युरोपिय संघाने घेतला पुढाकार
चीज उत्पादनातील उपपदार्थ निवळी (व्हे) पासून पोषक प्रथिने वेगळी करण्यासाठी जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ होहेनहेईम आणि फ्राऊनहॉपर आयजीबी या संस्थांनी प्रयत्न सुरू केले आहे. त्यांनी इलेक्ट्रोमेब्रेन या नव्या पद्धतीचा व्यावसायिक वापर करण्यासाठी व्हे टू फूड या प्रकल्पाची आखणी केली आहे.
चिज उत्पादनामध्ये व्हे किंवा निवळी हा उपपदार्थ मोठ्या प्रमाणात तयार होतो. एकट्या युरोपमध्ये 81 दशलक्ष टन प्रति वर्ष व्हे तयार होतो. त्यातील केवळ चाळीस टक्के व्हे वर प्रक्रिया होते. त्यापासून विविध पदार्थांचा निर्मिती केली जाते. मात्र, तरिही वाया जाणाऱ्या व्हेचे प्रमाण 60 टक्क्यांपर्यंत आहे. ते अनेक वेळा काही प्रक्रिया न करता ते टाकून दिले जाते. थोडक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पोषक घटक वाया जातात.
या वाया जाणाऱ्या घटकांचा खाद्यामध्ये वापर करण्याच्या दृष्टीने युरोपिय संघाच्या आर्थिक साह्याने युनिव्हर्सिटी ऑफ होहेनहेईम आणि फ्राऊनहॉपर आयजीबी या संस्थांनी व्हे टू फूड हा प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे.
व्हेमधील उच्च दर्जाची प्रथिने मिळवून त्याचा खाद्यामध्ये वापर करण्यासाठी नव्या इलेक्ट्रोमेब्रेन प्रक्रियेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाबाबत माहिती देताना प्रकल्पाच्या मुख्य डॉ. ऍना ल्युसिया वास्क्वेझ यांनी सांगितले, की अन्न व खाद्य उद्योगासाठी व्हेमधील प्रथिने मोलाची असून, अनेक खाद्य पदार्थामध्ये नैसर्गिक बंध घटक म्हणून वापरले जातात. त्याच प्रमाणे शिशूखाद्य आणि पोषक खाद्य निर्मितीसोबतच खेळाडूंसाठी प्रथिनयुक्त पेयांच्या निर्मितीसाठी केला जातो. या साठी व्हेपासून प्रथिने वेगळी करणे आवश्यक असते. व्हेमधील ऍण्टीथ्रोम्बोजेनिक केसिन मॅक्रोपेपटाईड प्रकारची प्रथिने वेगळी करण्यासाठी काही मुलभूत पद्धतीचा सध्या वापर होतो. चाळणीच्या माध्यमातून एकूण प्रथिने वेगळी केली जातात. त्यातील प्रत्येक घटक वेगळे करणे शक्य होत नाही.
अशी आहे इलेक्ट्रोमेब्रेन पद्धती
प्रथिनांचे त्यांच्या पोषकतेनुसार आणि कार्यानुसार वेगळे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी होहेनहेईम विद्यापीठामध्ये इलेक्ट्रोमेब्रेन प्रक्रिया विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये दाबाखाली व विद्यूत क्षेत्रामध्ये गाळण प्रक्रिया केली जाते. त्यामुले प्रथिने त्यांच्या आकारानुसार आणि त्यांच्यावर असलेल्या विद्यूत भारानुसार वेगळी केली जातात. त्यामुळे व्हेपासून अधिक प्रथिनांचे उत्पादन मिळते. तसेच दरवेळी गाळण यंत्रणासाठी साफ करण्याची गरज राहत नाही. त्यामुळे साफसफाईसाठी होणारा पाण्याचा अपव्यय कमी होतो. या पद्धतीच्या प्राथमिक चाचण्यामध्ये व्हेपासून ए लॅक्टलब्युमिन आणि बी लेक्टोग्लोब्युलिन प्रकारची प्रथिने वेगळी करणे शक्य झाले आहे.
खाजगी कंपन्याच्या सहकार्याने उभारणार स्वयंचलित प्रकल्प
इलेक्ट्रोमेब्रेन ही प्रक्रिया व्यावसायिक दृष्ट्या वापरण्यासाठी अधिक वेगवान आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक सुरक्षित करण्यासाठी संशोधक या प्रकल्पामध्ये संशोधन करणार आहेत. त्यासाठी स्वयंचलित प्रक्रिया पद्धतीचा पथदर्श प्रकल्प रोविता आणि श्वार्व्झल्डमिल्च या खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे. स्वयंचलित प्रकल्पामुळे प्रथिनांचे उत्पादन वाढण्यासोबतच ऊर्जा वापर व निर्मिती खर्चात बचत होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा