सोमवार, ९ जून, २०१४

शेतीला बसणार पाल्मर ऍमरंथ तणाचा फटका

पाल्मर ऍमरंथ (Amaranthus palmeri) हे तण सोनारण वाळवंट आणि नैर्ऋत्य अमेरिकेतील स्थानिक वनस्पती आहे. ती पिकामध्ये अधिक स्पर्धा करते.

अमेरिकी शेतीला बसणार पाल्मर ऍमरंथ तणाचा फटका


तण खाई धन ही म्हण मराठीमध्ये रूढ आहे, त्यावर आता इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधकांनी शिक्कामोर्तब केले आहे. अमेरिकेतील कपाशीमध्ये आढळणाऱ्या पाल्मर ऍमरंथ या तणामुळे शेतीउद्योगाला मोठा फटका बसणार असल्याचा अहवाल त्यांनी नुकताच प्रकाशित केला आहे.

पाल्मर ऍमरंथ (Amaranthus palmeri) हे तण अत्यंत वेगाने व पिकांच्या वाढीच्या सर्व हंगामामध्ये वाढते. तसेच त्यापासून मोठ्या प्रमाणात बिया तयार होतात. त्यामुळे हे तण वेगाने पसरते. दुष्काळ आणि उष्णतेला हे तण सहनशील आहे. त्याचप्रमाणे अनेक तणनाशकांनाही प्रतिकारकता विकसित होत असल्याचे अहवालात समोर आले आहे. या तणाचे नियंत्रण करण्यासाठी बिया येण्यापूर्वीच्या अवस्थेमध्ये काढणे किंवा चार इंचापेक्षा कमी उंचीचे असताना तणनाशकांचा वापर करणे हे दोनच उपाय राहतात. एकदा चार इंचापेक्षा वाढली, की तणनाशकांचा परिणामकारकता कमी होत जाते.

अहवालातील महत्त्वाचे...

 




- अमेरिकेतील (विशेषतः जॉर्जिया) कपाशी उत्पादनामध्ये या तणांचा प्रादुर्भाव अधिक आहे. अनेक शेतकऱ्यांमध्ये या तणाच्या धोक्याची कल्पना असल्याचे दिसत नसल्याचे संशोधक ऍरॉन हॅगर यांनी सांगितले. 

- जॉर्जियामध्ये तणाच्या नियंत्रणासाठी होत असलेल्या साधारणपणे प्रति एकर 25 डॉलर खर्चामध्ये या तणामुळे 2010 पासून सुमारे 60 ते 100 डॉलर प्रति एकरपर्यंत वाढ झाली. त्यामुळे या राज्यामध्ये एक दशलक्ष एकर कपाशी क्षेत्रातून माणसांच्या साह्याने पाल्मर ऍमरंथ काढणीसाठी किमान 11 दशलक्ष डॉलर इतका खर्च झाला. हा नेहमीच्या खर्चापेक्षा कितीतरी अधिक होता.

- अमेरिकी कृषी विभागातील संशोधक ऍडम डेव्हीस यांनी नुकत्याच मांडलेल्या अहवालानुसार, पाल्मर ऍमरंथ या तणामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये 78 टक्के आणि मक्याच्या उत्पादनामध्ये 91 टक्के घट होऊ शकते. काही ठिकाणी तर सोयाबीनच्या पिकापेक्षा या तणाची वाढ अधिक झाल्याने सोयाबीन पीक शेतात दिसून येत नाही.

- इल्लिनॉईज प्रांतातील अर्ध्यापेक्षा अधिक भागामध्ये या तणाने ग्लायफोसेट या सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या तणनाशकांसाठी प्रतिकारकता विकसित केल्याचे दिसून आले.
------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा