शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

संगीताने वाढते सोलर सेल ची कार्यक्षमता




संगीताचे परिणाम सजीवांवर चांगल्या प्रकारे होतात, ही बाब आता सर्वाना माहिती आहे. मात्र, लंडन येथील क्वीन मेरी विद्यापीठ आणि इंपीरीयल कॉलेज मधील संशोधकांनी सौर ऊर्जेच्या निर्मितीतील सोलर सेलच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी संगीताचा आधार घेतला आहे. पॉप आणि रॉक संगीतातील उच्च क्षमतेच्या वारंवारितेमुळे विशिष्ट प्रकारचा थरथरणे अनुभवास येते. या थरथरण्यामुळे सोलर सेलमधील नॅनो रॉडच्या कार्यक्षमतेमध्ये 40 टक्क्यांनी वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

सौर किरणापासून ऊर्जेची निर्मिती अधिक कार्यक्षम करण्यासाठी विविध पातळीवर सातत्याने संशोधन केले जाते. लंडन येथील संशोधकांनी सोलर सेलमध्ये झिंक ऑक्साईडपासून बनविलेल्या अतिसूक्ष्म अशा नलिकांचा वापर केला असून, या नलिकांना झाकण्यासाठी पॉलिमरचा वापर केला आहे. झिंक ऑक्साईडच्या विशिष्ट अशा गुणधर्मांमुळे 75 डेसिबल इतक्या कमी क्षमतेच्या ध्वनीलहरींचा सोलर सेलच्या कार्यक्षमतेचा चांगला परिणाम होत असल्याचे दिसून आले होते. हा आवाज अत्यंत कमी असून, रस्त्यावरील आवाज किंवा ऑफिसमधील प्रिंटरच्या आवाजाइतका असू शकतो.
या संशोधनाबाबत माहिती देताना क्वीन मेरी अभियांत्रिकी आणि धातूशास्त्र विद्यालयातील प्राध्यापर डॉ. स्टिव्ह डून यांनी सांगितले, की थरथरण्याच्या प्रणालीमुळे फोटोव्होल्टाइक सेलच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. त्यावेळी याच प्रकारच्या भौतिक गुणधर्मांच्या अन्य पदार्थांमध्येही असेच निष्कर्ष मिळाले आहेत.

असे आहे संशोधन


  1.  झिंक ऑक्साईड धातूंवर विविष्ट प्रकारे दाब पडल्यास त्यातून उपलब्ध होत असलेल्या व्होल्टेजच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे आधी झालेल्या संशोधनातून समोर आले होते. या परिणामाला पिझोइलेक्ट्रिक इफेक्ट असे म्हणतात. मात्र, या परिणामांचा वापर सोलर सेलच्या कार्यक्षमता वाढीसाठी या पूर्वी करण्यात आलेला नाही. 
  2.  लंडन इंपीरीयल कॉलेजमधील संशोधक जेम्स ड्युरंट यांनी सांगितले, की ध्वनींच्या लहरींचा वापर धातूंवर विशिष्ट प्रकारे दाब देण्यासाठी करण्यामध्ये अडचणी येऊ शकतील, असा सुरवातीला अंदाज होता. एकमेंकाचा परिणाम नष्ट होण्याचा धोका होता. मात्र, अंतिम परिणाम चांगला मिळाला आहे. 
  3.  अनियंत्रित बदलामुळे एकमेंकाचा परिमाण नष्ट न होता सोलर सेलच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ मिळविणे शक्य झाले आहे. सुरवातीला शांत अशा संगीताचा वापर केला होता. त्या तुलनेत विविध क्षमतेच्या आवाजाचा वापर केला गेला. त्यामध्ये शास्त्रीय संगीताच्या तुलनेत पॉप संगीताला सोलर सेल अधिक चांगला प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले आहे. 


-----------------------------

असे होतील संशोधनाचे फायदे 


  • या संशोधनामुळे संगीत निर्मितीच्या विविध साधनामध्ये सौर ऊर्जेचा अधिक कार्यक्षमतेने वापर करणे शक्य होणार आहे.






  •  तसेच कार, घरे किंवा सतत संगीत सुरू असलेल्या नाट्यगृहे, सिनेमा थिएटरसारख्या अन्य ठिकाणी सौर ऊर्जा वापरणे अधिक कार्यक्षम होऊ शकते.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा