतज्ज्ञ सोहेला मलेकी यांनी टेक्सास विद्यापीठातील कॅथरीन श्चेन आणि सहकाऱ्यांसह हे संशोधन केले आहे. हे स्ट्रक्चरल डेटाबेस ऑफ ऍलर्जेनिक प्रोटिन्स  SDAP या विषयीचे निष्कर्ष ऍलर्जी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

का होते ऍलर्जी ?



  1. अन्नामध्ये असलेल्या प्रथिनांना सूक्ष्म अशा पेपटाईडमध्ये रुपातंरीत करून त्याचे पचन केले जाते. रक्ताच्या प्रवाहातील प्रतिकारक यंत्रणेच्या प्रतिपिंडाकडून त्यांची ओळख पटविली जाते. अशा प्रतिकारक यंत्रणेमध्ये इम्यनोग्लोबिन इ (IgE) हे प्रतिपिंड अधिक प्रमाणात असल्यास ऍलर्जीचे प्रमाण वाढते. हे IgE अन्नातील प्रथिनांना बाह्य घटक समजून त्यावर अधिक प्रतिक्रिया देतात. 
  2. शेंगदाणे आणि अन्य दाण्यातील प्रथिने यांच्याही बाह्य घटकामध्ये समावेश केला जातो. पर्यायाने शेंगदाणे खाल्याने काही लोकांना ऍलर्जी होते.  नक्की कोणत्या दोन घटकांच्या एकत्रित वापरातून ऍलर्जी निर्माण होते, याचा अंदाज मिळविण्यासाठी माहितीचा साठा उपयुक्त ठरणार आहे. 


पुर परिस्थितीनंतर सुपीकतेसाठी 

सायनोबॅक्टेरिया ठरतात कारणीभूत




सेजेस आणि विलो झाडाना त्यांच्या गरजेपुरते नत्र पुरातून वाहून आलेल्या गाळ आणि अन्य घटकामध्ये वाढणाऱ्या सायनोबॅक्टेरिया या सूक्ष्म जिवांकडून उपलब्ध होते.  (स्रोत ः टी डिल्युका, वॉशिंग्टन विद्यापीठ) 

केवळ गाळाची माती नसते पुरेशी

पुरामुळे गाळाची माती जमा होऊन परिसरातील शेत जमिनीची सुपीकता वाढली जाते, असे आजवर मानले जात होते. मात्र, पृथ्वीच्या उत्तर भागातील जंगल परिसरामध्ये नेमकी त्याच्या विपरीत स्थिती असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. या परिसरामध्ये वाहत्या पाण्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी झाले असून जिवाणूंची संख्या कमी असल्यास नत्र स्थिरीकरणही कमी झाल्याचे आढळले आहे. हे संशोधन प्लॉसवन या संशोधनपत्रिकेमध्ये  प्रकाशित झाले आहे.

रशिया आणि कॅनडाच्या हार्डी नॉर्समन आणि अन्य नव्या वसाहतींच्या परिसरामध्ये असलेल्या गवताच्या विपूलतेमुळे सायनो बॅक्टेरिया (नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू) मोठ्या प्रमाणात आहेत. या परिसरातील जंगलामध्ये गवतावर जगणाऱ्या प्राण्यांची संख्याही मोठी आहे. या परिसरामध्ये सातत्याने पूर येतात. नदीच्या पाण्यासोबत येणाऱ्या मातीमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असल्याचे मानले जात होते. वॉशिंग्टन विद्यापीठातील पर्यावरण आणि वन शास्त्र विभागातील संशोधक थॉमस डेल्युका यांनी सांगितले, की अभ्यासामध्ये या समजापेक्षा वेगळी स्थिती असल्याचे दिसून आले आहे. हवेतील नत्राचे स्थिरीकरण करण्यामध्ये मोलाची भुमिका निभावणारे सायनोबॅक्टेरिया जंगलाच्या वाढीमध्ये महत्त्वाची भुमिका निभावतात. त्यामुळे शतकानुशतके कोणत्याही खत व्यवस्थापनाशिवाय या जंगलाची वाढ झालेली आहे.

असे झाले संशोधन


  1.  उत्तर फेनोस्कॅन्डिया भागातील दहा नद्या आणि 71 पुरग्रस्त प्रदेशांचा अभ्यास करण्यात आला. हा भाग स्कॅन्डीनेव्हिया आणि फिनलॅंड देशामध्ये येतो. या नद्या निवडताना नदीच्या काठाचा एक भाग हा प्रिस्टींन जंगलाचा व मानवाच्या संसर्गापासून दूर असलेला निवडण्यात आला. तसेच टूण्ड्रा प्रदेशाशी साधर्म्य असलेल्या बोरीयल रहिवासांचाही काही प्रमाणात समावेश होता.
  2. बोरीयल प्रांताच्या उत्तरेकडील भागामध्ये परिसरातील टेकड्यावरील माती नापीक असून नत्र स्थिरीकरण करणाऱ्या वनस्पतीचा अभाव आहे. या ठिकाणी मॉस आणि अन्य घटकांच्या साह्याने सायनोबॅक्टेरियाची वसाहत वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही भाग हा पाण्याच्या प्रवाहापर्यंत जातो. 
  3. पूर परिसरामध्ये सायनोबॅक्टेरियांच्या हंगामी वाढण्याचे अनेक पुरावे आढळून येतात.  त्यामुळे झाडांच्या मुळांच्या परिसरामध्ये आवश्यक तो नत्र उपलब्ध होतो. 
  4. काळ्या, थंड आणि बर्फाळ थंडी असलेल्या उत्तर स्वीडनमध्येही उष्ण आणि सजिवांसाठी योग्य वातावरण असलेल्या फ्लोरिडा भागाप्रमाणे सायनोबॅक्टेरिया नत्राचे स्थिरीकरण समान दरामध्ये करत संशोधकांना असल्याचे दिसून आले आहे. 
  5. सायनोबॅक्टेरिया विलो आणि सेजेसच्या जंगलातील भागामध्ये शेतामध्ये शेतकरी पुरवित असलेल्या प्रमाणाच्या एक चतुर्थांश ते एक षष्ठांश इतक्या नत्राचे स्थिरीकरण करत असल्याचे अभ्यासात दिसून आले. मात्र, दोन किलो रासायनिक नत्र तयार करण्यासाठी अनेक गॅलन डिझेलचा वापर करावा लागतो. त्यातुलनेत सायनोबॅक्टेरिया नैसर्गिक रित्या नत्राचे स्थिरीकरण करतो.


कृषी क्षेत्रात वापरण्यासाठी योग्य प्रारुपाची गरज

जंगलाच्या परिसरामध्ये नत्राचा पुरवठा करण्यामध्ये सायनोबॅक्टेरिया मोलाची भुमिका निभावतो. शेतीमध्ये त्यांचा उपयोग करणे शक्य झाल्यास कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवणे शक्य होणार आहे. मात्र, शेतकरी शेतामध्ये या जिवाणूंचा वापर करून पिकांचे उत्पादन घेऊ शकतात का, या दिशेने विचार केल्यास प्रश्नांची मालिका उभी राहते. नदीतील नत्रांचे प्रमाण मोजण्यासाठी अचूक अशा प्रारुपांची निर्मिती करावी लागेल. सध्या असे प्रारुप उपलब्ध नाही.


जर्नल संदर्भ ः Thomas H. DeLuca, Olle Zackrisson, Ingela Bergman, Beatriz Diez, Birgitta Bergman. Diazotrophy in Alluvial Meadows of Subarctic River Systems. PLoS ONE, 2013; 8 (11): e77342 DOI: 10.1371/journal.pone.0077342
----------------------------------


संगीताने वाढते सोलर सेल ची कार्यक्षमता




संगीताचे परिणाम सजीवांवर चांगल्या प्रकारे होतात, ही बाब आता सर्वाना माहिती आहे. मात्र, लंडन येथील क्वीन मेरी विद्यापीठ आणि इंपीरीयल कॉलेज मधील संशोधकांनी सौर ऊर्जेच्या निर्मितीतील सोलर सेलच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी संगीताचा आधार घेतला आहे. पॉप आणि रॉक संगीतातील उच्च क्षमतेच्या वारंवारितेमुळे विशिष्ट प्रकारचा थरथरणे अनुभवास येते. या थरथरण्यामुळे सोलर सेलमधील नॅनो रॉडच्या कार्यक्षमतेमध्ये 40 टक्क्यांनी वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

सौर किरणापासून ऊर्जेची निर्मिती अधिक कार्यक्षम करण्यासाठी विविध पातळीवर सातत्याने संशोधन केले जाते. लंडन येथील संशोधकांनी सोलर सेलमध्ये झिंक ऑक्साईडपासून बनविलेल्या अतिसूक्ष्म अशा नलिकांचा वापर केला असून, या नलिकांना झाकण्यासाठी पॉलिमरचा वापर केला आहे. झिंक ऑक्साईडच्या विशिष्ट अशा गुणधर्मांमुळे 75 डेसिबल इतक्या कमी क्षमतेच्या ध्वनीलहरींचा सोलर सेलच्या कार्यक्षमतेचा चांगला परिणाम होत असल्याचे दिसून आले होते. हा आवाज अत्यंत कमी असून, रस्त्यावरील आवाज किंवा ऑफिसमधील प्रिंटरच्या आवाजाइतका असू शकतो.
या संशोधनाबाबत माहिती देताना क्वीन मेरी अभियांत्रिकी आणि धातूशास्त्र विद्यालयातील प्राध्यापर डॉ. स्टिव्ह डून यांनी सांगितले, की थरथरण्याच्या प्रणालीमुळे फोटोव्होल्टाइक सेलच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. त्यावेळी याच प्रकारच्या भौतिक गुणधर्मांच्या अन्य पदार्थांमध्येही असेच निष्कर्ष मिळाले आहेत.

असे आहे संशोधन


  1.  झिंक ऑक्साईड धातूंवर विविष्ट प्रकारे दाब पडल्यास त्यातून उपलब्ध होत असलेल्या व्होल्टेजच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे आधी झालेल्या संशोधनातून समोर आले होते. या परिणामाला पिझोइलेक्ट्रिक इफेक्ट असे म्हणतात. मात्र, या परिणामांचा वापर सोलर सेलच्या कार्यक्षमता वाढीसाठी या पूर्वी करण्यात आलेला नाही. 
  2.  लंडन इंपीरीयल कॉलेजमधील संशोधक जेम्स ड्युरंट यांनी सांगितले, की ध्वनींच्या लहरींचा वापर धातूंवर विशिष्ट प्रकारे दाब देण्यासाठी करण्यामध्ये अडचणी येऊ शकतील, असा सुरवातीला अंदाज होता. एकमेंकाचा परिणाम नष्ट होण्याचा धोका होता. मात्र, अंतिम परिणाम चांगला मिळाला आहे. 
  3.  अनियंत्रित बदलामुळे एकमेंकाचा परिमाण नष्ट न होता सोलर सेलच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ मिळविणे शक्य झाले आहे. सुरवातीला शांत अशा संगीताचा वापर केला होता. त्या तुलनेत विविध क्षमतेच्या आवाजाचा वापर केला गेला. त्यामध्ये शास्त्रीय संगीताच्या तुलनेत पॉप संगीताला सोलर सेल अधिक चांगला प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले आहे. 


-----------------------------

असे होतील संशोधनाचे फायदे 


  • या संशोधनामुळे संगीत निर्मितीच्या विविध साधनामध्ये सौर ऊर्जेचा अधिक कार्यक्षमतेने वापर करणे शक्य होणार आहे.






  •  तसेच कार, घरे किंवा सतत संगीत सुरू असलेल्या नाट्यगृहे, सिनेमा थिएटरसारख्या अन्य ठिकाणी सौर ऊर्जा वापरणे अधिक कार्यक्षम होऊ शकते.  


फळबागेतील किडींच्या संख्येचा अंदाज देणारे उपकरण

ब्राझीलमध्ये सफरचंदातील पतंगाच्या संख्या विश्लेषणासाठी स्वयंचलित उपकरणांचा वापर सुरू


ब्राझील येथील कृषी संशोधन आणि सॅण्टा कॅटरिना ग्रामीण विस्तार कंपनी यांच्या एकत्रित प्रयत्नातून सफरचंदामध्ये येणाऱ्या ऍपल मॉथ या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंचलित प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यासाठी कृषी हवामानशास्त्र विभागाच्या परिसरातील सात केद्रांची मदत त्यासाठी घेण्यात आली आहे. त्यातून उपलब्ध होणाऱ्या माहितीतून सफरचंद आणि अन्य फळझाडांवरील किडींच्या संख्येत होणाऱ्या बदलांची प्रति दिन अंदाज मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कसे काम करते हे उपकरण
 - या उपकरणामध्ये कृत्रिम गंधसापळे वापरले असून, त्यामध्ये परिसरातील पतंग आकर्षित होतात. सापळ्यामध्ये आल्यानंतर, त्यामध्ये असलेल्या चिकट पट्टीवर ते चिकटून राहतात.
- या पट्टीवरील पतंगाच्या संख्येची नोंद अनेक कॅमोराद्वारे घेतली जाते. त्यांच्या प्रतिमा मोबाईल फोनद्वारे सर्व्हरला पाठविल्या जातात. त्याचे विश्लेषण केले जाते.
- विश्लेषणाचे अंदाज किंवा निष्कर्ष इंटरनेट, मोबाईल, किंवा अन्य उपकरणाद्वारे सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध केले जातात. त्यानुसार किटकांच्या, पतंगाच्या संख्येचा अंदाज त्वरीत मिळतो.
- आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर ही संख्या गेल्यास नियंत्रणासाठी आवश्यक ते पर्याय सुचवले जातात.  - ब्राझीलमध्ये गेल्या काही वर्षापासून सफरचंदाच्या बागासाठी अशा प्रकारच्या उपकरणाचा वापर वाढत आहे.