ताणाच्या स्थितीत होतो दीर्घकालीन स्मृतींवर परिणाम
गोगलगायींवरील प्रयोगातील निष्कर्ष
लॅमनिया स्टॅग्नालिस या प्रजातीच्या गोगलगायींवर प्रयोग करण्यात आले. (स्रोत ः साराह डेल्समन) |
ताण वाढल्यानंतर मेंदूतील प्रक्रिया रोखल्या जात असल्याचे तलावातील गोगलगायींवर एक्सटर विद्यापीठ आणि कॅलगरी विद्यापीठामध्ये झालेल्या प्रयोगामध्ये दिसून आले आहे. संशोधकांनी केलेल्या प्रयोगामध्ये प्रशिक्षीत गोगलगायींमध्ये अधिक ताण असलेल्या परिस्थितीत दीर्घकालीन स्मृतींवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन प्लॉसवन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
एक्सटर विद्यापीठातील संशोधिका डॉ. साराह डेल्समन यांनी सांगितले, की प्रत्यक्ष जीवनामध्ये ताणांच्या परिस्थीतीमध्ये प्रत्येक सजीव कशा प्रकारे प्रतिक्रिया देतो, याचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या आधी माणसांवर ताणपूर्ण परिस्थितींच्या परिणामांमध्ये असेच निष्कर्ष मिळाले होते. असेच प्रयोग प्रशिक्षित गोगलगायींवर करण्यात आले असून, त्यांच्या वर्तवणूकीचा आणि मेंदूमध्ये होत असलेल्या बदलांचा अभ्यास करण्यात आला आहे. एखाद्या ताणामुळे स्मरण शक्तीमध्ये काहीसा फरक पडत असला तरी एकापेक्षा अधिक ताणपूर्ण प्रसंगामध्ये स्मरणशक्तीवर मोठा विपरीत परिणाम होतो. विशेषतः स्मरणांची प्रक्रिया रोखली जात असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
गोगलगायींवर प्रयोग का केला जातो
हे प्रयोग तलावातील लॅमनिया स्टॅग्नालिस (Lymnaea stagnalis) या प्रजातीच्या गोगलगायींवर करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूतील चेतापेशी मोठ्या असून स्मरणाशी संबंधित प्रक्रियांच्या अभ्यास करणे सोपे असते. या गोगलगायी ताणांच्या परिस्थितीला सस्तन प्राण्यासारखेच प्रतिसाद देतात. त्यामुळे शिकणे आणि स्मरणाशी संबंधित प्रयोगात प्रारूप म्हणून त्यांची निवड केली जाते.
असा झाला प्रयोग
- गोगलगायी पाण्यामध्ये त्वचेच्या साह्याने श्वसन करतात. पाण्यामध्ये ऑक्सीजनचे प्रमाण कमी असते. जमिनीवर श्वसन करताना त्वचेवर असलेल्या छिद्राचा वापर करून हवा आत घेतात.
- गोगलगायींना जेव्हा ऑक्सीजनचे प्रमाण कमी असताना त्यांची हवा आत घेण्यासाठीची छिद्रे प्रत्येक वेळी बंद केली जातात. त्यातून त्यांना त्वचेद्वारे श्वसन करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. त्यातून त्यांची स्मरणशक्ती तयार होते.
- त्यांच्या स्मरणशक्तींच्या चाचण्या घेतल्या. त्या चाचणीमध्ये यशस्वी झाल्यानंतर त्या गोगलगायींना अचानक ताणांच्या स्थितीमध्ये सोडले जाते. विशेषतः कमी कॅल्शियम असलेल्या ठिकाणी त्यांच्यावर ताण येतो. कारण कवच निर्मितीसाठी त्यांना कॅल्शिअमची गरज असते. तसेच एका जागी अधिक गोगलगायींची गर्दी झाल्यास त्यांच्यावर ताण येतो.
- ताणाच्या परिस्थितीमध्ये दीर्घ स्मरणशक्ती तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. मात्र, एक मिनीट ते तासांच्या कालावधीतील लघू स्मरणशक्तीवर फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून आले आहे.
- मात्र, दोन्ही ताण परिस्थिती एकाच वेळी आल्यास त्यांच्या स्मरणशक्ती तयार होणे, शिकण्याची प्रक्रिया रोखले जात असल्याचे दिसून आले.
जर्नल संदर्भ ः
Sarah Dalesman, Hiroshi Sunada, Morgan Lee Teskey, Ken Lukowiak. Combining Stressors That Individually Impede Long-Term Memory Blocks All Memory Processes. PLoS ONE, 2013; 8 (11): e79561 DOI: 10.1371/journal.pone.0079561
-------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा