शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

मृत झांडापासून जैवइंधन निर्मितीसाठी संशोधन होतेय सुरू

मृत झांडापासून जैवइंधन निर्मितीसाठी

 संशोधन होतेय सुरू


अमेरिकी कृषी विभागाच्या वतीने दिले 

10 दशलक्ष डॉलरचे आर्थिक साह्य


रॉकीज पर्वताच्या परिसरामध्ये किटकांच्या प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या झाडांचे प्रमाण मोठे आहे. या झांडापासून जैव ऊर्जा इंधन निर्मिती करण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर उपाय शोधण्यासाठी समग्र अभ्यासाची गरज आहे. त्यासाठी अमेरिकी कृषी विभागाने कोलोरॅडो राज्य विद्यापीठ आणि सहकारी, प्रशासकीय, औद्योगिक आणि शासकीय पातळीवरील संस्थांना संशोधन साह्य म्हणून 10 दशलक्ष डॉलरचे अनुदान जाहिर केले आहे.


रॉकिज पर्वताच्या परिसरातील सुमारे 42 दशलक्ष एकर अमेरिकी जंगलांवर पाइन आणि स्पुरस बार्क भुंगेरे यांचा प्रादुर्भाव झाला आहे. 1996 पासून झाडे मृत होण्याचे प्रमाण वाढले असून त्याचा प्रादुर्भाव पसरत जाण्याचा धोका आहे. या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशोधन आवश्यक आहे. त्यासोबत मृत झालेल्या झाडांपासून उपलब्ध बायोमासचा उपयोग स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी करण्याचा प्रयत्न या संशोधनातून केला जाणार आहे.

अमेरिकेतील कृषी सचिव चॉम विल्सॅक यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुंगेऱ्यामुळे मृत झालेल्या झाडांपासून इंधन निर्मितीचे प्रयत्न केले जात आहेत. या इंधन निर्मितीसाठी उपलब्ध मृत झाडांचा वापर केला जाणार असल्याने नव्या लागवडीचा प्रश्न नाही. तसेच वातावरणावर परिणाम होण्याचीही भिती नाही. अर्थात, या संशोधनामध्येही काही अडचणी आहेत. ही जंगले अत्यंत दुर्गम भागामध्ये पसरलेली आहेत. त्यामुळे काढणी आणि वाहतूकीच्या खर्चामध्ये वाढ होणार आहे. तसेच तांत्रिक अडथळे, पर्यावरणावर होणारे परिणाम, सामाजिक प्रश्न आणि स्थानिक धोरणे यांचेही प्रश्न सोडवावे लागणार आहेत. संशोधनासाठी आर्थिक साह्य राष्ट्रीय अन्न आणि कृषी संस्थेच्या (NIFA) वतीने देण्यात आले आहे.


अमेरिकेतील चार राज्यांचा प्रकल्पात सहभाग


  • कोलोरॅडो विद्यापीठातील संशोधन आणि अन्य विद्यापीठे, शासकीय, कासगी उद्योगातील संशोधकांच्या साह्याने जैवऊर्जा गट तयार करण्यात येणार आहे. जैवइंधन निर्मितीतील अडचणींवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
  • या प्रकल्पाद्वारे आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक, धोरणात्मक बाबींचा समग्र अभ्यास केला जाणार आहे. 
  • या प्रकल्पामध्ये मोंटाना, वायोमिंग, इदाहो या राज्यातील विद्यापीठांचा समावेश असून अमेरिकी वन सेवा रॉकी पर्वतीय संशोधन केंद्र, राष्ट्रीय अपारंपरिक ऊर्जा प्रयोगशाळा आणि शीत ग्रह ऊर्जा प्रणाली या संस्थांचा सहभाग आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा