मंगळवार, १० जून, २०१४

सूक्ष्मजीवांची विविधता प्रदूषकांच्या विघटनामध्ये ठरते मोलाची

मातीतील सूक्ष्मजीवांची विविधता प्रदूषकांच्या विघटनामध्ये ठरते मोलाची

मातीतील सूक्ष्मजीवांच्या विविधतेमध्ये पाच टक्क्यांनी घट झाल्यास पर्यावरणातील विषारी घटकांच्या विघटणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असल्याचे ऑस्ट्रेलियातील संशोधनात आढळले आहे.  हे संशोधन एन्व्हायर्नमेंटल मायक्रोबायोलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित केले आहे.



शेतीतील माती जिवंत व सुपीक असण्यासाठी मातीतील सुक्ष्मजीव महत्त्वाची भुमिका निभावतात. अनेक वेळा सूक्ष्मजिवाच्या जैवविविधतेचा काय लाभ होतो, या विषयी अधिक माहिती नसल्याने सवंर्धनासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीत. शेतीच्या मातीमध्ये हजारो सूक्ष्म जीव आढळून येतात. त्यांचा लाभ पिकांच्या उत्पादनासाठी होत असतो. तसेच मातीमध्ये मिसळल्या जाणाऱ्या विषारी घटकांचा प्रभाव कमी करून प्रदूषण आटोक्यात ठेवण्यामध्ये या सूक्ष्म जीवांचा मोलाचा वाटा असतो. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न सिडनी येथील संशोधक डॉ. ब्रजेश सिंग यांनी सांगितले,की पर्यावरणातील विषारी घटकांचे विघटन होण्याच्या प्रक्रियेमध्ये घट झाल्यास त्याचे विपरीत परिणाम एकूणच पर्यावरणावर होणार आहे.  पृष्ठभाग आणि भूजलामध्ये रासायनिक घटकांचे प्रदुषण वाढत जाणार आहे. त्यामुळे मातीतील सूक्ष्मजीवाविषयी विषारी घटकांच्या विघटनाच्या दृष्टीने अधिक माहिती मिळवली जात आहे.

मातीतील प्रदुषण वाढण्याची कारणे ः
- शेतीतील मातीमधील सूक्ष्मजीवांच्या विविधतेमध्ये घट होण्याची कारणे गुंतागुंतीची आहेत. संशोधकांच्या गटाने  दीर्घकालीन प्रदुषणामध्ये जड धातूंच्या ( कॅडमिअम, जस्त आणि तांबे) प्रमाणामध्ये औद्योगिक कारणामुळे वाढ होत असल्याचे दिसून आले.
- शेतीमध्ये सेंद्रिय खत म्हणून वापरला जाणारा टाकाऊ कचऱ्याच्या माध्यमातून मातीमध्ये विषारी घटकांचे प्रमाण वाढत आहे.  तसेच किडनाशके व तणनाशकांचा अनियंत्रित होत असलेला वापर ही विषारी घटकांचे प्रमाण वाढवत आहे.
- युरोपीय संघाने निर्धारीत केलेल्या पातळीच्या कितीतरी पट अधिक प्रमाण जड धातूंचे मातीच्या तपासणीमध्ये दिसून आले आहे. या मातीतील सूक्ष्मजीवांच्या विविधतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचेही या अभ्यासात आढळले आहे. त्यामुळे विषारीपणा कमी करण्यामध्ये मोलाची भुमिका निभावणाऱ्या सूक्ष्मजीवांची विविधता वाढविण्यासंदर्भात प्रयत्न केले जात आहेत.


जर्नल संदर्भ ः
Brajesh K. Singh, Christopher Quince, Catriona A. Macdonald, Amit Khachane, Nadine Thomas, Waleed Abu Al-Soud, Søren J. Sørensen, Zhili He, Duncan White, Alex Sinclair, Bill Crooks, Jizhong Zhou, Colin D. Campbell. Loss of microbial diversity in soils is coincident with reductions in some specialized functions. Environmental Microbiology, 2014; DOI: 10.1111/1462-2920.12353

त्वचेवर पडलेल्या सूर्यप्रकाशाने कमी होतो रक्तदाब



त्वचेवर पडलेल्या सूर्यप्रकाशाने कमी होतो रक्तदाब

इंग्लंड येथील साऊथ्मप्टन आणि इडिनबर्ग विद्यापीठामधील संशोधकांना सूर्यप्रकाशामध्ये त्वचा राहिल्याने ह्रद्यरोग आणि पक्षाघाताचा धोका कमी होत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन जर्नल ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह डर्मेटोलॉजी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये त्वचा आल्यानंतर त्वचा आणि रक्तामधील माहितींची देवाणघेवाण करणाऱ्या नायट्रिक ऑक्साईड रेणूंच्या पातळीमध्ये बदल होतात.  या विषयी अधिक माहिती देताना संशोधक मार्टिन फिलिश्च यांनी सांगितले, की रक्तदाबाच्या नियंत्रणासाठी नायट्रिक ऑक्साईड हा घटक कार्यरत असतो. सूर्यप्रकाशामध्ये त्वचेतून कमी प्रमाणात नायट्रिक ऑक्साईड प्रवाहित होते. त्यामुळे रक्त दाब कमी होण्यास मदत होते. प्रयोगासाठी प्रति दिन वीस मिनिटे सूर्यप्रकाश आणि दिव्यांच्या साह्याने अतिनील किरणे आणि उष्णता यांच्या सानिध्यामध्ये निरोगी लोकांना बसविण्यात आले होते. त्याचे चांगले फायदे मिळत असल्याचे दिसून आले आहे.


एडिनबर्ग विद्यापीठातील डॉ. रिचर्ड वेल्लर यांनी सांगितले, की सूर्यप्रकाशाशी कमी संपर्क असलेल्या व्यक्तीमध्ये ह्रद्याशी संबंधित आजारामध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले. रक्त दाब आणि ह्रद्यरोग यांच्यामध्ये एक संबंध आहे.


दुधाच्या निवळीतील पोषक प्रथिने मिळविण्यासाठी राबवणार प्रकल्प


युरोपिय संघाने घेतला पुढाकार



चीज उत्पादनातील उपपदार्थ निवळी (व्हे) पासून पोषक प्रथिने वेगळी करण्यासाठी जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ होहेनहेईम आणि फ्राऊनहॉपर आयजीबी या संस्थांनी प्रयत्न सुरू केले आहे. त्यांनी इलेक्ट्रोमेब्रेन या नव्या पद्धतीचा व्यावसायिक वापर करण्यासाठी व्हे टू फूड या प्रकल्पाची आखणी केली आहे.

चिज उत्पादनामध्ये व्हे किंवा निवळी हा उपपदार्थ मोठ्या प्रमाणात तयार होतो. एकट्या युरोपमध्ये 81 दशलक्ष टन प्रति वर्ष व्हे तयार होतो. त्यातील केवळ चाळीस टक्के व्हे वर प्रक्रिया होते. त्यापासून  विविध पदार्थांचा निर्मिती केली जाते. मात्र, तरिही वाया जाणाऱ्या व्हेचे प्रमाण 60 टक्क्यांपर्यंत आहे. ते अनेक वेळा काही प्रक्रिया न करता ते टाकून दिले जाते. थोडक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पोषक घटक वाया जातात.
या वाया जाणाऱ्या घटकांचा खाद्यामध्ये वापर करण्याच्या दृष्टीने युरोपिय संघाच्या आर्थिक साह्याने युनिव्हर्सिटी ऑफ होहेनहेईम आणि फ्राऊनहॉपर आयजीबी या संस्थांनी व्हे टू फूड हा प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे.

व्हेमधील उच्च दर्जाची प्रथिने मिळवून त्याचा खाद्यामध्ये वापर करण्यासाठी नव्या इलेक्ट्रोमेब्रेन प्रक्रियेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाबाबत माहिती देताना प्रकल्पाच्या मुख्य डॉ. ऍना ल्युसिया वास्क्वेझ यांनी सांगितले, की अन्न व खाद्य उद्योगासाठी व्हेमधील प्रथिने मोलाची असून, अनेक खाद्य पदार्थामध्ये नैसर्गिक बंध घटक म्हणून वापरले जातात. त्याच प्रमाणे शिशूखाद्य आणि पोषक खाद्य निर्मितीसोबतच खेळाडूंसाठी प्रथिनयुक्त पेयांच्या निर्मितीसाठी केला जातो. या साठी व्हेपासून प्रथिने वेगळी करणे आवश्यक असते. व्हेमधील ऍण्टीथ्रोम्बोजेनिक केसिन मॅक्रोपेपटाईड प्रकारची  प्रथिने वेगळी करण्यासाठी काही मुलभूत पद्धतीचा सध्या वापर होतो. चाळणीच्या माध्यमातून एकूण प्रथिने वेगळी केली जातात. त्यातील प्रत्येक घटक वेगळे करणे शक्य होत नाही.

अशी आहे इलेक्ट्रोमेब्रेन पद्धती
 प्रथिनांचे त्यांच्या पोषकतेनुसार आणि कार्यानुसार वेगळे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी होहेनहेईम विद्यापीठामध्ये इलेक्ट्रोमेब्रेन प्रक्रिया विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये दाबाखाली व विद्यूत क्षेत्रामध्ये गाळण प्रक्रिया केली जाते. त्यामुले प्रथिने त्यांच्या आकारानुसार आणि त्यांच्यावर असलेल्या विद्यूत भारानुसार वेगळी केली जातात. त्यामुळे व्हेपासून अधिक प्रथिनांचे उत्पादन मिळते. तसेच दरवेळी गाळण यंत्रणासाठी साफ करण्याची गरज राहत नाही. त्यामुळे साफसफाईसाठी होणारा पाण्याचा अपव्यय कमी होतो.  या पद्धतीच्या प्राथमिक चाचण्यामध्ये व्हेपासून ए लॅक्टलब्युमिन आणि बी लेक्टोग्लोब्युलिन प्रकारची प्रथिने वेगळी करणे शक्य झाले आहे.

खाजगी कंपन्याच्या सहकार्याने उभारणार स्वयंचलित प्रकल्प
इलेक्ट्रोमेब्रेन ही प्रक्रिया व्यावसायिक दृष्ट्या वापरण्यासाठी अधिक वेगवान आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक सुरक्षित करण्यासाठी संशोधक या प्रकल्पामध्ये संशोधन करणार आहेत. त्यासाठी स्वयंचलित प्रक्रिया पद्धतीचा पथदर्श प्रकल्प रोविता आणि श्वार्व्झल्डमिल्च या खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे. स्वयंचलित प्रकल्पामुळे प्रथिनांचे उत्पादन वाढण्यासोबतच ऊर्जा वापर व निर्मिती खर्चात बचत होणार आहे.

नत्रयुक्त खतांच्या व्यवस्थापनाचे मिरचीवर झाले प्रयोग

नत्रयुक्त खतांच्या व्यवस्थापनाचे मिरचीवर झाले प्रयोग





नत्राच्या कार्यक्षम वापर करण्यासाठी अमेरिकेतील संशोधकांनी मिरची पिकामध्ये प्रयोग केले आहेत. सून, 56.2 मिलिग्रॅम प्रति लिटर या तीव्रतेच्या नत्र द्रावणाचे मिरची पिकामध्ये पुर्ण शोषण होत असून उत्पादन व त्याचा दर्जा यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे या पेक्षा अधिक प्रमाणात वापरलेले नत्र हे जलस्रोतांच्या प्रदूषणाचे कारण ठरू शकते. या अभ्यासाचे निष्कर्ष हॉर्ट सायन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

वर्षभर फळे आणि भाज्यांची मागणी राहत असल्याने शेतकरीही त्याचे वर्षभर उत्पादन घेतात. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पारंपरिक पद्धतीमध्ये खतांच्या वापरासह अनेक बदल होत गेले आहेत. मात्र, त्यामुळे पर्यावरणावर अनेक विपरीत परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे पिकामध्ये नत्राचा कार्यक्षम वापर होण्याची आवश्यकता वाढत आहे. नेगेव्ह येथील गिलट संशोधन केद्रातील संशोधक हगाई यासौर यांनी हरितगृहातील मिरचीच्या (Capsicum annum L.) दोन जातींच्या लागवडीमध्ये नत्राच्या चार तीव्रतेच्या द्रावणांचा वापर करून अभ्यास केला. हरितगृहामध्ये लागवड असलेल्या बेल पेपर या मिरचीमध्ये नत्रांचा उत्पादन आणि दर्जा यांच्यावर कोणताही विपरीत परिणाम न होता पर्यावरणावरील विपरीत परिणामांना टाळण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

संशोधक हगाई यासौर यांनी सांगितले, की एकूण सोळा अन्नद्रव्यातील नत्र हे महत्त्वाचे आणि सर्वाधिक वापरले जाणारे अन्नद्रव्य आहे. पिकाच्या वाढीसाठी प्रथिने क्लोराप्लास्टमधील नत्र हा आवश्यक घटक आहे. मात्र, त्यांचा असंतुलित वापर झाल्याने परिसरातील पाण्याचे स्रोत प्रदुषित होत असल्याचे दिसून आले आहे.  नत्राच्या कमतरतेविषयी अधिक अभ्यास झाला असून त्या प्रमाणात अधिक नत्रामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास फारसा झालेला नाही. मिरचीतील  नत्राच्या वापराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयोग करण्यात आले.

असे झाले प्रयोग ः
  1. -  जगामध्ये इस्राईल, स्पेन, दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिका या भागामध्ये वर्षभर उत्पादन घेण्यासाठी हरितगृहे आणि शेडनेटचा वापर केला जात आहे. या ठिकाणी लागवड असलेल्या व वाढीच्या पद्धती वेगळ्या असलेल्या दोन मिरची जाती निवडल्या.
  2. - त्यामध्ये ठिबक सिंचनद्वारे चार तीव्रतेच्या नत्र द्रावणांचा वापर करून त्यांनी फळांचा भौतिक आकार, फळांचे उत्पादन, रासायनिक दर्जा विशेषतः शर्करेचे व आम्लतेचे प्रमाण यांचे मोजमाप केले.
  3. - नत्राचे प्रमाण 56 मिलीग्रॅम प्रति लिटर असलेल्या प्रमाणामध्ये मिरचीचे अधिक उत्पादन मिळाले. त्या पेक्षा अधिक तीव्रतेच्या द्रावणांचा वापर केल्यानंतर उर्वरीत प्रमाण हे पर्यावरणामध्ये गेले..56.2 मिलीग्रॅम प्रति लिटर तीव्रतेचे द्रावणांचा पिकांने पुरेपूर वापर केल्याचे दिसून आले. तसेच फळांच्या दर्जावरही कोणताही विपरीत परिणाम दिसून आला नाही.
  4. - नत्रांच्या या चारही प्रमाणाच्या वापरामुळे या घटकासह पोषक अशा बीटा कॅरोटीन आणि लायकोपीनच्या प्रमाणामध्ये कोणतीही घट आढळली नाही.

------------------------------------------------
जर्नल संदर्भ :
Hagai Yasuor, Alon Ben-Gal And Uri Yermiyahu. Nitrogen Management of Greenhouse Pepper Production: Agronomic, Nutritional, and Environmental Implications. HortScience, October 2013

औषधी वनस्पतीच्या लागवडीत होतेय वाढ


केनियात औषधी वनस्पतीच्या लागवडीत होतेय वाढ


मूल्यवर्धनाच्या साखळीचा विस्तारही वाढतोय

केनियामध्ये औषधी वनस्पतींच्या व्यापार व मागणीत सातत्याने वाढ होत असल्याने, जंगली वनस्पती उत्पादनाप्रमाणेच शेतीमध्ये औषधी वनस्पतींची लागवड वाढत आहे. औषधी वनस्पतीच्या व्यापारामुळे लागवडीसह योग्य त्या पॅकिंग व लेबलिंग पद्धतीचा वापरही ग्रामीण भागामध्ये होऊ लागल्याचे केनियामध्ये झालेल्या अभ्यासात दिसून आले आहे. या प्रक्रियेत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडत आहे.

विविध विकसनशील देशाप्रमाणेच केनियामध्ये पारंपरिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, सुमारे 80 टक्के आफ्रिकी लोक हे पारंपरिक औषधावर अवलंबून असतात. त्याचप्रमाणे पाश्चात्य देशामध्ये नैसर्गिक औषधांच्या वापरामध्येही वाढ होत आहे. त्याचा परिणाम औषधांची मागणी वाढण्यामध्ये झाला आहे. व्यापार आणि मागणी वाढल्याने औषधी वनस्पतींची शेतीमध्ये लागवड करण्याचे प्रमाणही वाढले असून, त्यातून चांगल्या दर्जाचे पॅकेजिंग, स्वच्छता यांचाही वापर वाढला आहे. आतापर्यंत जंगलातून उपलब्ध होणाऱ्या औषधींचा वापर विविध प्रकारच्या सौदर्य प्रसाधनांमध्ये होऊ लागला आहे. केनियामध्ये या साऱ्या प्रक्रियेचा जागतिक कृषीवन संस्थेच्या वतीने अभ्यास करण्यात आला. त्याबाबत माहिती देताना अभ्यासाच्या मुख्य संशोधिका जोनाथन मुरियुकी यांनी सांगितले, की औषधी वनोपजाच्या विक्रीमध्ये सातत्याने वाढ होत असून, ग्राहकांकडून अधिक चांगल्या दर्जाच्या पॅकेजिंगची मागणी होत आहे. त्यामुळे वनस्पती मिळवणारे, पिकवणारे, गोळा करणारे, त्यावर प्रक्रिया व निर्मिती करणारी एक मूल्यवर्धित साखळी तयार झाली आहे. त्यामध्ये निर्यातदारांचाही समावेश आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष फॉरेस्ट ट्रिज ऍण्ड लाइव्हलीहूड या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

अभ्यासातील निष्कर्ष ः

विक्रीच्या साखळीच्या प्रत्येक टप्प्यांचा अभ्यास करण्यात आला. लागवड आणि विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळण्यास मदत झाली आहे.

-  69 टक्के व्यापारी अद्यापही जंगली झाडापासून उपलब्ध होणाऱ्या उत्पादनाची मागणी करत आहेत. जंगली उत्पादनामध्ये शेतात उत्पादीत मालापेक्षा अधिक प्रमाणात औषधी गुणधर्म असल्याचे त्यांचे मत आहे. साधारणतः जंगली वनस्पती या अत्यंत सुपीक अशा जमिनीमध्ये वाढत असल्याचा हा परिणाम मानला जातो.  तसेच त्यामध्ये फारसा मानवी हस्तक्षेप होत नाही. 

- 49 टक्के व्यापारी औषधी वनस्पती शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. जे व्यापारी शेतीमध्ये उत्पादीत मालाची मागणी करतात. त्यांच्या मते, जंगलातून आवश्यक त्या प्रमाणात औषधी उत्पादनाची पुर्तता होत नाही. तसेच जंगलाच्या रक्षणासाठी असलेल्या अनेक नियमांचा अडसर येतो. त्याऐवजी प्रत्यक्ष शेतीमध्ये ही उत्पादने घेतल्याने एकाच वेळी अधिक प्रमाणात औषधी कच्च्यामालाची उपलब्धता होते. त्यातून व्यापारामध्येही वृद्धी होत आहे. तरीही व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये योग्य त्या पद्धतीने मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तसेच या प्रक्रियेमध्ये महिलांना अधिक संधी देण्याची गरज असल्याचे मत अभ्यासामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

- पारंपरिक पिकांच्या तुलनेत पर्याय म्हणून औषधी वनस्पती पिकाची लागवड वाढण्याची गरज आहे.
जर्नल संदर्भ ः
    Jonathan Muriuki, Steven Franzel, Jeremias Mowo, Peris Kariuki, Ramni Jamnadass. Formalisation of local herbal product markets has potential to stimulate cultivation of medicinal plants by smallholder farmers in Kenya. Forests, Trees and Livelihoods, 2012; 21 (2): 114 DOI: 10.1080/14728028.2012.721959

कुजवण प्रक्रियेसाठी हवामानापेक्षा वाळवी, बुरशी ठरल्या सरस


लाकडाच्या कुजण्याच्या प्रक्रियेवर हवामानापेक्षा वाळवी आणि बुरशींच्या संख्येचा अधिक प्रभाव पडत असल्याचे अमेरिकेत झालेल्या संशोधनातून पुढे आले आहे.  हे संशोधन जर्नल नेचर क्लायमेट चेंज मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

आजवर लाकडाच्या कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये तापमानाची भूमिका महत्त्वाची असल्याचे मानले जात होते. कुजण्याच्या प्रक्रियेतून मुक्त होणाऱ्या कार्बनच्या प्रभाव जंगलातील पर्यावरणावर होत असतो. हे कर्बवायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जंगलातील विविध अवशेषांच्या कुजण्याच्या प्रक्रियेवर सेंट्रल फ्लोरीडा युनिव्हर्सिटी आणि बफेलो स्टेट युनिव्हर्सिटी येथील संशोधकांनी अधिक अभ्यास केला. त्यांना लाकडाच्या कुजवण्याच्या प्रक्रियेमध्ये बुरशी आणि वाळवी या तापमानापेक्षा मुख्य भुमिका निभावत असल्याचे दिसून आले आहे.

असे झाले प्रयोग ः 

- स्थाननिहाय सरासरी कुजवण दर हा प्रामुख्याने त्या स्थानाच्या हवामानाशी जोडला गेला. मात्र, या संशोधनामध्ये त्या स्थानावरील बुरशी आणि वाळवीच्या संख्येचा प्रभाव अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


- सुमारे 13 महिने 160 पाईन वृक्षाच्या लाकडावर पूर्व अमेरिकेतील पाच वन विभागामध्ये  प्रयोग करण्यात आले. कुजवण प्रक्रियेचा अभ्यास व विश्लेषण करण्यात आले. त्या बाबत माहिती देताना जीवशास्त्रज्ञ जोशुआ किंग यांनी सांगितले, की हवामानाच्या बदलाचा कुजवण्याच्या प्रक्रियेमध्ये मोलाचा वाटा असल्याचे मानले जात होते. मात्र, छोट्या किटकांनी आणि बुरशीनी कुजवण प्रक्रियेवर आपले नियंत्रण अधिक असल्याचे दाखवून दिले आहे. अर्थात, स्थाननिहाय बुरशी आणि वाळवीच्या कुजवण प्रक्रियेचा दर वेगवेगळा आढळला आहे. 
--------


सेंट्रल फ्लोरीडा विद्यापीठातील वाळवी आणि मुंग्यावरील तज्ज्ञ जोशुआ किंग.

जर्नल संदर्भ ः
    Mark A. Bradford, Robert J. Warren II, Petr Baldrian, Thomas W. Crowther, Daniel S. Maynard, Emily E. Oldfield, William R. Wieder, Stephen A. Wood, Joshua R. King. Climate fails to predict wood decomposition at regional scales. Nature Climate Change, 2014; DOI: 10.1038/nclimate2251

सोयाबीनवरील बुरशींच्या अभ्यासासाठी नवी पद्धती विकसित

बुरशीमुळे फोमोप्सीस सीड डिके (पीएसडी) या रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीनसह अन्य पिकावर होतो. या सोयाबीनवरील रोगकारक बुरशींचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील कृषी संशोधन संस्थेमध्ये नवे तंत्र विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे सोयाबीन पिकामध्ये बुरशीसाठी प्रतिकारकता निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे. हे संशोधन जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजिकल मेथडस् या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

2012 मध्ये अमेरिकेच्या दक्षिणेतील सोळा राज्यामध्ये फोमोप्सीस सीड डिके या रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे उत्पादनामध्ये 2 दशलक्ष बुशेल इतकी घट झाली होती. पीएसडी हा रोग मुख्यतः फोमोप्सिस लॉन्जीकोला या बुरशीमुळे होतो. या रोगामध्ये सोयाबीन बियांच्या भौतिक दर्जावर परिणाम होतो. तसेच त्यातील प्रथिने आणि तेलाच्या दर्जावर विपरीत परिणाम होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा वापर, रोगाचा यजमान नसलेल्या पिकांटी फेरपालट आणि खोलवर मशागतीसाठी धोरणांचा अवलंब प्रामुख्याने केला जातो. या रोगासाठी प्रतिकारक जाती विकसित करणे हीच अधिक कार्यक्षम पद्धती असू शकते, असे मिसिसिपी येथील कृषी संशोधन संस्थेच्या क्रॉप जेनेटिक्स रिसर्च युनिट येथील वनस्पती विकृती शास्त्रज्ञ शुक्क्षीयान ली यांनी सांगितले.

मातीतील जिवाणू वापरला निरीक्षण प्रक्रियेसाठी...

वनस्पती विकृती शास्त्रज्ञ शुक्क्षीयान ली फ्लुरोसन्स मायक्रोस्कोपच्या साह्याने फोमोप्सिस लॉन्जीकोला या सुक्ष्मजीवाचे निरीक्षण करत असताना. (स्रोत ः क्रॉप जेनेटिक रिसर्च युनिट)

- फोमोप्सिस प्रतिरोध प्रकल्पांतर्गत ली यांनी बुरशी पेशीय पातळीवर कशा प्रकारे हानी पोचवते, याचा अभ्यास केला. त्यामध्ये मातीतील जिवाणूंची एक जात ऍग्रोबॅक्टेरिअम ट्युमेपेसियनचाही समावेश होता. ही जात सामान्यपणे जनुकिय अभियांत्रिकी प्रक्रियेसाठी व नव्या जाती विकसित करण्यासाठी वापरली जाते.


- या जिवाणूंच्या जनुकांचा प्रतिजैविक मार्कर म्हणून आणि हिरव्या चमकदार प्रथिनाचा (GFP)बुरशीच्या पेशी केंद्रकामध्ये वापर केला. त्यामुळे नवी पी. लॉन्जिकोला प्रजाती प्रथिने निर्मिती आणि हिरव्या चमकदार प्रकाश निळ्या ते अतिनील दरम्यानच्या प्रकाशामध्ये करू लागल्या. त्याचा उपयोग संवेदनशील आणि प्रतिकारक जातीच्या सोयाबीनच्या बियामध्ये होणाऱ्या रोग प्रादुर्भावाच्या प्रक्रियेच्या अभ्यासासाठी केला.


- या प्रक्रियेमुळे पीएसडी रोगाच्या प्रतिकारकतेच्या मुळ स्रोतांची ओळख पटविणे शक्य होईल. तसेच प्रत्यक्ष शेतावर रोगांच्या लक्षणांसाठी कराव्या लागणाऱ्या रोग चाळणी प्रक्रिया करायची गरज राहणार नाही. ही पारंपरिक पद्धती अत्यंत वेळखाऊ आहे.



सोमवार, ९ जून, २०१४

शेतीला बसणार पाल्मर ऍमरंथ तणाचा फटका

पाल्मर ऍमरंथ (Amaranthus palmeri) हे तण सोनारण वाळवंट आणि नैर्ऋत्य अमेरिकेतील स्थानिक वनस्पती आहे. ती पिकामध्ये अधिक स्पर्धा करते.

अमेरिकी शेतीला बसणार पाल्मर ऍमरंथ तणाचा फटका


तण खाई धन ही म्हण मराठीमध्ये रूढ आहे, त्यावर आता इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधकांनी शिक्कामोर्तब केले आहे. अमेरिकेतील कपाशीमध्ये आढळणाऱ्या पाल्मर ऍमरंथ या तणामुळे शेतीउद्योगाला मोठा फटका बसणार असल्याचा अहवाल त्यांनी नुकताच प्रकाशित केला आहे.

पाल्मर ऍमरंथ (Amaranthus palmeri) हे तण अत्यंत वेगाने व पिकांच्या वाढीच्या सर्व हंगामामध्ये वाढते. तसेच त्यापासून मोठ्या प्रमाणात बिया तयार होतात. त्यामुळे हे तण वेगाने पसरते. दुष्काळ आणि उष्णतेला हे तण सहनशील आहे. त्याचप्रमाणे अनेक तणनाशकांनाही प्रतिकारकता विकसित होत असल्याचे अहवालात समोर आले आहे. या तणाचे नियंत्रण करण्यासाठी बिया येण्यापूर्वीच्या अवस्थेमध्ये काढणे किंवा चार इंचापेक्षा कमी उंचीचे असताना तणनाशकांचा वापर करणे हे दोनच उपाय राहतात. एकदा चार इंचापेक्षा वाढली, की तणनाशकांचा परिणामकारकता कमी होत जाते.

अहवालातील महत्त्वाचे...

 




- अमेरिकेतील (विशेषतः जॉर्जिया) कपाशी उत्पादनामध्ये या तणांचा प्रादुर्भाव अधिक आहे. अनेक शेतकऱ्यांमध्ये या तणाच्या धोक्याची कल्पना असल्याचे दिसत नसल्याचे संशोधक ऍरॉन हॅगर यांनी सांगितले. 

- जॉर्जियामध्ये तणाच्या नियंत्रणासाठी होत असलेल्या साधारणपणे प्रति एकर 25 डॉलर खर्चामध्ये या तणामुळे 2010 पासून सुमारे 60 ते 100 डॉलर प्रति एकरपर्यंत वाढ झाली. त्यामुळे या राज्यामध्ये एक दशलक्ष एकर कपाशी क्षेत्रातून माणसांच्या साह्याने पाल्मर ऍमरंथ काढणीसाठी किमान 11 दशलक्ष डॉलर इतका खर्च झाला. हा नेहमीच्या खर्चापेक्षा कितीतरी अधिक होता.

- अमेरिकी कृषी विभागातील संशोधक ऍडम डेव्हीस यांनी नुकत्याच मांडलेल्या अहवालानुसार, पाल्मर ऍमरंथ या तणामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये 78 टक्के आणि मक्याच्या उत्पादनामध्ये 91 टक्के घट होऊ शकते. काही ठिकाणी तर सोयाबीनच्या पिकापेक्षा या तणाची वाढ अधिक झाल्याने सोयाबीन पीक शेतात दिसून येत नाही.

- इल्लिनॉईज प्रांतातील अर्ध्यापेक्षा अधिक भागामध्ये या तणाने ग्लायफोसेट या सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या तणनाशकांसाठी प्रतिकारकता विकसित केल्याचे दिसून आले.
------------------------